शाहीर शंतनू कंबळे यांच्याबद्दल... !
शाहीर शंतनुविषयी मी त्यांच्या हयातीत कधी काही लिहलं नाही, म्हणून त्यांच्या मृत्यूपश्चात काही लिहावं का? असा नैतिक गंड मला काही क्षणासाठी आला. या विद्रोही शाहीराचे गाणे सगळ्याच परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यक्रमात गायले जातात, पण त्यांचं नाव बऱ्याच जणांना माहित नसतं.
मी कृतीवंत नसलो,तरी त्यांच्या गाण्याचा चाहता आहे. 'समतेच्या वाटेनं तु खणकावत पैंजण यावं ' हे गाणं कुण्यातरी नव्याने समाजवाद्यांच्या नादी लागलेल्या पोगंडी चळवळ्या पोराच्या तोंडून ऐकलं होतं.
हरकलो होतो ऐकून. एवढा जब्री आशय किती लाघवी पद्धतीने शाहिराने मांडला आहे. असं लिहता येणं, कठीण असतं. अनेकांनी त्यांचे गाणे स्वताच्या नावाने कुठे कुठे खपवले असतील माहित नाही.
अनेक एलीट डाव्यांच्या कार्यक्रमात कुणी लंडनहून आलेल्या पोरीही, हे गाणं म्हणून जातीअंताचा शृंगारिक कळवळा गाताना मी पाहिल्या.
विद्रोही गाण्याच्या कार्यक्रमाच्या काही मंडळी सुपाऱ्याही घेऊन सांस्कृतिक संघर्षाच्या गोष्टी करताना दिसले. पण शंतनुने हे कधीच विकलं नाही. आता याकडं कसं पाहायच माहित नाही मला. शाहिर शंतनु प्रचंड दारिद्र्यात होता, नैराश्यातलं माहित नाही.
तारूण्यातला आपला रोमँटीसिझम कधीच गळून पडतो, तो असुरक्षिततेमुळं. हे आपलं मध्यमवर्गीय रडगाणं नेहमीच असतं म्हणा.
शंतनुला भेटलो त्यावेळेस त्याच्या डोळ्यात सगळं फसलेलं अल्टरनेटीव दिसलं. आंबेडकरी राजकारणातील बांडगूळांविषयी प्रचंड चीडही दिसली...
सहज गाण्याचा आग्रह केला, तर अगदी सहज हसून, कोणतेही आढेवेढे न घेता शाहिराने आपल्या कमकुवत बोटांनी डफावर थाप मारली. जर्जर झाला तरी आवाजतला टोकदारपणा अंगावर येणारा होता.
बाकी त्यांच्यावर नक्षली समर्थनाचे आरोप झाले, ते निर्दोष सुटलेही. पण त्यांच्या आयुष्याची वाताहात झाली. कोर्ट सिनेमाची स्टोरी या माणसाच्या आयुष्यावरच बेतलेली म्हणता येईल.
आयडियालॉजीच्या पुढे जाऊन एखाद्या कलावंताला समजून घ्यायला हवं. अर्थात हा माझा भाबडेपणा मला कबूल आहे.
एखादा कलाकार अश्या अवस्थेत संपतो. ते कलाकराचं व्यक्तीगत मरणं नसतं. तर आपण समाज म्हणूनही आजारी असतो, त्या संबधीत कोणती सक्षम सपोर्ट सिस्टीम आपण उभी करू शकलो नाही, याचा पाढाच कलाकाराचा मृत्यू वाचत असतो.
शाहीर, माझ्यासारख्या दांभिक कविफिवी कडून तुला मानाचा जयभीम...
-पोस्ट by-Kunal Gaikwad ✍️
-------------------------------
--------
Comments
Post a Comment