हृदयस्पर्शी...!!
आज १४ एप्रिल नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिन नाही, ६ डिसेंबर तर नाहीच
नाही, किंवा तसाच एखादा सण हि नाही . मग आज 'राजगृहाला ' हार का घातला
आहे ? राजा शिवाजी विद्यालयाकडे जाताना एक मध्यमवयीन गृहस्थ एक वयोवृद्ध
स्त्री ,दोन तरुण, एक पुरंध्री राजगृहाला हार घालत असतांना मी पहिले .
तेव्हा केवळ कुतूहलापोटी मी त्यांना प्रश्न विचारला .
तेव्हा तो रुबाबदार उंच बांधेसूद गृहस्थ मला म्हणाला .....
' आजचा दिवस आमच्याकरिता सोन्याचा दिवस आहे . आजचा दिवस आमच्या जीवनात
उगवला नसता तर मी आणि माझी हि आई आम्ही दोघेही केव्हाच मरून गेलो असतो.
आजच्या दिवशी बाबासाहेबांनी माझ्या आईची केस जिंकली ,आज जो मी तुमच्या
समोर उभा आहे तो मी एक पोलीस अधिकारी आहे. आलिशान घर आहे , गाडी आहे सर्व
काही ऐश्वर्य आहे ते केवळ बाबसाहेबांच्या कृपेमुळे आहे. म्हणून ज्या
दिवशी बाबासाहेबांनी माझ्या आईची केस जिंकली त्या दिवसापासून दरवर्षी
आम्ही सहकुटुंब माझ्या या आईसह येऊन राजगृहाला हार घालतो आणि नतमस्तक
होतो. बाबासाहेबांनी केलेले उपकार आम्हांला केव्हाही विसरता येणार नाही.
'
त्या परीस्पर्श झालेल्या मातोश्रीच्या मी पाया पडलो आणि विचारले 'आई
तुमची केस होती तरी कसली ?'
पांढरी शुभ्र साडी परिधान केलेली चेहऱ्यावर ऐश्वर्याची झळाळी आलेली ती
माता खळकन डोळ्यात अश्रू आणून म्हणाली.
'माझा हा दीपक असेल ४-५ महिन्याचा . त्याला घेवून मी बाबासाहेबांच्या
पोयबावडी दामोदर हॉल वर असलेल्या हापिसात गेले . दारावर बालमचा( बालम
म्हणजे राजगृहातील हरकाम्या होता ) पहारा होता , त्यांना मी सांगितले .
'दादा ,मला बाबासाहेबास्नी भेटायचं तेव्हा ते म्हणाले 'ये तू येडी कि
खुळी ?बाबासाहेब कुठल्या तरी विषयाचा अभ्यास करत चारी बाजूला पुस्तकाच्या
गराड्यात बसलेत. त्यांनी सक्त ताकीद दिली आहे कि गव्हर्नर जरी आला तरी आत
सोडू नकोस, अन तू म्हणतेस कि मला बाबासाहेबांना भेटायचं ? ये इकडे बस,
त्यांची पुस्तकातील समाधी मोडली , कि मी त्यास्नी विचारून मग तुला आत
बाबासाहेबांकडे सोडीन.'
'बराच वेळ गेला . पोटात भुकेचा डोंब उसळला होता, लेकरू अंगाला चीटकत
होते. त्याच पोट भरत नव्हत म्हणून त्यान भोकाड पसरल होत. माझे हात पाय
काड्या -वाणी झाल होत. पोट खपाटीला गेल होत. बांगड्या दंडा पावोत सरकत
व्हत्या , मग अंगावर दुध कुठल ?' लेकरू रडल्याचा आवाज ऐकल्याक्षणी
बाबासाहेब गर्जले....
अरे ये बालम , बाहेर कोण रडतयं ?'
' बाबासाहेब , बाहेर एक तरुण बाई आपल्या मुलाला घेवून आली आहे. ती एक
जागेवर जवळ जवळ ४-५ तास झाले असतील , बसलीय , तीचं मुल रडतयं तिने हळू
आवाजात खूप समजावलं , पण ते मुल रडायचं थांबेना .'
हे वाक्य ऐकल्याबरोबर बाबासाहेब स्वतः ऑफिसच्या बाहेर आले अन म्हणाले...
' ये पोरी , त्याला पाजत का नाहीस ? पाजल्यानंतर तो शांत होईल .'
अचानक बाबासाहेबांना समोर पाहताच मी धडपडत कशी बशी उभी राहून त्यांना हात
जोडले . डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले .
'बाबा उपास मारीने दूधच आटलय , तर याला कुठून पाजू .?'
बाबासाहेबांनी, दीपकला जवळ घेतले वा तरा तरा चालत जावून पोयबावडीच्या
कोपऱ्यातील दुधाच्या दुकानात गेले ( आजचे गौरीशंकर छितरमल मिष्टान्न
दुग्धालय )
आणि आपल्या हातांनी माझ्या या लेकराला दुध पाजले. त्याने पण ढसा ढसा एक
ग्लास दुध संपवले. बाबासाहेब परत हापिसात आले. माझ्या लेकराला माझ्या
हवाली केल व मला आत बोलावल . एका कागदावर माझे नाव लिहिले. ,नाव
लिहितांनाच बाबासाहेबांनी दचकून माझ्याकडे पहिले .
' तू विधवा आहेस ?'
' होय बाबासाहेब .' डोळ्यात आसव आणून मी म्हणाले .
' नवरा कोठे काम करीत होता ?'
' बाबा , माझा नवरा बी ई एस टी मधी वायरमन होता. काम करत असतांना
त्यास्नी शॉक लागून ते गेले. मी लय अर्ज विनंत्या केल्या पण कंपनी काय
दाद देत नाय. म्हणत्यात कि तुझ्या नवऱ्याच्या चुकीच्या कामामुळ त्याला
शॉक लागून तो मेला. त्याला कंपनी जबाबदार नाही. बाबा माझा नवरा एकटाच
होता, आम्हाला दुसर कोणी बी नाय . माहेरावरही इस्तू पडलय . तिथं बी कोणी
नाय . एक मनी डोरलं होत ते इकलं तवा त्या पैशांवर आज पावोत तग धरलाय !
बाबा मला व माझ्या लेकराल तुमच्याशिवाय जगात कोणी नाय ! मला मदत करा . मी
तुमच्या पाया पडते.
तवा बाबासाहेब माझ्यावर खेकसले ,
' माझ्या पाया पडू नकोस .'
पुन्हा शांतपणे मायेने म्हणाले .... पोरी , तू आता घरी जा . तू
दाखविलेल्या कागदावरून सर्व माहिती झाली आहे. काय करायचे ते मी करीन.'
पुन्हा बाबासाहेबांना हातजोडून मी निघणार तो बाबासाहेबांनी पाच रुपयांची
नोट दीपकच्या मुठीत खुपसली .
' हे मुलाच्या दुधाकरिता .'
बाबासाहेबांनी बी ई एस टी वर फौजदारी खटला भरला. माझ्याकडून एक पैसा
सुद्धा मागितला नाही. तो खटला बाबासाहेबांनी मला जिंकून दिला . खटल्याचा
निकाल असा लागला कि .
' बाई दुसर लग्न करेपर्यंत किंवा तिचा मुलगा शिकेपर्यंत या कुटुंबाचा सर्व खर्च
बी ई एस टी ने भरावा
-वैभव छाया..✍️
-----------------------
Comments
Post a Comment