आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐





1】 भारताचा उध्दारकर्ता.. महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर..-आचार्य प्र. के. अत्रे... !!



पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युद्धाच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले कि, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणी भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाज व्यवस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दार करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू - मुसलमानांना त्यांच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले कि, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बुध्दधर्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हाल, अपेष्टा आणि छळ यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरहि प्राशन करावे लागले अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला कि, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकात जाई. धमन्याधमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतिक बनले. हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्यां छळाची आणि अपमानाची त्यांनी लवमात्रही पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुली आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही; अशी त्यांची जिद्द होती आणि ति त्यांनी शेवटपर्यंत खरी करून दाखविली. जो धर्म तुम्हाला कुत्र्या मांजरा पेक्षाही हीन रीतीने वागवितो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यावधी हिंदूंना ते कित्येक वर्षांपासून बजावत होते.

           

 माणसासारख्या माणसांना अस्पृश्य मानणारी ति तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार आहे, असे त्यांनी सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. त्यामुळे हिंदूधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले कि आंबेडकर हे गझनीच्या महंमद पेक्षाही हिंदुधर्माचे भयंकर दुश्मन आहेत. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा कुर्तकोटीनी त्यांना सांगितले कि, आंबेडकरांना तुम्ही मारलेत कि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून १० आंबेडकर बाहेर पडतील. आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा हि हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला असे आंबेडकरांचे मत होते. धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्यापाशी बोलताना एकदा ते म्हणाले की, हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते; पण ह्या देशाच्या इतिहासात माझे नाव विध्वंसक म्हणून नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही.!

           

   हिंदूधार्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर नेहमी प्रखर टीका करीत असत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करीत हिंदू स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरत आहेत अशी पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली होती. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टीकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरोधात जसे गांधीजींनी युध्द पुकारले तसे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का पुकारू नये असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणा बाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात अशा तऱ्हेने मुलभूत मतभेद होते. म्हणून साम्राज्यशाहीविरोधी पातळीवर आंबेडकर आणि काँग्रेसची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजींच्या बद्दल मनात एवढी विरोधाची भावना असतांनाही केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची आपली मागणी मागे घेतली आणि पुणे करारावर सही केली. गोदशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजीचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदू समाजाला समजू नये याचे आम्हाला दुःख होते. पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले पण स्वतःचे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली तो उमेदपणा आणि खेळाडूपणा कॉंग्रेसने मात्र आंबेडकराशी दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेत्तर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत कि, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे जीवन गांधींनी आणि काँग्रेस ह्यांनी या देशातून नेस्तनाबूत करून टाकले.

            

नऊ कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळविण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे कॉंग्रेसने काहीही केले नाही. असे असताच देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, "जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचे भंग करू शकणार नाही; आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज न उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही.!" आंबेडकरांचे हे उद्गार त्यांच्या दैदीप्यमान देशभाक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वी असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची जवाबदारी त्यांनी पत्करली. "मनुस्मृती जाळा" असे सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे.! घटना तयार झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोडबिल तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम बाहेर उफाळून आल्या. त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रीमंडळातून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद अन्याय, विषमत नष्ट होऊन हिंदू समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता, आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ति घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्दैव हिंदू समाजाचे.! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वःताचा आणि सात कोटी असहाय्य नी हीनदीन अनुयायांचा उध्दार कारणासाठी त्यांना मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक बुध्दांना शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.

             

आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीमत्तेचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासानेची महान परंपरा चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून दुसरा कोण होता..? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते.  महार जातीत जन्माला आलेला माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणतीही एक कठीण विषय नव्हता कि ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाट्टेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती, हि गोष्ट फार थोड्या लोकाना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुद्धिवादी असले तरीही त्यांचा पिंड धर्मनिष्ठेचा होता. भावूक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्मांचा त्यांनी तौलानिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या* उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता असते असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले. त्यांना कसलेही आणि कोणतेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो, जे लिहितो ते खोटे आहे हे म्हणण्याची परमेश्वराची सुध्दा प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तीमत्वात सदैव संचारलेला असे; अनेक वर्षांच्या अध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने आंबेडकर शेवटी भगवान बुद्धांच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्याशिवाय केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच तारीख १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे ५ लाख लोकांना बुध्द धर्माची दिक्षा दिली तेव्हा "सारा भारत बुध्दमय करेन" अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांनी केली. मुंबईतील १० लाख अस्पृशांना थोड्याच दिवसांनी ते बुध्दधर्माची दिक्षा देणार होते, पण अदृष्टात काही निराळेच होते.

             

अन्यायाशी आणि जुलुमाशी संबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातला कण न कण असुसलेला होता. भगवान बुद्धांच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेरचा आसरा मिळाला तेव्हा त्यांच्या अंतःकरणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपण उध्दाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाउलींच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याचे जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्ता सुध्दा लागली नाही.

             

"मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदूधर्मात कधीही मारणार नाही." हि आंबेडकरांची घोषणा हिंदूधर्माविरूध्द रागाची नव्हती, सुडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे, शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी हि रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची हि शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा प्रकाश पडेल तसतसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उध्दारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे काही उज्वल आणि उदात्त आहे त्याचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचे ते महान प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे, ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत.

             

बाबांचे कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या गुणांचे स्मरण करावयाचे ? सात कोटी अस्पृश्यांवरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार..? आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू तरी कोण पुसणार..? त्यांनी ध्यानात धरावे कि, भारताच्या इतिहासात आंबेडकर आणि त्यांचे कार्य अमर आहे. त्यांनी जो मार्ग आखला आणि प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उध्दार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चरित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने जर आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट करण्याचा प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांना अभिवादन करतो..
-आचार्य अत्रे...✍️


【 Ref-आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा दैनिक "मराठा" मध्ये दिनांक ०७-१२-१९५६ रोजी प्रकाशित झालेला लेख】
------------------------------------------------------------
--------------------------


2】“जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे, पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते, तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागले नसेल. आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च सन्मानाचे पद मिळवता आले असते! त्यांच्यासारख्या अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राप्य असे काय होते? बरे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती. काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळविले असते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्यांचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही. पण ब्रिटिशांची सेवावस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या ‘देशभक्ती’ चा गणवेशही अंगावर त्यांनी चढविला नाही! सात कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वागावर काटेरी वस्त्रे चढविली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले.’’


–आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
-------------------------------------------------------------------------------------------------


3】आह्मी महार असतो तर" - आचार्य प्र. के. अत्रे 



हा प्रश्न गेले कित्येक दिवस आह्मी आमच्या मनाला विचारित आहोत. गेल्या महिन्यात नाग्पुर येथे आंबेडकरानी व त्यंचे दोन लाख महार यानी बौद्ध धर्माचा स्विकार केला.पुढल्या महिन्यात मुंबइ येथे दोन ते चार लाख महार बान्ध्वाना बुद्धधर्माची दिक्षा देणार आहेत. भगावन बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रच्ंड लाट या देशातील अस्प्र्श्य समाजामधे उलटलेली आहे.बुद्धधर्मीय झालेल्या महार्ंच्या अभीनदनांच्या दोन – तीन सभा मधे आह्मी हजर होतो. तेथील चैतन्य आणी हर्षाचे वातवरण आह्मी डोळ्यानी पाहिलेय. त्याच वेळी आमच्या मनात प्रश्न उद्भवला की , आह्मी स्वत: महार असतो तर काय केले असते ? भारतातील लक्षावधी लोक बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत ही काय समान्य घटना आहे ? शताकाशतकात न घडलेली ही महान ऎतिहासीक घटना आहे, पण एव्हढी क्रांतीकारक घटना होत असताना त्याची देशात प्रतिक्रिया काय घडत आहे ? लक्षावधी अस्प्रुश्य समाज बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत हे पाहुन हिन्दु समाजाला काय वाटत आहे ? काही नाही. अक्षरशा काही नाही. कोणालाही त्याबद्धल काही वाटत नाही आन्नद वाटत नाही व दुख ही वाटत नाही. सावरकरान्नी ‘ केसरी ’ त ह्यावर टिका केली असेल तेव्हढीच. लक्षावधी लोक अस्प्रुश्य बौद्ध झाले ह्याचा हिन्दु समाजाला केव्ह्ढा धक्का बसायला पाहिजे होता. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निशेधाच्या वा शोकाच्या म्हणा , प्रच्ंड सभा भ्रवल्या व्हव्या होत्या, पण असे काहीच घडले नाही. ह्याचा अर्थ हाच नव्हे काय की, हिन्दु धर्मातुन कोणी कितीही संखेने बाहेर पडले तरी, बाकीच्या हिन्दुसमाजाला त्यचे काहीच वाटत नाही, जणु काही तो असेच म्हणत असतो की, ‘जा, हवे तितके जा, अम्च्या धर्मातुन जा,आमच्या धर्माचे आणी समाजाचे तुमच्या जाण्याणे काडी इतका ही नुकसान होणार नाही ‘ 'गेली पाच हजार वर्षे परधर्मात जाण्यार्या सह्स्त्रावधी हिन्दुंच्या बद्धल बाकीच्या हिन्दु समजाची हीच बेफिकीरी व बेवर्वाइची व्रुत्ती आहे. हिन्दु धर्मात बाहेरुन कोणी येण्याचा मुळी प्र्श्नच उत्प्न्न होत नाही . जो उठतो तोह य्हा ध्र्मातुन बाहेर पडतो . ह्या गोष्टीचा विच्रार करणे जरुर आहे , त्यावर उपाय शोधुन काढणे आवश्यक आहे असे हिन्दु लोकाना निवा समाजाला मुळीच वाटत नाही. आंबेडकरानी व अनुयायानी दिक्षा घेतली ह्याचे आह्माला आश्चर्य आणी वाइट वाटत नाही , उलट आनन्द वाटतो. कोणी म्हणेल की तुह्मी हिन्दु धर्माचे शत्रु आहे.आंबेडक्रानी व त्यांच्या अनुयाय्नी ‘धर्म्मांतर‘ केले हा शब्द प्रयोग आह्म्हाला पसंत नाही, त्यानी धर्म स्विकार केला असेच आह्मी म्हणु . अस्प्रुश्य समाज हा हिन्दु आहे ही गोष्ट्च मुळी आह्माला मान्य नाही . आह्मी त्याना धर्मा पासुन नेहमीच दुर ठेवले आहे , म्हणुन त्यानी बुद्धधर्म स्विकरला, ह्याब्द्धल हिन्दुना शोक करण्याचा हिन्दुमात्राना अधिकार नाही. बुद्धधर्म हा हिन्दु धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दिदशहाणे करतात , तो त्यांचा मत्सर आणी घमेंडखोरपणा आहे . कोणी म्हणत बौद्ध होवुन त्यांची अस्प्रुश्यता जाणार नाही . कोणी म्हणत बौद्ध होवुन त्यांची आर्थीक सुधारणा होणार नाही . असे म्हणणार्याना बौद्धधर्म स्विकारण्यारयांची भावना मुळी कळलीच नाही . बौद्ध झाल्याने हिन्दु लोक आपल्याला अप्र्युश्य समलजणार नाही आपली आर्थीक सुधराणा होणार नाही ही गोष्ट काय आंबेडकराना समजत नाही ? आंबेडकराना त्याची बिल्कुल पर्वा नाही . उलट झगडुन मिळविलेल्या आपल्या राजकिय हक्कंवर पाणी सोडायलासुद्धा ते तयार झाले आहेत. ह्याचे कारण धर्माला आणी संस्क्रुतीला हजारो वर्षे आचवलेल्या कोट्यावधी अस्प्रुश्याना न्यायावर आणी समतेवर आधारलेल्या अका महान धर्माची , तत्वद्न्यनाची आणी संक्रुतीची दिक्षा देण्याची आंबेडकराना तळमळ लागली आहे. बुद्धधर्माच्या दिक्षातील आचारांचे जर समाज काटेकोर पालन करील तर एक पिढीच्या आत ह्या सर्व समाजाची बौद्धीक आणी नैतीक उंची सर्वसमान्य हिन्दु समाजपेक्षाही वाढल्यावाचुन राहणार नाही. बुद्धधर्माचा स्विकार हा सप्रुश्य समाजाचा महान प्रयत्न आहे. त्याना नावे ठेवण्याचा हिन्दुना अधिकार नाही. आम्ही महार असतो तर हेच केले असते.


लेखक - आचार्य प्र. के. अत्रे..
【Ref-.मराठा-२२/११/१९५६...】
(संकलन - राहुल गायकवाड)
-----------------------------------------------------


4】असा प्रेम व असा शोक आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही !!
छत्तीस वर्षांपुर्वी टिळक मरण पावले त्यावेळी साऱ्या भारताला दुःख झाले, पण त्या दुःखाचे स्वरुप सामुदायीक होते, वैयक्तीक नव्हते. गांधीच्या मृत्युमुळे हजारो लोक घाव मोकळुन शोक करत आहेत, असा देखावा काहीसा पहावयास मिळाला नाही. पण, डा.आंबेडकरांच्या  मृत्युनंतर त्यांचे लक्षावधी अनुयायांचे त्यांच्यावरील अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्युने त्यांना झालेल्या अपरंपार शोकाचे जे ह्रदयद्रावक निदर्शन आम्हाला पहावयास मिळत आहे. त्याला खरोखरच तुलना नाही.
आंबेडकरांचा मृत्यु हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्युसारखा वाटतो. आंबेडकरांच्या मृत्युची वार्ता ऐकुण त्यांच्या कित्येक अनुयायांना दुःखतिरेकाने मुर्छा आली. कित्येक भिंतीवर डोके आदळुन शोक करु लागले. आंबेडकरांचे शव जेव्हा सांताक्रुझच्या विमानतळावर आले, तेव्हा जमलेल्या असंख्य अनुयायांनी ''बाबा आम्हाला सोडुन कसे गेलात हो!'' असा हंबरडा फोडला. त्याने दगडाचे काळीज देखील दुभंगली असती. राजगृहात अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना भोवतालच्या एक मैलाच्या परीसरात त्यांच्या लेकरांचा प्रचंड महासागर जमला होता. त्याची कल्पना तो डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांच्याखेरीज इतरांना कशी येईल...?


हिंदु कॉलोनीत राहणारे स्पृश्य हिंदु रहिवाशी तो अभुतपुर्व देखावा पाहुन हतबद्ध झाले होते. डॉ. आंबेडकरांना देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक ह्या मुंबई शहरात आहेत, ह्याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती. स्मशानामध्ये अग्नीसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकाचा महापुर अंतःकरणाचे बांध फोडुन बाहेर पडला, आंबेडकरांच्या आणि कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करु लागलो.. तेव्हा लोक टाहो फोडुन एवढ्या मोठमोठ्याने रडु लागले कि, निसर्गालादेखील त्यांचे सांत्वन करता आले नसते. साऱ्या स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस पडला. एका माणसासाठी लक्षावधी लोक अशाप्रकारे अश्रु ढाळताना आणि शोक करताना आम्ही तरी कधी बघितले नव्हते आणि कोणी पाहिले असतील असे वाटत नाही.
लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांवर एवढे विलक्षण प्रेम का आहे....?? 


याच्या स्पृश्य हिंदु समाजातील लोकांनी खरोखरच विचार करायला हवा. आंबेडकर जोपर्यंत जीवंत होते तोपर्यंत अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते, सरकारचे ना स्पृश्य हिंदु जनतेचे. आंबेडकर म्हणजे सिंह होते, त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली कि शत्रुच्या छातीत धडकी भरत त्यांचे विरोधक त्यांना चराचरा कापत असत. कोणी कितीही विद्वान असला किंवा मुत्सुदी दिसला तरी त्याची आंबेडकरांसमोर डाळ शिजत नसे. बुद्धीमता, चरित्र्य ह्यांचे ते हिमालय होते. अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा आज हिमालय ढासळला म्हणुन ते रडत आहेत. पाच हजार वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता, असा महान नेता कोणत्या जन्मी लाभणार ह्या एका विचाराने त्यांची ह्रदये शतदा विदीर्ण होत आहेत !!


-अचार्य अत्रे यांचा लेख
---------------------------------------------
-------


5】 भारताच्या राजकीय, सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे,
आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाही पुनीत करणारे भारताचे तपोनिधि व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निद्रावस्थेंतच देहावसान झाल्याचे गुरुवार ता. ६-१२-५६ रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले! ही दुःखद वार्ता कानी पडताच सारा भारत विव्हळ झाला. ‘भारतातील हिंदु समाजातल्या अनिष्ट रुढींविरुध्द केलेल्या बंडाचे प्रतीक’ असे उद्गार डॉ.बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहताना नेहरुंनी ता. ६-१२-५६ रोजी लोकसभेत काढले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार ता. ६-१२-५६ रोजी रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आला. हजारों लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले. दुपारी तीन वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीघ सुरू होती. तीनच्या सुमाराला सुमारे वीस हजार लोक विमानतळावर हजर होते. ही गर्दी सारखी वाढतच होती. मुंबईत त्यादिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूस जागोजाग लोकांचे थवे उभे होते. या सर्वांच्या चेहेऱ्यांवर दुःखाची दाट छाया पसरलेली होती.अस्पृश्य समाजांतील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या. ‘आता आम्हाला कोण विचारणार?’ या आर्त वाणीने त्या एकमेकांकडे असहायतेने पहात होत्या.बाबासाहेबांच्या देहावसानाची बातमी पसरतांच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यांहून स्वयंस्फूतीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतःकरणाच्या तळमळीने दुखवटा व्यक्त केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृति गेले काही दिवस बरी नव्हती. ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीस हजर होते. बुधवारी मध्यरात्री ते झोपावयास गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही.गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचत्वांत विलीन झाले होते. निधन समयी त्यांचे वग पासष्ट वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नेहरु, दळणवळण मंत्री श्री जगजीवनराम, राज्यसभेचे उपसभापती श्री. कुष्णमूर्ति राव आदींनी अलीपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रध्दांजली अर्पण केली. लोकसभा व राज्यसभा यांचे कामकाज त्यादिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ तहकूब करण्यात आले.विमानतळ ते ‘राजगृह’...!!!त्या दिवशी पहाटे सांताक्रूझ विमानतळावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शव दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’या त्यांच्या निवासस्थानी आणले जात असताना मुंबईतील व उपनगरांतील जनतेने त्यांना जी भावनापूर्ण श्रध्दांजली वाहिली तशी यापूर्वी अन्य नेत्यास क्वचित वाहिली असेल.विमानातून डॉ. बाबासाहेबांचा पुष्पाच्छादित पार्थिव देह बाहेर काढताच विमानतळावरील डॉ. बाबासाहेबांच्या आप्तेष्ट स्त्रिया ओक्साबोक्शी रडू लागल्या. पुरुष मंडळींनासुध्दा आपले अश्रू आवरणे कठीण झाले. बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन येणारे इंडियन एअर लाईन्स कार्पोरेशनचे खास विमान पहाटे दोन वाजता सांताक्रूझ विमानतळावर उतरले. त्यावेळी विमानतळावर पंचवीस हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. डॉ.बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधि मिळावी म्हणून विमानतळाबाहेरील जागेत त्यांनी दोन रांगा केल्या होत्या. खुद्द विमानतळावर बाबासाहेबांचे आप्तष्ट व आचार्य मो. वा. दोंदे, बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव, श्री. बी. सी, कांबळे,श्री. मधु दंडवते, श्री. आर. डी. भंडारे व शेडयूल्ड कास्ट फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विमानांतून बाबासाहेबांचे शव बाहेर काढल्यावर त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिध्दार्थ आर्टस व सायन्स कॉलेज, सिध्दार्थ लॉ कॉलेज, सिध्दार्थ कॉमर्स कॉलेज, शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशन व भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेच्या ऍम्ब्युलन्समध्ये शव ठेवण्यात आले व तेथून मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला.डोळयांत अश्रू, हातात फुले...!!! सांताक्रूझ विमानतळ ते ‘राजगृह’ या पाच मैलांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री-पुरुष नागरिक त्या दिवशी
दुपारपासून आपल्या प्रिय नेत्याला
आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि
थंडीची पर्वा न करता उभे होते. डॉ.
बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या ऍम्ब्युलन्सची
वाट पहात अफाट जनसमुदाय कित्येक तास
तिष्ठत होता. त्यांच्या डोळयांत अश्रु आणि
हातात फुले किंवा हार होते. सारा समुदाय
अत्यंत शिस्तबद्व होता. ऍम्ब्युलन्सच्या पुढे
पोलिसांची मोंटार होती. परंतु त्या
मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या
सूचना दिल्या. जाण्यापूर्वीच शिस्त आणि
शांतता राखली जात होती.
बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा
म्हणून ऍम्ब्युलन्समध्ये खास प्रकाश योजनेची
व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रुझ ते
दादर हे पाच मैलांचे अंतर एरवी मोटारीने वीस
मिनिटात तोडता येते.परंतू सर्वांना
बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन मिळावे व त्यांना
पुष्पाजंलि वाहता यावी म्हणून ऍम्ब्युलन्सचा
वेग अगदी कमी करण्यात आला होता.
ऍम्ब्युलन्सने रात्री अडीच वाजता सांताक्रुझ
सोडले. परंतु ती दादरला राजगृहात येईपर्यत
पहाटेचे पांच वाजले होते. या एकाच
गोष्टीवरुन सांताक्रुझ, कुर्ला, सायन, माटूंगा,
दादर येथील नागरिक किती मोठया संख्येने
उपस्थित होते त्याची कल्पना येईल.
राजगृहापाशी...!!!
बरोबर पाच वाजून पाच मिनिटानी ऍम्ब्युलन्स
राजगृहाशी आली. तोपर्यत तेथे रात्रभर
साडेतीन लाख लोक ऍम्ब्युलन्सची वाट पहात
बसून होते. ‘बुध्दं सरणं गच्छामि’ ची
प्रार्थनाही तेथे सतत चालू होती. ऍम्ब्युलन्स
राजगृहापाशी येताच लोकांनी इतकी गर्दी
केली की, पांच सात मिनिटे पोलिसांना व
समता सैनिक दलाच्या सैनिकांनी ती आवरणे
अशक्य झाले. तथापि नेत्यांच्या विनंतीस
मान देऊन सर्वांनी पूर्ववत् शिस्त शांतता
स्थापन केली. बरोबर सव्वा पाच वाजता
मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व
उदबत्त्यांच्या सुवासांत डॉ. बाबासाहेबांचे
शव ऍम्ब्युलन्समधून उतरविण्यात आले. त्यावेळी
तेथे असलेले लाखो लोक धाय मोकलून रडत होते.
अर्ध्या तासानंतर डॉ.बाबासाहेबांच्या
पार्थिव देहाचे अत्यंदर्शन घेण्याची जनतेस मुभा
देण्यात आली. विमानतळावर उपस्थित
असलेल्या हजारों लोकांपैकी अनेक लोक चालत
आले होते. दुपारी तीन वाजल्यापासून ते
विमान येईल म्हणुन ते वाट पहात होते.
विमानतळावरील एक हमाल म्हणाला ”आज
खरोखर माझी डयुटी नाही. परंतु
बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन जवळून घेण्याची
संधी मिळावी म्हणून मी डयुटीवरचा पोशाख
घालून आलो आहे.’ विमानतळावरील दुसरा एक
अधिकारी म्हणाला, ”अापल्या आवडत्या
पुढाऱ्याचे दर्शन मिळावं म्हणून बारा बारा
तास वाट पाहणारे अनुयायी ज्याला
लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच
नाही.”
‘राजगृहा’तील दर्शन...!!!
‘राजगृहा’च्या पश्चिमाभिमुखसज्जांत
बाबासाहेबांचे शव ठेवण्यासाठी
शामियाना उभारण्यांत आला होता. या
शामियान्यांत पुष्पशय्येवर पार्थिव देह
ठेवण्यात आला. त्यांच्या उशाकडील बाजूला
बाबाचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते
होते. दर्शनोत्सुक जनतेला थोपवितांना
‘समता दला’ च्या सैनिकांना अतिशय जड
जात होते. पोलिसांच्या पलटणीही
लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत
होत्या. दलित जनतेला काबूत आणणे कठीण
जात होते. आदल्या दिवसापासून तिष्ठत
असलेल्या आणि क्षणाक्षणाला वाढत
असलेल्या त्या प्रचंड समुदायाचा धीर आता
सुटत चालला होता. अक्षरश: ओक्साबोक्शी
रडत हे स्त्री-पुरुष ‘राजगृहा’च्या कुंपणावर
लोटत होते. तरीसुध्दा ‘राजगृहा’
भोवतालच्या परिसरात एवढाही गोंधळ गर्दी
आढळून येत नव्हती. ‘समता दैनिक दला’ च्या
सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा करण्यात
यश मिळविले. या रांगा मध्य रेल्वेच्या दादर
स्टेशनपासून रुईया महाविद्यालयाला वळसा
घालून ‘राजगृहा’ च्या प्रवेशद्वारापाशी
पोहोचल्या होत्या.
नवयुग-मराठा तर्फे पुष्पाजंली...!!!
सकाळी साडेसात वाजल्यानंतर सर्व पक्षांचे
मान्यवर नेते अत्यंदर्शनासाठी व पुष्पांजली
अर्पण करण्यासाठी येऊ लागले. हिंदी
कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे
अध्यक्ष कॉ. मिरजकर, समाजवादी पक्षाचे नेते
रोहीत दवे व हॅरीस,मिल मजदुर पक्षाचे
बापूराव जगताप आदि मंडळी सकाळी पुष्पहार
अर्पण करून गेली. साडेआठच्या सुमारास
आचार्य अत्रे येऊन त्यांनी दैनिक ‘मराठा’व
साप्ताहीक ‘नवयुग’ तर्फे बाबासाहेबांच्या
पार्थिव देहाला पुष्पाजंली वाहिली.
बाबासाहेबांचे अत्यंदर्शन घेतांना आचार्य अत्रे
यांचे डोळे पाणावले. हे पाहून भोवतालच्या
मंडळींना शोकावेग आवरणे कठीण गेले.
स्मृतीला अभिवादन...!!!
श्री. नाना पाटील त्यादिवशी
साताऱ्याला होते. त्यांना ही दु:खद वार्ता
समजताच ते ताबडतोब मुंबईस निघून आले.
त्यांनीही बाबांच्या स्मृतीला अभिवादन
केले. कॉ.डांगे येथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने
सौ. उषाताई डांगे व कन्या यांच्यासह येऊन
त्यांनी पुष्पहार अर्पण केला.
बाबासाहेबांच्या या जुन्या सहकाऱ्याने
बाबासाहेबांच्या पुष्पशेजेवर शीर नमवितांच
तिथे गंभिर शांतता पसरली.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे कार्यवाह
श्री. राम मोहाडीकर ‘रुपारेल
महाविद्यालया’ चे प्राचार्य चि. व. जोशी,
‘सिध्दार्थ’ चे डॉ. हेमंत कर्णिक, प्रा. अनंत
काणेकर आदि नामवंत मंडळींनी पुष्पहार अर्पण
केले.


जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा,राज्यसत्तेपेक्षांहि मानवी अंत:करणातल्या भावना किती शक्तीमान, तेजस्वी व स्थलकालाची, अंतराची बंधने जुमानत नसतात.यांचे प्रत्युतर मुंबईच्या जनतेला ता. ३। ११। ५६ ला दिसून आले. बाबासाहे बांच्या परिनिर्वाण यात्रेसाठी जो दहा लाखांचा जनसागर त्यादिवशी गोळा झाला होता त्याने काही तास तरी मुंबइंचे सारे यांत्रिक जीवन स्थगितच केले होते. ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती.एखाद्या नदीला पुराचा लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रत्यावरून धावताना दिसत होत्या. जनसागराच्या भावनांचे जे विराट दर्शन दादर चौपाटीच्या परिसरांत पाहायला मिळाले, ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ति जगातल्या कोणत्याही अन्यायी शक्तिपुढे कधीच मान तुकवणार नाही याचा साक्षात्कार सर्वाना झाला.


(दै. मराठाच्या ७ डिसेंबर १९५६ च्या अंकातून साभार)

---------------------------------------------------------------------------------------------------



Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!