डॉ बाबासाहेब आंबेडकर लंडन अमेरिका प्रवास व तेथील शिक्षण अनुभव...!!



1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (अमेरिकेस रवाना)



वडलांच्या मृत्युनंतर भीमराव खचुन गेले. आज पर्यंत सगळ्या दुनियाशी झगडताना सुभेदार कायम पाठीशी उभे असायचे. भीमरावांचा कायमचा आधार एकाएकी नाहिसा झाला होता. बडोद्यात जाऊन नोकरीवर रुजु होण्याची ईच्छा होत नव्हती. पण अबोल महत्वकांक्षा गप्प बसु देत नव्हत्या. दलित समाजाचं नेतृत्व आज वडिलांच छत्र हरविल्यामुळे पोरकं झालं होतं. सावरायला थोडा वेळ लागणार होता. वरुन कुटुंबाची जबाबदारी यांच्यावरच पडली होती.  आता दोन दोन आघाड्यावर लढायचं होतं. कुटुंब प्रमुख अन जातियवादी व्यवस्था अशा आघाड्यावर लढण्याची तय्यारी करावी लागणार होती. शेवटी शेवटी वडील कर्जबाजारी झाले होते. एकंदरीत परिस्थीती फार बिकट होती. एकाच वेळी ब-याच अडचणी येऊन दारात धडकल्या होत्या. याच चिंतेत असताना बडोदा नरेशांची मुंबईत भेट घेण्याची संधी मिळाली. याच दरम्यान बडोदा नरेशानी ४ विद्यार्थ्याना अमेरीकेत उच्च शिक्षणघेण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. या भेटीत महाराजानीच भीमरावाना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले. भीमरावानी तसा अर्ज दाखल केला. बडोदे राज्यातील शिक्षण मंत्रालयाने अमेरीकेतील शिक्षणासाठी बाबासाहेबांची निवड केली. केवढा हा योग. कित्येक अर्ज आले होते पण ईतक्या अर्जामधुन एक महार मुलाची निवड होते तेही अमेरीकेत शिक्षणासाठी. महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच, आम्ही सगळे महाराजांचे ऋणी आहोत. तेंव्हा हि संधी मिळाली नसती तर आजही आम्ही वेशीबाहेरच असतो. बाबासाहेबाना अशी संधी देणारे बडोदा नरेश यांच्या या महान कार्याला सतश: प्रणाम.
भीमरावाची निवड झाल्यावर करार पत्रावर सही करण्यासाठी ते बडोद्याला रवाना होतात. ४ जुन १९१३ रोजी उपशिक्षण मंत्र्यासमोर बाबासाहेबानी करार पत्रावर सही केली. या करारा नुसार अमेरीकेतील शिक्षण पुर्ण केल्यावर भीमरावानी बडोदा सरकारकडे १० वर्षे नोकरी करावी असे ठरले.
आज आनंदाचा दिवस होता, मनात उत्सव साजरा होत होता. विलायतेत जाऊन ज्ञान संपादन करण्याची आगळी वेगळी संधी चालुन आली होती. बडोना नरेशाला मनातुन अनेक धन्यवाद देत बाबासाहेब मुंबईच्या दिशेनी निघाले. नुकताच पितृवियोग झाल्यामुळे खिन्न झालेल्या, खचलेल्या भीमरावाना परत उठुन जोमाने कामाला लागण्यास प्रवृत्त करणारी एक अपुर्व संधी अचानकच चालुन आली होती.
१९१३ मधिल जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्या बाबासाहेब न्युयॉर्कला पोहचतात. अमेरीका हा लोकशाहिचा पाया घालणारं देश. समानतेची क्रांती जिथे झाली त्या देशात पाय ठेवताना बाबासाहेब फार सुखावुन गेले. हि अब्राहम लिकंनची माती होती, लोकशाहीचा पाया ईथेच रचला गेला, प्रत्येकाला राजकीय हक्क बाजवण्यासाठी निवडनुकीचे अवलंब करणारी समावेशक यंत्रणेचा पुरस्कार करणारी ही माती. बुकर टी. वॉशिंग्टनची ही भुमी. आज एक युगप्रवर्तकानी या उदात्त भुमित पाय ठेवले. एक दलित ज्याचा स्पर्शही लोकाना वर्ज्य होता तो आज या विकासाची व मानवी हक्काचे कळस गाठलेल्या देशात पाय ठेवले.
सुरुवाती विश्वविद्यालयाच्या वसतीगृताह वास्तव्य होते. पण तिथेलं खान पान अगदी वेग्ळं होतं. बाबासाहेबांची उपासमार होऊ लागली. त्यानी पाश्चात पद्धतीचं जेवण फारसं आवडेना. नंतर ते हिंदु विद्यार्थ्याकडे राहायला गेले. नवल भथेना नावाच्या पारसी विध्यार्थ्याबरोबर लिव्हिंग्स्टन हॉल मधे राहु लागले. ईथे एकदाचं ठाव ठिकाणा पक्का झाला. आता जोमाने अभ्यासाला लागण्याचे दिवस होते. हे महाविद्यालयाचे सुरुवातीचे दिवस अन वरुन अमेरीका सारखा संपन्न देश. सुबत्ता लाभली की लोकं चैनीने राहण्याकडे झुकतात. शृंगाराची आसक्ती वाढते. पण बाबासाहेब मात्र यातल्या कुठल्याच गोष्टीकडे आकृष्ट झाले नाहीत. विशिष्ट उद्देशाने प्रेरीत होऊन अभ्यासाचे कित्ते गिरविणार हे महापुरुष आपल्या ध्येयापासुन एक इंचही हटले नाहीत.
येथील बरोबरीची वागणुक त्यांच्यात दहापट स्फुर्ती भरुन देई. आज पर्यंत ईकडे भारतातील तुच्छ वागणुकीची सवय पडलेले बाबासाहेब या समानतेच्या वागणुकीने पार भारावुन गेले होते. एकत्र बसुन जेवणे, खाणे पिणे, व कुठल्याच ठिकाणि उच निच भेदभाव नसल्यामुळे मन प्रसन्न होत असे. हा समतेचा सुखद साक्षात्कार होता. यामुळे मनाची क्षीतिजं विस्तारु लागली होती. आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. अंगी सामर्थ्य वाढविण्याची संधी खुणावत होती. सर्व शक्ती एकवटुन व आपले दायित्व ओळखुन अध्ययन सुरु झाले. सुखविलासात रमण्याच्या पायरिवर उभं राहुन त्यागाचे कित्ते गिरवायला सुरुवात झाली. मिळालेल्या शिष्यवृत्तीत जेमतेम खर्च भागत असे. त्यातुनही काही पैसे वाचवुन रमाईसाठी मुंबईला पाठवित असतं. त्यांच्या एका दिवसाचा जेवणाचा खर्च एक डॉलर दहा सेंट ईतका होता. हात आखडुन खर्च करावे लागे. धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला अन आयुष्याचा प्रत्येक क्षण सुद्धा योग्य ठिकाणी वापरला. त्यांच्या नियोजनाला तोड नाही, ठरविल्या प्रमाणे वागुन यश संपादन करण्यात त्यांचा स्वत:ला झोकुन देण्याचं गुण उपजतच अंगी होतं.
प्रा. एडविन आर. ए. सोलिग्मन यांचा भीमरावांवर अत्यंत प्रभाव. हे प्राध्यापक महाशय फार विद्वान. शिकविण्यातील त्यांचा हतखंडा फार आगळा अन विद्यार्थ्यांवर छाप पाडणार तल्लख बुद्दीचं हे तेजस्वी व्यक्तीमत्व प्रत्येक विद्यार्थ्यावर आपला प्रभाव सोडुन जात असे. भीमरावांवरही या प्रध्यापकाचं विलक्षण प्रभाव पडला. प्राध्यापकाकडुन जास्तीत जास्त ज्ञान संपादन करण्यासाठी सदैव उत्सुक असतं. एकदा भीमरावानी प्राध्यापक महोदयाना विचारलं की, संशोधनाची सर्वोत्तम अन प्रभावी पद्धत कुठली? यावर प्राध्यापक महाशयानी उत्तर दिल.
“आपले काम कळकळीने केल्यास संशोधनाची स्वत:चील पद्धत तयार होते”
या वाक्यानी भीमराव आंबेडकरांवराना संशोधनाच्या नविन मार्गाच्या पाऊलखुणा दाखविल्या. संशोधनाच्या मार्गावर भीमानी चांगलीच गती प्राप्त झाली. रोज १८ तास अभ्यास करण्यास सुरुवात झाली. अभ्यासात स्वत:ला झोकुन देलं. प्रचंड वाचन सुरु झाले. विविध विषयाची पुस्तकं पालथी घालु लागले. ज्ञानाचा भांडार सापडल्याने त्याना ज्ञानग्रहनाशिवाय ईतर काहिही सुचत नव्हते. दिवस रात्र एकच काम चालु होते.
१९१५ साली दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर “प्राचिन भारतातील व्यापार” (Ancient Indian Commerce) हा प्रबंध लिहुन एम. ए. ची पदवी संपादन केली. अन मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “भारतातील जातीसंख्या, तीची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास” (Caste In India, Their Mechanism, Genesis & Development) ह्या विषयावर त्यानी एक निबंध वाचला. मनुचा  उद्दटपणा  ईथे जगासमोर माडताना त्याना भरुन आलं रंजल्या गांजल्या लोकांची किंकाळी ईथवर केंव्हा पोहचलीच नव्हती, आज प्रथमच अमेरीकनाना दलितांच्या किंकाळ्यांची जाणिव करुन देताना बाबासाहेब सदगदीत झाले.  याच्या आधी स्वामी विवेकानंदाच्या बंधु आणि भगिनीनो या शब्दानी भारावुन गेलेल्या अमेरीकन लोकाना आज भारताचा खरा चेहरा समजला होता. आज पर्यंत ईथे आलेल्या प्रत्येक माणसाने भारत कसा महान आहे व त्यांची संस्कॄती कशी चांगली आहे हेच सांगितले. आपले सगळे कुकर्म लपवुन ठेवले होते. आज मात्र दलित समाजाती खुद्द जातीयवादाचे अनेक चटके पाठीवर घेऊन अमेरीकेत आलेला एक विद्यार्थी या समस्त हिंदुनी विदेशात तयार केलेली खोटी प्रतिमा पुसुन टाकण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. उभा अमेरीका अवाक झाला होता. भारतीयांच्या क्रुरपणाचा सगळ्यानी निषेध केला. अन अशा प्रकारे दलित विध्यार्थी भीमराव आंबेडकरानी प्रस्थापितांच्या विरोधात ईथेच रणशिंग फुंकले.  पुढे जुन-१९१६ मधे “भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा-एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन” (National Dividend of India-A Historical & Analytical Study) हा प्रबंध कोलंबिया विद्यापिठात सादर केला. विद्यापिठाने हा प्रबंध अक्षरश: डोक्यावर घेतलं. आंबेडकरांवर सगळीकडुन स्तुतीसुमनांची उधळन होऊ लागली. हे यश ईतकं अफाट होतं की विद्यापिठातील विद्यार्थ्यानी भीमरावाना मेजवानी दिली. अशा प्रकारे अमेरीकेत आपल्या विद्वत्तेचा डंका वाजवुन बाबासाहेबानी भीमगर्जना केली होती...


-Adv: एम डी रामटेके...✍️
----------------------------------------------------------------------


2】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (लंडनला रवाना)





१९२० मे च्या शेवटच्या आठवड्यात नागपुर येथे “अखिल भारतिय बहिस्कृत परीषद” भरविण्यात आली. या परिषदेच्ये अध्यक्ष होते कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज. याच दरम्यान भारतात जिकडे तिकडे लहान मोठे अस्पृश्याचे नेते उदयास येते होते. देशात अस्पृश्यनिवारणाचे वारे वाहु लागले होते. लोकांना गुलामगिरीची जाणीव होऊ लागली अन आता ती झिटकारण्याची वेळ जवळ येत होती.याच दरम्यान डी. सी. शिंदेनी सरकारला एक निवेदन सादर केले होते. त्यात त्यानी सरकारला विनवणी केली होती की, अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळानी नेमावे. राज्यपाल व अस्पृश्यांच्या संस्थानी ते निवडु नये.  झालं यावरुन लोकांचा रोष ओढवुन घेतला. एवढे महान समाजसेवी पण एक गोष्ट जराशी चुकली अन लोकांच्या विरोधाला समोर जावे लागले.विषयनियामक समितीच्या बैठकित बाबासाहेब अन शिंदेंच्या आघाडीतील दोन नेते १) गणेश अ. गवई २) बेळगावचे पापन्ना यांच्यात खडाजंगी झाली. गवईनी व्यूह रचला होता. बाबासाहेबाना या समितीचे अद्यक्ष बनवायचे म्हणजे ईथे घेतलेल्या निर्णयाचं खापर बाबासाहेबांच्या डोक्यावर फोडता येईल. पण आंबेडकरांची सेना फार हुशार त्यानी हा डाव ओळखला अन फार चलाखिने शिंदेंचा खंदा कार्यकर्ता पापन्ना यानाच या समितीचे अद्यक्ष केले. आता बाबासाहेब बोलायला मोकळे होते. अध्यक्षांच्या परवानगीने बाबासाहेबानी एक लांब लचक भाषण दिले. डी. सी. मिशनचे धोरण कसे घातक आहेत हे त्यानी सिद्ध केले. शिंदेंच्या या धोरणांचा यथेच्च समाचार घेऊन धोरणांचा निषेध केला. शिंद्यांच्या मताप्रमाणे सरकारनी निर्णय घेऊ नये असा ठराव मांडला. सगळ्या अस्पृश्य नेत्यांचा पाठिंबा मिळवुन तो प्रस्ताव तिथेच पास करवुन घेतला. हे सगळं शिंदेंच्या डोळ्यापुढे घडुन आलं. ते आवाक झालेत. त्यांच्या निर्णयाचा व धोरणांचा ईथे नुसता विरोध अन निषेधच झाला नाही तर त्यानी सरकारला सादर केलेले निवेदन चुकीचे आहे हे सिद्धही झाले, अन प्रस्तावहई पास झाला. हा एक चमत्कार होता. भावी विद्वानाच्या आगमनाची ही नांदी होती. या परिषदेत बाबासाहेबांच्या नेतृत्व कौशल्य, वादकुशलता अन बुद्धीमत्ता ईत्याची गुणांची पाऊले ठशठशीत उमटली. बाबासाहेबांचा हा पहिला विजय होता. तो असाच  मिळाला नव्हता, बुद्धीच्या जोरावर त्यानी तो खेचुन आणला होता. मूकनायकानी आपल्या भावी महान कार्याची चुणूक दाखविली. आता मूक्या लोकांचा नायक म्हणुन एक विद्वान व्यक्ती रणांगणात उतरली होती. अस्पृश्यांतील १८ उपजातीतील नेत्याचे सहभोजन घडवुन आणले. अस्पृश्यांमधे आपापसात  उच्च निच प्रकार होते, ते आधि मिटावे म्हणुन हा प्रयत्न होता.प्राध्यापक म्हणुन नोकरी करताना बाबासाहेबाना भरपुर वेतन मिळत असे. काटकसरीने जीवन जगत, गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च न करता साठवुन ठेवण्याच्या वृत्तीमुळे आज जवळ ब-यापैकी पैसे साठले होते. नोव्हेबर १९१८ मधे नोकरी धरली होती अन मार्च १९२० मधे या नोकरीचा राजीनामा देऊन अर्धवट सोडलेले शिक्षण पुर्ण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. ते आजही इंप्रुव्हमेंट चाळितल रहात होते. आता लंडनला जाण्याच्या तय्यारीत लागले.मित्र नवल भथेना, हा अगदी अमेरीकेपासुनचा जीवलग मित्र. नेहमी अडचणिच्या वेळी हाच उपयोगी पडत असे. लंडनला जाण्याची तयारी केली खरी पण पैशाची अजुन तजवीज करायची होती. नवल कडुन ५०००/- रुपये उधार घेतले. हा मित्र सुद्धा कुठलीही कुरकुर न करता नेहमी सढळ हातानी मदत करीत असे. त्यानंतर छ्त्रपती शाहु महाराजांकडुनही थोडे पैसे घेतले अन १९२० मधे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लंड्नला पोहचले.याच दरम्यान बडोदे सरकारच्या अधिका-यानी शिक्षणासाठी झालेला खर्च परत मिळावा म्हणुन बाबासाहेबांच्या मागे तगादा लावला. बाबासाहेब महाविद्यालयात नोकरी करतात हे कळल्यावर त्यानी प्राचार्याना पत्र लिहुन तसे कळविण्याचा घृणास्पद प्रकार केला होता. एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणुन त्यानी मुंबई प्रांताचे शिक्षण अधिकारी याना सुद्धा एक पत्र लिहुन बाबासाहेबांची बदनामी केली. ना. म. जोशींच्या कानावर ही बातमी घातली अन बाबासाहेबांचा छ्ळ करण्याच्या नवनविन क्लृप्त्या लढविल्या जात होत्या. तो पर्यंत बाबासाहेब देश सोडुन विदेशात शिक्षणासाठी निघुन गेले होते. तिकडेही पत्र पाठवुन त्यांच्या छळ करण्याचे काम चलविले गेले. हा महार आता आमच्या नकावर टिच्चुन शिक्षण पुर्ण करतो आहे याचं त्यान फार खटकत होतं. आम्ही याची शिक्षणाची नाकेबंदी व्हावी म्हणुन अनेक प्रयत्न करुन सुध्दा हा परत शिकण्यासाठी विदेशात गेला याचं त्याना सलत होतं. काहिही करुन कोर्टात खेचायचं अन शिक्षणात अडथडा आणायचा हाच काय त्यांच्या प्लॅन होता. पण बाबासाहेब या दिवाणाला दाद देत नव्हते अन शेवटी हे प्रकरण महाराजांकडे गेलं. तेंव्हा महाराज म्हणतात“ हि रक्कम शिक्षणावर खर्च झाली, ते कर्ज थोडीच होतं? वसुलीचा प्रश्नच नाही, ती शिष्यवृत्ती होती”पण जातियवादी अधिका-यानी छळ चालुच ठेवला. शेवटी जेंव्हा महाराजाना कळतं की आपले अधिकारी उगीच आंबेडकराना त्रास देता आहेत तेंव्हा त्यानी संबंधित अधिका-याना चांगलच खडसावलं अन शेवटी १९३२ साली हे प्रकरण निकाली काढले.तिकडे बाबासाहेबानी खडतरी परिश्रम घेणे सुरु केले. मिळेत ते खाऊन सकाळीच म्युझियममधे वाचायला जात. दुपारच्या जेवनसाठी पैसे खर्च करणे त्याना परवडणारे नव्हते. या वेळेस ते कर्ज काढुन शिकायला आले होते. पैसा योग्य ठिकाणी खर्च करणे फार गरजेचं होतं. म्हणुन सकाळी येताना एक सॅंडविच सोबत घेऊन येत अन दुपारी भुक लागल्यावर हळुच तो सॅंडविच काढुन तिथेच खात. पण त्या म्युझियमच्या एका सेवकाच्या लक्षात येताच त्यानी नियमाकडे बोट दाखविले अन या नंतर बाबासाहेबानी कायमचं दुपारचं खानं बंद केलं. पुढच्या तिन साडेतिन वर्षात दुपारचं जेवण त्याना माहितच नाही. सकाळी सगळ्यात पहिले प्रवेश करणारे तेच अन दिवसभर उपाशी पोटानी अभ्यास करुन शेवटी बाहेर पडणारेही तेच. पोटाची भुक मारुन सायंकाळ पर्यंत अभ्यास करुन बाबासाहेब काय मिळवायचे तर पैशाची बचत, वेळेची कमाई अन टिपणांच्या कागदानी फुगलेले खिसे अशा अवस्थेत शिणलेल्या शरिराने पण टवटवित डोळ्यानी भावी युगप्रवर्तक म्युझियम मधुन बाहेर पडत असे.घरी जाऊन परत अभ्यासाला बसत असे. रात्रीचे थोडेफार खाऊन परत पहाटे पर्यंत अभ्यास चालत असे. त्यांचा रुममेट श्री. अस्नाडेकर अधे मधे केंव्हा रात्री उठलाच तर बाबासाहेबाना म्हणायचा, “अरे झोप, किती वाचतो, तब्बेतीवर परिणाम होईल” यावर बाबासाहेब म्हणत, “अस्नाडेकर, मी खुप गरीब आहे, माझ्याकडे अन्नाला पैसे अन झोपायला वेळ दोन्ही नाहीत” यावर रुममेट निरुत्तर होत.अशा प्रकारे अविश्रांत श्रम, खडतर परिश्रम करणारा हा महापुरुष आता स्वत:ला पुर्णपणे झोकुन दिले. दिवस रात्र अभ्यास. मिळेत त्या वेळेत अभ्यास. डोळ्यासमोर सतत एकच ध्येय होते. लवकरात लवकर हा ईथला अभ्यासक्रम पुर्ण करायचा अन वेळ मिळाल्यास अन पैसा हाती उरल्यास आजुन काही शिकता येते का ते पहावे.मधे चलनवाढीमुळे जवळ असलेला पैसा अपुरा पडला. पैशाचं गणित बिघडलं. तेंव्हा बाबासाहेबांकडे पर्यान नव्हता म्हणुन परत आपल्या नेहमीच्या मदतगार मित्राकडे म्हणजेच नवल भथेनाकडे पैशाची मागनी करणारी चिठ्ठी लिहली. पण या वेळेस पैसे मागताना बाबासाहेबाना मनात फार वाईट वाटत होते. कारण ईथे येताना आधिच नवल कडुन रु. ५०००/- कर्ज घेतले होते. पण आता नाईलाज होता. ते चिठ्ठित लिहतात.“नवल माझ्यामुळे तुला त्रास होतो. तु मनाने फार चांगला आहेस अन माझा एकमेव मित्र आहेस. म्हणुन मी तुझ्याकडे सारखं पैशाची मागणी करत असतो. माझा नाईलाज आहे. पण हे नेहमी नेहमी चालल्यानी तु माझी मैत्री तोडशील की काय अशी अधे मधे भितीही वाटते. कारण मित्राला सहन करुण्याच्याही सिमा असतात. मी त्या सिमा केंव्हाच पार करुन तुला त्रास देऊ लागलो तरी तु ही मैत्री टिकवुन नाईलाजास्तव मला मदतीचा हात देतोस. पण काय करु, मला पैशाची खुप गरज आहे मला एकमेच तुझाच आधार आहे.”बाबासाहेबाना आता मित्राकडे पैसे मागतानाही फार लाज वाटत असे पण त्यांचा वेळोवेळी नाईलाज झाला. पुढे त्यानी शाहु महाराजानाही पत्र लिहुन आर्थिक मदत मागविली. अशा प्रकारे ते कसं बसं आर्थिक डोलारा सांभाळत लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करण्यात गुंतले होते. यावेळे मात्र घरी रमाईला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणिना तोंड दयावे लागत होते. मागच्या वेळेस सासरे होते अन शिष्यवृत्तीचे पैसे मिळत होते. पण हि वेळ वेगळी होती. याच दरम्याना बाबासाहेबांची प्रकृती बिघडते. ते शिवतरकराना लिहलेल्या पत्रात म्हणतात की माझ्या बायकोला ह्यातलं काही सांगु नका. मी लवरच बरा होईन अन परत अभ्यासाला लागेन.याच काळात बाबासाहेब एक इंग्रज बाईकडे बायबलचा अभ्यास करायला जात. त्या बाईशी बाबासाहेबांच चांगलं पटत असे. अन लंडनच्या उपनगरात आजुन एक विसाव्याची जागा सापडली होती. संस्कृत शास्त्र्यांच्या घरी आठवडा पंधरा दिवसानी बाबासाहेबाना भोजणाचे निमंत्रण असे. त्या माणसाची बायको बाबासाहेबाना भाऊ मानत असे. या दांपत्यानी बाबासाहेबांवर खुप प्रेम केले. पण ईथे त्याना बाबासाहेबानी आपली जात सांगितली नाही अन जेंव्हा त्यांची जात जगजाहीर झाली त्या नंतर या दांपत्याची केंव्हा भेट झाली  नाही. बाबासाहेब नेहमी म्हणत की आज माझी जात कळल्यावर त्या कुटुंबात माझ्याविषयी काय भावना आहेत हे माहित करुन घेण्याची खुप ईच्छा आहे पण मार्ग नव्हता.बाबासाहेब मुंबई पासुन हजारो मैल दुर लंडनला शिकत होते तरी त्यांचं भारतातील राजकारणावर बारिक लक्ष होतं. १९२० मधे जुलैच्या शेवटच्य आठवड्यात ते लंडनला पोहचले अन १ ऑगस्ट १९२० मधे ईकडे टिळक वारले. टिळकयुग संपले. आता गांधी नावाचा नविन तारा भारतीय राजकारणात उगवला. बाबासाहेब या गांधी युगाला तमोयुग म्हणत.या दरम्यान भारतमंत्री मॉंटिग्युची लंडनमधे भेट घेऊन बाबासाहेबानी याचे मतपरिवर्तन करण्याचे काम केले. हा मॉंटिग्यु आधि ब्राह्मणेत्तर चळवळीच्या विरोधात होता. तो ब्राह्मणांच्या सांगण्यावरु ब्राह्मणेत्तर चळवळीला हिन लेखायचा किंवा ख-या महितीच्या अभावी त्याला ही चळवळ नेमकी काय आहे ते केंव्हा कळलेच नाही. पण या वेळेस बाबासाहेबानी लंडन मधेच याला गाठलं अन सगळी हकिकत सांगितली. तेंव्हाकुठे या भारतमंत्र्याला ब्राह्मणेत्तर चळवळ म्हणजे नेमक काय आहे ते कळल. आता मॉंटिगो आपल्या चळवळीला अनुकुल झाला याची खात्री झाल्यावर ३ फेब्रुवारी १९२१ रोजी बाबासाहेबानी हि बातमी छत्रपती शाहु महाराजाना कळविण्यासाठी एक पत्र लिहले. आपण मॉंटिगुचे ह्रुदयपरिवर्तन केले असुन ते या पुढे आपल्या चळवळीला विरोध करणार नाही,किंबहुन वेळ प्रसंगी आपल्याला आधार देतील असे कळविले...



-Adv: एम डी रामटेके...✍️
-----------------------------------------------------------------------


3】डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (मायदेशी परतले)



आता भीमराव आंबेडकर हे विद्यापिठात सर्वांच्या परिचयाचं झालं होतं. याच दरम्यान लाला लचपतराय यांच्याशी विद्यार्थी भीमरावाची ओळख झाली. लालाने भीमरावा राजकीय लढयात ओढण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाबासाहेबानी वेगळ्या ध्येयानी प्रेरीत असल्याचं स्पष्ट केलं. तुमच्यावर फक्त एकच गुलामगिरी आहे ती म्हणजे इंग्रजांची, पण आमच्यावर दोन गुलामगि-या आहेत. एक इंग्रजांची दुसरी तुमची. आता प्रश्न हा आहे की आम्ही लढा उभारायचा तर नेमकं कुढल्या गुलामगिरीच्या विरोधात आधी उभारायचा? या प्रश्नावर लाला लचपत राय निरुत्तर झाले. भारतातील परिस्थीती त्याना चांगल्या प्रकारे माहित होती.
अमेरीकेतील दोन घटनांचा बाबासाहेबांवर अत्यंत प्रभाव पडला
१)       अमेरीकेतील राज्यघटनेतील गुलामगिरी नष्ट करणारी १४ घटना दुरुस्ती.
२)      नीग्रोंचा उद्धारकर्ता बुकरी टी. वॉशिंग्टन यांचा मृत्यु.
येथील अभ्यासक्रपुर्ण झाल्यावर अन एम. ए. ची पदवी प्राप्त करुन जुलै १९१६ मधे अमेरीका सोडली. पुढे लंडनला जाऊन अर्थशास्त्र व कायदा विषयाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. करार वाढवुन पाहिजे होता. महाराजांकडे तशी परवानगी मागितली. महाराजानी परवानगी दिल्यावर बाबासाहेब पुढील अभ्यासासाठी थेट लंडनला गेले. कायद्याच्या अभ्यासासाठी “ग्रेज ईन” मधे प्रवेश मिळविला. सोबतच London School of Economics & Political Science या संस्थेत अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळविला. बाबासाहेबांची अर्थशास्त्र या विषयावर एवढी पकड होती की तिथला प्राध्यापकवृंद या ज्ञानाच्या तेजाने थक्क झाला. असा विध्यार्थी लाभल्यामुळे ते स्वत:ला धन्य मानु लागले. बाबासाहेबांच्या ज्ञानाची खोली जाणुन प्रध्यापक वृदांनी त्याना एक परिक्षेत न बसण्याची सवलत दिली. त्याना थेट दुस-या परिक्षेसाठी पात्र ठरविले. हा गो-यांच्या भुमीत एका अस्पृश्याच्या विद्वत्तेचा हा सन्मान होता. जे गोरे भटा बामणानाही bloody black म्हणुन हिनवित असत त्याच बामणांनी सदैव मानहानी केलेल्या समाजाती एका पिढीत व शोषित विद्वानाचा हा जाहिर सन्मान होता. एकंदरीत सगळं मनासारखं झालं. आता अभ्यासाला सुरुवात झाली. बाबासाहेबांची बरीच काम पडलेली होते. ध्येयानी झपाटलेली माणसं मिळेल त्या परिस्थीतीत ध्येयाच्या दिशेनी सर्वस्व झोकुन देतात. बाबासाहेबानी जोमानी अभ्यासाला सुरुवात केली. मात्र एवढ्या सुरळीत सगळं चालने म्हणजेच संकंटाची नांदी होती. बाबासाहेबांचं आयुष्य नुसतं संकंटानी भरलेलं होतं. थोडं काही चांगलं झालं की संकट यायचाच, यावेळेसही संकट उभा ठाकला.
लंडनपासुन हजारो मैल दुर बडोदे सरकारमधे उच्च पदस्थ अधिका-यांमधे बराच बदल घडत होता. या सगळ्या धामधुमीत जुने दिवाण जाऊन मनुभाई मेहता नावाचा नविन दिवाण नियुक्त होतो. मनुभाईनी राज्याच्या कारभारात ईतर मोठे काम करण्यापेक्षा एका दलितावर घसरण्याचा निचपणा केला. त्यानी बाबासाहेबाना परत येण्याचे आदेश दिले. शिष्यवृत्तीचा कालावधी संपला असुन आता यापुढे १० वर्षे ठरलेल्या करारा प्रमाणे बडोदे सरकारकडे नोकरी करण्यास हाजर व्हावे असा आदेश येताच बाबासाहेब हादरुन जातात. खरतंर बाबासाहेबानी महाराजांची परवानगी घेऊन हा कालावधी वाढवुन घेतला होता. पण कागदोपत्री जो करार होता त्याच्या आधारे मनुभाईन हा मनुवाद केला होता. आता सगळं सोडुन भारतात परतण्याचं संकट कोसळलं होतं. उपाय नव्हता. बाबासाहेबानी पुढील ४ वर्षात हा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी परत येण्याच्या अटीवर विद्यापिठाकडुन परवानगी मिळविली अन शिक्षण अर्धवट सोडुन २१ ऑगष्ट १९१७ रोजी भारतात परतले.
बाबासाहेबांच्या अमेरीकेतील शैक्षणीक यशाचं कौतुक म्हणुन त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. रावबहाद्दुर चिमणलाल सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आखण्यात आला. बाबासाहेबांच्या या यशाचं सन्मान म्हणुन त्याना मानपत्र देण्याचं ठरलं. पण अमेरीकेतील वास्तव्यात बाबासाहेबानी एक से बढकर एक दिग्गज बघितले. महान विद्वानांची बैठक लाभल्यावर त्याना स्वत:चं अस कौतुक करुन घेणे आवडलं नसावं. त्यानी हे मानपत्र घेण्यास साफ नकार दिला. ते या कार्यक्रमालाच गेले नाहीत.
आता कराराप्रमाणे बडोदे सरकारमधे नोकरीस हजर राहणे क्रमप्राप्त होते. सप्टेबर १९१७ च्या दुस-या आठवड्यात बाबासाहेब बडोद्यास पोहचले. बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाडानी बाबासाहेबांच स्टेशनवर स्वागत करण्याचे आदेश दिले होते. पण महाराचं स्वागत करणार तरी कोण? जेंव्हा बाबासाहेब बडोद्यास पोहचतात तेंव्हा स्टेशनवर त्याना घेण्यासाठी कुणीच आलेलं नव्हतं. उलट त्यांच्या येण्याची खबर फैलली अन लोकानी या महारांला वाळीत टाकण्याचा पवित्रा घेतला. जातिने महार असल्यामुळे रहायला जागा मिळेना, कुठल्याही खानावळात त्याना जेवन मिळत नसे. ज्या मानसाचा आत्ता काही दिवसापुर्वी लंडन विद्यापिठाने अन अमेरीकेने एवढा मान सन्मान केला अशा विद्वानाचा ईथे सडक्या मनुवाद्यानी इतक्या हिन दर्जाला जाऊन अपमान चालविला. तरी बाबासाहेब न डगमगता खंबिरपणे उभे राहण्याचे अनेक प्रयत्न करत होतेच. कुठेच राहण्याची व खाण्याची सोय होत नाही हे लक्षात आल्यावर बाबासाहेबानी पारशी वसतीगृहात जागा मिळविली. पण आता पर्यंत पदरी आलेला अनुभव बघता ईथेही त्याना प्रवेश नाकारल्या जाणार याची जाण असल्यामुळे त्यानी ईथे चक्क खोटं बोलावं लागलं. त्यानी आपली जात न सांगताच ईथे प्रवेश मिळवील. उच्च विद्याविभुषित असल्यामुळे कोणी जात विचारलिही नसावी. पण काही दिवस जाताच पारशी लोकांच्या कानावर आले की त्यांच्या वसतीगृहात एक अस्पृश्य राहतो आहे. मग मात्र पारशी लोकांचं डोकं पेटलं. लोकांचा मोठा घोडका बाबासाहेबांवर चालुन गेला. बाबासाहेबांची यथेच्छ मानहानी करुन हाकलुन लावले. यावेळेस बाबासाहेबानी हात जोडुन अनेव विनवन्या केल्या व ८ तासाची महुलत मागुन घेतली. पण पुढच्या ८ तासात कुठेच सोय न झाल्यामुळे आपला सामान घेऊन बाहेर पडले. एका झाडाखाली रात्र काढली. दुस-या दिवशी मुन्शीना भेटुन काही सोय होईल का याची चौकशी केली पण कुठे काहीच होईना. महाराजाना भेटायचे होते पण महाराज म्हैसुरला जाण्याच्या तयारीत असल्यामुळे भेट घेता आली नाही. शेवटी कुठेच काहीच सोय झाली नाही अन नाईलाजाने व दु:खी अवस्थेत मुंबईस परतले.
हा सगळा प्रकार ऐकुन केळूस्कर गुरुजी फार दु:खी झाले. त्यानी महाराजाना पत्र लिहुन बरीच खटाटोप केली पण काहीच हाती आलं नाही. याच दरम्यान श्री. सयाजीराजे गायकवाड यांचे वडिल बंधु आनंदराव यांचे निधन झाले. महाराजांच्या जबाबदा-या वाढल्या अन त्या सगळ्या घाईगडबडीत महाराज व्यस्त झाले.  डिसेंबर १९१७ च्या अखेरीस महाराज म्हैसुरहुन मुंबईला येतात अन फेब्रुवारी १९१८ पर्यंत ईथेच वास्तव्य होता. पण एकंदरीत परिस्थीती बघता बाबासाहेबाना महाराजांची भेट घेता आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. घरातील मोठ्या भावाच्या मृत्युमुळे महाराज दु:खी अन व्यस्त होते.
दिवाण मनुभाईनी मात्र पाय ओढण्याच्या व्यतिरीक्त काहीच केले नाही. केळूस्कर गुरुजीने बडोद्यातील एका प्राध्यपक मित्राशी बोलुन राहण्याची सोय करण्याची विनंती केली. सुरुवातील त्यानी होकार दिला. बाबासाहेब बडोद्याला निघुन गेले. पण तिथे गेल्यावर त्या प्राध्यापकाने बायकोचा विरोध असल्यामुळे ही मदत नाकारली. मग बाबासाहेबानी स्वत: सगळ्याना भेटुन कुठे राहण्याची व जेवणाची सोय होते का, यासाठी बरेच प्रयत्न केले. पण कुठेच यश न आल्यामुळे एक महान विद्वान आज जातियवादाचे चटके खाऊन खिन्न मनाने मुंबईची वाट धरली अन बडोदे सरकारला कायमचा जयभिम ठोकला. याच दरम्यान त्यांची सावत्र आई वारली. बाबासाहेबानी सगळा विधी पार पाडला.
याच दरम्यान अस्पृश्य निवारनाच्या दिशेनी मुंबईत एक अत्यंत महत्वाची घटना घडली. १९ मार्च १९१८ ला मुंबईत “अखिल भारतिय अस्पृश्य निवारण परिषद” भरविण्यात आली. या परिषदेचे सुत्रधार कर्मवीर शिंदे अन अध्यक्ष होते बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाड. महाराजानी आपल्या भाषणात काही मुख्य गोष्टी सांगितल्या त्या या प्रमाणे, “ जातीचा चिरकाल टिकाव अशक्य आहे, जाती मानव निर्मीत आहेत. हे असच चालल्यास पुढे ख्रिश्चन धर्म याचा फायद उठवेल. धर्मांतराचा फार मोठा धोका निर्माण होईल. व्यवहारीक सुधारणांची गरज आहे. अन्यथा एक दिवस आपल्या धर्मात मोठी फुट पडेल” अशा आशयाचं भाषण देऊन महाराजानी जातीपातीचा नायनाट करण्यास आवाहन केलं.
परिषदेच्या दुस-या दिवशी टिळक नावाचा एक भट पुण्याहुन परिषदेस आला. खरंतर या भटाची काहिच गरज नव्हती पण त्याचा खरा चेहरा लोकाना कळावा या साठी त्याला पाचारण करण्यात आले. याचं नाव बाळगंगाधर, हा एक अत्यंत जातियवादी माणुस. सदैव ब्राह्मणाच्या हिताचं व दलितांच्या अहिताचं चिंतन्यात आयुष्य गेलेलं. या इसमाने भाषणात म्हटलं, “ अस्पृश्य वर्गाचा प्रश्न सामाजीक व राजकीय दृष्ट्या निकाली काढला पाहिजे. ब्राह्मण क्षत्रीय आणि वैश्य याना जे जे अधिकार आहेत ते शुद्रानाही आहेत. मात्र शुद्रानी वैदिक मंत्र म्हणु नये. जातियवाद हे पुर्वीच्या ब्राह्मणानी चालु केलेली प्रथा आहे हे मी मान्य करतो.” असे एकंदरीत दुतोंडी व ब्राह्मणी हरामखोरी करणारा हा टिळक ईथे एवढे बोलुन थांबला नाही, त्यानी आजुन एक अत्यंत हिणकस कृत्य केलं.
परिषदेच्या शेवटी सर्व पुढा-याच्या सहिने एक जाहिरनामा काढण्यात आला. त्या जाहिरनाम्यात सही करणा-या पुढा-यानी वयक्तिक जीवनात अस्पृश्यता पाडनार नाही अशी प्रतिज्ञा करायची होती. टिळकानी या जाहिरनाम्यावर सही करण्यास स्पष्ट नकार दिला. कारण त्याला अस्पृश्यता हवी होती. त्याला ब्राह्मणांचं वर्चस्व हवं होतं. त्याला दलितांचा विकास नको होता. दलितानी माणुस म्हणुन जगावं हे या टिळक नावाच्या भटुरड्याला मान्य नव्हते. म्हणुन त्यानी जाहिरपणे ईथे अस्पृश्यनिवारणाच्य जाहिरनाम्यावर सही करण्यास नकार दिला. केवढा हा दृष्टपणा.
अन मुंबईत १९१८ च्या सुरुवातीला जेंव्हा हे सगळं घडत होतं तेंव्हा आंबेडकर नावाचा तारा आजुनतरी राजकीय नभात उगवायचा होता. तो आज क्षितीजाच्या उंबरठ्यावर उभा होता. तारा ते महासुर्य असा एकंदरीत प्रवास करणारा हा विद्वान बडोदयातील जातीयवादाच्या चटक्यानी ज्या जखमा दिलेल्या होत्या त्यातुन सावरण्याचा प्रयत्न करत होता...

-Adv: एम डी रामटेके....✍️
-------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!