बौद्ध विवाह कायदेशीर आहेत का...??
बौद्ध विवाह कायदेशीर आहेत का...??
हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे रूढी परंपरेचे विवाह व सप्तपदी हा संस्कार विधी केलेले विवाह कायदेशीर आहेत. बौद्ध धर्मीय सप्तपदी किंवा हिंदूंच्या रुढीप्रमाणे लग्न करीत नसल्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे लग्नास कायदेशीरपणा प्राप्त होत नाही असा आक्षेप घेतला जातो.
महाराष्ट्र राज्याच्या विधी आयोगाने नवव्या अहवालामध्ये बौद्धांच्या विवाहाची माहिती मिळविली. बौद्ध धर्मातील मान्यवर व्यक्तींनी आयोगाला कळविले, त्यात तत्कालीन महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रा. सु. गवई यांची विधी आयोगाने महत्वाची साक्ष नोंदवली. ते म्हणाले, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर वधु-वर त्रिशरण पंचशील म्हणतात व शेवटी तीन वेळा साधू म्हटल्यावर पुष्पवर्षाव केला जातो...त्यापूर्वी वधु - वर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात, त्यांना पती-पत्नी बाबतची शपथ दिली जाते व विवाह संपन्न होतो, असा विवाहविधी कोणीही बौद्ध व्यक्ती, उपासक किंवा भंते लावू शकतात."
१४ ऑक्टोबर १९५६ ला देशभरातील लाखो दलित बांधवांनी नागपूर च्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग केला व बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे त्यांनी जुनी विवाहाची पद्धत सुद्धा सोडून दिली व नव्या बौद्ध पद्धतीस प्रारंभ केला, ती पद्धत कलम ३ अन्वये रूढी झाली आहे.
मा. मुंबई उच्च न्यायालायासामोरच्या "बेबी जयंत जगताप वि जयंत महादेव जगताप" या प्रकरणात वरील बौद्ध पद्धतीचा प्रश्न उपस्थित करून या पद्धतीला आव्हान दिले असता, मा.न्यायमूर्तींनी विधी आयोगाचा नववा अहवाल लक्षात घेतला, साक्षीदारांनी सांगितलेला बौद्ध विवाहाचा विधी हा अनेक वर्षापासून चालू असल्यामुळे हि पद्धत एक "रूढी परंपरा" असल्याचे मान्य केले.
हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ (१) अन्वये बौद्धाने रूढी परंपरेने केलेला विवाह कायदेशीर ठरतो या प्रकरणात विधी आयोगाच्या नवव्या अहवालाचा उल्लेख केला आहे.
धर्मांतरित बौद्धांनी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करावा या बाबत मुंबईच्या एका व्ही.एस. कर्डक नावाच्या शिक्षकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली होती. त्या पत्राचे उत्तर बाबासाहेबांनी ४ डिसेंबर १९५६ (महापारीनिर्वानाच्या अगदी दोन दिवस अगोदर) ला दिले होते. बाबासाहेबांनी लिहिले होते कि, बौद्ध विवाहात सप्तपदी व होमाची काहीच आवश्यकता नाही. अगदी सध्या पद्धतीने विवाह संपन्न करावा. एक मातीचा पाण्याने भरलेला घडा ठेवा, त्यामध्ये लांब धागा ठेवा, त्याचे एक टोक वरच्या हातात व दुसरे वधूच्या हातात ध्यावे. वधुवर शुभ्र वस्त्र परिधान करून उभे राहतील. कुणीही एखाद्याने मंगलसुत्त म्हणावे अशी साधी पद्धत असावी.
तसे पाहता बाबासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ कधीही मिटवता येणार नाही... परंतु विधी आयोग आणि "बेबी जयंत जगताप विरुद्ध जयंत महादेव जगताप "(1981 महाराष्ट्र लौ जर्नल पेज ६१४ ) या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...."बौद्ध विवाह...कायदेशीर" आहेत.
संदर्भ : बेबी जयंत जगताप विरुद्ध जयंत महादेव जगताप (1981 महाराष्ट्र लौ जर्नल पेज ६१४ ) .
- अॅड. राज जाधव सर...✍️💗
---------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment