1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (धर्मांतराची भीम गर्जना)
अनेक प्रयत्न करुन बाबासाहेब दलितांना सामाजीक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधितरी अस्पृश्यांबद्दल सदभावना जागॄत होईल या आयेशी ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. मागच्या पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनूयायी मोठ्या जिकरीने लढा चालविला होता. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्या मांजरापेक्शाही खालच्या दर्जाची वाट्ली. याचा एकंदरी परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा मागच्या पाच वर्षात मातीत मिसळला. याच दरम्यान जेंव्हा नाशिकचा लढा चालू होता तेंव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामूळे त्यानी आपल्या कार्यंकर्त्यां मार्फत हा झगडा सतत पाच वर्ष केला. तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यामातून जमेल तितकं अस्पृश्यांसाठी खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यानी अस्पृश्याना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लेढा दिला.
शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेब एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचिही कदर नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करुन बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्याना बोलून दाखवू लागले, त्यांची मन चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोनी प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजून आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र बाबासाहेबाना बळ आलं. आपल्या समाजातील मोठा जनसमूदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्याबर बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली ती म्हण्जे पर्यायी धर्म निवडायचा कुठला. ईथून निघूण परत दुस-या अशा धर्मात अजिबात जायचे नव्हते जिथे परत जातियवादाची पुनरावृत्ती होईल. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मातंर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती या धर्मांतराच्या घोषणेची. सा-या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी वागणूकिस कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. अन येत्या काही दिवसात येवल्यात भरणा-या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.
येवला परिषद
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. हा हा म्हणता भारताच्या कानाकोप-यातून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संखेनी येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले ईतका प्रचंड जनसमूदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमूदाय येवल्या नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. अन बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष आयू. अमृत धोंडीबा रणखांबे होते. लोकानी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी अन हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरु झाले. बाबासाहेब म्हणतात, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाण हृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकिचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानूष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुस-या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुस-या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?” बाबासाहेबांच्या या वाक्यानी सभेतील लोकं मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून दयावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा’ अन हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यानी प्रतिध्वनीत केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची भीमगर्जना करतात जी ऐकून भारतच नाही उभ्या भूतलावर मोठं वादळ उठतं. ते म्हणतात, “मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतं. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.” ही भीम गर्जना ऐकून अस्पृश्य लोकामधे एक उत्साहची लाट उसळते. नसा नसात नवचैतन्य भरणारी ही भीम गर्जाना म्हणजे हजारो वर्षाची हिंदूंची गुलामी झिटकारण्याची अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती. आता अस्पृश्यांच्या जिवनाचे एक नवे पर्व सुरु झाले, ते या येवलेभूमीनी अनूभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता. आता मात्र तो या घोषणेनी मनोमनी या सर्व गुलामीतून मूक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीम गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसा पर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताळावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होतं) किंवा या हिंदू धर्माला झिटकारुन धर्मांतरा द्वारे मानवी मूल्ये जपणा-या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तय्यारी करण्याचा ईथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुनर्जन्म झाल्यागत स्वत:मधे एक अप्रतिम बदल झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मुल्याच्या झगड्याचा परिणाम होता.
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळारम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदुच्या हृदयात आपल्यासाठी आजिबात स्थान नाही तेंव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरु होत आहे. आम्हाला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तीभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेंव्हा की यांचा देव अन हे आम्हाला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले. तेंव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मुल्य़े नाकारणा-याना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातीभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तय्यारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जलोषात व उत्साहात परतीला निघतात.
भीम गर्जनेचे उमटलेले पडसाद
बाबासाहेबांच्या भीम गर्जनेनी उपस्थीत पत्रकार लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. तसही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनूभव होता. पण हा धर्मांताची बॉंब मात्र पुरता भारद हादरवून सोडाणारा होता. धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड ईतकी प्रभावी नि तडाखेंबंद होती की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुस-या दिवशीच्या सर्व मुखपत्रातील प्रथम पानावर ही बातमी छापून येते. बाबासाहेब धर्मातंर करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने केलेली ही गर्जना हिंदू धर्मातील विविध लोकांमध्ये मोठं वादळ उठवून जाते. हिंदू विचारवंत, पिठाधिश, मठाधिश व सामान्य नागरीक प्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला. अन बाबासाहेब मात्र धर्मांतराच्या बॉंबनी घायाळ झालेल्या या हिंदूच्या छिन्न विछिन्न अवस्था न्याहाळात निवांत बसले होते. त्याना हेच पाहायचे होते की आतातरी हा समाज आम्हाला सुधारतो का.
हिंदू धर्मातील समाजसेवक अन पुरोगामी वर्ग मात्र बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण ईथला पुरोगामी वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा उध्दार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त करु लागला. लगेच धर्मांतर न करता आजून पाच वर्ष तरी वाट पहावी अन हिंदू समाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारे अनेक पत्र बाबासाहेबाना पाठविण्यात आले.
पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदुना सुगीचे दिवस येतील. अस्पृश्यांची संख्या ईतकी प्रचंड होती की जर तो मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना निस्तेनाबूत करुन सर्व आघाड्यावर आपलं वर्चस्व गाजवेल हे या मुर्खांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचं नाव एक रात्रीत बदलून ईस्लामीस्तान होईल साधं एवढं समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयात नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थीतीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासू रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवन्या करु लागला.
अनेक धर्मगुरुंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव
बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करुन दुस-या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हा हा म्हणता साता समूद्रापार जाते अन अनेक धर्माचे धर्मगुरु जे नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टानी उभं जग पालथं घालत असतात त्याना मोठी संधी आयती चालून आल्याने उकळ्य़ा फूटू लागल्या. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात यावा यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. राजगृहावर देश विदेशातून अक्षरश: अशा धर्मगुरुंद्वार पत्रांचा व तारांचा वर्षाव होतो.
ख्रिश्चनांचे धर्मगूरु बिशप ब्रेनटन थॉबर्न ब्रॅडले, मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्च मुंबईचे बिशप यानी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्विकारुन आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करुन घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधिपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरी होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले. ख्रिश्चन मिशन-यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचिही कल्पना दिली. शिक्षण क्षेत्रातील मिशन-यांचं कार्य मोठं लक्षणिय व वाखाणन्याजोग. याचा दलिताच्या उत्कर्षासाठी अत्यंत प्रभावी नि सकारात्मक प्रभाव कसा पडेल हे ही समजावून सांगितलं.
मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबाना तार करुन मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरु बाबासाहेबाना भेटण्यास आलेत. बाबासाहेबानी ईस्लाम स्विकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडुन कशी पैशाची व ईतस सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यानी ईस्लाम स्विकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास कसा हिंदूचा थरकाप उडेल हे ही बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. हिंदू धर्माचे लोक सहसा मुसलमानांच्या वाटेला जात नाहीत. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मूक्त करण्याचा खरतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्या बरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरूष यांचा वयक्तील पातळीवरही मोठा बदल घडावून आणावयाचा होता. शैक्षणीक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिल पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडाझेप घ्यावयाची होती. हे ईस्लाम मध्ये शक्य नव्हते. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनाना नकार दिला व ईस्लामचा मार्ग नाकारला.
शिख धर्माचे धर्मगुरू व सुवर्ण मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष सरदार दरिपसिंग दोबीया बाबासाहेबाना तार करुन अस्पृश्यांनी शिख धर्मात यावे अशी विनंती केली. एकेश्वरी शिख धर्म अस्पृश्यांचं मनोभावे स्वागत करायला तयार आहे. त्याच बरोबर आमच्या धर्मात सर्वाना समान वागणूक दिली जाते नि विद्यार्जनाचे, उत्कर्षाचे सर्व मार्ग शिख बंधू व भगिनीना सदैव उघडे असल्या कारणास्तव या धर्मात तुमचा केवळ नि केवळ उत्कर्षच होईल अशी हमी दिली. बाबासाहेब मधल्या काळात शिख धर्माकडे झुकतातही. बाबासाहेबाना हा धर्म तसा ईतरांच्या तुलनेत जरा जवळचा वाटू लागला होता.
बौद्ध धम्माचे अनुयायी, महाबोधी संस्था बनारस येथील कार्यवाह यानी बाबासाहेबाना तार केली. भारतात जन्मलेल्या, जातीभेद ना मानणा-या, सर्वाना समान समजणा-या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मुल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक काना कोप-यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती आहे, अनुयायी व धम्म बांधव आहेत. आशीया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्विकारलेला आहे. ईश्वराला काळीमात्र महत्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून सोडेल. तळागळातल्या लोकांच्या प्रती अत्यंत करुना बाळगणारा बौद्ध धम तुम्हा सर्वांचा नवा ईतिहास रचेल अशा प्रकारचं एकंदरीत संदेश बाबासाहेबाना मिळतं.
गांधी मात्र टोमणं मारायला विसरत नाहीत. अस्पृश्यांचा प्रश्न निकाली निघण्याच्या टप्प्यात असताना, शेवटाच्या निर्णायक वळणावर असताना बाबासाहेबानी अशी घोषणा करणे केवळ दुर्दैव आहे. हरीजन बांधव आंबेडकरांचे काही एक ऐकणार नाही, धर्म काय अशी रातोरात बदलण्याची वा अंगावरचे कपडॆ बदलावे तशी बदलण्याची गोष्ट आहे का? बहुतांश हरीजन आंबेडकरांच्या या धर्मांतरास साथ देणार नाही अशी मुक्ताफळं गांधीनी उधळली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यानी मात्र मोठ्या अस्वस्थ व दु:खी मनाने या धर्मांतराच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. सावरकरानी रत्नागिरी व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्पृश्य निवारणाचे कार्या हाती घेतले होते. त्यांनी सहभोजन व मंदिर प्रवेशाचे कार्य मोठ्या झपाट्याने चालविले होते. रत्नागिरी सारख्या कट्टरपंथी कोकणस्थांच्या बालेकिल्ल्यात सहभोजन घडवून आणने म्हणजे गंमत नव्हती. अस्पृश्य बांधवानी हिंदू धर्मातच रहावे अन यासाठी त्यानी बदलण्याची गरज नसून हिंदु धर्माने कात टाकावी असा विचार मांडाणारे सावरकर हे नंतर कट्टरपंथीया द्वारे चांगलेच झोडपले जातात.
अशा प्रकारे बाबासाहेबांच्या धर्मातराच्या भीम गर्जनेनी सारा भारत दुमदुमू लागला. सर्वत्र मोठा गहजब उडाला. ईतर धर्मीयाना ही संधी वाटू लागली तर गांधी, सावरकरादि नेत्यानी बाबासाहेबांवर तोफा डागल्या. सर्व वृत्तपत्रातून झाडून टिकांचा वर्षाव होऊ लागला. माथेफिरू हिंदूनी मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. काहीनी तर चक्क तारा पाठवून तसे कळविले. एकानीतर चक्क रक्ताने पत्र लिहून पाठविले की जर तुम्ही धर्मांतर केलात तर तुमचा खून करु. अशा सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकंदरीत ही घोषणा हिंदूच्या जिव्हारी लागली होती व तशा प्रतिक्रिया देशभर उमटल्या. बाबासाहेब मात्र सेनापती जसे शत्रूच्या किल्यावर तोफ डागून शांतपणे उध्वस्त तटबंधी न्याहाळतो तसे हिंदूवर धर्मांतराची तोफ डागल्यावर शांतपणे कोसळणारी हिंदू तटबंदी न्याहाळत होते.
शंकराचार्थ पदाची मागणी:
सर्वत्र धर्मांतराच्या विरोधात हिंदूनी अक्षरश: बाबासाहेबांवर टिकेची झोड उठविले. तिकडॆ ख्रिश्चन लोकं हिंदूंच मोठ्या प्रमाणात धर्मांतर करुन यांच्या संख्याबळाला जबरी सुरुंग लावत होते. मुस्लिमानी सुद्धा मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतर घडविणे चालूच ठेवले होते. अन जोडीला बाबासाहेबांनी केलेली घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास हिंदू एका झटक्यात सर्व आघाड्यावर मागे फेकल्या जाईल हे चित्र दिसू लागलं. येवले परिषदे नंतर बाबासाहेब वसईचे मित्र डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे मुक्कामी गेले. तिथे हिंदू धर्माचे प्रसिद्ध धर्मगुरु मसूरकर महाराज बाबासाहेबांची भेट घेतात. हे मसूरकर महाराज हिंदुच्या धर्मांतराचा धोका जानणारे व तो टाळण्यासाठी खटाटोप करणारे एक सच्चे हिंदू होते. ईतर धर्मांधासारखे डोळ्यावर पट्टी बांधून हिंदू म्हणवून घेणारे नव्हते. यानी स्वत: गोव्यातील दहा हजार धर्मांतरीत होऊन ख्रिश्चन बनलेल्या लोकांचे शुद्धिकरण करुन हिंदु धर्मात परत घेतले होते. ते मोठ्या कळकळीने बाबासाहेबान म्हणतात की धर्मांतर हा तोडगा नसून तुम्ही कृपया यावर मार्ग सांगा. तेंव्हा बाबासाहेब एक बिनतोड प्रस्ताव मसुरकरांच्या पुढे ठेवतात. बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य हिंदुला एका वर्षासाठी शंकराचार्य पदावर बसवावे, अन तुम्ही सर्व हिंदूनी व शंभरेक ब्राह्मणानी वर्षभर सहकुटूंब त्या अस्पृश्य शंकराचार्याच्या पाया पडून मनोभावे पुजा करावे. तेंव्हा आम्ही मानू की तुम्ही आम्हास समान समजता व तो दर्जा देण्याईतपत तूमचे हृदय पालट झाले आहे.” बाबासाहेबांचे हे वाक्य ऐकून मसुरकरांचा मुखवटा पार गडून पडतो. कारण अस्पृश्याला शंकराचार्य बनविण्यासाठी लागणारी मानसिकतात ईतरांची तर सोडाच पण खुद्द मसूरकरांची सुद्धा नव्हती. बाबासाहेबांचं डाव उलटविण्याचं कौशल्य फारच अप्रतिम होतं. पुढच्या माणसाला पार नागडा करुन सोडायचे. अशा प्रकारे शंकराचार्याची मागणी करुन बाबासाहेबानी मसूरकराना त्या खिंडीत गाठले जिथे मावळे त्यांचेच, आयुधं त्यांचीच, हमल्याची रुपरेषा त्यांचीच अन दाणदाणही उडाली त्यांचीच. हे असले भीमास्त्र सोडाण्यात बाबासाहेब मोठे पटाईत होते.
पुण्यातील परिषद
धर्मांतराचा निर्णय तळीस नेण्याचे काम जोमाने चालविले जाऊ लागले. जाने १९३६ च्या १२ व १३ तारखेला पुण्यात परिषद भरविण्यात आली. प्रा. एन. शिवराज यानी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते. अध्यक्षिय भाषणात शिवराज यानी एक जबरदस्त मुद्दा मांडला. ते म्हणाले आर्यांनी आणलेला हिंदू धर्म ईथे रुजण्या आधी आदिद्रविडांचा एक तेजस्वी इतिहास या मातीला आहे. आपण तो पुनरुज्जीवित करावा. बाहेरून आलेल्या धर्माला पुरुन उरणारा आदिद्रविडांचा इतिहास मोठा प्रभावी नि तेजस्वी आहे. डॉ. पुरुषोत्तम सोळंखी जे सुरुवातीला धर्मांतराच्या विरोधात होते ते आता मात्र अनुकूल झाले होते. त्यानी आपल्या भाषणात नवीन धर्म स्थापन्याचा प्रस्ताव सुचविला होता. बाबासाहेबानी आपल्या तेजस्वी भाषणात धर्मांतराची गरज, त्याची उपयुक्ततात पटवून देताना धर्मांतरामूळे रोजगाराचा प्रश्न मिटणार नाही हे अधोरेखित केले. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागेल हे ठासून सांगितले. धर्मांतर हा मानवी मुल्याचा प्रश्न असून पोटा पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा मार्ग नव्हे. उपजिविकेच्या आघाडीवर लढण्यास सज्ज होण्याचे आवाहन केले. पाच वर्षा पर्यंत हिंदूच्या हृदयपालटाची वाट पाहून तदनंतर धर्मांतर करु असा निर्वाणीचा ईशार दिला. अशा प्रकारे हिंदूना ५ वर्षाचा अल्टिमेटम देऊन बाबासाहेब पुढच्या कामाला लागतात.....
-Adv:एम डी रामटेके....✍️
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
2】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (भीमगर्जने नंतरचे वादळ)
जातपात तोडक मंडळाचे वार्षिक संमेलन (१९३६)जातपत तोडक नावाची नावाची त्या काळातील पुरोगामी लोकांची एक अत्यंत प्रसिद्ध संघटना होती. जातियवादाच्या विरोधात पुरोगामी म्हणवून घेणा-या हिंदु बांधवांची ही जातीयवाद्यांच्या विरोधात काम करणारी संघटना. पण या संघटनेची कार्यपद्धती मात्र सनातन वाद्याना न दुखविता जातीयवादाचे निर्मूलन करणारी होती. जातीयवाचाव्या विरोधात मोठी भरीव कामगीरी करणारी ही संस्था सनातनी लोकांचा कर्दनकाळ बनून फिरत असे. बाबासाहेबांसारख्या अस्पृश्य उद्धारकाच्या उदयानी ही संस्था अत्यंत भारावून गेली. १९३६ मध्ये लाहोर येथे भरणा-या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भुषवावे असा ठराव या मंडळाद्वारे पास करण्यात आला. तदनंतर बाबासाहेबानी अध्यक्षपद स्विकारावे अशी आग्रहाची विनंती केली. श्री. इंद्रसिंग नावाचा यांचा एक कार्यकर्ता या संदर्भात मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो. तसेच डॉ. गोकुळचंद नारंग नावाच्या धनाढ्य व्यक्तीने संमेलन काळात बाबासाहेबानी आपल्याकडे राहावे अशी विनंतीही केली. या परिषदेसाठी बाबासाहेबानी अध्यक्षिय भाषण करावयाचे होते. त्यासाठी त्यानी अत्यंत विद्वत्तेने एक प्रदिर्श भाषण तयार केले. बाबासाहेबांच्या भाषणाची तय्यारी ही उभ्या भारताला गदागदा हालवून सोडणारी होती. जातीयवाद्यांच्या अंध नि वर्चस्ववादी मनोवृत्तीला भगदाड पाडणारी होती. ईकडे मुंबई ईलाख्यात बाबासाहेबांची भीमरुपी गदा हिंदुत्ववांद्यांवर घणाघाती हल्ले चढविण्यात मश्गूल झालेली होती. बाबासाहेबानी उगड उघड घेतलेली हिंदु विरोधी भूमीका जातपात तोडक वाल्याना फारसी आवडली नाही. त्यामूळे त्यांच्यात बाबासाहेबांच्या अध्यक्षीय पदापद्धल अंतर्गत वादावादी चालू झाली. शेवटी १९३६ च्या मार महिन्यात असे घोषित करण्यात आले की मंडळाचे वार्ष संमेलन मे महिन्या पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. ९ एप्रिल १९३६ रोजी संताराम हरभगवान नावाचा मंडळाचा एक सदस्य मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो. बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी भीम गर्जनेनी लाहोरचे जातपात तोडक मंडळांच्या सदस्यात उडालेले खटके व काही व काही दुखावलेले वरिष्ठ सदस्य मंडलाचा राजिनामा दिल्याची बातमी घानावर घातली. तरी सुद्धा मंडळ बाबासाहेबानाच अध्यक्ष म्हणून संमेलनास बोलविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणासाठी बाबासाहेबानी लिहलेल्या भाषणाचा काही भाग छापण्यासाठी म्हणून या सदस्याने सोबत घेतला. ईकडे बाबासाहेबांची भीमरुपी गदा मात्र काही केल्या थांबेना. सनातन वाद्यांवर भीमास्त्राचा मारा सतत चालू होता. त्याच बरोबर धर्मांतराची घोषणा झाल्यापासून हिंदू समाजात सर्वत्र एक हाहाकार उडाला होता. चहू बाजूनी बाबासाहेबांवर टिका, शाप नि दुषणांचा भडीमार होऊ लागला. प्रतिउत्तरात लढ्यात बाबासाहेबही मोठ्या विर्याने उत्तर देत, विद्वानाच्या बैठकीतला हा महामानव या सर्वांवर भीमास्त्र सोडून सनातन्याना घायाळ करी. हिंदू धर्मावरील अत्यंत टोकाची टीका, धर्मग्रंथाना लावलेल्या तत्वज्ञानाच्या कसोट्या व वेद, स्मृती नि श्रृतींचा तर्कबुद्धिने घेतलेला समाचार ईतका मनोवेधक आणि मर्मभेदक असे की बाबासाहेबांपुढे हिंदीचे लढवय्ये नांगी टाकून पळ काढीत. पण याची दुसरी बाजू होती की, हिंदूंच्या मनातील द्वेष वृद्धिंगत होत गेला. बाबासाहेबांचे विरोधक वाढत गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की, जातपात तोडक मंडळासारखी स्वत:ला पुरोगामी समजणारी संस्था बाबासाहेबाना अध्यक्ष बनविण्यात धोका मानू लागली. शेवटी बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी लढ्याचा परिणामी धसका घेऊन पुरोगाम्याचं सोंग आणणारी ही जातपात तोडक मंडळ नावाची संघटना लाहोर येथे भरणारे वार्षीक संमेलन कायमचे स्थगीत करते. अशा प्रकारे बाबासाहेबांचे अध्यक्षीय भाषण निकाली काढले. या संमेलनासाठी लिहून घेतलेले प्रदिर्घ भाषण तय्यार होते. परिषद रद्द झाल्यामूळे या भाषणाची एक लहानशी पुस्तीका छापून घेण्याचे ठरले. जातीचे निर्मूलन (अनायलेशन ऑफ कास्ट) नावाची पुस्तीका इंग्रजीत छापण्यात आली. लवकरच या पुस्तीकेचे जवळपास सात आठ भाषेत भाषांतर करण्यात आले. आणि या लहानशा पुस्तीकेने त्या काळात भारतभर खडबड उडवून दिली. हिंदू धर्माचे वाभाडे काढणारी ही पुस्तीका हिंदू धर्मग्रंथाचा समाचार घेणारी तर्क व तत्वाच्या कसोट्या लावून धर्मग्रंथाचा धुव्वा उडविणारी आहे.
शीख धर्माची चाचपणी१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोप-यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट ईथे हजेरी लावतात. सेवानिवृत्त न्यायाधिश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व ईतर अनेक मंडळीनी मोठ्या अभिमानानी शीख धर्माचा जाहीर नि विधीवत स्विकार केला. या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले. बाबासाहेब ईथे शीखांच्या भूमीत बोलताना मोठ्या त्वेषाने भीम गदा फिरवीतात आणि परत एकदा जाहीरपणे धर्मांतराच्या निर्णयावर ठाम असल्याची भीम गर्जना करतात. या परिषदेच्या मंचावरुन उभ्या भारताला एक आव्हान करतात की, “हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव आमच्यावर लादले. अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जिवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेचि तत्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगती प्रवर्तक आहेत. त्यामूळे मला शीख धर्म मनातून आवडु लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केंव्हा करायचे हे आजून ठरायचे आहे.” अशा प्रकारे आपला पुढील कार्यक्रम काय असेल याचं ओझरतं दर्श त्यांच्या या भाषणातून तमाम त्या लोकांपर्यंत ज्पोहचलं ज्यांच्या पर्यंत पोहचायला पाहिजे होतं.प्रतिनिधी सुवर्ण मंदिरात पाठविले.आता मात्र धर्मांतराची चळवळ अत्यंत वेगाने आकार घेऊ लागली. बाबासाहेबांच्या वादळी प्रचाराने भारतभर खडबळ उडाली. हिंदू धर्मातील सर्व आघाड्या पेटून उठल्या अन बाबासाहेबांवर चतूरस्त्र टिका होऊ लागली. बाबासाहेब मात्र प्रत्येक टिकेगणिक अधिक दृढनिश्चयी व ठामनिर्णयी बनत गेले. शीख धर्माकडील त्यांचा झूकाव अल्लेखनिय होता. उपलब्ध तमात धर्मातुन हा धर्म बाबासाहेबाना आकर्षित करुन गेला. पन भावनेच्या भारात तडकफडकी निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करनार बाबासाहेब नव्हते. जो कुठला धर्म स्विकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करुन, मानवि मुल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंका कुशंकाचे निराकरन झाल्या नंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतन्या मुकंद याना बाबासाहेबानी अमृतसर येथील गुरुद्वारेत वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारेतील शीख बांधवानी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुलं परत आली.१३ जणांची तुकडी१८ सप्टे १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला रवाना केली. मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. धर्मांत चळवळीतील शीख धर्माच्या दिशेनी पडलेले हे आजून एक पाऊल होते. हा हा म्हणता ही तुकडी अमृतसरला पोहचून शीख धर्माचा अभ्यास सुरु केला. दरम्यान काळात झालेल्या पत्र व्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारे अनेक पत्र बाबासाहेबाना मिळाले. उत्तरादाखल लिहलेल्या पत्रात बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. ईकडे बाबासाहेब ईतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर ईतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता तडक शीख धर्माची दिक्षाच घेऊन टाकली. खरतर बाबासाहेबानी याना अभ्यासासाठी पाठविले होते. धर्म स्विकारण्याचा निर्णय आजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय ईतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकल्या गेले. जेंव्हा ते मुंबईत परतले तेंव्हा त्याना कुणी काळ कुत्रही पुसेना. यांचा कधी विषय निघाल्यास बाबासाहेब म्हणत, “देव जाणे त्यांच काय झालं ते” अशा प्रकारे धर्मांतर चळवळीची वाटचाल चालू होती.शीखांशी मतभेद आणि काडीमोडबाबासाहेब शीख धर्माचा स्विकार करतील याची सर्वत्र चर्चा चालू झाली. याच दरम्यान आजून एक दुसरीच समस्या उद्भवू लागली. अस्पृश्याना विधिमंडळात मिळालेले आरक्षण हे हिंदू धर्मातील एक जात (वर्ग) म्हणून मिळाले होते. पण जर अस्पृश्यानी हिंदू धर्माचा त्याग करुन शीख धर्म स्विकारल्यास या आरक्षणाचे काय? असा नवीनच निर्बंधीक पेच तयार झाला. बरं शीखानाही राखिव जागा मिळाल्या होत्या पण त्या फक्त पंजाब प्रांतापुर्ती मर्यादीत होत्या. धर्मांतरा नंतर शीख हे भारतभर असणार पण शिखांचे आरक्षण मात्र भारतभर लागू नव्हते, अशी ही नवीन अडचण उभी ठाकली. अस्पृश्यानी शीख धर्म स्विकारावा यासाठी हिंदू महासभेचा पाठिंबा मिळविण्याचे काम सुरु झाले. १८ जुन १९३६ रोजी बाबासाहेब व डॉ. मुंजे यांची या संदर्भात एक भेट झाली. सर्व बाजुनी चर्चा झाल्यावर व हिंदू महासभेच्या प्रमुख सदस्यांची संमती घेतल्यावर डॉ. मुंजे व हिंदू महासभेनी अस्पृश्यांच्या धर्मांतरास व शीख धर्म स्विकारण्यास पाठिंबा दिला. पण शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की शीख धर्म स्विकारण्याचा विचार सोडून दयावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची अतिरिक्त जाबाबदारी अंगावर पडली.....
-Adv:एम डी रामटेके...✍️
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3】 बाबासाहेब आणि धर्मातर... !!
बाबासाहेब आंबेडकरांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना. तिची बीजं त्यांच्या मनात कशी रुजत गेली? सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना. तिची बीजं त्यांच्या मनात कशी रुजत गेली? सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचेवर झालेल्या मानसिक व बौद्धिक विकासाची वाटचाल पाहिली तर भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली असे म्हणावे लागेल.दादासाहेब केळुसकरांनी १८९८ साली प्रसिद्ध केलेले मराठीतील बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात अर्पण केले. चर्नीरोडच्या बागेत केळुसकर गुरू भीमराव या शिष्याला बुद्धाच्या कथा सांगत असावेत. १९१२ साली बी.ए. होईपर्यंत डॉ. बाबासाहेबांनी मुंबईतील सर्व ग्रंथालये पालथी घालून मॅक्समुलर, हॉगसन यांची गौतम बुद्धावरील पुस्तके, सर एडविन अर्नाल्ड यांचे ‘लाइट ऑफ एशिया’ हे बुद्धाचे काव्यमय चरित्र यांचे सूक्ष्म वाचन केले. पी. लक्ष्मी नरसू यांचे इसेन्स ऑफ बुद्धिझम हे पुस्तक १९०७ साली प्रसिद्ध झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक १९४८ साली पुन्हा प्रसिद्ध करताना म्हटले की, ‘‘हा ग्रंथ आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांत सवरेत्कृष्ट आहे.’’ कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या एम.ए.च्या शोधनिबंधाचा विषय एन्शट इंडियन कॉमर्स होता. (अल्ल्रूील्ल३ कल्ल्िरंल्ल उेी१ूी) त्या निबंधात प्राचीन भारताच्या समृद्धीचे स्पष्टीकरण करताना त्यांनी बौद्ध धर्म ग्रंथांचे आधार सादर केले होते. बट्राँड रसेल यांच्या ळँी ढ१्रल्ल्रूस्र्’ी२ ऋ र्रूं’ फीूल्ल२३१४ू३्रल्ल (सामाजिक पुनर्घटनेची मूलतत्त्वे) या पुस्तकांचे परीक्षण करताना डॉ. आंबेडकरांनी म्हटले हाते की, ‘‘प्रत्येक माणसाला स्पर्धा आवश्यक आहे. अडथळे, अडचणी पार करून विजय मिळविल्यामुळे त्याच्या अंतर्गत प्रवृत्ती-शक्ती कार्यप्रवण होतात. त्यातून त्याला आपण विकास करीत असल्याची जाणीव होत राहते.’’ हे विवेचन बौद्ध तत्त्वज्ञानाशी पूर्णत: सुसंगत आहे असे आढळून येते. १९२० ते १९२३ या आपल्या इंग्लंडमधील शिक्षणाच्या निमित्ताने झालेल्या वास्तव्यात चर्चेचा विषय असलेली तत्कालीन बौद्ध ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे डॉ. बाबासाहेबांनी काळजीपूर्वक अभ्यासली.१९२७ साली चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर डॉ. आंबेडकरांनी महाड शहराजवळील बौद्ध लेणी पाहिली. तेथे बौद्धकालीन बांधलेली जी आसने होती त्यावर बसण्यास त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मनाई केलेली होती. या आसनांवर तत्कालीन बौद्ध भिक्षु बसलेले होते. ‘आपण त्यावर बसून त्यांचे पावित्र्य नष्ट करू नये’ असे त्यांनी सहकाऱ्यांना बजावले. बुद्ध धर्माबद्दल त्यांचा आदर या घटनेतून प्रतिबिंबित होतो. १९३३ साली गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुस्लीम आणि अन्य अल्पसंख्य वर्गाशी जवळचे संबंध प्रस्थापित केले असले तरी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा माझा विचार तर नाहीच, परंतु बुद्ध धर्माच्या स्वीकारासंबंधी मी विचार करीत आहे’ असे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते.१९३४ च्या सुमारास तयार झालेल्या मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानास डॉ. बाबासाहेबांनी बुद्धाच्या धर्मप्रसारासाठी निकटचा संबंध असलेल्या बिंबीसार राजाच्या राजधानीचे नाव ‘राजगृह’ हे दिले.१९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे
१९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले. म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार १९३६ पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून येते. २ मे १९५० रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे सूचित केले होते. एप्रिल-मे १९५०च्या महाबोधिमध्ये ‘बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ या लेखात डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘जग जर कोणता धर्म स्वीकारू शकेल तर तो बुद्ध धर्म होय’’. रॉयल एशियाटिक सोसायटीतील एका भाषणात त्यांनी ‘मला माझ्या बालपणापासून बुद्ध धर्माची आवड आहे’ असे सांगितले. जुलै १९५१मध्ये डॉ. बाबासाहेबांनी ‘इंडियन बुद्धिस्ट सोसायटी’ची स्थापना केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्या वेळेस त्यांच्याबरोबर अन्य पुस्तकांबरोबर भगवान बुद्धावरील बरीचशी पुस्तके होती व ‘मी ही पुस्तके वारंवार वाचीत असे’ असे त्यानी नंतर नमूद करून ठेवले आहे.
धर्मातर घोषणेनंतर दोन महिन्यांनी ८ डिसेंबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील फोरास रोडजवळील ढोर चाळ (जयराम भाई स्ट्रीट) येथे धर्मातराच्या संदर्भात केलेल्या भाषणाने हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले अनंत हरी गद्रे प्रभावित होऊन म्हणाले की ‘‘दहा हजार श्रोतृसमुदायासमोर डॉ. आंबेडकरांचे हे भाषण ऐकण्याची संधी लाभली हे आम्ही आपले भाग्य समजतो.’’ गद्रे धर्मातराचे विरोधक असूनही म्हणतात, ‘‘हिंदू समाजाला आपले दोष समजून घ्यायचे असतील तर त्याने डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाचे मनन केले पाहिजे. बाबासाहेबांच्या भाषणातून अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग करावा असे वारंवार सांगितले जात असले तरी त्यांनी कोणता विशिष्ट धर्म स्वीकारावा हे ते सांगत नसत. बाबासाहेबांनी धर्मातराच्या सर्व भाषणांतून ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्माची उदाहरणे घेतली असली तरी ख्रिस्त किंवा महम्मद पैगंबर यांचा आदर्श ठेवा असा उपदेश केलेला दिसून येत नाही.’’ ‘कुणीही एकटय़ाने धर्मातर करू नये, जे करायचे ते सर्व मिळून करू’ असा सबुरीचा सल्ला त्यांनी १९२७-२८ च्या दरम्यान मुसलमान होऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांना दिला.
१९३७ साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यापूर्वी डॉ. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. तथापि पक्षाच्या जाहीरनाम्यात धर्मातरितांना कोणत्याही विशेष सवलती त्यांनी जाहीर केल्या नाहीत. मतदारांना केलेल्या आवाहनात ‘धर्मातराचा प्रश्न वेगळा असून विधान मंडळात निवडून जाण्याशी त्याचा काहीच संबंध नसल्याचे’ स्पष्ट केले. राजकारण करीत असताना धार्मिक प्रश्न त्यांनी कधी आड आणले नाहीत. आणि धार्मिक प्रश्नांना राजकारणाचा स्पर्श होऊ दिला नाही.१९४७ चे सत्तांतरण होण्यापूर्वी १९४२ पासूनच्या वाटाघाटी सुरू होत्या. त्यात ‘आम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारतो, आम्हाला सत्तेत वाटा द्या’ असे त्यांनी म्हटले नाही. धर्मातराचा वापर करून अस्पृश्य समाजाला सत्ता व संपत्तीत वाटा मिळवून देणे शक्य असूनही डॉ. बाबासाहेबांनी ते टाळले. त्यांनी भारत देश व हिंदू समाज यांच्याशी बेइमानी न करता, राजकारणात आपल्या नीतिमूल्य, तत्त्वांचा व्यापार केला नाही.
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना बाबासाहेब म्हणाले की, ‘कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्टय़ाही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्टय़ा हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठय़ा समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ.’
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे झालेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पस्ष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’गांधीजींच्या भूमिकेला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात,
‘‘मनुष्यमात्राला धर्म आवश्यक आहे, हे गांधीजींचे म्हणणे मला मान्य आहे. परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या खऱ्या धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वत:च्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला स्फूर्तिप्रद होणारा व आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर वाटते,़ त्या नियमांचा अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच तिने त्याला चिकटून राहिले पाहिजे हा मात्र त्यांचा दंडक मुळीच कबूल नाही.. धर्मातर करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे. बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की नाही याची मला पर्वा नाही. तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना त्यात हित वाटत असेल तर ते माझे अनुकरण करतीलच.’’ त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा देऊन स्पष्ट केले की ‘‘थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मातर केले पाहिजे. तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल. त्यासाठी वेळ हा लागणारच आणि तेवढा वेळ मी थांबणार आहे.’’ डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही.’’
धर्मातरासंबंधी तर्कनिष्ठ, वस्तुनिष्ठ विवेचन करताना बाबासाहेब म्हणाले की, ‘‘धर्मातरांच्या विषयावर जसा सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच तात्त्विकदृष्टय़ाही विचार केला पाहिजे. अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची बाब झाली आहे असे अनेक दैनंदिन घटनांवरून दिसून येते. मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामथ्र्य आवश्यक असते. एक मनुष्यबळ, दुसरे द्रव्यबल व तिसरे मानसिक बल. सामथ्र्य असल्याशिवाय जुलमाला प्रतिकार करता येणार नाही. प्रतिकाराला आवश्यक असलेले सामथ्र्य कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून धर्मातर करून अन्य समाजात अंतर्भूत झाल्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामथ्र्य प्राप्त होणार नाही.’’
धर्मातराची आध्यात्मिक कारणे विशद करताना बाबासाहेब म्हणतात,‘‘व्यक्तीचा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो. हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्याकारणाने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. व्यक्तीच्या विकासाकरिता सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकही बाब उपलब्ध नाही..’’ ‘‘मनुष्यमात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे.’’‘‘अस्पृश्यातील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असेल तर धर्मातर करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे. हिंदू समाजातील सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही, हे आमचे कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. हिंदू धर्मात राहून समता मिळवणे केवळ अशक्य असल्याने धर्मातर करून समता मिळविण्याचा साधा सोपा मार्ग अवलंबिता येणे शक्य आहे. धर्मातराचा मार्ग पळपुटेपणाचा किंवा भेकडपणाचा नसून तो एक शहाणपणाचा मार्ग आहे.’’
जातिभेद सर्वाकडे आहे त्यामुळे जातिभेदाला त्रासून धर्मातर करण्यात अर्थ नाही असा युक्तिवाद करणाऱ्यांना बाबासाहेब उत्तर देतात ते असे-‘‘जातिभेद सर्वत्रच आहेत असे जरी कबूल केले तरी हिंदू धर्मातच राहा असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही. जातिभेद ही गोष्ट जर अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असता जातिभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा जेथे जातिभेद लवकर सहज व सुलभतेने मोडता येतील त्या समाजात जा, हा खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे, असे मानावे लागेल.’’धर्मातराची आवश्यकता विशद करताना बाबासाहेब म्हणतात,‘‘जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मातराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच धर्मातरांचे महत्त्व अस्पृश्यांना आहे. धर्मातर आणि स्वराज्य या दोन्हींचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य. ज्या धर्मातरापासून स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मातर निर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही..’’‘‘धर्मातर हे राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे.’’आपले धर्मातराविषयीचे ठाम मत विविध अंगांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. ते म्हणतात,‘‘माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मातर करा. संघटन करावयाचे असेल तर धर्मातर करा. समता, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मातर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.’’
नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हटले की,‘आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी ‘नाग’ नदी आहे. म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.’’ ‘मनुस्मृती’मध्ये चातुर्वण्र्य सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये समता नाही. हिंदू धर्माच्या विचित्र वर्णव्यवस्थेने सुधारणा होणे शक्य नाही. उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिख्खू होते. सागरात गेल्यावर जशा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, असे समतेने सांगणारा एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय,’’
डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले की..‘‘या देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.’‘देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. दु:खाने पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे.’’तब्बल दोन तास चाललेल्या आपल्या प्रभावी, अर्थपूर्ण भाषणाचा समारोप करताना डॉ. बाबासाहेबांनी उपस्थितांना बजावले की,‘‘तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान-सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू शकू.’’अशा तऱ्हेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी सुरू झालेल्या ‘धम्म’ प्रवासाची सांगता १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाली...
-लेख:सुहास पटवर्धन...✍️
【Ref: लोकसत्ता,६ डिसेंबर २०१३.. https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/lite/】
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment