सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व...!!
1】 सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व...!!
जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले. केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी , न्यायाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या जोरावर जग जिंकले.
जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले. केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी , न्यायाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या जोरावर जग जिंकले.अशोकांच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. जरी कलिङ्ग युद्धात खूप सैनिक मारले गेले, तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एव्हढे प्रचंड सैनिकी सामर्थ्य सम्राट अशोकांचे होते.
सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.
काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ, चीन, मंगोलिया इराण, इजिप्त, श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो सम्राट अशोका शिवाय दुसरा राजा कोण असू शकेल? ज्याने भारतीयच नव्हे तर भारता बाहेरील जनतेच्या मनात देखील शेकडो वर्षांपासून प्रेमाचे, आदराचे स्थान मिळवले आहे तो सम्राट अशोका व्यतिरिक्त कोण आहे?
बुद्ध धम्म स्वीकारला
सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व आहे. कलिंगच्या युद्धातील प्रचंड रक्तपाताने राजपुत्र अशोक व्यथित झाला, मानवी जीवणाची क्षणभंगुरता त्याला अस्वस्थ करून गेली आणी मग भगवान बुद्धांच्या धम्ममार्गावर जीवनाची वाटचाल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. युद्धा ऐवजी प्रेमाने प्रजेला जिंकणारा, प्रजेवर मुलांसारखे प्रेम करणारा, प्रजेची पित्याप्रमाणे काळजी घेणारा, शेजारी देशांना घाबरू नका आपण एकमेकांवर विश्वास ठेवून आनंदाने राहू शकतो असा मित्रांप्रमाणे विश्वास देणारा देवानामप्रिय, प्रियदर्शी अशोका सारखा सम्राट पुन्हा होणे नाही. सम्राटाने बौद्ध धम्माला अनुसरून देशात लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली.अगदी ग्रामपंचायत पातळी पासून शासनव्यवस्था निर्माण केली, अतिशय प्रभावी अशी महसूल व्यवस्था निर्माण केली, जनतेला शेतीसाठी जमिनीचे पट्टे वाटले, रस्ते बांधले, तलाव, विहिरी निर्माण केल्या, नदीवर बांध घालुन हि भूमी सुजलाम-सुफलाम केली, जनतेच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आरोग्यशाला, मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा निर्माण केल्या, मुलांचे संगोपन हि राज्याची जबाबदारी आहे असा नियम बनवला, भुकेल्यांसाठी अन्नछत्र निर्माण केले, जनतेला चोर, दरोडेखोर, लुटारू यांच्यापासून सरंक्षण दिले व्यापाऱ्याना सरंक्षण दिले..
भारताचा व्यापार देश-विदेशात सुरू करणारा पहिला भारतीय राजा
व्यापारी मार्गांवर विश्रांती स्थळ निर्माण केले, सम्राटाने व्यापा-यांना देश-विदेशात व्यापार करायला प्रोत्साहन दिले, सम्राटाच्या पाठींब्यावर भारतीय व्यापाऱ्यानी इजिप्त, ग्रीस, सीरिया, पूर्व आशिया आणि मध्य आशियातील देशांशी समुद्रमार्गे आणि भूमार्गे व्यापार केला. म्हणतात कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघायचा पण सम्राट अशोकाच्या काळात भारतात सोन्याचा धूर निघायचा असे कोणी सांगत नाही, अशोकाच्या काळात जागतिक व्यापारातील ४०% हिस्सा भारताचा होता आज तो हिस्सा २% इतका खाली आहे.
त्याकाळात सम्राटाच्या नेतृत्वाखालील भारत एक जबाबदार जागतिक महाशक्ती होता.
सम्राट अशोकाच्या बहुतेक शिलालेखांवर एक चक्र आहे त्यास “अशोक चक्र ” असे म्हणतात,हे चक्र स्वतः पुढे जाणाऱ्या काळाचे प्रतिक आहे,त्यावरील २४ आऱ्या ह्या सतत प्रवाहित होणाऱ्या काळाचे प्रतिनिधित्व करतात. भारताच्या राष्ट्रध्वजात हे अशोक चक्र सन्मानित करून स्वीकारण्यात आले.
बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आपल्या मुलांना विदेशात पाठवणारा महान सम्राट
सम्राट अशोका यांनी भिक्खूसंघाला देशविदेशात धम्म प्रसारासाठी पाठवले. बौद्ध भिक्खू बौद्ध तत्वज्ञानं चीन सहित पूर्व आशिया, इराण, मध्य आशिया, इजिप्त आणि ग्रीस पर्यंत घेऊन गेले. स्वतः सम्राटाने स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा धम्मप्रसारासाठी दान केले. जेव्हा बालक राहुलने आपला पिता भगवान बुद्धांकडे वारसा मागितला तेव्हा बुद्धांनी राहुलला वारश्यात कपिलवस्तुच राज्य न देता, कोणतीही संपत्ती न देता धम्माचा वारसा दिला, तद्वत सम्राट अशोकाने सुद्धा आपली मुलगी संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांना वारश्यात आपले अफाट साम्राज्य न देता धम्माचा वारसा दिला. आदी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि जो अंतीही कल्याणकारी आहे अश्या बौद्धधम्माला अभिप्रेत लोककल्याणकारी आज्ञा असलेले ८४ हजार शिलालेख, प्रस्तरखंड, गुंफा कोरल्या आणि केवळ आज्ञा कोरल्या नाहीत तर त्यानुसार राज्यकारभार चालतोय कि नाही यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुद्धा निर्माण केली. अगदी इराण मधे सुद्धा हे शिलालेख सापडले आहेत.
सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे.
माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ मध्ये म्हणतात की, ‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा सम्राट् अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.’’
भारताच्या इतिहासात एकच असा ‘एकमेव’ म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.
—विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
(Ref: ॲनिहिलेशन ऑफ कास्ट)
“जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वत:ला ‘हिज हायनेस’, ‘हिज मॅजेस्टीज’, ‘हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज’ आणि अशा त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले; पण सम्राट अशोक! ते मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपतच राहिले आहे, अगदी आजपर्यंत.”
— एच्.जी. वेल्स (ग्रंथ – आऊलटाईट ऑफ हिस्टरी)
“इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरश: गर्दी झाली आहे; पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे.”
— एच्.जी. वेल्स (ब्रिटीश इतिहासतज्ज्ञ)
“आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते, ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की, भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही.”
— जवाहरलाल नेहरू (ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ इंडिया)
लेखन – प्रशिक धांदे...✍️
नेर(लेखक पत्रकार आहेत)
( काही संदर्भ – विकिपीडिया )
-------------------------------------------------------------------------------------
2】मी एकदा विमान प्रवासाने जात असताना विमानातून दिसणारे भूभाग पाहत असताना विचार आला की इतका मोठा भारत खंडप्राय झालेला त्यास एकत्र करून देश ही संकल्पना आणणारा पहिला राजा कोणी असेल तर सम्राट अशोकच! इतकं मोठं राज्य त्यावेळी दळणवळणाची यंत्रणा नसताना देशावर अधिराज्य गाजवून अफगाणिस्तान ते थेट सौदी अरेबियात पण मजल मारणारा सम्राट अशोक बुद्धाने सांगितलेले तत्वे ,विचार शिलालेख, लेणी , शिल्प स्वरूपात प्रसारित केली.एक न्यायप्रिय सम्राट , लोकशाही पुरस्कर्ता ,देशाला एकसंघ ठेवून देशाची आर्थिक सुबत्ता वाढविण्यारा , धनसंपन्न देश बनविण्यारा महान राजा!
आताचा भारत पूर्वीचा जम्बुद्वीप हा खंड खंड तुकड्या मध्ये विखुरला होता त्यात अफगाणिस्तान बलुचिस्तान सौदी अरेबिया पासून ते सध्याचा बांग्लादेश तर दक्षिणेच टोक याला अखंड एकत्र भारत करणारा एकमेव द्वितीय राजा ,नुसता राजा नव्हे तर सम्राट ज्याने तलवारी च्या जोरापेक्षा मानवतेच्या जोरावर अखंड भारत जोडला .अर्थनीती ,व्यापार, सांस्कृतिक ,सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय विविधांगी क्षेत्रात प्रभाव पडणारा इतकंच काय तर पशु पक्षी उन्हाळ्यामध्ये तहानेने तडफडू नये ,छोट्याश्या चिमण्यासाठी पाणी मातीच्या भांड्यात ठेवण्याचे आदेश देणारा एकमेव महान चक्रवर्ती सम्राट अशोक !!! जगातल्या महान राजांपैकी एक परदेशातील इतिहासकाराचे कुतूहल असणारा सम्राट अशोक हा आहे .सम्राट अशोकाची कीर्ती किती महान होती याचा अभ्यास सर्वांनी करावा .अशोकाच्या विविध पैलूचा अभ्यास केला तर लक्षात येईल की या राजाचा इतिहास गौरव आपण बाजूला ठेवलेला आहे .अगोदर सम्राट अशोक पुस्तकातुन वाचा ,अशोकाचे शिलालेख अभ्यासा आणि नंतर अशोकाच्या कार्याचा गौरव कार्यक्रम देशभर सुरू केले तर मोठा बदल पाहायला मिळेल.इथल्या ब्राह्मणी इतिहासकारानी सम्राट अशोक ला बदमान करण्यातच धन्यता मानलेली आहे ."सहा सोनेरी पाने" या अर्थहीन पुस्तकातून विनायक दामोदर सावरकर ने अशोकाला देशद्रोही म्हटले आहे.जोवर इतिहास आपण वाचणार नाही व त्याचा प्रसार करणार नाही ,इतिहास इतिहास राहील आणि जो खरा सम्राट देशासाठी होऊन गेला तो दूर राहून ब्राह्मणी व्यवस्थेतील राजांना डोक्यावर घेऊन नाचण्यातच तुमची धन्यता राहील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी Riddles in Hinduism या महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मिती पुराण,वेद व अतिप्राचीन ग्रंथसंपदा यांचा अभ्यास करून मोठी चिकित्सा केलेली आहे . ज्या प्रमाणे वामन (विष्णू अवतार) हे पुराणातील काल्पनिक पात्र आहे तर बळी हे सुद्धा कल्पनिकच पात्र आहे.बळीचा उदो उदो करणे म्हणजे वामन अवताराला एकप्रकारे पावती देणे होय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली पण त्यात बळीराजा चा उल्लेख मला तरी कुठे पहायला आला नाही. महात्मा फुले च्या लिखानात तो जरूर आलाय परंतु तत्कालीन आकलन काळानुरूप असते आणि ते बदलते.
या देशात बौद्ध धम्म इतका रुजला होता की त्याचा पाडाव करणे शक्य नव्हते .सम्राट अशोकाने धम्माचा इतका मोठा प्रचार प्रसार केला होता की चक्रवर्ती सम्राट व मानवता धम्माचा प्रचारक असलेला देशातलाच नव्हे तर जगातला सर्वश्रेष्ठ राजा होता. ज्यावेळी बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर ही लोकांच्या मनात बुद्ध, धम्म आणि सम्राट अशोक होता .त्याच पाडावानंतर अनेक पुराणे आणि काही वेद, रामायण ,महाभारत लिहिल्या गेलं .बुद्धाबद्दल ,धम्माबद्दल सम्राट अशोकबद्दल लोकांच्या मनात सहानभूती होती ती सहानभूती divert करण्यासाठी बळीराजा ची निर्मिती करण्यात आली .बळीराजाला जस रंगवलं तो ब्राम्हणवादाचाच पुरस्कर्ता दाखविलेला आहे आणि तो सुद्धा काल्पनिक पात्रच आहे.बळीराजा ची निर्मिती फक्त आणि फक्त बौद्ध धम्माचे महत्व कमी करण्यासाठी व सम्राट अशोकाचे महत्व पुसून टाकण्यासाठी केलेली आहे .बळिराजा ला पुढे करून सौम्य ब्राम्हन्यवादी भूमिका घेतली गेली.जेणेकरून मूळ धम्म व सम्राट अशोक ही ओळख पुसून जावी हा उद्देश त्या मागे होताच.
मधल्या काळात ते आजही मराठावादी संघटना त्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी ओबीसी लोकांना बळीराजाला फ्लॅश करून खूप मोठं करण्याचा प्रयत्न केला गेला. मध्यंतरी माझ्या वाचण्यात "सद्धम्म संदेश" तसेच डॉ विनोद अनाव्रत इतिहास संशोधक यांनी सुद्धा बळीराजा च्या खोट्या उदात्तीकरनावर संशोधक लेख प्रसिद्ध केले होते.त्यामुळे आपण पुराण, वामन यांना काल्पनिक मानत असाल तर बळी हा सुद्धा कल्पनिकच पात्र आहे.
सम्राट अशोक ची कीर्ती विविध कामावरुन लक्षात त्यात प्राण्यापासून ते जनतेची काळजी घेण्याची गोष्टी ते देशाची पत विदेशी व्यापारापर्यंत इतकं अफाट कर्तृत्व सम्राट अशोक च आहे. देवनामप्रिय चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
- प्रविण जाधव...✍️
---------------------------------------------------------------------------------
3】 सम्राटाच्या शिलालेखांच्या शोधाचा प्रवास...!!
सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून भारताच्या लिखित इतिहासाचा प्रारंभ होतो हे निर्विवाद सत्य आहे. या शिलालेखांच्या पूर्वीचा लिखित पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. आपली नीतिपर शिकवण आणि इतिहास हा दगडांवर कायमस्वरूपी कोरून ठेवण्याच्या अशोकांच्या दूरदृष्टीपणाचे आणि बुद्धिमतेचे कौतुक करावेसे वाटते. सम्राटाच्या या शिलालेखांचा शोधप्रवास हा देखील त्याच्या व्यक्तिमत्वा इतकाच रंजक आहे.
१७५० साली सर्वात पहिल्यांदा पाद्री टायफेनथालर यांना दिल्ली मेरठ येथील स्तंभलेख आढळला. त्याची लिपी व भाषा माहित नसल्यामुळे त्यांनी फक्त त्याची नोंद करून ठेवली. १७८५ मध्ये ह्यरिंग्टन यांनी बाराबर आणि नागार्जुनी डोंगरावरच्या लेणींना भेट दिली व पहिल्यांदाच या लेणींची इतिहासात नोंद झाली. तेथील शिलालेख देखील नोंदवून ठेवण्यात आला. याच काळामध्ये कॅप्टन पोलियर यांनी दिल्ली टोपरा येथील स्तंभलेख शोधला आणि त्याचे चित्र काढून सर विलियम जोन्सकडे पाठवून दिले. जोन्स यांनी हा स्तंभलेख आणि त्या बरोबरच अलाहाबाद कोसम येथील कॅप्टन जेम्स होरे यांनी शोधलेला स्तंभलेख हे दोन्ही १८०१ साली ‘एशियाटिक रिसर्चेस’ मध्ये प्रकाशित केले व त्याचा अर्थ शोधण्याचे आवाहन सर्व अभ्यासकांना केले. १८२२ मध्ये मेजर जेम्स टॉड यांनी गिरनारचा शिलालेख शोधला. याच काळात अलाहाबाद येथील टांकसाळीत अधिकारी असलेला जेम्स प्रिन्सेप, या सर्व स्तंभलेख आणि शिलालेखांची लिपि समजावून घेण्याची धडपड करत होता. खंदाहर मध्ये सापडलेल्या खरोष्टी लिपीतील शिलालेख आणि येथील शिलालेखांच्या लिपी वर त्याचे संशोधन चालू होते. १८३४ साली बंगाल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल मध्ये लेफ्टनंट बर्ट यांनी केलेल्या अलाहाबाद स्तंभलेखाचे चित्रण व प्रिन्सेपणे शोधलेले काही लिपींची अक्षरे प्रकाशित करण्यात आली. १८३५ साली कॅप्टन लान्ग यांनी गिरनारचा शिलालेख कापडावर लिहून मुंबईच्या डॉ. विल्सन कडे पाठविला जो त्यांनी प्रिन्सेपकडे भाषांतरासाठी पाठवून दिला. १८३६ च्या उत्तरार्धात महाराज रणजित सिंहांच्या दरबारी असलेल्या फ्रेंच अधिकारी कोर्ट यांनी शाहबाजगढी येथील शिलालेख शोधला व त्याची नक्कल करून प्रिन्सेपकडे पाठवली. सगळीकडून येत असलेले स्तंभलेख आणि शिलालेखांचे चित्रण आणि नक्कल पाहून प्रिन्सेपने ही लिपि शोधून काढण्याचा ध्यास घेतला.
सतत सहा महिने, दिवस रात्र प्रचंड मेहनत घेऊन जेम्स प्रिन्सेपने अशोकांच्या शिलालेखांची स्वर, व्यंजन वर्णमाला तयार केली. १८३७ साली सर्वात पहिल्यांदा दिल्ली टोपरा येथील अशोकांच्या स्तंभलेखाचे वाचन जेम्स प्रिन्सेपने केले व त्याचे प्रकाशन केले. त्यानंतर लगेचच त्याने लौरिया आरिया आणि लौरिया नंदनगढ येथील स्तंभलेखांचे वाचन केले.
मेजर पेव यांनी दिल्ली मेरठ येथील स्तंभलेखाचे संपूर्ण दृश्यप्रत बनवली जी प्रिन्सेपने प्रकाशित केली. याच वर्षाच्या शेवटी लेफ्टनंट कीटोय यांनी धौली येथील अशोकाचा एक महत्त्वाचा शिलालेख शोधून काढला. हा शिलालेख शोधत असताना त्यांच्या जीवावर बेतले होते. खरं तर धौली येथे लेफ्टनंट कीटोय १८३६ सालीच गेले होते, मात्र या शिलालेखाच्या पायथ्याशी एक अस्वल आपल्या दोन बछड्यांबरोबर राहत होती. कीटोयला पाहताच अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला आणि नाईलाजस्तव कीटोय यांना तिच्यावर गोळी झाडावी लागली. जखमी झालेल्या कीटोय यांना परत फिरावे लागले. मात्र या शिलालेखाचा शोध घ्याचाच म्हणून ते परत १८३७ साली तेथे गेले तेव्हा त्यांना मोठे झालेले दोन्ही बछडे दिसले. त्यांना हुसकावून लावून कीटोय यांनी दगडावर चढून हा शिलालेख लिहून घेतला व प्रिन्सेपकडे पाठविला. याचे संपूर्ण वर्णन त्यांनी जर्नल मध्ये प्रकाशित केले आहे. १८३८ मध्ये प्रिन्सेपने गिरनार आणि धौली येथील शिलालेखांचा तौलनिक अभ्यास केला आणि तो प्रकाशित केला. १८३९ साली रावेनशॉ यांनी शाह कबिराउद्दीनच्या मदतीने सासाराम, बिहार येथील शिलालेख लिहून घेतला.
१८४० साली मेसन यांनी शहाबाजगढी येथे जाऊन तेथील शिलालेखाची दृश्यप्रत बनवली व प्रकाशित केली. यूरोप मधील अभ्यासक नॉरीस यांनी अभ्यास करून खरोष्टी लिपीतील 'देवानंपियास' हा शब्द शोधून काढला. याच साली बैराट येथी भाब्रु शिलालेख कॅप्टन बर्ट यांनी लिहून काढला आणि तो कॅप्टन कीटोय यांनी पंडित कमलाकांत यांच्या मदतीने लिप्यांतरित केला. हे सर्व शिलालेख अशोक नावाच्या सम्राटाने लिहिले आहे याची खात्री जेम्स प्रिन्सेपला पटली, मात्र ठोस पुरावा सापडत नव्हता कारण कुठल्याच शिलालेखांमध्ये हे नाव आढळत नव्हते. प्रिन्सेपने शिलालेखांच्या लिपीला "अशोकन स्क्रिप्ट" हे नांव दिले. याच वर्षी प्रिन्सेपचे कामाच्या प्रचंड ताणांमुळे, अवघ्या चाळीसाव्या वर्षी निधन झाले. मात्र अशोकांच्या शिलालेखाचे शोधकार्य आणि भाषांतराचे काम थांबले नाही. प्रिन्सेपने तयार करून दिलेल्या वर्णमालाच्या साह्याने अनेक अभ्यासक हे काम करत राहिले. १८५० साली सर वॉल्टर इलियट यांनी ओडिशा येथील जौगडा येथे असलेला अशोकाचा शिलालेख शोधून त्याची दृश्यप्रत बनवली. अभ्यासांती त्यांनी हा शिलालेख शहाबाजगढी, गिरनार आणि धौली यांच्या सारखाच आहे हे सिद्ध केले. १८६० साली फॉरेस्ट यांनी देहरादून येथील कालसी या ठिकाणाचा शिलालेख शोधून काढला. या शिलालेखाच्या दगडावर संपूर्ण शेवाळ पसरले होते. १८७० मध्ये कर्नल एलिस यांनी मध्य प्रदेशातील रुपनाथ येथील शिलालेख शोधून काढला. १८७२ मध्ये कार्लाईल यांनी राजस्थानातील बैराट येथील लहान शिलालेख आणि बिहार मधील रामपूरवा येथील स्तंभलेख शोधून काढला. १८७९ साली सर अलेक्झांडर कंनिंगहम यांनी अशोकांचे शोधलेले सर्व शिलालेख, स्तंभलेख यांच्या लिप्यांतरांचे व भाषांतराचे संकलन करून 'कॉर्पस इन्स्क्रिप्टोनम इंडिकारम' च्या पहिल्या भागात प्रकाशित केले. याची संकल्पना जेम्स प्रिन्सेपचीच होती आणि अजून शिलालेख सापडू शकतील हे गृहीत धरून कनिंगहम यांनी पहिला भाग प्रकाशित केला व नंतर सापडणारे शिलालेख दुसऱ्या भागात प्रकाशित करावे असे सूचित केले. सम्राट अशोकांचे शिलालेख शोधण्याचे काम अविरत चालू होते. १८८२ साली डॉ. भगवानलाल इंद्रजी यांना मुंबई जवळील सोपारा येथे शिलालेख सापडला. १८८९ साली कॅप्टन लेह यांना पाकिस्तानातील मनशेरा येथे अशोकाचा शिलालेख सापडला. १८९१ साली लेविस राईस यांना म्हैसूर येथे तीन शिलालेख सापडले. १८९५ साली फ्युरर यांनी नेपाळ येथील निगाली सागर येथे स्तंभलेख शोधला तर १८९६ साली त्यांनीच रुम्मिनदायी येथील स्तंभलेखही शोधला. १९०५ साली ओर्टेल यांनी सारनाथ येथील स्तंभलेख शोधला. १९१५ साली कर्नाटक येथील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथील सोन्याच्या खाणीचे इंजिनियर बेडॉन घरी परतत असताना त्यांना अचानकपणे एका दगडावर शिलालेख दिसला. हा शिलालेख अतिशय महत्त्वाचा ठरला कारण आत्तापर्यंतच्या सर्व शिलालेखात 'देवानं पियदस्सी राज्ञो' एवढंच लिहिले होते त्यामुळे हे शिलालेख कोणी लिहिले हे कळत नव्हते मात्र मस्की येथील शिलालेखात प्रथमच 'देवानं पियदस्सी राज्ञो असोक' लिहिलेले आढळले आणि भारतात अशोक नावाचा सम्राट होऊन गेला आणि त्यानेच हे सर्व शिलालेख लिहिले ही माहिती जगाला प्रथमच कळाली. संशोधकांना या महान सम्राटाच्या राज्याची कल्पना आणि त्यांनी लिहिले नीतिपर शिकवणीचा परिणाम भारताबरोबरच इतर देशांवर कसा झाला याची माहिती मिळाली. या देशावर सम्राट अशोक नावाचा महान राजा होऊन गेला हे जेम्स प्रिन्सेपचे संशोधन खरे ठरले.
या सर्व शिलालेखांचे लिप्यांतर आणि भाषांतराच्या कामात अनेक संशोधक आणि अभ्यासकांनी स्वतःला वाहून घेतले. फ्रँके, स्मिथ, फ्लीट, मायकलसन, ल्यूडर्स, थॉमस, हल्ट्झ, भांडारकर, जयस्वाल, बरुआ आणि वूलनर यांनी अशोकांच्या शिलालेखांवर खूप काम केले. १९२५ साली हल्ट्झ यांनी शिलालेखाचा कॉर्पस मध्ये दुसरा भाग प्रकाशित केला.
सम्राट अशोकांचे शिलालेख शोधण्याचा या २७० वर्षांचा अथक प्रवास अतिशय महत्त्वपूर्ण आणि भारताच्या इतिहासाला नवीन वळण देणारा ठरला. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि तहान भूक हरवून, अशोकांचे शिलालेख शोधण्याचे काम करणाऱ्या या सर्व संशोधकांना मनापासून आदरांजली.
-अतुल भोसेकर...✍️
९५४५२७७४१०
---------------------------------------------------------------------------------
4】 सम्राट प्रियदर्शीला (अशोक) आपण जरी एक ऐतिहासिक राजकीय व्यक्ती, एक सम्राट म्हणून बघत असलो तरी तो एका सामाजिक सिद्धांताचा अविष्कार, एक परिणाम होता जो तथागतांनी निर्मिला.
वैयक्तिक जीवनाला मनाच्या संस्कारातून स्वतंत्र, आनंदी मार्ग सांगतांनाच सामाजिक परिस्थितीतून उदभवणारऱ्या दुःखाकडे ही तथागत लक्ष वेधतात. म्हणून आत्मा, परमात्मा, ईश्वर, कर्मकांड, स्वर्ग असल्या साऱ्या अंधश्रद्धेचं जोरदार खंडन करून... प्रज्ञा शील करुणा मैत्री सांगून अत्त दीप भंव (स्वयंप्रकाशित व्हा) चा अंतीम उपदेशही दिला. सर्व सामान्यांना सहज प्रबोधित enlight करता येत नाही. ना त्याच्यासाठी ते स्वतः कधी प्रयन्त करत असतात. त्यातल्या त्यात विषमतेची चटक लागलेल्या समाजाला समता झेपत नसते. अशा वेळी समतेची शिकवण ही कायद्याने बंधनकारक करावी लागते. म्हणून राजकीय शक्तींना समतेच्या तत्वाने प्रभावित करणे तथागतांना योग्य वाटले असावे. कारण राजाच्या नियमांना आणि प्रत्यक्ष आचरणाला समाज सहज follow करत असतो. तथागतांचा स्वतःचा पूर्व संबंध हा राजकीय परिवाराशी असल्यामुळे राजकीय इच्छशक्ती कशा पद्धतीने मोठ्या ऊर्जेने समाज परिवर्तनाचे काम करते हे त्यांच्या अनुभवात होते.
गोतम इतरांना पराभूत करण्याची मनीषा बाळगणारा सम्राट बनला नाही पण बुद्ध बनून त्याने इतरात परिवर्तन घडवले. आणि स्वतःच्या विचारांनी अशी एक सामाजिक पार्श्वभूमी निर्माण केली कि तिथे येणाऱ्या काळात कोणीही राजा बनला तरी त्याच सामाजिक समतेच्या उद्धेशाने काम करेल. पण हे इतकं पण सोप्प नव्हतं की सहज कोणी बुद्ध विचार ऐकावे आणि सम्राट प्रियदर्शी बनावे. त्यासाठी तसा अनुयायी वर्ग असावा लागतो जो सद्विचारांना जिवंत ठेवत असतो. (वंदन त्या आदर्श बौद्ध भिक्कूना ज्यांनी आपल्या प्रयन्तांतून ते साकार केले) हा विचार सम्राटाच्या काळा पर्यंत जिवंत होता म्हणून जगातलं सर्वात मोठं राजकीय आणि सामाजिक परिवर्तन बघायला मिळालं. आणि हाच विचाराचा वारसा अखंड जिवंत राहावा म्हणून सम्राट प्रियदर्शीने असंख्य विद्यालय, विध्यापीठ उभारले, अभ्यासकांना विविध देशात पाठवले, पाषाणावरती इतिहास कोरला. फक्त ह्याच एका कल्पनेने की येणाऱ्या काळात बुद्ध विचाराने प्रभावित होऊन राजकीय इच्छशक्ती जागृत राहून सामाजिक परिवर्तनाचे कार्य असीमित चालत राहावे.
शिक्षणाचे इतक्या मोठ्या स्तरावर सामाजिकीकरण करणाऱ्या ह्या थोर आंतरराराष्ट्रीय आदर्श राजकीय नेतृत्वाला त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
- राहुल पगारे...✍️
---------------------------------------------------------------------------------
5】सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर तलवार म्यान केली याचा अर्थ भारताची संरक्षण व्यवस्था मोडकळीस आली होती ...सम्राटांनी जी अहिंसा स्विकारली ती अहिंसा टोकाची दूराग्रही नव्हती ... " हिंसेची इच्छा व गरज " यात सम्यक धोरण असणारे ते बुध्द तत्व होते ...
साम्राज्य रक्षणात कोणतीही तडजोड सम्राट अशोक करीत नव्हते ....
शेवट पर्यंत त्यांची चतुरंग सेना तत्पर आसायची ..हेर खाते सतत जागृतच असे ...
अशोकांची त्या काळातील मर्यादित लोकसंख्या असल्यावरही (9 कोटी होती) सैन्य शक्ती किती अफाट होती हे पाहल्यावर आपण चकित होतो ..
सम्राट अशोकांची सैन्यशक्ती .
1 ) पायदळ सैन्य ...6 लाख ..
2 ) घोडेस्वार 31 हजार
3 ) हत्ती 9 हजार
4 ) युध्द नौका 2000
5 ) रथ 20 हजार ...
आपल्या लक्षात एका युध्दाची आठवण सांगतो ...
जगज्जेता अलेक्झांडर पोरसासोबत हरणार होता कारण ..पोरसाचे सैन्यात फक्त 20 हत्ती होते ....
लांब भाले घेऊन युध्द करणारी पथके शत्रुसैन्य जवळ येण्या अगोदरच मृत्युमुखी धाडत असत .
पण पोरसाने या पथकाचे आडव्या बाजूने हत्ती सोडल्याने लांब भाले असणारी ग्रिकांची पथके कुचकामी ठरली होती.
पण अलेक्झांडरने आपली अश्वसेना मागे राखून ठेवली होती त्याचे भरवशावर ते युध्द तो जिंकला होता ..
विदेशी सैन्यशक्तीला 9 हजार गजशक्ती ही तत्कालीन शत्रुला हायड्रोजन बॉम्ब सरखीच वाटत असे.
- महेन्द्र शेगांवकर...✍️
---------------------------------------------------------------------------------
6】मौर्य कालीन लिपी जगातून लुप्त झाली होती ..सम्राट अशोकांचे शिलालेख , स्तंभ लेख , लघु लेख , गिरिलेख , नाणी लेख , लेण्यावरील दान लेख भरपूर प्रमाणात मिळाले होते ..पण कोणालाही ते वाचता येत नव्हते ..
तेंव्हा जेम्स प्रिन्सेप या पुरातत्विय अधिकाऱ्याने 7 वर्ष अभ्यास करून मौर्य कालिन लिपी वाचून दाखवलीय ..
ह्याच व्यक्तिच्या योगदानामुळे सम्राट अशोकांचा इतिहास जगा समोर आलाय ..
या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांचे नाणे काढून त्यांचा सत्कार केला होता ..अशा महान संशोधकाने 22 एप्रिल 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला होता ..
-महेन्द्र शेगांवकर...✍️
---------------------------------------------------------------------------------
7】 कोणत्याही देशाचे राष्ट्रचिन्ह हा केवळ त्याचा सरकारी शिक्का नसतो. तर त्या देशाला जी ध्येय व जी मूल्ये प्रिय वाटतात त्याचे ते प्रतीक असते...आपल्यां देशाचे बोधचिन्हे अशोकाच्या नावाशी निगडीत आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.भारताच्या आणि जगाच्या इतिहासात प्रियदर्शी सम्राट अशोकाचे स्थान अनन्यसाधारण व सर्वात अग्रणी आहे. उच्च कोटीतील आहे...
-विश्वरत्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
【Ref:भारतीय घटना परिषदेतील भाषण - २ जुलै १९४७】
---------------------------------------------------------------------------------
8】महिलांना राज्य अधिकारी बनविणारा पहिला चक्रवर्ती...!!
स्त्रीवर्ग आणि चक्रवर्ती धार्मिक धर्मराजा अशोक
--------------------------------------------------
सम्राट अशोकांनी नाविन्यपूर्ण संस्था (Institutions) काढून कल्याणकारी राज्य निर्माण करण्यावर भर दिला.
'#धर्ममहामात्र' असेल, '#धम्मविजय' असेल किंवा '#धर्मयात्रा' असेल, यातून बहुजन हिताय सुखाय अर्थात Kingdom of Righteousness
हेच Governance चे प्रमुख तत्व होते.
त्यांनी त्याकाळी स्त्रियांच्या कल्याणकारी व्यवस्थेसाठी तब्बल 2000 वर्षांपूर्वी नवीन संस्था उभारली होती–
'#स्त्री-#अध्यक्ष-#महामात्र' !
आधुनिक भारतात कम्युनल बहुसंख्याकांना नियंत्रित करणाऱ्या बामन बनिया शासक वर्गाला स्त्रियांसाठी स्वतंत्र डिपार्टमेंट उघडायला 1985 साल उजडावे लागले..
#सम्राटअशोकजयंती
– पवनकुमार शिंदे...✍️
8459853080
--------------------------------------------------------------------------------
9】 लिपिंचा शोधयात्री - जेम्स प्रिन्सेप...!!!
जेम्स प्रिन्सेप १८१९ मधे जेव्हा भारतात आला तेव्हा तो २० वर्षांचा होता. जेम्स हा जॉन व सोफिया याचं १०वं अपत्य होता. १७७१ मधे जेम्सचे वडील, जॉन यांनी भारतात येउन अमाप पैसा कमावला होता व भारतातील संधी पाहून आपल्या मुलांनाही भारतात पाठवले. जेम्सला इंजीनियरिंग व अर्कीटेक्ट या विषयात खूप आवड होती. वडिलांच्या ओळखीने जेम्सला भारतात, कलकत्ता येथील टांकसाळीत ‘अस्से मास्टर’ म्हणजे 'पारख करणारा' म्हणून काम मिळाले. वर्षभरातच त्याची वाराणसीच्या टांकसाळीत बदली करण्यात आली. त्याची कामाची प्रगती बघून थोड्याच अवधीत त्याला बढतीवर पुन्हा कलकत्त्याला बोलविण्यात आले. टांकसाळीत अस्से मास्टर म्हणून काम करताना त्याला अनेक नवीन प्रयोग करता आले व त्याने नवीन उपकरणांचा शोध घेतला. टांकसाळीतील प्रचंड मोठ्या भट्टीतील अचूक तापमान मोजण्याचे उपकरण किंवा ०.१९ ग्रॅम एवढ्याशा धातूचे वजन करण्याचे तराजू हे त्यापैकी काही उपकरणे जेम्सने तयार केली. वाराणसी मधे असताना, जेम्स तेथील अनेक इमारतींच्या शिल्पकलेने भारावून गेला. वाराणसीच्या टांकसाळीचे डिझाईन, तेथील चर्च, वाराणसीला रोगराई पासून बचाव करण्यासाठी सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत भुयारे, औरंगजेबच्या मिनारांची दुरुस्ती आणि दगडी पूल हे सर्व जेम्सच्या कल्पकतेची आजही साक्ष देतात. कलकत्त्याला आल्यानंतर जेम्सने नाणे संशोधनावर भर दिला. जेम्सला “जर्नल ऑफ एशियाटीक सोसायटी”चे संपादक करण्यात आले आणि त्यात त्याने रसायनशास्त्र, खनिज, नाणेशास्त्र, भारतातील प्राचीन वास्तू, स्थळे, हवामान बदल व पर्यावरणावर अनेक लेख प्रसिद्ध केले. मात्र जेम्स प्रिन्सेपची खरी ओळख जगाला झाली ती त्याच्या लिपि संशोधानामुळे. जेम्स तसा खऱ्या अर्थाने भाषातज्ञ किंवा लिपितज्ञ नव्हता, मात्र त्याला संशोधनाची आवड होती. प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती तो मिळवायचा. प्राचीन नाण्यावर काम करीत असताना त्यातील अक्षरे त्याला खुणवू लागली. त्या अक्षरांचे संशोधन तोपर्यंत सिमित होते. या अक्षरांमध्ये व अलाहाबादच्या स्तंभावरील अक्षरांमध्ये काहीतरी साम्य आहे असे वाटल्याने जेम्सने त्याचा पाठपुरावा करायचे ठरविले. ओरिसा मधील काही खडकांवर देखील त्याला काही अक्षर कोरल्याचे कळाले. बिहार मधील बेतिहा या ठिकाणाचे काही शिलालेखांचे ठसे त्याने मागविले. त्याने भारतातील अनेक संस्कृत पंडितांना याबद्दल विचारले मात्र कोणाला ते सांगता आले नाही. ब्याक्टेरिया आणि कुषाण यांची इंडो ग्रीक नाण्यांचा अभ्यासातून त्याने ‘खरोष्ठी’ या प्राचीन लिपिचा शोध लावला. त्याचा हा निबंध एशियाटीक सोसायटीच्या जर्नल मधे प्रसिध्द झाला आणि संपूर्ण भारतातून लोकांनी त्याच्याकडे अनेक शिलालेखांचे ठसे, नाणी, हस्तलिखिते पाठवून दिली. एवढेच नव्हे तर महाराजा रणजीत सिंह यांचे फ्रेंच जनरल जें बाप्तीस्ते वेन्तुरा यांनी रावलपिंडी मधील उत्तखणनात सापडलेली काही शिलालेख पाठवून दिले. शिलालेखातील अभ्यासातून प्रिन्सेप यांनी सर्वात प्रथम शोध लावला तो "दानं" या शब्दाचा कारण अनेक शिलालेखांच्या शेवटी हा शब्द लिहिला होता. १८३७ मध्ये प्रथमच भारतातील शिलालेखांमधील अक्षरांचा शोध प्रिन्सेपने लावला. पुढे सम्राट अशोकाचे शिलालेख वाचताना त्यांच्या प्रत्येक वेळीस आलेला "देवानांपिय पियदस्सिन" हे कोणाला उद्देशून आहे हे कळत नव्हते. प्रिन्सेपला वाटले कि हा कोणी श्रीलंकेचा राजा असावा कारण “महावंस” मधून तेथील देवानांपिय राजाचे नाव मिळत होते. मात्र श्रीलंकेच्या राजाचे हे शिलालेख किंवा स्तंभलेख भारतात कसे काय हा प्रश्न प्रिन्सेपला पडला. सतत ६ आठवड्यांच्या अथक प्रयत्नानंतर, अनेक शिलालेख वाचल्यानंतर व त्यांचे मित्र जॉर्ज टर्नर यांनी श्रीलंकेतील पालि भाषेतील पाठविलेल्या काही संदर्भ ग्रंथावरून देवानांपिय पियदस्सिन म्हणजेच सम्राट अशोक असल्याचे प्रतिपादन प्रिन्सेपने केले. या सर्व शिलालेखांमधे सम्राट अशोकांच्या न्याय, नीती व लोक कल्याणाचा मार्ग हे समान सूत्र लिहिले आहे.
या शोधानंतर प्रथमच जगाला अशोक नावाच्या सम्राटाचे शोध लागला. अनेक शिलालेखांच्या अभ्यासातून प्रिन्सेपने सम्राट अशोकांचे सारे आयुष्य जगासमोर ठेवले. जवळपास २२०० वर्षे अशोक नावाचा कोणी सम्राट या देशात होऊन गेला याचे कोणा गावीही नव्हते.
१९१५ मधे कर्नाटकातील मस्की येथील शिलालेखात सम्राट अशोकाचे नाव दिसले आणि प्रिन्सेपच्या अचूक अभ्यासाची कल्पना आली.
या सर्व शिलालेखांचे आणि प्रिन्सेपच्या कार्याचा गौरव साऱ्या जगाने केला. पुढे प्रिन्सेपने भारतातील शिलालेखांच्या संशोधनाला वाहिलेल्या "Corpus inscriptionium indicarium" या नावाची ग्रंथाची मालिका प्रकाशित करण्याचा सुतोवाच केला जो पुढे जाऊन सर अलेक्सझांडर कन्निंगहमने १८७७ ला प्रकाशित केला. जेम्स प्रिन्सेपच्या लिपि शोधामुळे भारतातील अन्तियोकोस आणि ग्रीक राजांच्या बरोबरच भारतातील अनेक राजांचा इतिहास कळाला. प्रिन्सेपने अफगानिस्तान मधील शिलालेखांचा देखील अभ्यास केला. शिलालेखांच्या अभ्यासावरून प्रिन्सेपने सम्राट अशोकांच्या प्रचंड राज्याची माहिती लोकांसमोर आणली. प्रिन्सेपने शिलालेखांच्या अभ्यासाचा धडाकाच लावला. दररोज १८ ते २० तास त्याचे संशोधन चाले.
अतिपरिश्रमामुळे प्रिन्सेपला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. हवाबदल व उपचारासाठी त्याला इंग्लंडला हलविण्यात आले, मात्र २२ एप्रिल १८४० साली उण्यापुऱ्या ४१ व्या वर्षी प्रिन्सेपचे निधन झाले.
भारतीय शिलालेखातील सर्वात प्राचीन असलेली धम्मलिपि व खरोष्टी लिपि यांचा शोध आणि त्यातून सम्राट अशोक व त्यांचे कार्य जगासमोर येऊ शकले ते केवळ जेम्स प्रिन्सेप मुळेच. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात A.S.I ची स्थापनेचे बीज प्रिन्सेपने रोवले होते. प्रिन्सेपने केलेल्या कामाची दाखल घेत कलकत्तावासियांनी त्याच्या स्मरणार्थ हुगली नदीकाठी “प्रिन्सेप घाट” बांधला तर इंग्लंड मधे सरकारच्या वतीने त्याच्या नावाचे मेडल बनविले. जॉन रोयाले नावाच्या जीवशास्त्रज्ञाने एका झाडाच्या प्रजातीचे नाव “प्रीन्सेपिया” ठेवले. एशियाटिक सोसायटीने त्याचा अर्धपुतळा बसविला. १७७१ मधे पहिल्यांदा आलेल्या जॉन प्रिन्सेप नंतर प्रिन्सेप घराण्याच्या चार पिढ्यांनी भारतात वास्तव्य केले. नुकतेच जेम्स प्रिन्सेपच्या चवथ्या पिढीतील मुलाने जेम्स प्रिन्सेपचे जपून ठेवलेले सारे हस्तलिखितांचे पेटारे अभ्यासासाठी भारत सरकारच्या हवाली केले.
भारतातील सर्वात प्राचीन असलेली सम्राट अशोकांची “धम्मलिपि”चा शोध व भारतीय शिलालेखांचे गूढ उकलल्या बद्दल जेम्स प्रिन्सेपला आदरपूर्वक नमन.
-अतुल मुरलीधर भोसेकर...✍️
९५४५२७७४१०
------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment