शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी... व शाहू महाराजांच्या जीवनातील त्यांची ठोस कामे...!!!
1】 आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती....!!💐💐
फुले शाहू आंबडेकर हे पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाजाचे दैवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत बनले. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली, आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही. सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात इ.स. १८७४ २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संतांनी, महंतांनी, राजांनी, महाराजांनी, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडला. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले , त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांना त्यांनी कोल्हापूरला आणल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे. बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत. ८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले. २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते. ‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’ महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला. क्रूर रूढी आणि प्रथांना पायबंद, हुंड्यांची भयानक रुढी, दारुचे दुष्परीणाम, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य, स्वदेशीचा आग्रह व प्रचार, बालविवाहाचे दुष्परीणाम असे लोककल्याणकारी विषय घेऊन समाज घडविण्यासाठी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी त्या काळी रोजगार हमी योजना सुरु केली आणि त्या योजनेतून रस्ते, तलाव, पूल बांधून घेतले. मजूरांच्या लहान मुलांसाठी शिशु संगोपन गृहे उघडली. अपंग, अनाथ, आजारी वृद्धांसाठी अनेक ठिकाणी निराधार आश्रम सुरु केले. प्लेग या भयानक रोगापासून स्वसंरंक्षण कसे करावे त्यावर काय उपाय करावे याची माहितीपत्रके छापून लोकांचे अज्ञान दूर केले. सामान्य गरीब जनता माणूसकीला पारखे झालेले दलित बांधव यांना जागृत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहण्यास अथक प्रयत्न करुन महाराजांनी त्यांना प्रगतीप्रथावर नेले. अधर्मावर, दुष्ट आणि क्रूर रुढी परंपरांवर कठोर प्रहार करुन मानव धर्माचा, माणूसकीचा, सामाजिक समतेचा, लोककल्याणाचा वृक्ष त्यांनी बहरत ठेवला. राजा असूनही ते लोकांसाठी, समाजासाठी राजऋषीसारखे जगले. करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला. अशा थोर लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा...!!! -
- Adv Raaj Jadhav सर...✍️
---------------------------------------------------------------------------------------------
२】शाहू छत्रपतींनी ब्राह्मण्याचा बालेकिल्ला ढासळून टाकला….!
कोल्हापूरसंबंधी एक गोष्ट अगदी निश्चित आहे व या गोष्टीबद्दल
अस्पृश्यांना व मला कोल्हापूरचा अभिमान वाटतो. शाहू महाराजांनी कोल्हापुरातच खरी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली ही ती गोष्ट होय. आपण गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असतो.शिव छत्रपतीला ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही. आपल्या राज्याभिषेकासाठी सोने देऊन काशीहून गागाभट्टाला त्यांना आणावे लागले...ब्राह्मण्याची नांगी तोडण्याबाबतीत शाहू छत्रपति हे शिवरायापेक्षाही श्रेष्ठ होत असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. शाहू राजांना वेदोक्त अधिकार नाही असे सांगणाऱ्या ब्राह्मणांना पुण्याच्या लोकमान्य टिळकांचा व तेथील भटशाहीचा आधार असतानाही त्यांना शाहू छत्रपतींनी ठोकरीने उडविले, ही गोष्ट विसरता येण्याजोगी खास नाही शाहू छत्रपती महाराजांच्या अंगी दोष असतील. पण मी असे विचारतो की कोणता राजा निर्दोष आहे? निव्वळ दोषांकडे पाहण्यात अर्थ नाही. ब्राह्मण्य नष्ट झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणे नाही. त्यांनी ब्राह्मण्य नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व ब्राह्मण्याचा बालेकिल्ला ढासळून टाकला ही काही लहान कामगिरी नाही......
-विश्वरत्न.डॉ .बाबासाहेब आंबेडकर....✍️📚
【Ref-३०डीसें १९३९ कोल्हापुर.....जनता १३ जानेवारी १९४०.बाबासाहेब आंबेडकर लेखन अणि भाषणे खंड १८ भाग २ पृ ३०७】
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
3】 कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण !!
गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्यांला तत्कालीन महार समाजाच्या नागरिकास महाराजांनी कोल्हापूरच्या राज रस्त्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागा दिली,भांडवलही दिले व कांबळेचे "सत्यसुधारक" नावाचे हॉटेल सुरू झाले. दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना शेवटी ही गोष्ट महाराजांन पर्यंत गेली त्यावर महाराजांनी एक युक्ती काढली. दररोज शाहु महाराजांची घोडागाडी गंगारामच्या दुकानपुढे थांबु लागली, महाराजांच्या गाडीत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असायचे व महाराज त्यांना घेवून दुकानात यायचे व आपल्या भरदस्त आवाजात चहा मागवायचे, "गंगाराम सर्वांना चहा आण"... स्वतःहा महाराज चहा पिताना दिसल्यावर बाकीच्यांना तो निमूटपणे प्यायला लागे, एवढेच नाहीं तर ज्यांना कुणास सरकारी कागदपत्रावर सही हवी असेल तर सकाळी "सत्यसुधारक" मध्येच येणे असा नियमचा महाराजांनी पाडला. त्यामुळे सकाळी दुकानावर प्रचंड गर्दी व्ह्यायची महाराज गंगारामने केलेला चहा पाजायचे आणि मगच सही करायचे अशी होती राजर्षी शाहू महाराजांची सत्यशोधक चळवळ......☺️👌👌💐💐
जेव्हा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलात छत्रपती शाहू महाराज चहा पिण्यासाठी जातात...
काय रे तू हॉटेल काढलयसं म्हणं? खरं काय?'राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना विचारलं.'होय महाराज, आपणच सांगितलं काही तरी स्वतंत्र धंदा सुरू कर म्हणून,!' गंगाराम कांबळे यांनी उत्तर दिलं.'मग, पाटी का लावली नाहीस कुणाचं हॉटेल आहे म्हणून?''काय म्हणून पाटी लावायची महाराज? माझी काय कुणावर सक्ती आहे? सगळ्या हाटेलवर काय जातीच्या पाट्या लागल्यात?'असं, व्हय? खरं हाय तुझं. आतापर्यंत किती लोक चहा प्यायले तुझ्या दुकानात?''बरेच लोक प्यायलेत. मला संख्या माहीत नाही.''मग सगळ्या गावालाच बाटवलसं की तू. बरं तर चांगला चहा करून ठेव. जाताना येतो मी.'महाराजांनी आपण चहा प्यायला येणार हे बाहेर गाडीत बसूनच सांगितलं. महाराज गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहासाठी येणार ही बातमी म्हणता म्हणता सगळ्या कोल्हापुरात पसरली.महाराज येण्यापूर्वीच अनेक लोक हॉटेलसमोर थांबले. या सगळ्या लोकांसमक्ष महाराज इथं चहा प्यायले. आणि त्यांच्या गाडीतल्या इतर मंडळींनाही चहा पाजला....चहा घेऊन झाल्यानंतर महाराज गंगाराम यांना म्हणाले, "तू सोडावॉटरचं यंत्रही घे. मी घेऊन देईन तुला." महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेलमध्ये सोडावॉटरचं मशिनही घेऊन दिलं.गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातल्या भाऊसिंगजी रोडवर हॉटेल सुरू केलं होत. या घटनेला 100 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. राजर्षी शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातला हा संवाद बरंच काही सांगतो.कृतीतून दिला संदेशशाहू महाराजांनी समाजाला दुभंगीत करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक खास शैली होती. ती कधी सडेतोड, कधी मुत्सद्देगिरीची, कधी अपरंपार प्रेमाची, कधी प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी मिश्किलपणे धडा शिकवणारी होती.तो काळच असा होता की अस्पृश्यांना शिवणे म्हणजे मोठी अपवित्र गोष्ट आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या वस्तुंना, ठिकाणांना, देवळांना शिवणे हा मोठा गुन्हा समजला जात होता.या स्पृश्यांमध्ये केवळ ब्राह्मणच नव्हे तर मराठे आणि तत्सम अनेक जातींचे लोकही होते. अशा सामाजिक परिस्थितीत शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत स्वतःच जाहीर कृत्यांनी प्रस्थापित समाजाला हादरे दिले.शाहू महाराज 1920मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले होते. यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला होता.पुढच्याच महिन्यात नाशकात अस्पृश्य वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभासाठी गेले होते. इथं त्यांनी शेकडो लोकांच्या समोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला. याचीच पुनरावृत्ती त्यांनी तासगावला केली होती.शिवाजी महाराजांच्या वंशजानं त्याकाळात कर्मठ समाजासमोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचं अन्नपाणी घेणं, हा शाहू महाराजांनी दिलेला एक क्रांतिकारक संदेश होता.याच दरम्यान कोल्हापुरात घडलेली ही घटना महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा मैलाचा दगड ठरली.पाण्यासाठी गंगाराम यांना मारहाणकोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते.जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ गडबड उडाली.तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम नावाचा एक मराठा शिपाई आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील घोड्याच्या पागेतील मोतद्दारास जबरदस्त मारहाण करत होते.कारण होतं, त्यानं पाणी पिण्यासाठी मराठ्यांसाठी असलेल्या हौदाला स्पर्श केल्याचं.एका अस्पृश्यानं हौद बाटवला म्हणून संताराम आणि त्याचे साथीदार हातात चाबूक घेवून गंगाराम यांची पाठ फोडून काढत होते. त्यांनी त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला.खरं तरं 1919ला शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती. हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.ते दिल्लीहून येण्याची गंगाराम वाट पाहात होते. महाराज कोल्हापूरला आले. त्यांचा मुक्काम कोल्हापूर शहराबाहेरील सोनतळी इथं होता. महाराज आल्याचं कळताच गंगाराम अस्पृश्य बांधवांसह महाराजांना जाऊन भेटले.महाराजांनी गंगाराम कांबळे यांनी येण्याचं कारण विचारले. गंगाराम कांबळे यांना हुंदका अनावर झाला त्यांनी त्यांची पाठ उघडी करून दाखवली आणि झालेला सर्व प्रकार महाराजांना सांगितला.गंगाराम कांबळेंवर झालेल्या अत्याचाराची कथा ऐकून महाराजांच्या डोळ्यात अंगार फुलत होता. ताबडतोब त्यांनी गंगाराम कांबळेंना ज्यांनी मारलं त्यांना बोलावलं आणि स्वतःच्या हातात घोड्याची कमची घेऊन त्यांच्या पाठी फोडून काढल्या.हे करत असताना हा मराठा आहे, असा विचार त्यांनी केला नाही आणि गंगाराम यांच्या समोर त्यांना शिक्षा दिली.मग त्यांनी गंगाराम यांना जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. ते म्हणाले, "जा, गंगाराम तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर. लागेल ती मदत माझ्याकडे माग."अस्पृश्यांनी वरच्या दर्जाच्या लोकांप्रमाणे काही व्यवसाय करणे हे त्या काळच्या समाजाला पचणारं नव्हतं. तरीही शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना व्यवसाय करण्याचा मार्ग खुला केला....आणि हॉटेल सुरू झालेपुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल सुरू केलं.त्यांच्या हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम चहा कुणालाही लाजवेल असा होता. पण ते अस्पृश्याचं हॉटेल आहे, असे समजताच सवर्ण मंडळी या हॉटेलात जायची बंद झाली. एका अस्पृश्यानं सर्वांना चहा द्यावा, या विचारानेच सवर्ण मंडळी संतप्त झाली होती.ही बातमी महाराजांना समजायला वेळ लागली नाही.समाज हा कायदे करून बदलत नाही, त्यासाठी काही नामी युक्त्या कराव्या लागतात. समाजाला गोड बोलून परिवर्तनाच्या दिशेनं वळवावं लागतं, याची महाराजांना जाण होती.त्यामुळे कोल्हापुरात फेरफटका मारताना त्यांची घोडागाडी (खडखडा) गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली.महाराज त्यांच्या गडगडाटी आवाजात चहाची ऑर्डर देत आणि गंगाराम मोठ्या आदबीनं महाराजांना चहा देत असत.महाराज तो चहा स्वतः घेतच पण त्यांच्या घोडागाडीत खच्चून भरलेल्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना ते आग्रहानं चहा पाजत.छत्रपती खुद्द गंगाराम यांच्या हॉटेलातला चहा घेत असल्यानं त्यांच्या चहाला नाही म्हणण्याची कोणाची छाती होत नसे.महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा प्रसंग इतिहासप्रसिद्ध झाला.महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी दोन मार्ग अवलंबले. एक मार्ग कायद्याचा आणि दुसरा म्हणजे आपल्या जाहीर आणि सार्वजनिक कृत्यातून समाजातील अस्पृश्यतेच्या रूढीला सुरुंग लावणे...एक राजा म्हणून पहिला मार्ग तर त्यांनी अवलंबलाच पण गंगाराम कांबळे यांच्या घटनेबद्दल दुसरा मार्ग अवलंबताना त्यांची आईची माया दिसून आली.याच गंगाराम कांबळे यांनी महाराजांच्या निधनानंतर तीन किंवा चार वर्षांनी शाहू महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी एक मंडळ स्थापन केलं होतं.या मंडळानं 1925ला शाहू महाराजांचं पहिलं स्मारक कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत उभारलं. महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण देशातलं शाहू महाराजांचं हे पहिले स्मारक गंगाराम कांबळे यांच्या पुढाकारानं दलित समाजानं उभारलं होतं.(या लेखाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातील संवादाचा सविस्तर उल्लेख भाई माधवराव बागल यांनी 1950 साली लिहिलेल्या श्री. शाहू महाराज यांच्या आठवणी या पुस्तकात आहे.)...
-लेख:डॉ.मंजुश्री पवार....✍️
इतिहासतज्ज्ञ 26 जून 2018
【Ref:https://www.bbc.com/marathi/india-44599980?ocid=wsmarathi..social.sponsored-post.facebook.AEP-Shahubirthani.nneed1.Interests.Statement.mktg】
-----------------------------------------------------------------
4】 राजर्षी छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!
महार जातीतील डॉ.आंबेडकर नामक ग्रुहस्थाने उच्च पदवी प्राप्त बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेंव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही, जी व्यक्ती महाराजांना भेटायला येई त्या व्यक्तीसमोर बाबासाहेबांचे तोंडभरून कौतुक करून म्हणायचे "आता या बामनांना बौद्धीक बाबतीत शह देण्यास बहुजन समाजातील माणसे हळू हळू पुढे येऊ लागली. "एक दिवस असा उगवेल की या बामनांपेक्षा आमची बहुजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील"शाहू महाराजांजवळ बापुसाहेब महाराज बसलेले असायचे .आंबेडकरांचे चाललेले कौतुन बघून बापुसाहेब म्हणाले, "महाराज एकदा आंबेडकरांना भेटावयास तरी बोलवा" शाहू महाराज प्रसन्न होऊन म्हणाले,"बापसाब अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा"
योगायोगाने तेथे दळवी आर्टिस्ट आले,त्यांना मुंबईचा खडानखडा माहीत असल्याने महाराजांनी आबेंडकरांना बोलविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीली व त्यांच्या मुंबई प्रवासाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा देऊन महाराज सोनतळीला निघून गेले.
महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दळवी मुंबईस गेले डॉ.आंबेडकरांची भेट घेतली महाराजांचा खास निरोप दिला.पण आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार होईनात.कारण संस्थानिकांच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.अखेर दळवींनी इतर संस्थानिकांपेक्षा महाराज कसे वेगळे असून अस्प्रुश्योद्धरांसाठी कसे काम करतात, हे सांगितल्यावर आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार झाले व ते कोल्हापुरला आले.
पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची मैत्री जमली.मैत्री ही स्फ़ुल्लिंगासारखी असते, ती केंव्हा प्रकट होते हे सांगणे कठीण असते कित्येक वर्षाच्या सहवासानंतरही प्रकट होत नाही पण काही वेळी विश्वासाच्या वातावरणाने प्रगल्भता धारण केल्यास एकाच भेटीत ती चीरमैत्री होऊ शकते.असेच शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब यांच्या मैत्रीचे झाले.एकाच भेटीत चिरमैत्री जमली.पहिल्याच भेटीत डॉ. बाबासाहेबांनी अस्प्रुश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले.’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना आंबेडकरांनी महाराजांना सांगितले की "आपण ३१ जानेवारीला १९२० ला पहिला अंक प्रकाशित केला.या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,"
" काय करू आता धरुनिया भीडा नि:शंक हे तोंड वाजविले ।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजुन नव्हे हित ।"
संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले " व्वा ! व्वा ! छान ! छान !!" असे सहजच म्हनुन गेले.
आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे व्रुत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगत असतानाच सोमवंशीय मित्र,हिंदू नागरीक, विटाळ विद्वंसक यांची उदाहरणे दिली.तसेच त्यांनी कारणेही सांगितली.त्या काळी व्रुत्तपत्रांना फ़ारश्या जाहीराती मिळत नसत.वर्गणीसारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असत आणि वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसत.महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.२,५०० ची भरगोस मदत केली.या मदतीनंतर " मुकनायक" बोलु लागला.
२० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील "कागल" जहागिरीतील माणगाव या ठिकाणी अस्प्रुश्यांची पहिली ऐतिहासिक भव्य परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले होते.त्यावेळी मार्गदर्शन करताना भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख "माझे प्रिय मित्र आंबेडकर" असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना "प्रिय मित्र" म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.भाषणाच्या शेवटी आंबेडकरांना आग्रहाचे भोजनाचे आमंत्रन देताना म्हणाले,"आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांनी जाण्यापुर्वी मेहरबानीने माझे रजपुतवाडीच्या कॅंपवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी" महाराजांच्या आमंत्रणाचा स्विकार करून आंबेडकर सोनतळीला आले.भोजनाच्या वेळी महाराजांनी स्वत: आग्रह करून त्यांना यथेच्छ भोजन करावयास लावले.त्यानंतर आंबेडकर आगगाडीने मुंबईस जाणार होते, त्यावेळी महाराजांनी स्वत: स्टेशनवर येऊन त्यांना निरोप दिला.
डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी आली.शाहू महाराजांनी तर निश्चयच केला होता की "माझे राज्य गेले तरी बेहत्तर पण अस्प्रुश्योद्धर
ाचे कार्य थांबविणार नाही" महाराजांच्या अशा या कार्यामुळे अस्प्रुश्य लोक शाहुंना आपला त्राता,उद्धारक ,मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानत होते.दिवसेंदिवस महाराज आणि आंबेडकर यांचा स्नेह वाढतच गेला.स्नेह माणसाला त्याग करायला शिकवतो, संकुचीत नात्याची तो सीमा पार करतो.असेच या दोघांच्या नात्यात घडत गेले.खरी मैत्री ही मोकळ्या ह्र्दयाने बोलत असते,केंव्हाही मदत करण्यास तयार असते.
४ सप्टेंबर १९२१ रोजी लंडनहुन आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सासाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी आंबेडकरांना किती आदर होता हे यावरून दिसून येते.आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली.त्यानंतर पुढे काही दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९२२ रोजी लंडनहुन डॉ.आंबेडकरांचे महाराजांना पुनश्च मदत मागताना पत्र आले, त्या पत्रात ते म्हणतात, "मला परत येण्यास अवधी लागणार असल्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी हुजुरांनी क्रुपावंत होऊन रु.७५० मदत करावी,आजवर जे अनेक उपकार हुजुरांनी केलेत त्यात हाही करतील अशी आशा आहे."हे पत्र मिळताच महाराजांनी मनिओर्डरने रुपये सातशे पन्नास पाठवून देण्याची व्यवस्था केली.
डॉ.बाबासाहेबांना शाहू महाराजांविषयी नेहमीच आदरभाव असे.उच्च जाती आपल्या स्वार्थासाठी ब्राह्मणेत्तर आणि बहिष्क्रुत यामध्ये कधीही एकी निर्माण न होता बेकीच रहावी यासाठी प्रयत्नशील होते.तशा प्रकारे ते हिन डावपेच खेळत.प्रत्येक वेळी ते डावपेच शाहू महाराज आपल्या मुत्सद्देगिरीच्या बळावर उधळून लावत.याबाबत २२ सप्टेंबर १९२० च्या "मुकनायक" मध्ये "प्रेम की सुड" या लेखात् आंबेडकर म्हणतात,"या विसाच्या शतकातील स्वयंनिर्णयाचा काळात राजर्षी शाहू छत्रपती यांनी ब्राह्मण जातीकडून नाडावलेल्या ब्राह्मणेत्तर व बहिष्क्रुत वर्गाच्या चळवळीचा पुरस्कार केल्यावर बहुजन समाजाकडून त्यांस मिळत असलेला धन्यवाद ब्राह्मण या जातीस न खपून त्यांनी बहिष्क्रुत व ब्राह्मणेत्तर या वर्गात् खुद्द मराठ्यांत फ़ुट पाडण्याचा अत्यंत घातक असा उपक्रम चालविला आहे".
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे १३ व १४ फ़ेब्रुवारी १९२२ रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती.त्या परिषदेत आंबेडकरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढताना शाहू महाराज म्हणाले होते ."भिमराव आंबेडकर तुमचे महान नेते आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, त्यांचे अनुकरण करा व त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा.मी तर तुमच्या सेवेला वाहुन घेतले आहे, मला तुमची सेवा करू द्यावी ही विनंती." बाबासाहेब आंबेडकर अस्प्रुष्यता निर्मुलण व त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी "ऑल इंडिया डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन फ़ंड" संस्था उभी करणार होते, या संस्थेत शाहू महाराजांनी कोणत्याही लहानमोठ्या पदावर काम करण्याची इच्छा त्यांनी आंबेडकरांना रुकडी (कोल्हापुर) येथुन दि.७ जुन १९२० रोजी लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.
" चांगला मनुष्यच चांगला मित्र होऊ शकतो" हे उभयतांच्या मैत्रीवरून स्पष्ट होते.
साभार : शाहुंच्या आठवणी
लेखक : प्रा.नानासाहेब साळुंखे
------------------------------------------------------------------------------------------------
5】राजश्री शाहू महाराजांचे सामाजिक कार्य...!!
छत्रपती शाहू गादीवर आले त्या वेळच्या प्रशासनात गोरे, पारशी आणि ब्राह्मण यांचे फार मोठे प्रस्थ होते. १८९४ साली एकूण ७१ दरबारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राह्मण आणि ५२ खाजगी पैकी ४५ ब्राह्मण होते. दिवान बर्वे यांनी न्याय, महसूल आणि पोलिस या महत्वाच्या खात्यात ब्राह्मणी वरचष्मा निर्माण करून ठेवला होता. राजे झाल्यानंतर लगेचच शाहूंनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला.
छत्रपतींनी या जातिव्यवस्थेविरोधात बंड पुकारले. त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी मागासलेल्या जातींना संस्थानच्या नोकऱ्यात शेकडा ५० जागा राखून ठेवण्यासंबंधीचा जाहीरनामा कोल्हापूर गैझेट मध्ये प्रसिद्ध केला. म्हणूनच ' नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत ' या शब्दात धनंजय कीर यांनी शाहूंचे वर्णन केले .
शाहूंनी २८ नोव्हेंबर १९०६ रोजी चांभार व महार लोकांसाठी रात्रीची शाळा सुरु करण्याचा आदेश काढला . ४ ऑक्टोबर १९०७ रोजी त्यांनी चांभार , ढोर यांच्यासाठी मुलींच्या शाळेस मंजुरी दिली व त्यासाठी ९६ रुपये खर्चाची तरतूद केली . ' दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही ' अशी घोषणा त्यांनी केली होती.
शाहूंनी खाजगीत अस्पृश्यांच्या नेमणुका केल्या. अस्पृश्यांसाठी १९०८ साली वसतिगृह स्थापन करून त्याचे व्यवस्थापन भास्करराव जाधव आणि निकटवर्ती मंडळीकडे सोपविले . त्या वसतिगृहास १९०९ साली त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. १९१० साली शाहूंनी जहागीरदाराचे अधिकार कमी केले.
११ जानेवारी १९११ रोजी शाहूंनी कोल्हापुरात परशुराम घोसरवाडकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचे प्रमुख म्हणून भास्करराव जाधव काम पाहत असत. जुलै १९१३ मध्ये कोल्हापुरात ' सत्यशोधक समाज शाळा ' सुरु करून विसोजी डोणे यांच्याकडे सोपविली. पण पुढे काही काळानंतर शाहूंनी केलेली क्षात्रजगदगुरु पदाची कृती सत्यशोधक समाजाला आवडली नाही. कारण फुलेंनी देव व माणूस यांच्यात मध्यस्थ नाकारला होता.
२४ नोव्हेंबर १९११ रोजी संस्थानातील सर्व अस्पृश्य वर्गास सर्व प्रकारचे शिक्षण मोफत केले. हुशार विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्त्या मंजूर केल्या. ७ एप्रिल १९१९ रोजी अस्पृश्य मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. तलाठी वर्गातील अस्पृश्य विद्यार्थ्यांना दरमहा आठ रुपयांप्रमाणे खास शिष्यवृत्त्या जाहीर केल्या.
जुलै १९१७ मध्ये शाहूंनी विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदेशीर मान्यता देणारा ' विधवा पुनर्विवाह ' कायदा संमत केला. शाहूंनी यानंतर ' देवदासी प्रतिबंधक कायदा ' केला . या कायद्यान्वये देवदासी स्त्रियांना पित्याच्या संपत्तीत कायदेशीर वाटा दिला गेला.
१९१८ साली शाहूंनी कोल्हापूर संस्थानात आर्य समाजाची शाखा स्थापन केली. ही शाखा पुढे राजाराम कॉलेज कडे चालविण्यासाठी देण्यात आली. १९१८ साली त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा संमत केला.
२८ सप्टेंबर १९१९ रोजी काढलेल्या एका आदेशान्वये संस्थानातील अस्पृश्यांच्या शाळा बंद करण्यात आल्या. या आदेशात शाहू महाराज म्हणतात , " येत्या दसऱ्यापासून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा बंद करण्यात याव्यात व अस्पृश्यांच्या मुलांस सरकारी शाळातून इतर लोकांच्या मुलांप्रमाणेच दाखल करून घेत जावे. " याच वर्षी शाहूंनी स्त्री अत्याचाराविरुद्ध कायदा केला.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी १९१६ साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या शाहुनी सर्वांसाठी खुल्या केल्या.
१७ जानेवारी १९२० रोजी ' हिंदू वारशाचा दुरुस्तीचा कायदा ' गैजेट मध्ये प्रसिद्ध केला. कायद्यान्वये सर्व वर्णाच्या अनौरस संततीस पित्याच्या मिळकतीत हिस्सा देण्यात आला. त्याच वर्षी शाहूंनी दुसरा एक ' घटस्फोट कायदा ' संमत केला.
राजांनी अस्पृश्य मुलांचे उपनयन ( मुंज ) करून त्यांना वेदांची संथा दिली. न्यायव्यवस्थेत राजांनी काही अस्पृश्य व्यक्तींना जाणीवपूर्वक वकिलीच्या सनदा दिल्या. हे धोरण वरिष्ठ जातींना आवडले नाही. १८ सप्टेंबर १९१८ रोजी राजांनी जमिनीसाठी महार कुटुंबांना वर्षानुवर्षे गुलामगिरीत अडकवून ठेवणारी महार वतनाची अमानुष पद्धत बंद केली.
शाहू महाराजांनी २७ जुलै / ३१ ऑगस्ट १९१८ रोजी महार , मांग , गारुडी , रामोशी , बेरड अशा गुन्हेगार जातींना दररोज चावडीवर जाऊन हजेरी देण्याची पद्धत बंद केली. त्यानंतर २९ सप्टेंबर १९१८ रोजी गट्टेचोर जमातीची हजेरी बंद केली. अस्पृश्यांनी स्वतःला अस्पृश्य न म्हणता ' सूर्यवंशी ' असे नाव घ्यावे व आपल्यातील न्यूनगंड टाकून द्यावा, असाही आदेश महाराजांनी १९१७ साली जारी केला.
वेठवरळा किंवा वेठबिगारी पद्धतीत गावचे पाटील - कुलकर्णी अथवा सरकारी अधिकारी महार वतनदाराकडून गावची व सरकारी कामे करून घेत असत. महारांना वतन म्हणून एक छोटासा तुकडा दिलेला असे , त्या मोबदल्यात त्यांना रात्रंदिवस एखाद्या गुलामाप्रमाणे राबावे लागत असे . महाराजांनी २६ जून १९१८ रोजी एक हुकुम काढून वेठवरळा बंद करून टाकला व महार वतने रयतावा करून टाकली .
गंगाराम कांबळे या सरकारी पागेतील एका मोतद्दारास अस्पृश्य असल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची तक्रार शाहू महाराजांकडे आल्यानंतर त्यांस नोकरीतून मुक्त करून , स्वतंत्र धंदा करण्यास त्यास हॉटेल काढून दिले. स्वतः महाराज आपल्या लवाजम्यासह अस्पृश्याच्या हॉटेलातील चहा घेऊ लागले. अस्पृश्यता नष्ट करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयोग होता. हेच ते प्रसिद्ध ' सत्यसुधारक हॉटेल ' होत .
ज्या त्या जातीचे नेतृत्व त्या त्या जातीतील नेत्यांनीच करावे असा शाहू महाराजांचा आग्रह होता. कोल्हापूर संस्थानात माणगाव येथे १९२० मध्ये दलित अस्पृश्यांची परिषद भरली होती. परिषदेमागील प्रेरणा शाहुंचीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष होते. शाहूंनी या परिषदेस स्वतः उपस्थित राहून बाबासाहेबांचा गौरव केला होता. १९२० सालचीच हुबळी येथील अब्राह्मणेतर परिषदेचे महाराज अध्यक्ष होते.
शाहूंनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदतही केली होती. तसेच आंबेडकरांच्या मूकनायक व आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्रांना देखील शाहूंनी आर्थिक मदत केली.
३० मे ते १ जून १९२० या तीन दिवसीय अखिल भारतीय बहिष्कृत समाजाच्या नागपूर येथील एक्जिबिशन ग्राउंड वर भरलेल्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष शाहू होते. १९२२ साली दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षही शाहू बनले.
शाहूंनी सर्व जातीतील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात वसतिगृहे सुरु केली. वास्तविक १८९६ साली कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करवीर संस्थानच्या दरबाराने आपल्या खर्चाने वसतिगृह सुरु केले होते. परंतु तेथे ब्राह्मणेतर मुलांना प्रवेश दिला जात नसे. १८९९ साली पांडुरंग चिमणाजी पाटील या मराठा मुलाची ब्राह्मणाशिवाय इतरांच्या खानावळी नसल्यामुळे शिक्षणाची अत्यंत गैरसोय झाली. पी.सी. पाटील यांची वस्तीगृहाविना झालेली अवस्था पाहून १८ एप्रिल १९ ०१ रोजी 'व्हिकटोरीया मराठा बोर्डिंग' स्थापन करण्यात आले .
यानंतर सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची मालिकाच उभी राहिली. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) , वीरशैव लिंगायत वसतिगृह (१९०६) , मुस्लिम बोर्डिंग (१९०६) , मिस क्लार्क होस्टेल (१९०८) , दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) , नामदेव बोर्डिंग (१९११) , पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) , गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) , इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) , रावबहादूर सबनीस प्रभू बोर्डिंग (१९१५) , ढोर - चांभार बोर्डिंग (१९१९) , आर्य समाज गुरुकुल (१९१८) , वैश्य बोर्डिंग (१९१८ ) , शिवाजी वैदिक विद्यालय वस्तीगृह (१९२० ) , प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस (१९२०) , सुतार बोर्डिंग (१९२१) , नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) , सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) , देवांग बोर्डिंग (१९२०) , मराठा बोर्डिंग नाशिक (१५ एप्रिल १९२०) अशा विविध जातीधर्माची वसतिगृहे शाहूंच्या सहकार्याने उभी राहिली.
- संकलित...
Rohit Ravindra...✍️
----------------------------------------------------------------------------
👌👌
ReplyDelete