डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!
1】 !! धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीच १४ ऑक्टोंबर नव्हे !!
माझ्या अनेक लेखात बौद्ध धम्माचे विकृतीकरण या सदराखाली मी दशहरा / दसरा
या विषयी विस्तृत माहिती लिहीलेली आहे . रावण , दसबळी इ . जे मांडले गेले
आहे ते संपूर्ण बौद्ध धम्माच्या पाडवानंतरचे चित्रण आहे . आज कोणी रावण
किवा म्हैसासूर यांची उदाहरणे देऊन मांडत असेल किंवा आवतन देऊन सांगत
असतील तर तो बौद्ध धम्माच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्ट आहे . बौद्ध
धम्माचा इतिहास आणि अभ्यास करून पाहिलं तर या सर्व गोष्टी बौद्ध धर्माला
शह देण्यासाठी होत्या म्हणून काल्पनिकतेने सांगितल्या गेलेल्या पात्रांना
मोठ करण्यात काहीही उपयोग नाही . ज्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे
आहेत असाच बौद्ध धम्म सांगणे सर्वात अगोदर महत्वाचे आहे , रावण अथवा
म्हैसासुर अशी पात्रे रंगवून सांगणे आणि बौद्ध धम्माचे महत्व
लपविण्यासारखे आहे . बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी चे महत्व ओळखून आणि
त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४ ऑक्टोबर म्हणून
नव्हे तर अशोक विजयादशमी म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा पण हे अत्यंत
चूक आहे याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न मी करतो .
'दसरा' हा हिंदू चा सण त्याच दिवशी येतो म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन
दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा असे बरेच लोक सांगताना आढळतात पण
बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करणे आवश्यक आहे . सम्राट अशोक वयाच्या
२१ व्या वर्षी मगध च्या गादीवर बसला आपला राज्याभिषेक करून संपूर्ण भारत
देशाचा अनभिषीज्ञ सम्राट बनला एका मागून एक राज्ये अशोकाला शरण येऊ लागली
पण कलिंग देशाचा राजा चैत्र काही शरण येत नव्हता म्हणून सम्राट अशोकाने
कलिंग देशावर युद्ध पुकारले , युद्धात लाखो माणसे मारली गेली , लाखो लोक
जखमी झाले. हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि भीती
वाटली नाही. विजयाने बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता त्याचवेळी भन्ते
निग्रोध चारीकेसाठी चालले होते . बुद्धं सरणं गच्छामीचा निनाद सम्राट
अशोकाच्या कानावर पडला . अशोक म्हणतो , या भन्ते ,आपले स्वागत असो आपण
वेळेवर आलात , मला आशीर्वाद द्यावा ,मी आता सम्राट झालो . त्यावर भन्ते
म्हणाले , यात तू कसला आलास सम्राट , तू लाखो जीव हत्येचे पाप केले आहेस
, हे सारे कशासाठी ? तृष्णेपोटीच ना ! यात जनहित मुळीच नाही . या लोकांचा
आक्रोश तुला ऐकू येतो ना , हे सारे तुझ्याचमुळे झाले , असे दुष्कर्म तू
केलेले आहेस .
पुढे भन्ते तथागताचा मैत्री , अहिंसा तत्वाचा उपदेश अशोकाला करतात .
अशोकामध्ये बदल होऊन हाती असलेली तलवार सम्राट अशोक म्यान करतात आणि
म्हणतो ," मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही ,युद्ध करणार नाही
,आजपासून मी धर्मशील होणार , मी बुद्ध धम्माला शरण जाणार तेव्हा अशोक
बौद्ध धम्माचा स्वीकार करून भन्ते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची
दीक्षा घेतात . तो काळ म्हणजे इ . स . पूर्व २५४ आणि तो दिवस म्हणजे
अश्विन शुद्ध दशमीचा दिवस . तेव्हाच सम्राट अशोकाने एक जाहीरनामा आपल्या
राजमुद्रेत अंकित करून दसहारा म्हणून प्रसिद्ध केला आणि पुढे अनेक वर्षे
बौद्ध धम्माचे एक प्रतिक म्हणून अशोकविजयादशमी दसहारा हा उत्सव साजरा
करण्यात आला . सम्राट अशोकाने प्रजेला प्रजाधर्म आणि राजधर्म म्हणून
बौद्ध धम्म दिला , अनेक भिक्खूना परदेशात पाठविले , अनेक लेण्या , स्तंभ
उभारले . ८४००० स्तूप बांधले . लाखो करोडो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा
दिली .बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारलेला 'दसहारा ' नावाचा अधिकृत
जाहीरनामा बनवून त्यात आचरणाचे दहा तत्वे समाविष्ट करून अशोकविजयादशमी ,
दसहारा म्हणजेच कालांतराने दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला तो सम्राट
अशोकाचा नातू बृह्दत्त उर्फ बुद्धरथ याच्या काळापर्यंत .
सम्राट अशोकाने ८४००० स्तुपासाठी अमाप पैसा खर्च केला इ . स . पूर्व २६७
ला सुरु झालेलं काम अगदी झपाट्याने इ . स . पूर्व २६५ ला पूर्ण झाले
त्याचे कारण म्हणजे शहाणव्व कोटी सुवर्णमुद्रा खर्च करून हे बांधकाम
पूर्ण केले . सम्राट अशोक जगातील सर्वात बलाढ्य ,संपत्तीवान राजा होता
म्हणून प्राचीन भारताला सम्राट अशोकामुळे ' भारत सोने कि चिडिया ' किवा '
सोन्याचा धूर भारतातून निघत होता ' असे लोक आजही अभिमानाने म्हणतात .
पुढे पुष्पमित्र शुंगाने सम्राट अशोकाचा नातू सम्राट ब्रूहदत्त उर्फ
बुद्धरथ चा खून करून रक्तरंजित प्रतीक्रांती करून लाखो बौध्द
धर्मियांच्या , भिक्खुंच्या कत्तली केल्या . एका भिक्खूचे डोके जो आणेल
त्याला १०० सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या अर्थात सम्राट अशोकाच्या
वंशांची संपतीची देखील लुट केली आणि बौद्ध धम्माच्या पाडवासाठी 'दसहारा '
जो सम्राट अशोकाने धम्म उत्सव सुरु केला होता त्याला आपले विकृत रूप देऊन
धम्म आचाराची जी तत्वे होती तिचा पाडाव केला म्हणून आपल्यापरीने तोच सण
सूडभावनेने साजरे केले . बौद्ध धम्माच्या ज्या सांस्कृतिक बाबी लोकांना
आकर्षित करणाऱ्या होत्या कि बुद्ध मूर्तीची रथयात्रा , महोत्सव ,सण ,
उपोसथ इ स्वीकारून त्याचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले . मनु ला हाती धरून
मनुस्मृतीची रचना केली , रामायण , महाभारत, भगवदगीता ,पुराणे इ . काव्ये
निर्माण करून स्वतःला राम आणि मोर्य राजांना रावणासारखे दर्शवून बौद्ध
धम्माला मोठा शह दिला . अनेक स्तूप ,विहारे, लेण्या बळकावून त्याचे
ब्राह्मणीकरण केले . काहींनी ब्राह्मणी देवस्थाने बनविली ज्यात पंढरपूर ,
तिरुपती , बद्रीनाथ ,जग्गनाथपुरी अशी मुळची बुद्ध विहारे बळकावून त्याचे
ब्राह्मणीकरण केले .
अर्थात बाबासाहेबांनी १९५६ या वर्षात येणारी अशोकविजयादशमी अर्थात दशहारा
हा अश्विन शुद्ध दशमीचा दिवस निवडून सम्राट अशोकाने तथागत बुद्धाने
केलेले जगातील धम्मचक्र प्रवर्तन अनुकारून त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली
आणि धम्मचक्र प्रवर्तनचे अनुष्ठान केले . म्हणून आपण अशोकविजयादशमी चे
ऐतिहासिक महत्व आणि धम्माचे पालन करून अनुसरण करावे . जर १४ ऑक्टोंबर ला
धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला तर आपले नावाला आंबेडकरी म्हणवणारे ,
गणपती , दहीहंडी , नवरात्र साजरा करणारे १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र
प्रवर्तन दिन साजरा करतील पण दसरा या दिवशी पुष्पमित्र शुंगाने ब्राह्मणी
हिंदू परंपरेने सुरु केलेल्या सणाला आपट्याची पाने तोडत बसतील म्हणून हा
मूळ आपला दशहारा अर्थात अशोक विजयादशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन साजरे
करून परत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा एव्हढंच मला सांगाव वाटत
.
!!! नमो बुध्दाय जय भीम !!!
- प्रविण जाधव
-------------------------------------------------------
2】 अशोक विजयादशमी की 14 ऑक्टोबर... !!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मादीक्षेपूर्वी बौद्ध धम्माशी थेट संबधित असणारे दोनच महापुरुष 1. तथागत गौतम बुद्ध व 2. सम्राट अशोक. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा प्रसार केला. कलिंगा युद्धाच्या नंतर हिंसावादी सम्राट अशोकाने अहिंसावादी, शांतीचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला व त्यानंतर सर्व प्रजेला सम्राट अशोकाने बुद्धाच्या दहा पारमिता वर आधारीत दहा कलमी कार्यक्रम दिला. म्हणूनच पुढे तो दिवस अहिंसेने हिंसेवर मिळवलेला विजय व दहा कलमी कार्यक्रम म्हणून 'अशोक विजया दशमी' म्हणून लोकं साजरा करू लागले.
सम्राट अशोका नंतरच्या काळात फार काळ बौद्ध धम्माला अनुकूल राजाश्रय मिळाला नाही व मनुवाद्यांनी कालांतराने कट, कारस्थाने रचून बौद्ध धम्म भारतातून संपवला. त्यातूनच पुढे शेकडो वर्षांच्या चालत आलेल्या सम्राट अशोकाच्या 'अशोक विजया दशमी' ला (Counter) प्रतिक्रांती म्हणून रामायणातील कथा पूढे केली व त्याचा प्रसार केला. ज्यामुळे कालांतराने सम्राट अशोकाच्या विजया दशमीचा इतिहास झाकला गेला.
बौद्ध आणि हिंदू हे दोन्ही धर्म वेगळे आहेत. त्यामुळे हिंदू धर्माच्या संबंधित रामायणाच्या कथेशी, मग भले ती खरी असो की काल्पनिक, त्याच्याशी बौद्धांनी स्वताचा संबंध जोडू नये. त्यामुळे मुळात 'अशोक विजया दशमी' रामायणाशी संबंधित नसून, ती सम्राट अशोकाने केलेल्या धम्मक्रांतीशी संबंधित आहे, हे सत्य बौद्धांनी समजून घ्यावे. बाबासाहेबानां बौद्ध धम्माची दीक्षा घेताना, इतिहासातील सम्राट अशोकाच्या धम्मक्रांतीच्या इतिहासाच्या संदर्भाला जोडूनच धम्मदीक्षा घ्यायची होती. त्यामुळेच त्यांनी अशोकाच्या विजयादशमीची निवड केली होती आणि म्हणूनच तर बाबासाहेबांनी धम्मदिक्षेच्या कार्यक्रम पत्रिकेवरसुद्धा 'रविवार दि.14.10.56 (अशोक विजयादशमी)' असा स्पष्टपणे उल्लेख केलेला होता.
1956 साली अशोक विजया दशमी योगायोगाने 14 ऑक्टोबर ला रविवारच्या दिवशी आली होती. आता प्रश्न असा येतो, की जर बाबासाहेबाना धम्मदीक्षेचा कार्यक्रम जर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घ्यायचा होता असे जर मानले, तर मग त्यांनी 14 तारीखच का निवडली ? कारण त्याच महिण्यात 14 तारखेच्या अगोदर 7 ऑक्टोबर व नंतर 21 व 28 ऑक्टोबरला सुद्धा रविवारच होता. तरीसुद्धा बाबासाहेबांनी 7, 21 व 28 ऑक्टोबरची रविवारची तारीख निवडली नाही. त्यामूळे बाबासाहेबांनी सर्वांच्या सोयीचा रविवारचा दिवस निवडला हा दावाचं फोल ठरतो. (योगायोगाने 1956 चे ऑक्टोबर महिण्याचे कॅलेण्डर व 2018 चे ऑक्टोबर महिण्याचे कॅलेण्डर एकसमानच आहे, निरीक्षण केले तर 14 तारीखेचा गोंधळ दूर होईल). तसेच 1956 च्या पूर्वी 14 ऑक्टोबर या तारखेला कोणताही विशेष असा पूर्वइतिहास कधीच नव्हता. यावरून स्पष्ट होत की, केवळ विजयादशमी 1956 साली योगायोगाने 14 ऑक्टोबर या दिवशी आली होती, व बाबासाहेबांना विजयादशमीच्या दिवशीच धर्मांतर करायचे होते, त्यामुळेच बाबासाहेबांना त्या दिवशी धर्मांतर केले होते.
दुसरा मुद्दा अनेक जण असं बोलत आहेत की, बौद्ध धम्म आधुनिक, विज्ञानवादी आहे. त्यामुळेच बौद्धांनी धमचक्र प्रवर्तन दिन तिथीनुसार सण साजरा न करता तारखेनुसार करावा. जेणेकरून 14 ऑक्टोबरचा धमचक्र दिन पूर्ण जगात एकाच दिवशी साजरा होईल. मुळात ते लोक हे विसरत आहेत की येशू ख्रिस्तपूर्वीच्या सर्व घटना या पौर्णिमा, अमावस्येवर आधारित तिथी व कालगणनेनुसार केल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध कालगणना व हिंदु कालगणना यांचा सामावेश होतो. त्यापैकी बौद्ध कालगणना ज्याला 'बुद्धाब्द' असेही म्हणतात. बौद्ध कालगणनेची सुरुवात ही "पौर्णिमे" पासून होते. विजयादशमी ख्रिस्तजन्मापूर्वीची आहे. त्यामुळे ती पौर्णिमा, अमावस्येवर आधारीत तिथीनुसारच केली जाते. तिथी केवळ हिंदू धर्माशीच संबंधित नाही आहे, कारण तिथींची गणना पौर्णिमा, अमावस्येवर आधारीत केली जाते. जेव्हा तारखा अस्तित्वात नव्हत्या तेव्हा सर्व व्यवहार पौर्णिमा, अमावस्येवर आधारीत तिथीनुसारच केले जात होते व त्यामुळेच तिथी जगमान्य आहेत. त्यामुळेच तर बुद्ध जयंती सर्व जगात एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते.
विजयादशमी तिथीनुसार येते म्हणून विरोध करणारे व तारखेचा आग्रह धरणारे लोकं, बुद्ध जयंती आपण वैशाख पौर्णिमेला साजरी करतो हे का विसरतात आणि केवळ आपल्याच देशात नाही. तर पूर्ण जगात बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेला केली जाते. तसेच बौद्ध धम्मात पौर्णिमेला महत्व आहे. त्यांना सर्व बौद्ध राष्ट्रांत मान्यता आहे. मुस्लिमांची ईद सुद्धा चंद्राच्या भ्रमतीवर कालगणानेनुसार साजरी केली जाते.
तसेच अशोक विजया दशमीच्या दिवशी नागपूर मध्ये लाखो लोक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला दीक्षाभूमीवर जातात, त्याच दिवशी आरआरएस सुद्धा त्यांच्या स्वयंसेवाकांच मेळावा घेते. आरआरएसच्या स्वयंसेवाकांपेक्षा बौद्धांची संख्या 100 पटीने अधिक असते. ज्यामुळे आरआरएसच्या कार्यक्रम झाकला जातो व त्यांना अपेक्षित मीडिया कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे आरआरएसनेचं त्यांच्या काही हस्तकांमार्फत शिवजयंती प्रमाणेच धम्मचक्र प्रवर्तन दिना बाबतही तिथी की तारिख हा निरर्थक वाद उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेणेकरून धम्मचक्र प्रवर्तन दिन पूर्ण भारतात विशेषतः नागपूर मध्ये एकाच दिवशी साजरा होऊ नये. त्याला काही सुशिक्षित बौद्ध आजाणतेने बळी पडत आहेत. त्यामुळेच आरआरएसच्या या छुप्या षडयंत्राला बळी न पडता व 'तिथी की तारिख' या निरर्थक वादात न पडता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलेल्या दिवशीच धमचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा. जय भिम....
- प्रवीण जाधव....✍️
----------------------------------------------------------------
3】धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करायचा, १४ आॅक्टोंबर नाही. भिक्कु संघाद्वारे एका संस्थापक बांधनीतुन बुद्ध विचाराचा प्रचार व प्रचार सुरु झाला होता. बुद्धाची सैद्धांतिक मांडणी तयार झाल्यावर ज्याला लोकभाषेत ज्ञानप्राप्ती म्हटलं गेलं तेव्हा उरूवेला नदीकाठी ६ आठवडे बुद्ध या विचारात होता की जे मला कळालं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावं की नको ? पोहचावं तर कोणत्या मार्गाने ? अडीच हजार वर्षांपूर्वी आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, ईश्वर, याचं आस्तित्व नाकारुन वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व सामान्य लोकांना स्वीकारायला भाग पाडणं हे सोपं नव्हतं. समता न्याय बंधुभाव याची शिकवण देणारी ती जगातली सर्वात मोठी institutional planning होती जे सर्व सामान्य लोकांपासून ते धनिक व्यापारी ते विविध राजे यांना प्रभावित करणारी ठरली. राजकारणात लोककल्याणकारी सुत्र गोवण्याचे काम धम्मदेशनेतुन घडुन आणलं. पंच वर्गीय भिक्कु बुद्धाच्या शिकवणीतुन ज्ञान प्रसाराला सक्रीय झाले तो दिवसच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस म्हणून ओळखला जातो. याआधी हा दिवस नव्हता, ना ब्राम्हण कधी साजरा करत. म्हणुन धम्मचक्र प्रवर्तन दिन ही बौद्ध परंपरेतली celebration space आहे. याच दिवसाला, ऐतिहासिक संदर्भाला उजाळा देण्यासाठी बुद्धांच्या सुमारे अडीचशे वर्षांनंतर सम्राट अशोकाने धम्म चक्र दुसऱ्यांदा गतीमान केले. धम्म प्रसाराचे काम निश्चितच बुद्धापासुन ते अशोकापर्यत सतत रात्रंदिवस चालुच होतं पण अशोकाच्या संदर्भाने दुसऱ्यांदा चक्र प्रवर्तन किंवा गतीमान झालं यासाठी म्हटलं की इतिहासात ते तेव्हापर्यतचं सर्वात मोठं mass mobilization ठरलं. देश विदेशात बुद्ध विचार पोहचवण्याचं कार्य स्वता चक्रवर्ती सम्राटाने मिशन म्हणून पुर्ण केलं. बाबासाहेबांनी बौद्ध साहित्य व परंपरेचा जो अभ्यास केला तेव्हा या दिवसाचं त्यांना महत्व व ऐतिहासिक संदर्भ माहीत नसेल काय ? म्हणुन आधुनिक भारतात अडीच हजार वर्षांनंतर लाखो लोकांना सोबत घेऊन सर्वात मोठं ऐतिहासिक mass conversation घडुन आणलं. तेव्हा त्यांनी जो दिवस निवडला तेव्हा तो काही निव्वळ योगायोग नव्हता तर ऐतिहासिक संदर्भाशी अस्पृश्य समुहाला जोडण्याचा प्रयत्नाचे कटिबद्ध नियोजन होते. रामायन, महाभारताच्या भाकड कथा या सम्राट अशोक नंतर पाचव्या वंशातल्या बृहद्रथ मौर्यचा खुन पुष्पमित्र शुंगा या ब्राम्हण लष्करी अधिकाऱ्याने केल्या नंतर प्रसुत केल्या. नथुराम गोडसे बद्दल जसं आज कथा, नाटक, पुस्तक, कांदबऱ्या, चित्रपट यांचा भडिमार करुन खुनाची मुळपार्श्वभुमी व मानसिकता लपवली जाते तसंच तेव्हा घडलं. आणि हीच ब्राह्मणांची मोडंस ओपरेंडी आहे. कथा रचण्यात व तिचा प्रसार करुन सत्य भासवण्यात माहीर आहेत. ऐतिहासिक कोणत्याही पटलावर तुम्हाला हे दिसुन येईल. ही क्रांती प्रतिक्रांतीची डावपेच आहेत. बाबासाहेब जेव्हा म्हणतात, "The history of India is a history of mortal conflict between buddhism and Bramhinism". तेव्हा हे लक्षात येईल. आणि अस्पृश्य हे नव बौद्ध नाही. तर मुळचे पारंपरिक बौद्ध आहे. जेव्हा आपण ब्राम्हण धर्माला शरणागती नाकारली तेव्हा अवर्ण, अस्पृश्य ठरवलो गेलो होता. आपण संविधानाच्या माध्यमातून "आपला" मुळ धम्माचा उपासनेचा सार्वजनिक हक्क reclaim केला, परत मिळवला. याच ऐतिहासिक तथ्याला समोर आणण्यासाठी हा बाबासाहेबांनी अशोका विजयादशमी दिवस सामुहिक धर्मांतरासाठी निवडला. म्हणुन तारखेचा घोळात पडु नये.
कारण नवा नॅरेटीव, नवा डिस्कोर्स धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या दिवशी सेट झाला जो की भारतीय कालगणनेनुसार आहे. तिथे इंग्रजी तारखाचा जे १६ व्या शतकां नंतर भारतात आले, त्यात अडकु नका.
I repeat.... बाबासाहेब म्हणतात, "The history of India is a history of mortal conflict between buddhism and Bramhinism".
-Rahul Pagare...✍️
------------------------------------------------------------------------------------------------------
3】 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...!! !
दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू
धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व
नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी
दिक्षा दिली.
दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी
सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन
व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे
ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण
दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत.
तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने
दिशानिर्देश दिलेत त्यानुसार समाजबांधव
वागला कां याचा विचार करणे आवश्यक आहे.
बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की,
’आम्हाला इज्जत प्यारी आहे आहे, लाभ
प्य्रारा नाही.’
केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत
चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले
होते की, ’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत.
त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत.
त्यांना अन्न नाही. शेतीवाडी नाही अशी
त्याची बिकट परिस्थिती असतांना मेलेली
ढोरे ओढू नका असे तुम्ही सांगत असल्यामुळे
त्यांचे दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे
५०० रुपये उत्पन्नाचे नुकसान होते.’ तेव्हा
बाबासाहेब म्हणाले होते की, ’तुम्ही, तुमचे
पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून
तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला
५०० रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्याशिवाय मी
दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची
व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल,
त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे
मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट
तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे करीत
नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा
होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही?
ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’
दुसर्या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट,
असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे
विचारले होते. त्यावर बाबासाहेब म्हणाले
की, ’तुम्ही महार बनून भरा.’
म्हणून बाबासाहेब म्हणतात की, आम्ही
झगडतो आहोत ते इज्जतीकरीता! मनुष्य
मात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरितां आम्ही
तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो
त्याग करण्याची आमची तयारी आहे.
काय बाबासाहेंबाच्या या
म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे
कां? की स्वार्थासाठी वाटेल ते, प्रसंगी
स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान
ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब
अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको
कां?
बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते
की, ’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५
पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली.
मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू
धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी
मागेच केली होती आणि काल मी ती खरी
करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की-
हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला
वाटते.’
काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या
संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे
कां? असा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारायला
नको कां?
पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला
कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द
धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले
पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’
काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार,
समाजबांधवांनी बौध्द धम्म आतातरी पटवून
घेतला आहे कां? धम्माची शिकवन समजून घेऊन
इतरांना समजून सांगितली काय? याचा जाब
प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?
भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना
बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा
सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व
समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी
किंवा हे महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य
असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे
आपली जात जाते व सर्वजण समान असतात.
काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा
विचार करतो काय? याचा जाब अशा
लोकांनी विचारायला नको काय?
बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास
ग्लानी कां येते? या राजा मिलिंदानी
विचारलेल्या प्रश्नाला भन्ते नागसेनाने
दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे
सांगितली आहेत.
१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा
असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य
नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार
अशा धर्म टिकतो.
२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे
विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते.
ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले
पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास
धर्माचे प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला
ग्लानी येते.
३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची
तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व
सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते
तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.
बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म
स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली
पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही
काला पुरती) आहेत असे कोणासही म्हणता
यावयाचे नाही.
काय धम्म प्रचारासाठी व गांवा-
गांवात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे
बांधण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत:
शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार
घ्यायला नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन
इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग
बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे.
तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ
पुढे नेण्याची जबाबदारी येऊन पडत नाही
काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही
जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर
लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल
अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे
आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू
नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी
सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने
धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.
नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक
स्थितीस आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढ
निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर
आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर
जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच
जगाचा उध्दार होणार आहे.”
काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा
प्रयत्न केला काय किंवा करतो काय? आपल्या
कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला
असे झाले तर नाही ना? याचा अंतर्मुख होवून
सर्वांनी विचार करायला नको काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा
मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प
केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरूणांनी
लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू
नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा
हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.
काय आपल्या उत्पनाचा विसावा
हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण
बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान
देतो काय? कां हेही पैसे आपण आपल्याच घरात,
शौकपाण्यासाठी खर्च करतो? याचा
विचार आपण करायला नको काय? हा पैसा
बाबासाहेबांचा आहे आणि तो मी
बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च करेन
याची जाणीव किती लोकांना आहे?
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात
की, “दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक
बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार
आहे असे मी जाहीर करतो.”
काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी
बौध्द धम्म स्विकारावा म्हणून आपण अशी
काही यंत्रना निर्माण करु शकलो काय?
याचा आम्ही विचार करायला नको काय?
बाबासाहेबांचे भाषण व त्यावर आपली
जबाबदारी याचा विचार करुन जर सर्वांनी
एकत्र येऊन एका सुत्रबद्द पध्दतीने व
निष्ठापूर्वक रितिने वाटचाल करण्याचा
निर्धार केला तर खर्या अर्थाने
बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे
स्वप्न काही अंशी साकार झाल्याशिवाय
राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.
------------------------------------------------------------
4】 धर्मांतराबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार.... !!
"भारत देशाच्या हिताला धोका येईल अश्या प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा, एवढेच काय पण, "देशहितासाठी" माझ्या समाजाच्या प्रगतिवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ आली तर मी तसे करण्यास का-कु करणार नाही."...!
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर..✍📚
【Ref:25 आँक्टोबर 1935...!】
--------------------------------------------------------------
----------------------
धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे, हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे,
जहाज एका बंदरातुन दुसर्या बंदराला नेन्याकरीता नावाडयाला जेवढी पुर्वतयारी लागते तेवढीच पुर्वतयारी धर्मांतराकरिता करावी लागणार आहे..
-विश्वरत्न..डॉ बाबासाहेब आंबेडकर....✍📚
【Ref- जनता २० जून १९३६】
----------------------------------------------------------------
---------------
"धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती करावयास आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे आपणास साधले तर आपल्याबरोबर देशाचा... इतकेच नव्हे जगाचाही उध्दार होणार आहे.......
-विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....✍📚
【Ref:धर्मांतर १५ ऑक्टोबर १९५६ 】
--------------------------------------------------------------------
----------------
खरे तर बुद्धधम्माच्या पुनरुत्थानाचे कार्य भारतात उशिरा सुरु केल्याबद्दल मला अपराध्यासारखे वाटत आहे...परंतु तरीही मला आशा आहे की, जी माझी माणसे आपल्या ऐशोआरामाला तिलांजली देतील आणि प्रामाणिकपणे माझे अनुसरण करतील ती माणसे भारतात बुद्धधम्म प्रसारित करण्यास मनःपुर्वक संघर्ष सुरु ठेवतील, मला तसा विश्वास आहे...
-विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
【Ref:प्रबुद्ध भारत - १७ नोव्हे १९५६ मधुन】
--------------------------------------------------------------------------------
--------------------
"हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरूरी आहे, तितकी हिंदूंना नाही. अशा रीतीने विचार केला असता, हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हांनी मारक झाला आहे...या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे...
-विश्वरत्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
【Ref:"मुक्ती कोन पथे" मुंबई परिषद ३०, ३१ मे १ व २ जून】
------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment