बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास रमाई... (रमाईला शेवटचा निरोप) व बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाई ला लंडन हुन लिहलेलं पत्र.. !!



1】डॉ. बाबासाहेब(रमाईला शेवटचा निरोप)बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास........ रमाई



अडचणी अन बाबासाहेब हे समिकरण आता बाबासाहेबांच्या शेवट पर्यंत चालणार हे बाबासाहेब जाणून चुकले होते. अत्यंत सोपं काम सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणानी आव्हान बनुन उभं ठाकायचं. नंतर बाबासाहेबानी भीम शस्त्र उपसायचे अन त्या आव्हानाला सामोर जायचं. आपली सर्व शक्ती पणाला लावून अशा आव्हानाना लोळवायचं अन विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध करायचं याची मालिका आता अखंडपणे चालू होती. सामोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्याची अंगभूत क्षमता अन आव्हान स्विकारण्याच्या वृत्तीमूळे जागोजागी बाबासाहेबांचा जयजकार होई. हे सर्व चालू असताना एक अत्यंत महत्वाची घट्ना घडते. बाबासाहेबाना पूरुन उरणारी ही घटाना मात्र बाबासाहेबांचं पुरतं नामोहरम करून सोडते. प्रत्येक ठिकाणी विजय खेचून आणणारा हा वीर ईथे मात्र हताशपणे पराजय पत्कारतो. ती घटना म्हणजे बाबासाहेबांची जिवनसंगिनी रमाई बाबासाहेबानी आयूष्याच्या प्रवासात अर्ध्या वाटेत सोडून जाते अन बाबासाहेब त्याना थांबविण्यात सर्वस्वी अपयशी ठरतात. केवळ हताश होऊन आपल्या परमप्रिय पत्नीला जाताना पाहण्या पलिकडे बाबासाहेब काहीच करु शकत नाही.
डिसेंबर १९३४  मध्ये बाबासाहेब जेंव्हा सिंहगडावर विश्रांती घेत होते तेंव्हा आमचा सिंहगड महारानी बाटवला म्हणून शेजारपाजरचे सनातनी सिंहगडावर मुक्कामी असलेल्या बाबासाहेबांवर चालून जातात. बाबासाहेबानी मोठ्या धैर्याने तो हल्ला परतवून लावला. हि बातमी रमाईला कळते तेंव्हा त्यांच्या मनात धस्स होतं. बाबासाहेबांवरील या हल्ल्याचा त्यानी असा धसका घेतला की शेवट पर्यत त्या उठतच नाहीत. रमाई अत्यंत धार्मि वृत्तीच्या, व्रतवैकल्य करणा-या, होत्या. शनिवारचा उपवास कधीच चुकत नसे. आपल्या लढवैय्या पतीचा रक्षणकर्ता ईश्वर त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहो यासाठी त्या पराकोटीची ईश्वरभक्ती करीत.   संवेदनशील मन, आत्मयज्ञ करण्याच्या नैसर्गिक वृत्ती अन कुटूंब वत्सल रमाईनी बाबासाहेबांच्या व्यस्त जीवनात कधिच अडथडा न आणता स्वत: त्यांच्या संसाराचा डोलारा आजवर सांभाळला. पण सिंहगडच्या घटने नंतर त्या हादरुन गेल्या.
याच दरम्यान बाबासाहेबानी मुंडन केले होते. ते हवापालटासाठी म्हणून वसईचे डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे राहावयास गेले होते. रमाईची तब्बेत डिसेंबरात बिघड्ली तेंव्हा पासून आता मे १९३५ चा तिसरा आठवडा सुरु झाला तरी सुधारलीच नव्हती. एकंदरीत हा आजार सहा महिन्याहून अधिककाळ टिकला होता. बाबासाहेब वसईला निघून गेल्यावर रमाई अधिकच हताश झाल्या.  मुलगा यशवंत व पुतण्या मुकूंद यानी आईच्या खुषी खातर तीच्या परिने पुजा पाठ व ईतर व्रतवैकल्याची दैनंदिनी सांभाळायसा सुरुवात केली. आता तर रमाईल उठून साधी पुजा करणेही जमेनासे झाले होते. काळ जवळ आला याची रमाईला जाणिव होऊ लागली होती. त्या दिवशी रात्री त्याना खूप ताप आला. त्या अक्षरश: तापानी फणफणू लागल्या, शरीराची लाही लाही झाली. शंकरमामा (रमाईचे बंधू) डॉक्टरांकडे धावले. रात्रीच डॉक्तराना बोलावून आणलं. ईंजेक्षन देऊन काही गोळ्या घ्यायची सुचना दिली व डॉक्टर निघून गेले. बाबासाहेबाना बोलावून घ्या असं शंकरमामाना हळूच सांगितलं. डॉक्टरांच्या या सल्ल्यानी मामा पुरता हादरुन गेला. बाबासाहेब नेमकं कुठं गेले होते याची माहिती नव्ह्ती. काहिंच्या मते ते वसईला गेले होते तर काहिंच्या मते ते पनवेलला. त्या काळात संपर्काची साधनं नव्हती. दुस-या दिवशीच्या सायंकाळ पर्यंत कळलं की बाबासाहेब वसईला आहेत.
रमाईची तब्बेत अत्यंत खालावली ही बातमी त्यांच्या सर्व ईष्टमित्रांमध्ये पसरली. राजगृहात अचानक लोकांची वर्दळ वाढली. रमाईला पंढरीला घेऊन जाणारे ग्यानबुवा महाराज व त्यांचे दोन भजनी शिष्य सर्वप्रथम राजगृहात धावून आले. ग्यानबुवा रमाईच्या शेजारी खाली बसले व त्यांची काळजी करु लागले. काही वेळानी रमाईनी डोळे उघडले तेंव्हा ग्यानबुवाना बघून रमाईच्या चेह-यावर आनंदाची लकीर उमटली. बुवा आपण कधी आलात असं विचारल्यावर बुवा उत्तर देतात....... आईसाहेब आपली तब्बेत बरी नाही कळल्यावर त्या पांडूरंगाला साकळं घालून लगेच ईकडे धाव घेतली.
“बरं केलात महाराज आपण आलात........... हळू हळू देवाचं भजन म्हणत चला....... तेवढंच देवाचं नाव ऐकून जिवाला बरं वाटेल.”
काही झालं तरी शेवटी धार्मिक पिंड असलेली एक श्रद्धावानी स्त्री होती आमची रमाई. ग्यानबुवाच्या भजनांच्या आवाजात त्या रात्री रमाईचा डोळा लागला. ईकडे बाबासाहेबाना परत बोलावण्याचे काम युद्ध पातळीवर चालू झाले. रात्री बारा नंतर रमाईचं अंग खूप तापल्यासारखं जाणवल्यावर शंकरमामानी थर्मा मिटर लावून पाहिले. ताप १०४ च्या पुढे सरकला होता. लक्ष्मीबाई व घरातील ईतर सदस्यानी कोलन वाटरच्या पट्ट्या ठेवण्याचे काम अखंडपणे चालविले होते. शंकर मामा अधून मधून गोळ्या व औषधी देत होता. ग्यानबुवा अन शिष्यगणांचा नामस्मरणाचा सोहळाही अखंडपणे चालू होता. अन एक अत्यंत महत्वाची घटाना घडते.
रमाई ताडकन उठतात अन सासरे बुवा (रामजी सपकाळ) आले असं बोलू लागतात. त्या म्हणतात, “मामंजी, मी तुम्हाला दिलेला शब्द पाडला बरं का. साहेबाना तुमच्या म्हणन्या प्रमाणे खूप शिकण्यास मदत केली. मी बायको म्हणून त्यांच्या शिक्षणात कधिच अडथळा आणला नाही.  संसाराचा सारा भार मी पेलला अन त्याना मुक्तभरारी घेण्यास वाट दिली. मी त्याना संसारात अडकून ठेवलं नाही. त्याना संसाराची काळजी करु दिली नाही. आता मात्र मी थकले ओ मामंजी. आता या तुमच्या सेवेत येण्याची ईच्छा आहे.”
अत्यंत धार्मिक वृत्तीमुळे  शेवटच्या घडीला असा संवाद होणे वा घडून येणे अगदी शक्य आहे. रमाई ज्या प्रकारच्या धार्मिक होत्या त्यांची देवा प्रती जी श्रद्धा होती ते बघता कोणी स्विकारो वा न स्विकारो पण रमाईचे हे वाक्य मी मात्र स्विकारतो.
पहाटे पाच वाजता शंकरमामा डॉक्टरांकडे गेले. रात्रभर तापात चाललेली बडबड सांगुन लगेच त्याना सोबत घेऊनच मामा घरी आले. डॉक्टरानी परत एकदा रमाईची तपासणी केली व औषध सुरु ठेवायचा सल्ला दिला. जाताना परत एकदा शंकर मामाना डॉक्टर म्हणाले. लवकरात लवकर आंबेडकर साहेबाना बोलवा.  आता मात्र अवसान गळाले. सर्व हतबुद्ध होऊन डॉक्तरांकडे पाहू लागले. बाबासाहेबाना बोलाविण्यासाठी वसईला बातमी धाडली होतीच.  ईकडे रामाई डोळ्यात जिव आणून बाबासाहेबांची वाट बघू लागली. मधेच शंकरमामाना बोलावून रमाई रागावू लागल्या. साहेब आजून का आले नाही याचा जाब विचारुन परत अस्वस्थतेमुळे बेशुद्ध अवस्थेत जाऊ लागल्या. एकंदरीत शेवटच्या घटका सुरु झाल्या होत्या. फक्त बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी तितका जिव अडकून पडला होता.
२६ मे १९३५ रोजी संध्याकाळी दारात मोटारीचा आवाज आला. बाबासाहेबानी वसई वरुन यायला खूप उशीर केला होता. पण रमाईनी मात्र सर्व शक्ती पणाला लावून जिव एकवटून धरला होता. बाबासाहेबाना पाहून रामाईनी चेह-यावर समाधान व्यक्त केले. ज्या व्यक्तीसाठी मागच्या दोन तीन दिवसापासून एवढा त्रास सहन करुन धीर धरला होता ती व्यक्ती आता पुढे उभी होती. बाबासाहेब रमाईच्या बिछान्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसले व डॉक्टरानी दिलेल्या औषधपाण्याचा डोस घ्यावयास लावला. रमाईची ही अवस्था पाहून त्यानाही भरुन आलं. ते पहिल्यांदा ओक्साबोक्सी रडले. त्याना रडताना पाहून घरातील सर्व सदस्याना अवघडल्यासारखे होत होते. ज्या बाबासाहेबाना देशातील सर्व वृत्तपत्रे लोखंडी काळजाचा निष्ठूर म्हणून उल्लेख करीत त्यांचा हा असा आगळा वेगळा चेहरा बघून सर्व थक्क झाले. आज लोकाना कळलं की आतले बाबासाहेब किती मृदू व हळवे आहेत. बाहेर जे कठोर दिसतात ते परिस्थीतीशी सामना करण्यासाठी सिद्ध झालेले कृत्रीम वा लढवय्ये बाबासाहेब हे खरे बाबासाहेब नसून गरज म्हणून निर्माण झालेले बाबासाहेब होतं. खरे बाबासाहेब तर अत्यंत भावूक, प्रेमळ व हळवे आहेत. पण सनातनी समाजाच्या निर्दयी प्रवॄत्तीला उत्तर देता देता खरे बाबासाहेब कधी बाहेरच आले नाहित. पण आज मात्र ईतक्या दिवस लपून बसलेल्या बाबासाहेबांचं दर्शन घडत होतं. रमाईच्या डोक्यावर व पाठीवरुन हात फिरवीत बाबासाहेबानी ती अख्खी रात्र जागून काढली.
सकाळ झाली तरी बाबासाहेब तिथेच बसुन रमाईला न्याहाळत होते. सर्व जिवन पट झरझर डोळ्यासमोरुन सरकत होते. रमाईनी किती कष्ट उपसून दिवस काढले याचा आढावा डोळ्यापुढे सरकत होतं. ते सर्व आठवून बाबासाहेब अत्यंत भावविवश होतात अन त्यांच्या डोळ्यातून गळालेले अश्रूचे थेंब थेट रमाईच्या चेह-यावर पडतात. रमाई जाग्या होतात व बाबासाहेबांचे अश्रू पाहून त्याही व्याकूळ होतात. तेवढ्यात त्यांच्या छातीत एकदम जोराची कळ येते व त्या ओरडू लागतात. बाबासाहेबानी शंकर मामाला हाक मारली. लक्ष्मी, शंकरमामा, मुकूंद व ग्यानबुवा सकट सगळे धावले. रमाई शेवटच्या घटका मोजू लागल्या. तेवढ्यात बाबासाहेबानी रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. अन अक्ष्मीबाईनी गौराबाईना सांगितलं, “गौराबाई....... रमाला कुंकु लावा........... करंडा तिथेच असेल बघा.......... सुवासीनीचा मान द्यायची वेळ हाय ही.”
गौराबाईनी करंडा घेतला, आधी स्वत:ला कुंकु लावला व नंतर रमाईला कुंकु लावला. बाबासाहेब मात्र रडात होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. रमाईनी आपला एक हात उचलून बाबासाहेबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तो हात मधुन खाडकन खाली पडला अन ज्योत मालवली. घड्याळात बरोबर साडेनऊ वाजले होते. दिवस होता २७ मे १९३५. रमाईनी बाबासाहेबांचा निरोप घेतला. या वेळी राजगृहात ज्या किंकाळ्या उठल्या त्या रेखाटना पलिकडच्या आहेत.
--------------------
रमाईच्या निधनाची बातमी वा-या सारखी शहरात पसरली. गिरणी कामगारानी ताबडतोब काम बंद केले. सर्व कामगार राजगृहाकडे धावले. बाबासाहेबांची अवस्था पाहण्यासारखी नव्हतीच. हा हा म्हणता १०,००० च्या वर माणसं जमली. आज राजगृहा समोरा सारा अस्पृश्य समाज पोरका झाल्याच्या भावनेने राजगृहा समोर टाहो फोडत होता. अन ईकडे आत रमाईच्या अंतिम यात्रेची तयारी चालू होती. बाबासाहेब म्हणतात, “रमाला पांढरे पातळ आवडत असे, तीला पांढरे पातळ नेसवा.” काय ती काळजी. अशा अवस्थेतही त्याना बायकोच्या आवडी निवडीचं बरोबर भान होतं. पण लोकानी तसे करण्यास नकार दिला. सौभाग्यवतीला शेवटच्या प्रवासाह हिरवा चुळाच नेसवायचा असतो, अन रमाईचा या प्रवासात हिरव्या चुळ्यावरचा अधिकार बनतोच बनतो. त्यावर बाबासाहेबानी माघार घेतली व हिरवा चुळा नेसविण्यात आला.
राजगृह ते वरळी हिंदू स्मशानभूमी पर्यंत निघालेल्या या प्रेतयात्रेत हजारो बांधव सामिल झाले. स्वत: बाबासाहेब, डॉ. पी. जी. सोळंकी, देवराव नाईक हे एका मोटारीत तर दुस-या मोटारीत त्यांचे खास सहकारी शिवतरकर, कमलाकांत चित्रे, दत्ता प्रधान सारखी मंडळी होती. ईतर तीन-चार मोटारीतून घरची व नात्यातील सर्व मंडळी होती. समता सैनिक दल अफाट जनमुदायाला ओरडून ओरडून वाट देण्याच्या कामात लागला होता. ग्यानबुवा, मडकेबुवा सोबत चालले होते तर चिरंजीव यशवंत हाती शिंकोळी घेऊन रडत रडत पुढे सरकत होते.
प्रेतयात्रा वरळीत पोहचली, अलोट गर्दीमूळे वरळी नगरीत पाय ठेवायला जागा उरली नव्हती. एका बाजूला चिता रचली गेली. दुस-या बाजूला शोकसभा आयोजीत करण्यात आली. या शोकसभेत सर्वप्रथम श्री. देवराव नाईक बोलले. त्या नंतर सिताराम शिवतरकरही बोलले. तेंव्हा रमाईला अगदी जवळून ओळखणारे ग्यानबुवा मधेच बोलले. त्यानी आपल्या भोळ्या भाबळ्या भावना व्यक्त केल्या. तिकडे चिरंजीव यशवंतनी आईच्या चितेला अग्नी दिला. बाबासाहेबानी हंबरडा फोडला व अशा प्रकारे सहजिवनाचा हा  अध्याय ईथे बंद पडतो अन बाबासाहेब या पुढे कायमचे एकाकी पडतात......

-Adv: एम डी रामटेके...✍️

----------------------------------------------------------------------------------------------------

2】 मित्र- मैत्रिणीनो... बाबासाहेबांचे हे पत्र वाचून, तुमच्या डोळ्यातून पाणी नाही आले तर , मग बोला....हे पत्र पूर्ण वाचा.... आणि आपल्या प्रतिक्रिया / भावना नोंदवा....!

-----------------------------------------------------------------
रमा.... !
कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.
     
दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.
   
मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.
   
आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.
     
रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.
   
मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.
     
आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.
   
मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !
   
मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.
   
खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.
   
माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.
   
रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
   
रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
           
सर्वांस कुशल सांग.....!
कळावे,

तुझा.... भीमराव.....!

【Ref:लंडन, ३० डिसेंबर १९३०】
(यशवंत मनोहर यांच्या 'रमाई' या पुस्तकातून साभार)
धन्यवाद - राज जाधव सर.
--------------------------------------------------------------------------
-----------------

3】 बाबासाहेब रमाई प्रती आपल्या वेदना प्रकट करतांना म्हणतात, "मी परदेशात असतांना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनही वाहावी लागत आहे व मी स्वदेशी परत आल्यानंतर माझ्या विपिन्न दशेत शेणाचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहत आणण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही अश्या ममताळु, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातुन अर्धा तासही मला घालवीता येत नाही..."

【संदर्भ :अग्रलेख, लौकिक ऋण,बहिष्कृत भारत, ३.०४.१९२७】

---------------------------------------------------------------------------------------


4】 "माझी रामू फारच भोळी होती. तिच्या मनात कोणतेही छळ, कपटास कोणतेही स्थान नव्हते. जर मी आजारी पडलो तर, ती रात्र-रात्र जागायची. ती स्वभावाने फार हट्टी आणि आपल्या म्हणण्यावर अटळ राहणारी होती, पण मनाने फारच कोमल होती. सेवावृत्ती तिचे अंगभूत लक्षण. दिवस असो की, रात्र असो चहापाण्याची व्यवस्था ती करायची स्वयंपाक करण्यास पटाईत. तिच्याकडूनच मी चांगले जेवण बनविणे शिकलो. ती सर्वांना खाऊ-पिऊ घालायची. महाड सत्याग्रहाच्या वेळी मला मारण्याचे षडयंत्र उघडकीस आले तेव्हा ती फारच भिली होती. एकदा नव्हे तर, कित्येकदा ती मला म्हणाली की, ती माझ्या सोबतच राहील. जेथे कार्यक्रम असेल तेथे तुमच्या सुरक्षिततेसाठी राहील. मी तिला वारंवार समजाविले की, तू आपल्या कुटुंबियांना बघ पण, ती फारच जिद्दी. तिला माझी फारच काळजी. कधी ती होय म्हणायची. तिच्या सरळ स्वभावास मी कधीच विसरू शकत नाही."


-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर...✍📚

【संदर्भ-२० जानेवारी १९४४ नवी दिल्ली येथील सहकाऱ्यांशी चर्चा करतांना या आठवणी बाबासाहेबांनी सांगितल्या】

-----------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!