डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार.... !!!


1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार... !!


गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना झाले. बाबासाहेब लंडहून निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारीख कळविली. बाबासाहेब येणार म्हणून  स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ ची जंग एक हाती लढवून येणार याचा कोण अभिआन वाटत होता. प्रत्येक दलिताचं ऊर दाटून आलं होतं. दलितांची बाजू भक्कमपणे मांडताना गांधी व तमाम शत्रूच्या गोटात शिरून आपल्या बापानी गो-यांच्या भुमीत मोठा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते  करुन अनेक ठिकाणी परिस्थितीला आपल्या बाजुने वळते केले होते. पत्रकार व इतर मंडळींची मदत घेताना दलितांच्या हितात जाणारी प्रत्येक गोष्ट घडवून आणली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व युक्त्या वापरल्या. बाबासाहेबांच्या आतील राजकीय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला लंडनच्या मैदानात कित्येक वेळा उघडे पाडून गो-या साहेबांना गांधीमधला विलन कसा दलितविरोधी आहे हे पद्धतशीरपणे पटवून दिले. दलितांचा बाप म्हणुन आपल्या लेकराना जास्तीत जास्त अधिकार मिळवुन देताना बाबासाहेबांमधील विद्वान अत्यंत मुद्देसुद अन तर्कसुसंगत वाद करत वस्तुनीष्ठ परिस्थीती अचुक मांडतो. अशा प्रकारे सर्व शक्ती एकवटून गोलमेज-२ मधे आमचा बाप म्हणुन कर्तव्य बजावताना लेकरांसाठी अतूल्य कामगिरी करणारा महाबली आज भारतात उतरत होता त्यामुळे स्वागतासाठी तमाम आंबेडकरी जनता गगनभेदी आरोळ्या देत बंदरात जमली होती. २९ जाने १९३२ रोजी बाबासाहेब मुंबईच्या बंदरात पाय ठेवतात. एक दिवस आधीपासुन तिथे जमलेल्या सर्व भीमपुत्रानी गगनभेदी आरोळ्यानी बाबासाहेबांचं जंगी स्वागत केले. समता सैनिक दलानी आपल्या राजाला मानवंदना दिली व भायखळा मार्गे परळ पर्यंत बाबासाहेबांची मिरवणुक काढण्यात आली. वाटेत जागो जागी बाबासाहेबांचा सत्कार व मानपत्र देऊन त्यांच्या गोलमेजच्या कार्याबद्दल अस्पृश्य संघटनानी आभार मानले. अन शेवटी बाबासाहेब घरी पोहचले.
लोथियन समिती: (मताधिकार समिती)
बाबासाहेब गोलमेज-२ मधे ब-याच मागण्या मागुन आलेत पण त्यातील अत्यंत महत्वाची मागणी म्हणजे अस्पृश्यांना राजकीय अस्तीत्व मिळावे ही होती. बाबासाहेबानी अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मागितला होता. खरं तर हे फक्त बाबासाहेबानीच हे मागीतलं नव्हतं तर शीख, मुसलमान, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक  लोकानीही याच मागण्या मागीतल्या होत्या. पण गांधीनी वरील मागण्या अस्पृश्य सोडून इतर सगळ्यांसाठी देण्याचे कबूल केले. फक्त अस्पृश्यानाच  नकारल्या. गांधीच्या अशा अनेक गूढ प्रकरणांचा एकंदरीत परिणाम असा झाला की राजकिय मागण्या मान्य करण्याआधी भारतातील अस्पृश्य लोकांची खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी लंडनहून एक समिती भारतात आली. त्या समितीचे अध्यक्ष  लॉर्ड लोथियन होते, म्हणुन त्या समितीचे नाव लोथियन समिती पडले. लोथियन समिती देशभर फिरून अस्पृश्यांची पाहणी करणार होती. त्यांच्या मागण्या व ईतर गोष्टींचा वृत्तांत लंड्नला पाठविल्यावर मतदानाचा अधिकार देण्याचे ठरविले जाणार होते. या कामात बाबासाहेब स्वत: जातीने भाग घेण्यासाठी लगेच दिल्लीत हाजर झाले. लोथियन समिती सोबत त्यानी देशभर दौरा केला. जागो जागी लोथियन समिती व बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले जात होते. भारतातील कानाकोप-यातील अस्पृश्यानी समितीपुढे बाबासाहेब आमचे एकमेव अन बिनविरोध नेते असल्याच्या भीमगर्जना करुन लोथियन साहेबांना भंडावुन सोडले. संयुक्त मतदार संघाचा देशभरातून तमाम अस्पृश्य संघटनानी विरोध नोंदविला. स्वतंत्र मतदार संघ मिळावा याची जागो जागी मागणी करण्यात आली अन दुहेरी मतदानाचा अधिकार मागण्यात आला. तर ही झाली लोथीयन समितीच्या पुढे मांडलेली डिमांड.
राजा-मुंजे करार (फितूरी आपल्याच माणसाची)
बाबासाहेब जीवाचं रान करुन जेंव्हा लोथियन समितीसोबत देशाचा दौरा करुन स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते तेंव्हा एक अत्यंत महत्वाचा अस्पृश्य नेता फोडण्यात हिंदु महासभा आघाडी घेते. सावरकरांच्या प्रभावाखाली चालणारी हिंदु महासभा त्या काळात बाबासाहेबांच्या बाजूनी होती असे ब-याच ठिकाणी जाणवते. पण डॉ. मुंज्यानी मात्र यावर बोट उचलण्यास भाग पाडणारी फितूरी घडवून आणली. जेंव्हा बाबासाहेब गोलमेज-२ गाजवत होते तेंव्हा गांधीनी "मीच एकमेव अस्प्रुश्यांचा नेता आहे" म्हणून जो काही संभ्रम निर्माण केला होता व ब्रिटिसांचा गोंधळ उडवून दिला होता. तो संभ्रम दूर करण्यासाठी इकडे भारतात मोठी चळवळ उभी केली गेली. त्या चळवळीचा नेता होता राजा. ज्या राजानी इकडे भारतात रान पेटवुन दिलं होतं अन बाबासाहेब हेच एकमेव अस्पूश्यांचे नेते असल्यांचा तारांचा वर्षाव पाडून गांधीचे मुखवटे फाडले अशा कर्तव्यनीष्ठ राजाला नेमक्यावेळी मुंज्यानी फोडून आपल्या गोटात खेचले व  बाबासाहेबांच्या पवित्र कामात विघ्न उभे केले. या सर्व घडामोडींच्या मागे सावरकरांचा हात होता हे निर्विवाद सत्य आहे. आज पर्यंत जो राजा अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळावा म्हणून लढत होता तो अचानक सूर बदलून वेगळा राग आवळायला लागला. त्यानी अचानक आपला पवित्रा बदलला अन अस्पूश्याना संयुक्त मतदार संघ व राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी करण्याचा करार फेब्रुवारी १९३२ मधे मुंज्यांशी केला. यालाच आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात राजा-मुंजे करार म्हणून ओळखले जाते. हा प्रकार ऐकुन बाबासाहेब मात्र अत्यंत अस्वस्थ झाले, क्रोधीत होऊन हिंदु महासभेच्या कूटनितीचा निषेध नोंदविला. पण ईकडे सावरकर अन मुंजे मात्र संघटना फोडल्याचा आनंद साजरा करत होते. सावरकरानी अस्पृश्यनिवारणाचे काम चालविल्याचा इतिहास आहे. पण त्यामागची भूमिका काय होती कोणी तपासुन पाहिले नाही. खोलात गेल्यावर हे कळते की बाबासाहेबांच्या कामात विघ्न निर्माण करण्यासाठी काही अस्पृश्य नेते सोबत असणे गरजेचे होते. त्यामुळे सावरकर अस्पृश्य निवारणाचा आव आणत होते. राजा-मुंजे करार झाल्यावर राजा कुठे शांत बसतो, त्यानी लगेच ब्रिटिश पंतप्रधानाला तार करुन कळविले की बाबासाहेब हे सर्व अस्पृश्यांचे नेते नसून ते एका लहानशा गटाचे नेते आहेत. आहे की  नाही गंमत... जो राजा काही दिवसाआधी बाबासाहेब हेच अस्पृश्यांचे एकमेव नेते आहेत म्हणून ब्रिटीशांकडे तारांचा वर्षाव करतो आता तोच नेता अगदी उलटं वागू लागला. राजाच्या उचापत्या सुरु होते तेंव्हा तिकडे बाबासाहेब मात्र समिती सोबत व्यस्त होते.
राजा-मुंजे करार झाला ही गोष्ट देशभर पसरली व राजाच्या विरोधात अस्पृश्य समाजातून एक लाट उसळली. पुर्वेकडील सर्व अस्पृश्य नेत्यानी या कराराचा निषेध केला. सावरकरांची कूटनिती उघड झाली. बाबासाहेब मात्र मताधिकार समिती सोबत काम करण्यात गढून गेले होते. राजानी नसता उपद्रव करुन बाबासाहेबांचा ताप वाढवून ठेवला होता. याच वेळी तिकडे नाशिकची चळवळ जोर धरत गेली अन भाऊराव गायकवाड व रणखांबे याना अटक झाली. अशा प्रकारे अनेक अडचणीना तोंड देत बाबासाहेब आपला लढा चालवित होते. याच दरम्यान भारतातील खास करुन पुर्व भारतातील अस्पृश्यानी अनेक परिषदा भरवुन बाबासाहेबाना पाठींबा दिला. १ मे १९३२ रोजी लोथियन समितीचे काम संपले. समितीचे इतर सदस्य निघून गेले पण बाबासाहेब मात्र आपले एक स्वतंत्र निवेदन सादर करण्याच्या हेतूने तिथेच (सिमल्याला) थांबले होते. त्या निवेदनाचा प्रभाव असा पडला की डिप्रेस्ड क्लास म्हणजे अस्पृश्य  अशी नवीन व्याख्या लोथियन साहेबाना मान्य करावी लागली. आता पर्यंत अस्पृश्य म्हणजे गुन्हेगारी लोकं, भटके जमाती, वन्यजाती व आदिवासी असा साधारण समज करुन बसलेल्या ब्रिटीशांना अस्पृश्य व इतर मागास यातला फरक कळला होता. बाबासाहेबांच्या निवेदनांची, तर्कसुसंगत अन अभ्यासपुर्ण मांडणीची फलश्रूती म्हणजेच लोथियन साहेबांनी स्विकारलेली वरील नविन व्याख्या. हा बाबासाहेबांचा एक महत्वाचा विजय होता. आता लोथियन साहेबानाही ब्रिटनला जाऊन हे सगळं  वरिष्ठांना  पटवून देतांना सोपं जाणार होतं.
ही सगळी कामं संपवून बाबासाहेब मुंबईला परतले. दोन दिवस आराम करुन लगेच ६ मे १९३२ रोजी नागपूर जवळील कामठी (जिथे आता ड्रॅगन पॅलेस आहे ते)येथे भरविण्यात आलेल्या डिप्रेस्ड क्लासच्या परिषदेस हाजर झाले. बाबासाहेबांसारख्या महान नेत्याला आमच्याच दलीत लोकानी नागपूर स्टेशनवर काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला होता. (पुढे जाऊन १९५६ मध्ये जिथे धम्मक्रांती घडली जिथेच १९३२ मध्ये बाबासाहेबांचं असं स्वागत केलं गेलं ) हे सगळे काळे झेंडे दाखविणारे दलित राजा-मुंजे समर्थक होते. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट होती की बाबासाहेब ज्या दलितांसाठी लढत होते त्यांच्यातूनच काही लोकानी गटबाजितून बाबासाहेबांचा निषेध केला होता. हा सगळा अपमान गिळून बाबासाहेब परिषदेच्या ठिकाणी पोहचतात. १५-२० हजार लोकानी मंडप भरलेले होते. लोकांच्या अलोट गर्दिपुढे बाबासाहेबांचे एक अत्यंत महत्वाचे अन आत्मसन्मान जागृत करणारे भाषण झाले. या परिषदेत दलित नेते गवई काहितरी उचापत्या करणार याची खात्री होती, मग त्यांना तसे न करण्याची तंबी देण्यात आली होती. त्यामुळे संतापून गेलेले गवई लोथीयन साहेबांकडे तक्रार दाखल करुन बाबासाहेब हे एका छोट्या गटाला रिप्रेझेंड करतात असे सांगितले. राजभॊजनी सुद्धा घोळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याना सुद्धा परिषदेतुन बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे ज्या ज्या नेत्यानी कॉंगेस व हिंदु महासभेच्या प्रभावाखाली फितूरी करण्याचे काम केले त्याना धडा शिकविण्यात आला. अशा प्रकारे ही परिषद वादावादीची व दगाबाजाना बदडून काढणारी आंबेडकरी परिषद म्हनून इतिहासात नोंदली गेली.
अस्पृश्य नेत्यांनी केलेल्या दगाबाजी व तक्रारीमुळे लोथीयन साहेबांचे मतपरिवर्तन होऊन अस्पृश्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बाबासाहेब आता थेट लंडन गाठण्याच्या कामाला लागतात. लोथीयन समिती जे सादर करील त्यावरुन आपल्यावर अन्याय होता कामा नये अन फितूरांचं फावल्यास समाजाची हानी भरुन निघणार नाही. म्हणून निर्णय येण्या आधीच तिथे धडकण्यासाठी बाबासाहेब २६ मे १९३२ रोजी लंडनला रवाना होतात. आयुष्यात अशी संधी परत येणार नाही हे बाबासाहेब ओळखून होते. जे काय करायचे ते आत्ताच अन त्याला पर्याय नाही म्हणून बाबासाहेब लगेच निघतात व  जुनच्या पहिल्या आठवड्यात बाबासाहेब लंडनला धडकले. तिथे अनेक महत्वाच्या व्यक्तीना भेटून आपले मत मांडतात. अस्पृश्याना जास्तीत जास्त सवलती देणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगतात. त्यानी लहानात लहानापासुन मोठ्यात मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या. एक स्वतंत्र निवेदन तयार करुन ते ब्रिटिश पंतप्रधानाना सादर केले. १४ जुन पर्यंत ही सगळी कामं उरकून बाबासाहेब जर्मनीला निघून गेले.  याच दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यानी जर्मनितील ड्रेसडेन येथील डॉ. मोलर यांच्याकडे उपचार नि विश्रांती घेतली. वेळप्रसंगी ब्रिटनला धावता येण्यासाठी हा मुक्काम अचूक होता. पूर्ण जुलै महिना त्यांनी जर्मनीत विश्रांती घेत्ली व  ऑगस्ट मधे भारतात येण्यास निघतात.
मताधिकाराचा निवाडा जाहीर झाला
बाबासाहेब मुंबईच्या प्रवासात होते. तिकडे भारतापासून हजारो मैल दूर ब्रिटनमधे अस्पृश्यांच्या मताधिकार व इतर मागण्यावर निर्णय घेण्यात आला. १४ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानानी अल्पसंख्यांक प्रश्नावर आपला निवाडा जाहीर केला. या निवाड्या प्रमाणे अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले. आता अस्पृश्य जनता आपला माणूस निवडून आणू शकत होती. त्याच बरोबर स्पृश्य हिंदूच्या प्रतिनिधीच्या निवडनुकीत मतदान करुन आपला हक्क बजावण्याचा दुहेरी अधिकारही बहाल करण्यात आला होता. अस्पृश्यांसाठी आज सोनियाचा दिनू होता. भारतभर जल्लोषाचं वातवरण होतं, पण ज्या माणसानी हे मिळविण्यासाठी पराकोटीचे कष्ट उपसले होते तो मात्र दूर समूद्रात भारताच्या दिशेनी प्रवासात होता. १७ ऑगस्ट १९३२ ला बाबासाहेब मुंबईस पोहचले. या निवाड्यामुळे अस्पृश्य वर्गामधे नवचैतन्याची लाट उसळली. आता नव्या दिशा त्याना खुणावू लागल्या होत्या. प्रगतीचे नवे पथ समोर दिसू लागले. राजकीय हक्क बजावण्यासाठी ब्रिटिशानी दिलेली संधी अतूल्य अन अमूल्य होती. आज पर्यंत दास्यात खितपत पडलेला समाज आता धन्याच्या बरोबरीत येऊन ठेपला होता. सरकार दरबारी अस्पृश्यांची वर्णी लागणार होती. ज्या सनातन्यानी आजवर कुत्र्यापेक्षा वाईट वागविले त्यांच्या बरोबरीचा मान सन्मान बहाल झाला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जल्लोष चालू होता. देशाच्या कानाकोप-यातील दलित आनंदाने भारावून गेला होता. या सर्व धामधूमीत मग्न झालेला दलित येणा-या वादळी संकटापासून अनभिज्ञ होता. या जल्लोषाला नजर लागली होती.
उभा समाज सर्वत्र आनंदात न्हाऊन निघत असताना भारताच्या पश्चिम भागात पुणे नावाच्या शहरात गांधी नावाचा इसम ज्याला लोकं महात्मा म्हणत त्यानी या सर्व आनंदावर विरजण घालण्यासाठी एक अत्यंत क्रुर व निष्ठुर आक्रमणाची तयारी सुरु केली. अस्पृश्यांचं राजकीय अस्तित्व उदयास येण्याआधीच त्याला ठेचण्याचा आराखडा पुण्यातील येरवडा तुरुंगात आकार घेऊ लागला. सर्व शक्ती झोकून देऊन दलितांचे नवे सर्व अधिकार विसर्जीत करुन त्याना परत गुलाम म्हणून वागविण्याची गांधीनी जणू शपथच घेतली होती. आपली पूर्ण ताकद झोकून दलितांच्या अस्तित्वावर घाला घाण्यास आता गांधी सज्ज झाला होता. अस्पृश्याना मिळालेले स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचे अधिकार हे ब्रिटिशानी दिलेले कवच कुंडल काढून घेण्यासाठी गांधीनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत शक्तीशाली असे ब्राह्मास्त्र म्हणजेच आमरण उपोषण उपसले. हे अस्त्र ईतके प्रभावी होते की दलितांची उभी जमात यात भस्म झाली असती. या उपोषणात गांधीचा मृत्यू झाल्यास देशात रक्ताचे पाट वाहिले असते अन मृत्यु न झाल्यास ती कवच कुंडले गांधी पळवुन नेणार होता. एकंदरीत काय तर गांधीची खेळी दोन्ही बाजूनी आमचा घात करुन जाणार होती. कारण त्यांनी पोतळीतून सर्वात घातक व शक्तीशाली अस्त्र बाहेर काढण्याचे जाहिर केले. आज पर्यंतचे बाबासाहेबांचे सर्व कष्ट मातीस मिसळणार होते. पर्यायही नव्हता. दलितांच्या विरोधातील उघड उघड घेतलेली ही गांधीची भूमीका समस्त मानव जातीला लाजविणारी होती. बर हे स्वतंत्र मतदार संघ फक्त दलितानाच मिळाले होते अशातला भाग नव्हता. मुसलमान, शीख, ख्रिश्चन याना सुद्धा स्वतंत्र मतदार संघ मिळाले होते. पण गांधीना इतरांचे मतदार संघ मान्य होते. त्यानी देशाला धोका नव्हता. पण दलितांचे मतदार संघ मात्र गांधीना नको होते. यावरुन दिसेल की गांधी किती जातीवादी व अस्पृश्य द्वेष्टा होता. त्यानी सरळ सरळ दोन समाजात मतभेद केला होता. मुसलमान व शीखाना मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघाला समर्थन दिले होते तर फक्त अन फक्त दलितांचा अधिकार मात्र त्यांच्या डोळ्यात खुपू लागला. जातीयवादी संस्कारात ज्याची जडण घड्ण होते त्याच्या बुद्दीच्या मर्यादा अशा प्रकारे सिद्ध होतात. गांधीमधील महात्मा आज गडून पडला व जातियवादी पुरुष जगापुढे आला. ज्या स्वतंत्र मतदार संघामुळे मुसलमान सारख्या समाजाकडुन गांधीला कुठलाच धोखा वा देशातील लोकामधे पडणारी फूट दिसली नाही ती दलितांच्या बाबतीत मात्र दिसली. गांधीच्या या दृष्टीकोनानी हे जगजाहीर झाले की गांधीची वैचारीक क्षमता फारच कुचकामी व मर्यादीत होती.
गांधीजी लवकरच उपोषणास बसणार आहेत ही बातमी हाहा म्हणता देशभर पसरली. सगळीकडे गांधीवादयानी अस्पृश्यांवर दबाव आणणे सुरु केले. दलितानी आपले सर्व अधिकार विसर्जीत करुन गांधी देतील ते अधिकार स्विकारावे असा पवित्रा सगळ्या सवर्णानी घेतला. अस्पृश्य समाज मात्र हताश होऊन कात्रीत सापडलेल्या बाबासाहेबांकडे खिन्न बघू लागला. या वेळेस गांधीनी बाबासाहेबाना अशा खिंडीत गाठले होते जिथे विजय अशक्यप्राय होते. पराजय मात्र अटळ होता. गांधीच्या या अमानवी, निर्दयी अन निष्ठूरपणाचा निषेध करावा तेवढा कमीच.
उपोषणापुर्वीची परिषद
१९ सप्टे १९३२ रोजी इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई येथे अत्यंत तप्त वातावरणात एक सभा घेण्यात आली. पंडित मदन मोहन मालवीय हे अध्यक्षपद भूषवितात. मनू सुभेदार, सर चिमणलाल सेटलवाड, वालचंद हिराचंद, राजेंद्रप्रसाद, कमला नेहरु,सर तेजबहाद्दूर सप्रू, छोटीराम गिडवानी, ठक्करबाप्पा, डॉ. देशमुख, डॉ. सावरकर, माधवराव अणे, के. नटराजन, पी. बाळू, पंडित कुंझरू, स्वामी सत्यानंद, एन. शिवराज, असे एकसे बढकर एक लोकं या सभेस हजर होते. त्या मानाने बाबासाहेब हे रंजल्या गांजल्यांचे नेते. वरुन प्रश्न गांधीच्या विरोधात जाण्याचा असल्यामुळे वातावरण तापलेले होते. सर्व गांधीवादी नेत्यांची नजर बाबासाहेबाना खाऊ कि गिळू म्हणत होती. तेवढ्यात वालचंद हिराचंद यानी बाबासाहेबानी आपले मत मांडावे अशी अध्यक्षाना विनंती केली.
बाबासाहेब उभे होतात अन अत्यंत संयम व विद्वत्तपुर्वक आपले विचार मांडतात. ते म्हणतात, “गांधीजीनी अस्पृश्यांच्या हिताविरोधात प्राणांकित उपोषण करणे खेदाची गोष्ट आहे. हेच उपोषण त्यानी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात केले असते तर त्यांचं महात्म्य अधिक उंचावलं असतं. गांधीनी नुसतच उपोषण जाहिर करुन माझ्यावर संकट ओढविले आहे. त्यानी बदली योजना सुचविल्या शिवाय प्रसंगातून मार्ग काढणे अशक्य आहे. मी अत्यंत कष्टाने मिळविलेले हे अधिकार नुसतचं गांधीच्या धाकामुळे पाण्यात सोडण्यास कधीच तयार होणार नाही. मग तुम्ही माझे प्राण घेतले तरी बेहत्तर. तुम्ही बदली योजना गांधींकडुन आणावे मग विचार करण्यात येईल.”
मर्द कशाला म्हणतात ते जर बघायचे असेल ना तर अडचणीत सापडलेले बाबासाहेब बघावा. शत्रूच्या गोटात घुसून परिस्थीतीच्या नजरेस नजर भिडवून निर्भेडपणे गरजणारा महाबली शत्रूला नुसतं आवाजाने गारद करत असे. आपला मनसुबा जाहीर करण्याचा त्यांचा हा बाणेदारपणा अन आतील मर्दानकीचा हा दणकटपा त्यांच्यातून ओसंडून वाहताना दिसतो. शत्रू कितीही बळकट व बलवान असला तरी बाबासाहेब दंड थोपटताना जो आत्मविश्वास व निर्भेडपणा दाखवायचे त्यामूळे शत्रू चरकून जाई, अर्धा खचून जाई. लढण्यापेक्षा ईथे समेटच बरे असा शत्रूचा विचारपरिवर्तन होई. बदली योजने शिवाय समेट नाही या भीम गर्जनेने गांधीवादी चरकले. धावाधाव झाली. नेते मुंबईहून थेट पुण्या पर्यंत धावले. नुसती धावपळ व धांधल चालू झाली. सगळ्य़ांची तारांबळ उडाली. बाबासाहेब असं काही करतील याचा अंदाजच नव्हता. समेट घडविण्याच्या सा-या फुशारक्या बाबासाहेबानी उडवून लावल्या होत्या. मोठ मोठाले नेते म्हणून मिरविण्याचा ज्याना गर्व होता ते पार भूईसपाट झाले होते. सर्व नेत्यानी अवाक होऊन बाबासाहेबांच्या पुढे लोटांगण घालून गांधीपर्यंत धाव घेतली. बाबासाहेब मात्र शांत नजरेनी उडालेला गोंधळ न्याहाळत होते.
पुण्यात गांधीची भेट घेऊन एक शिष्टमंडळ मुंबईस परत आले. दुस-या दिवशी परत परिषद भरते तेंव्हा ते शिष्टमंडळ सांगते की, “अस्पृश्याना राखीव जागा देण्यास गांधीची हरकत नाही.”
हे ऐकुन बाबासाहेब म्हणतात, “मी माझ्या कर्तव्यापासून तसुभरही ढळणार नाही, माझा प्राण गेला तरी माझ्या लोकांशी मी घात करणार नाही. मग त्यात माझा जीव गेला तरी चालेले. त्या पेक्षा तुम्ही गांधीना आपले उपोषन अठवडाभर तहकूब करायला सांगावे.”
बाबासाहेबांच्या रोखठोक भूमिकेमुळे दुस-या दिवशी दुपारी परिषद स्थगीत झाली.
सप्रूनी कार्यकर्त्यांबरोबर बसून एक नविन योजना तयार केली व रात्री परत सगळे चर्चेस जमले. तेंव्हा बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य वर्गास जातीय निवाड्यानुसार स्वतंत्र मतदर संघ मिळाले आहेत. त्या बदल्यात आम्हाला अधिक जागा मिळाव्यात व मध्यवर्ती विधिमंडळात लोकसंख्येंच्या प्रमाणात अस्पृश्याना जागा मिळाव्यात.”
परिषदेतील नेत्याना हे मान्य झाले. जयकर, सप्रू, बिर्ला, राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी हे रात्रीच्या गाडीने पुण्यास रवाना झाले.

************************
गांधीचे उपोषण सुरु
दिवस-१
२० सप्टे १९३२ रोजी ईकडे येरवडा तुरूंगात गांधीनी आमरण उपोषण सुरु केले. अस्पृश्यानी मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघावर पाणी सोडावे अन दुहेरी मतदानाचा अधिकारही विसर्जीत करुन हताश जीवन जगावे. आम्ही देऊ त्यावर समाधाना मानावे असे गांधीनी जाहीर केले.  माझ्या या सर्व अटी मान्य करेस्तोवर अन्नाचे एक शीत न घेण्याचे जाहीर करुन गांधीनी बाबासाहेबांवर उपोषणरुपी अस्त्र डागले. बाबासाहेब या अस्त्राला परतवून लावतात की घायाळ होतात ते बघण्यासाठी ऊभा देश मुंबईकडे डोळे लावून होता. सर्व पत्रकार पुण्या मुंबईत ठाण मांडून बसलीत. गांधी येरवडा कारागृहातच आपले कार्यालय थाटुन बसले होते. त्यांच्या सोबत त्यांचे खंदे कार्यकर्ते होतेच. तिकडे मुंबईत बाबासाहेबाना गांधीच्या काही अत्यंत बलवान लढवय्या सरदारानी घेरले होते. बाबासाहेबांचं मानसिक खच्चिकरण करुन दलितांच्या अधिकारांची होळी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू झाले. पण बाबासाहेबानीही मुत्सद्देपणाने खींड लढवून आपला निर्णय निर्भेडपने सांगितला. मला बदली योगना सांगा. नुसतं देऊ असं बोलून चालणार नाही. मिळालेल्या अधिकाराच्या तोलामोलाची बदली योजना घेऊन या. मगच काय ती चर्चा करता येईल. बाबासाहेब बदली योजनेवर अडून बसले.
दिवस-२
२१ सप्टे १९३२ रोजी मुंबईहून आलेले पुढारी सकाळीच कारागृहात जाऊन गांधींची भेट घेतात.  बाबासाहेबांचे मत गांधीपुढे मांडतात. त्यावर गूढ व्यक्तिमत्व परत घोळ घालतो. शांत चित्ताने सगळं ऐकुन झाल्यावर गांधी म्हणतात की विचार करुन सांगतो. ही गांधीची टिपिकल स्टाईल होती. कार्यकर्त्याना शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रमात ठेवण्यात त्यांचा हतखंडा होता. सरदार पटेल व सरोजीनी नायडू गांधीच्या सेवेत होतेच. गांधीची प्रकृती खालावत चालली होती. तुरूंगाबाहेर गांधीवाद्यांचा जमावडा वाढला होता. सप्रूनी दुपारी फोन करुन बाबासाहेबाना कळविले की लवकरात लवकर पुण्यास निघून यावे. गांधीची हालत खराब होत आहे. ही तार मिळताच   बाबासाहेब रात्रीची गाडी धरुन पुण्यास निघाले. आता पुढचा सगळा खेळ पुण्यात खेळला जाणार होता.
दिवस-३
२२ सप्टे १९३२ रोजी सकाळी बाबासाहेब पुण्यात पोहचतात. याच दिवशी गांधीजीनी डॉ. राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी याच्या सोबत विचार विनिमय करुन पुढची स्ट्रॅटजी ठरविली. बाबासाहेबांच्या मागण्या काय आहेत हे तर मुंबईहुन आलेल्या प्रतिनिधीनी आधीच सांगितले होते. आता त्यावर गांधीनी या दोघांसोबत बसुन सखोल चर्चा केली व पुढचे पाऊल काय असेल ते ठरविले. “अस्पृश्य वर्गाच्या सर्व जागाना निवडणुकीच्या प्राथमिक  व दुय्यम पद्धती लागु करण्यात याव्या.” हे गांधीनी ठरविले.
बाबासाहेब पुण्यात पोहचले होते. नॅशनल होटेल मधे ते उतरले होते. गांधींचे म्हणने बाबासाहेबाना कळविण्यात आले. गांधीवादी पुढारी मात्र बाबासाहेबांवर दबाव आणण्याचे काम करु लागले. तणाव वाढत चालला होता. बाबासाहेबानी मुकाट्याने ब्रिटिश पंतप्रधाना तार करुन दिलेले दोन्ही अधिकार (स्वतंत्र मतदार संघ, दुहेरी मतदानाचा अधिकार) रद्द करण्या बाबत निवेदन दयावे अशी मागणी कार्यकर्त्यानी लावून धरली. थोडक्यात काय तर धाक दाखवून मिळालेले अधिकार सोडावे ही गांधीवाद्यांची युक्ती. पण या सगळ्य़ा शेळ्या मेंढ्याना भीक न घालणारा सिंह गरजून उठला. असल्या बुड शेंडा नसलेल्या मागण्या करणा-या पुढा-यांपुढे डरकाडी फोडून बाबासाहे म्हणाले “माझ्या समोर पर्यायी योजना आल्याशिवाय मी ब्रिटिश पंतप्रधानाना काहीच कळविणार नाही, मग काही झाले तरी झेलायची आपली तयारी आहे.”  बाबासाहेबांचा दृढ निश्चय व भीम गर्जना इतकी प्रभावी अन  भेदक होती की सर्व पुढा-यानी झटक्यात माघार घेतला. आता सर्व पुढारी पर्यायी योजना दिल्याशिवाय बाबासाहेब ऐकणार नाही या मतावर आले. पर्यायी योजना देणे आता परिहार्य झाले होते. बाबासाहे या मुद्यावर लढण्यास सज्ज आहेत व सर्वोतोपरी युद्धाची सिद्धता करुन आले आहेत हे कळताच गांधीवादयानी मवाळ भूमिका घेतली.
दुपार पर्यंत वातावरण अत्यंत तापले होते. जयकर, सप्रू, पी. बाळू व एम. सी. राजा यानी दुपारी गांधीजींची भेट घेऊन समेट घडवून आणण्याची खात्री दिली.
याच दिवशी संध्याकाळी बाबासाहेब गांधीजीना भेटण्यास तुरुंगात गेले. त्यांच्या सोबत जयकर, बिर्ला, चुनीलाल मेथा व राजगोपालाचारी होते. गांधींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती. ते मृत्युच्या देशेनी बरेच पुढे निघून गेले होते. त्यांची हि अवस्था पाहून बाबासाहेबांचे हृदय द्रवेल व ते आपला निर्णय लगेच जाही करतील असा गांधीवादयांचा अंदाज होता. बाहेर गांधीवादयांनी बाबासाहेबांच्या विरोधात गगनभेदी आरोळ्यानी आकाश दणाणून सोडले होते. या घोंघवत्या आवाजात बाबासाहेबांचा हट्ट विरघळून जाईल अशी सगळ्याना आशा होती. परंतू झाले उलटेच.... युगानूयुगे गुलामीत जगणा-यांच्या अधिकारावर घाला घालणारे गांधी दिसताच बाबासाहेब अधिक दृढ निश्चयी व कठोर बनतात. आपल्या बांधवांच्या हक्कासाठी सर्वतोपरी लढा देणारे बाबासाहेब मनोधैर्य एकवटून म्हणतात, “गांधीजी तुम्ही माझ्यावर अन्याय करित आहात. तुम्हाला काही झाले तर काहीच कारण नसताना मला दोषी ठरविण्यात येईल. तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत. पण आमचे अधिकारही तेवढेच महत्वाचे आहेत.” तेंव्हा गांधी म्हणतात, “डॉक्टर, तुम्ही सुचविलेली पॅनलची पद्धती मी मान्य करतो. पण तुम्ही तुमचे दोन्ही अधिकार सोडून दयावे अन ही पॅनलची पद्धती सर्व आरक्षित जागांवर लागू करावी.” बाबासाहेबानी गांधीची ही सुचना मान्य केली.  मुलाखत संपली पण  आता  ईतर पुढा-यांसोबत पॅनलमधे किती उमेदवार असावेत, प्रत्येक प्रांतात अस्पृश्याना किती राखीव जागा दयाव्यात,  प्राथमिक निवडनुकीची पद्धत किती वर्षे चालवावी, राखीव जागांची सवलत किती वर्षे असावी अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यास सुरुवात झाली.
दिवस-४
२३ सप्टे १९३२ उजाडला.  आता बदली मागण्याची मिटींग भरली. बाबासाहेबानी बदली मागण्यात सर्व प्रांतात एकून १९७ जागा अस्पृश्याना मिळाव्यात असे जाहीर केले. कम्युनल अवार्ड (जातीय निवाडा) नुसार अस्पृश्याना केवळ ७८ जागा मिळाल्या होत्या. पण त्या स्वतंत्र मतदार संघ म्हणुन मिळाल्या होत्या. त्या बदल्यात बाबासाहेबानी राखीव जागा स्विकारण्याची तयारी दर्शविली पण त्या बदल्यात १९७ जागांची मागणी करताच गांधीवादी संतापाने गोरेमोरे होऊन उठले. नाराजीची लाट उसळली. बरीच खडाजंगी झाल्यावर त्यानी १२६ जागा देण्याचे मान्य केले. पण बाबासाहेब हट्टाला पेटले होते. जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा निर्धार ठाम होता. पॅनल मधे किती उमेदवार असावे यावरही सभागृह पेटले. १० वर्षानी राखीव जागा रद्द कराव्यात असा गांधीवाद्यांनी आग्रह धरला पण राखीव जागांचा कालावधी न ठरविता १५ वर्षानी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे अशी बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाची अट घातली. अशा प्रकारे चर्चा १० तासापेक्षा जास्त रंगली पण एकमत होताना दिसेना. शेवटी गांधीवादयानी गांधींजी भेट घेऊन संपुर्ण वृत्तांत कथन केला. ईतर सर्व मुदयांवर गांधी राजी झाले पण राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी मात्र संकट बनुन उभा ठाकला होता. बाबासाहेबानी कालावधीला मान्यता न देण्याचा निर्णन अत्यंत कठोरपणे जाहीर करताना निक्षुन सांगितले की अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्यात याव्यात.  १० किंवा १५ वर्षाचा कालावधी झाल्यावर राखीव जागा रद्द करणे म्हणजे दलितांवर अन्याय होईल असे बजावुन सांगितले.
तो पर्यंत अशी बातमी आली की गांधीजींची प्रकृती आजुन बिघडली असुन आणिबाणीची वेळ उभी झाली होती. सायंकाळी बाबासाहेब स्वत: गांधीना भेटण्यासाठी तुरुंगात जातात. सार्वमताच्या प्रश्नाला गांधीजीनी पाठिंबा दिला पण त्यांनी वेगळाच फासा टाकला. गांधी म्हणाले ५ वर्षानीच सार्वमत घ्यावे. गांधीच्या या तर्कहीन व खोचक वाक्यानी बाबासाहेब अत्यंत दुखावतात. कधी कधी गांधी फारच तर्क विसंगत बोलत. अशा प्रकारे ही भेट इथेच संपते. गांधीच्या हट्टापायी व बाबासाहेबांच्या दृढनिश्चयापायी या दिवसाची सारी चर्चा अनिर्णायक वळणावरच थांबली.
दिवस-५
२४ सप्टे १९३२ दिवस शनिवार, सकाळी परत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सार्वमत यावरुन खडाजंगी होऊ लागली. गांधीवादयानी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबानी कुठल्याही परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीवजागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबानी गांधींची भेट घेतली. गांधीशी झालेली चर्चातर अधिकच बिनबुडाची व तर्कविसंगत निघाली. गांधीनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते. शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात,  “५ वर्षात सार्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.”
गांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबे दणाणले. दाबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सार्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नामनिर्देश न करता करार करावा असे ठरले. दुपारी ३ वाजता राजगोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीना सांगितली. गांधीनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. करार खालील प्रमाणे होता.
पुणे करार (संक्षिप्त मसूदा)
१)     प्रांतीय  विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.
२)     या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे  प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३)     केंद्रिय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.
४)     केंद्रिय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५)     उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.
६)     प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये  दलितांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे.  तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत  दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.
७)     केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.
८)     दलिताना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९)     सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.
असा होता पुणे करार.
मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबाना सही करु देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम. सी. राजानी मुंजे सोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्य द्रोहीनी या करारावर सही करु नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्यां करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवियाने सही केली.
इतर सर्व सभासदानीही सह्या केल्या.  अन तिकडे तुरूंगातही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यानी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.
२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महाराज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढा-याने प्रत्यक्षपणे माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रीमंडळाने पुणे करार मंजूर करुन घेतला. त्यावर मंत्रीमंडळाने शिक्का मोर्तब केले.  तिकडे दिल्लीत हिंदु महासभेनेही आपली मंजूरी दिली. अशा प्रकारे पुणे करार घडवून गांधीनी दलितांचे अत्यंत महत्वाचे दोन अधिकार काढुन घेतले.  मात्र हेच अधिकार शिख, मुस्लिम व ख्रिश्चनाना खुशाल बहाल केले.....


-Adv:एम डी रामटेके... ✍️
---------------------------------------------------------------------


2】 पुणे करार आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका


पुणे करार १९३२ मध्ये झाला व १९८०-८५ पर्यंत त्यावर विशेष चर्चा झाली नाही. पण बामसेफने हा धिक्कार दिन घोषित केल्याने, त्यावर चर्चा होऊ लागली व आंबेडकरवादी लोकांनी हा  सन्मान दिन म्हणुन साजरा करण्यास सुरुवात केली . पुणे करारात १० मुद्दे असताना धिक्कार करनारे फक्त एका मुद्द्यावर धिक्कार करताना दिसतात. तो म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ. मग स्वतंत्र मतदारसंघ ही बाबासाहेबांची सुरवातीलाच व एकमेव मागणी होती का ? याचा शोध घ्यावा लागेल. तो घेतला असता काही पुरावे आढळतात...
१९१६ ला लखनौ करार झाला. तो  कॉंग्रेस व मुस्लिम मध्ये.त्यात मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे कबूल झाले होते.  त्यानंतर १९१९ ला साऊथब्यूरो कमिशन समोर, आधी लखनौ करार झाला असताना व  मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्यावरही बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी राखीव जागा मागितल्या होत्या. व मतदार हक्कांची अट शिथिल करण्यास सांगितली होती. पण स्वतंत्र मतदारसंघ मागितला नव्हता. साउथब्यूरो तर अधिकाराची विभागणी करताना अस्पृश्यांसाठी विचारच करत नव्हते. अस्पृश्यांना हिंदूचा अभिन्न भाग समजले जात होते. पण बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी वेगळे हक्क मागुन, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यासाठी बाध्य केले.....
मग स्वतंत्र मतदारसंघ/संयुक्त मतदारसंघ बाबतीत बाबासाहेबांचे विचार जाणून घेण्यासाठी  खालील उतारे पाहू.
१)वयात आलेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार असावा. या गोष्टीचा आग्रह धरण्यात हा त्यांचा हेतू उघड झाला आहे. संयुक्त मतदान पध्दतीचा ते एवढ्या साठीच पुरस्कार करीत आहे.... (जनता २९-१२-३०)
२) डॉक्टर आंबेडकरांनी वयात आलेल्या सर्वांना सरसकट मतदानाचा हक्क पाहिजे असे सांगितले.
(जनता २९-१२-३०)
३)सुशिक्षित व पुढाऱलेल्या वर्गाचे ते स्वराज्य होणार आहे. अस्पृश्य,ब्राह्मणेतर मजूर वगैरे मागासलेले व अज्ञानी जनता पूर्वीप्रमाणेच नाडली जाणार आहे.
(जनता २६-१-३१)
४) डॉक्टर आंबेडकरांनी वयात आलेल्या सर्वांना मतदानाचा सरसकट हक्क मिळावा , म्हणून विलायतेत अतिशय खटपट केली. पण दोघांशिवाय इतर प्रतिनिधींनी त्यांना सहकार्य केले नाही. त्यामुळे पुढे येणारे स्वराज्य हे पुढारलेल्या वर्गाचे स्वराज्य होणार आहे. ......... समाजाचे ते स्वराज्य असणार  नाही. ते मिळविण्यासाठी मत देण्याचा आपला अधिकार प्रत्येक व्यक्तीने संपादिला पाहिजे...(जनता २६-१-३१)
५) सार्वत्रिक मतदान पध्दतीची मागणी अमान्य करण्यात आल्यामुळे पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणे त्यांना नाईलाजास्तव भाग पडले. पण याची जबाबदारी त्यांच्यावर नसुन ती सर्वस्वी इतर स्पृश्य व मुसलमानांवर आहे.(जनता 9-2-31)
६) अस्पृश्यांना स्वतंत्र की संयुक्त मतदान पध्दती पाहिजे पाहिजे हा प्रश्न विचारता "बाबासाहेबांनी  अ) एकतर सार्वत्रिक मतदान पद्धती
ब) पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदान पध्दती व नंतर संयुक्त मतदान पध्दतीने आणि राखीव जागांच्या व्यवस्थेनुसार व्यवस्था करावी असे सुचविले"...
जे देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाले  आहेत, त्या सर्वात हा सार्वत्रिक मतदानाचा हक्क प्रस्थापित झाला आहे असे नाही....(९-३-३१ जनता)
७) डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या प्रतिनिधी या  नात्याने संयुक्त मतदान पध्दतीला,आपली संमती  आधीच देउन ठेवली आहे. वयात आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष व्यक्तीला मतदानाचा हक्क असावा,या मताचे डॉक्टर आंबेडकर हे एक प्रमुख पुरस्कर्ते आहेत. ....... अस्पृश्यता निवारणासाठी संयुक्त मतदान पध्दतीला आपला पाठिंबा दिला आहे. देशहिताच्या व एकराष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनेही जाती व धर्मविशिष्ट मतदारसंघ घातक असल्यामुळे, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ पध्दतीचा पुरस्कार केला नाही.
( २५-५-३१जनता )
८) २४ सप्टेंबर१९३१  ला गांधी सोबत भेटीत डॉक्टर आंबेडकरांनी पूर्वीप्रमाणेच सांगितले की ,जर सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळत असेल तर वेगळ्या मतदार संघाची अस्पृश्यांना आवश्यकता नाही.( २८-९ -३१जनता)
वरील उताऱ्यावरुन हे सिध्द होते की बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेच नव्हता. मग तो गमावला म्हणुन बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारे जे  निषेध/धिक्कार करतात ते करणे योग्य वाटत नाही. आता बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघ का पाहिजे नव्हता ? तर
मुसलमानांना  स्वतंत्र मतदारसंघ दिला. म्हणजे मुसलमान उभे राहतील तिथे फक्त मुसलमानच मतदान करू शकतील. त्यामुळे त्यांना इतर समाज स्वीकारणार  नाही.याला सोपे करून पाहू...
मुसलमान जर संयुक्त मतदारसंघातून उभा राहिला तर आपल्या पक्षाचे सरकार बनावे म्हणुन इतर जातीधर्मातील पक्ष आणि नेते त्यांच्या सोबत मैत्रीभावनेने वागतील त्यामुळे स्विकाहार्यता वाढेल  जर तो स्वतंत्र मतदारसंघातून उभा असेल तर त्याच्याशी काही घेणेदेणे नाही म्हणुन कोणी त्याला स्वीकारणार नाही.
तसेच मुसलमान मतदार फक्त मुसलमानालाच मत देतील,हिन्दूला नाही त्यामुळे  हिंदू नेते मुसलमानाला तो आपला वोटर नसल्याने मैत्री करण्याचे कारण उरणार  नाही.
आजही भाजप,कॉंग्रेस,शिवसेना व इतर हे मुसलमानांना जवळ फक्त यासाठीच करतात कारण ते त्यांचे वोटर तरी आहेत किंवा आपल्या पक्षातून उभे राहिले तर त्यांच्या  प्रतिनिधीची संख्या  वाढून सत्ता उपभोगता तरी येते. आज जे मुसलमान /आणि मागासलेल्या जातीच्या लोकांना सर्व पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते स्वीकारतात त्याचे कारण संयुक्त मतदारसंघच आहे. असे म्हणायला हरकत नाही.
स्वतंत्र मतदारसंघाचा साइड इफेक्ट होऊन  अखंड देशाचे तुकडे होऊ शकतात हे बाबासाहेबांसारखे  दुरदृष्टीकोण असणारे देशभक्तच ओळखू शकतात.  पाकिस्तानच्या फाळणीला कारणीभूत हाच लखनौचा स्वतंत्र मतदारसंघाचा करार ठरतो.
वरील उताऱ्यावरुन प्रश्न पडतो की मग बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ का मागितला ?
त्याचे उत्तर ही त्यांच्या वृत्तपत्रा  मध्ये मिळते ते खालीलप्रमाणे आहे... 👇🏻
स्वतंत्र मतदारसंघ नको असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटते अशा काही स्वतंत्र बुद्धीची माणसे अस्पृश्यांतही आहेत. डॉक्टर आंबेडकर हे त्यातील एक आहेत. डॉक्टर आंबेडकर ही स्वतंत्र मतदारसंघावर केवळ मजेखातर लूब्ध होणारे पुढारी नाहीत. कॉंग्रेसने केला नव्हता त्या आधीपासून डॉक्टर आंबेडकरांनी सार्वत्रिक मतदानाचा पुरस्कार केला आहे. ........
             ..... हिंदू समाजाचे हृदय परिवर्तन अजून झाले नाही.....
सार्वत्रिक मतदानाचा हक्क ही मृगजळाप्रमाणे  दुर दुर पळत आहे. अशी प्रत्यक्ष परिस्थिती डॉक्टर आंबेडकरांनी  पाहीली तेव्हाच त्यांनी देखील केवळ अपरिहार्य आपत्ती म्हणुन स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आहे.(जनता 19-10-31)
तरी मग स्वतंत्र मतदारसंघ मंजूर होतो. आणि गांधी या साठी उपोषणाला बसतात, की  अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको... मग बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येतात, तडजोड करावी म्हणुन हिंदू स्पृश्य पुढारी येतात. पण बाबासाहेब तयार होत नाहीत. आणि बोलतात की ,मला विजेच्या खांबावर अटकवुन मारले तरी मी हक्क सोडणार नाही....
.... माझा निर्णय आहे तो कायम आहे. हिंदूच्या स्वार्थाकरिता आपला प्राण पणास लावून गांधीला जर, अस्पृश्य समाजाविरुद्ध संग्रामच करायचा असेल, तर अस्पृश्य समाजालाही आपल्या हक्कांच्या प्राप्तिसाठी व संरक्षणा साठी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यास सज्ज होणे भाग पडेल........
( जनता १७-९-३२)
गांधीचे प्राण वाचविण्यासाठी मी माझ्या बांधवांच्या न्याय हक्काला हरताळ फासण्यास कारणीभूत होणार नाही.
(जनता 24-९-३२)
याचा अर्थ जर स्वतंत्र मतदारसंघ च्या मोबदल्यात  जर इतर जास्त सवलत मिळत असेल,तरच बाबासाहेब तो सोडू शकत होते. आणि बाबासाहेबांना ते मिळू शकते असे वाटायचे कारण 👇🏻
गांधीने भारताच्या स्टेट्स सेक्रेटरी सर सॅमुएल होअर सोबत केलेला पत्रव्यवहार....
 शिक्षण, मालमत्ता, वगैरे बाबतीत जरूर अशा मतदार होण्याच्या अटी अस्पृश्यांना न लावता त्यांच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषांचे नाव मतदारांच्या यादीत समाविष्ट व्हावे. असे माझे मत आहे... गांधी...
(चां. भ. खैरमोडे खंड ५ )
हेच तर बाबासाहेबांना पाहिजे होते. हे वरील उताऱ्यात स्पष्ट दिसत आहे. मग राहिला प्रश्न स्वतंत्र मतदारसंघ आणि  राखीव जागेचा तर.....
मुसलमान आणि शीख यांना फक्त एकेरी मतदान होते. तसे बाबासाहेबांनी न घेता करारात दुहेरी मतदान घेतले. आधी अस्पृश्यापैकी कोणी निवडणूक लढावी हे इतर पक्षातील स्पृश्य नाही ठरवणार तर फक्त अस्पृश्य व्यक्ती ठरवेल की कोण निवडणूक लढवेल. यामुळे चार गोष्टी साध्य होतात
१) जो अस्पृश्यांसाठी इमानदारीने काम करतो त्यालाच अस्पृश्य निवडणूक लढवण्यास पाठवतिल.
२) निवडणुकित स्पृश्य व्यक्तीला मत देण्याचा अधिकार अस्पृश्यांसाठी असल्याने स्पृश्य नेता अस्पृश्यांना जवळ करून अस्पृश्यता सोडून मतांची भीक मागेल. त्यामुळे अस्पृश्यता नष्ट होण्यास मदत मिळेल.
३) अस्पृश्यांसाठी बाकी पक्षात नेते म्हणून जागा ठेवण्यात येतील.
४) देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचणार नाही.
या करारामुळे जिथे ब्रिटिशांच्या मते  ७१ जागेवर अस्पृश्य व्यक्ती निवडून यायला पाहिजे तिथे करारानुसार १४८  निवडून येणार.....  आता असे असल्यामुळे विरोध/निषेध करणे खरच योग्य आहे ?
जर ७१ च्या जागी १४८ निवडून देण्याची करारात सोय नसती. तर जे लोक बाबासाहेबांना करारात करुणेचा महासागर समजतात त्यांना बाबासाहेबांचा मार्शल रेस मधील सैनिक दिसला असता. जो need to kill चा समर्थक आहे. आणि त्यांच्या सोबत १०० दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगणारे भिमा कोरेगांव गाजवणाऱ्याचे वंशज सुद्धा होते......
जातीय  निवाड्यानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ होता, पण फक्त प्रांतिक कायदेमंडळ मध्ये तो मध्यवर्ती कायदेमंडळ मध्ये सुरवातीला करण्यात आला नव्हता.
मतदार अधिकार स्पष्ट करण्यात आले नव्हते.
जास्तीत जास्त २० वर्षे हे अधिकार राहतील. मग आपोआप रद्द होतील असे होते.
मग गांधीने उपोषणाला सुरवात केल्यानंतर बाबासाहेबांनी नवीन योजना तयार केली. त्यात
१) १९७ जागा मागितल्या.
२) अस्पृश्य उमेदवार हे अस्पृश्यच ठरवतील.
३) १० वर्षांनंतर संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा.
४) वयस्क मताधिकार
५) लोकसंख्या नुसार अस्पृश्यांसाठी नोकरीत राखीव जागा.
स्पृश्याजवळ काहीच योजना नव्हती. बस स्वतंत्र मतदारसंघ सोडा एवढेच त्यांचे म्हणणे होते.
आणि ज्या करारावर सह्या झाल्या त्यातील मुद्दे खालीलप्रमाणे होते. ते स्पष्टीकरण सह देत आहे.
१) ७८७  पैकी १४८ जागा अस्पृश्यांसाठी राखीव
स्पष्टीकरण -- गांधी हे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा दोन्ही देणार नाहीत ह्या मताचे होते.बाबासाहेब राखीव मतदारसंघ चे पुरस्कर्ते होते. बाबासाहेबांना पूर्ण मागण्या मंजूर होऊ शकत नव्हत्या  म्हणुन मुत्सद्दीपणा दाखवून त्यांनी आधीच १९७ जागा मागितल्या. आणि १४८ जागा मिळवल्या.ज्या फक्त ७१मिळणार होत्या.....
२) अस्पृश्यांसाठी उमेदवार अस्पृश्यच निवडतिल.
स्पष्टीकरण=- गांधी/कॉंग्रेसने त्यांचे चमचे उभे केले असते. जे अस्पृश्यांसाठी काम न करणारे असते.
३) मध्यवर्ती कायदेमंडळमध्ये अस्पृश्याचे प्रतिनिधी सर्वसाधारण मतदारसंघात राखीव जागासाठी पॅनलच्या निवडणुकीने निवडले जावे.
स्पष्टीकरण =- ब्रिटिश जाहिरनाम्यानुसार मध्यवर्ती कायदेमंडळ चा विचारच करण्यात आला नव्हता.
४) मध्यवर्ती कायदेमंडळात हिंदुच्या जागेपैकी १८% जागा अस्पृश्यांसाठी राखीव....
५) अस्पृश्य उमेदवारांच्या पॅनलची पद्धत १०वर्षेच अमलात आणावी. पण त्याआधी सर्व जातीनी एकमताने ती रद्द करायचे ठरवल्यास तसे करण्यास हरकत नाही.
बाबासाहेब पण १० वर्षे आधीपासूनच मागत होते.
६) राखीव जागाचे तत्व सर्व जातीत एकवाक्यता होइपर्यंत अमलात रहावे.
स्पष्टीकरण =- ब्रिटिश २० वर्षे राहुन आपोआप बंद म्हणत होते. गांधी १० वर्षांनी आपोआप बंद म्हणत होते. पण बाबासाहेब अस्पृश्यांची परवानगी असे पर्यंत रद्द करण्यात येउ नये म्हणत होते.
७) मताधिकार लोथियम समितीनुसार व्हावा.
स्पष्टीकरण =- गांधीने पत्र पाठवून अस्पृश्यांसाठी वयस्क मताधिकार मंजूर केला होता.
८) स्थानिक संस्थानात निवडणूक किंवा सरकारी नोकर्यांमध्ये योग्य प्रमाणात जागा द्याव्या.....
स्पष्टीकरण =- ब्रिटिश किंवा गांधी नोकरीत आरक्षण याविषयी काहीच द्यायला किंवा बोलायला तयार नव्हते. ते अधिकार बाबासाहेबांनी मिळविले.......
९) निवडणुकीत आणि नोकरीत शिक्षणाच्या अटी अस्पृश्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात.
याला कोणीच विरोध केला नाही. म्हणून विजय /पराजय चा प्रश्न उद्भवत नाही.
१० ) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी योग्य प्रमाणात प्रांतिक सरकारच्या बजेटात तरतुद असावी.....
ब्रिटिश किंवा गांधी  याविषयी काहीच द्यायला किंवा बोलायला तयार नव्हते. ते अधिकार बाबासाहेबांनी मिळविले.......
तात्पर्य बाबासाहेब विजयी.
जो गांधी अस्पृश्यांसाठी कोणतेही वेगळे अधिकार नसावेत या मतांचा आहे. त्यासाठीच उपोषणाला बसला आहे. आणि इतक्या मागण्या करारात मंजूर करत आहे. मग या करारात बाबासाहेब हरले कुठे हे शोधूनही सापडत नाही. मग धिक्कार का करावा ?
करारानंतर बाबासाहेब काय म्हणतात तेही पाहुनच घेऊ.....
१) "माझ्या सर्व मागण्यांना गांधींनी मान्यता देउन उलट माझेच अभिनंदन केले. गांधीनी ही तडजोड मान्य केली ती दुसऱ्या राउंड टेबल परिषद मध्ये मान्य केली असती तर आजचे बिकट व भयानक असे वातावरण कधीच उत्पन्न झाले नसते."


( १-१०-१९३२ जनता)
२) "या कराराद्वारे आपल्या समाजाने बेदरकार हिंदू समाजास आपले राजकीय अस्तित्व कबूल करण्यास भाग  पाडले आहे. याकरिता तो आपला राजकीय दिन म्हणुन पाळला पाहिजे. पुणे करारान्वये आपल्या समाजास मिळालेले अधिकार आपण योग्य रितीने उपयोगात आणतो की नाही, हे पाहण्यासाठी आपण या दिवशी जमले पाहिजे".
सारांश =- गांधी आणि स्पृश्य हिंदू अस्पृश्यांसाठी कोणतेही विशेष अधिकार द्यायला तयार नव्हते, स्वतंत्र अस्तित्वच मानायला तयार नव्हते त्यांनीच   नमते घेऊन करार घडवून आणला व भरपूर अधिकार बहाल केले.बाबासाहेब आधीपासुनच स्वतंत्र मतदारसंघाचे समर्थक नव्हते.  वयस्क मताधिकार आणि राखीव जागा यांचे ते समर्थक होते त्यावेळी जगातील बऱ्याच देशात (इंग्लंड सहीत)उच्च शिक्षित आणि श्रीमंत लोकांनाच मताधिकार राहत होता. त्यामुळे भारतात सुध्दा त्याच पध्दतीने मताधिकार असावा असे ब्रिटिश म्हणत होते. त्यावेळी आताचे बौद्ध पण त्यावेळच्या अस्पृश्यांमध्ये उच्चशिक्षित आणि श्रीमंत मतदार अत्यल्प असल्याने अस्पृश्य व्यक्ती निवडून येणे अशक्य असल्याने बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यच नव्हे तर सर्व अल्पसंख्याकाच्या आग्रहाने स्वतंत्र मतदारसंघ मागितला.
पण संधी मिळाल्या बरोबर त्यांनी त्यांच्या जुन्या मागण्या सोबत नोकरी आणि शिक्षणासाठी नवीन मागण्या मंजूर करून घेतल्या.
यात बाबासाहेबांनी घाबरून किंवा दया दाखवून कोणतेही निर्णय घेतले नाही.उपोषण चालू असताना ज्या तडजोडी झाल्या त्या सर्व बाबासाहेबांच्या मतानुसारच झाल्या.
स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिताना त्यांनी १) वयस्क मताधिकार २) राजकारणात राखीव जागा ३) नोकरी व शिक्षणामध्ये राखीव जागा. मिळवल्या. आधी जे स्वतंत्र मतदारसंघ मुसलमान व शिख यांना मिळाले होते ते ही रद्द केले. यामुळे संविधान निर्मिती नंतर १९३२ चा करार संपला. आता भारतीय संविधानालाच महत्त्व राहते.
बाबासाहेब १९१९ ला साउथब्यूरो , १९२८ सायमन कमिशन , १९३१-३२ ला गोलमेज परिषद , १९३२ पुणे करार आणि १९४७-४९ संविधान निर्मिती या अधिकार मिळविण्याच्या प्रत्येक टप्प्यात विजयीच झाले. बाबासाहेबांचा विजय असो विजय असो.......


- संदीप राऊत...✍️
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!