संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान...!!!

1】 संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान...!!

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात ऊभारले गेलेले सर्वात मोठे आंदोलन होते. मुंबई, बेळगाव, कारवार, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरली होती. हा इतिहास सांगताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांचा ऊल्लेख नेहमीच केला जातो पण तसे करताना त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व आंबेडकरी चळवळीचे योगदानाची दखल मात्र ठळकपणे घेतली जात नाही हे कटू असले तरी सत्य आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे योगदान समुजन घेण्यासाठी या आंदोलनाची पार्श्वभुमी समजून घेणे आवश्यक आहे.

स्वतंत्र भाषावर प्रातरचनेसाठी देशाच्या विविध भागतून मागण्या वाढत चालल्या होत्या. भारताच्या विविध प्रांतांतून होणा-या भाषवार प्रांतरचनेच्या मागणीव्या दबावाखाली कॉग्रेसने राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद सिंह सहीने १७ जुन १९४८ रोजी धार कमिशनची स्थापना केली. भाषावार प्रांतरचना करावी की नाही हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी धार कमिशनवर होती. अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश एस.के.धार या कमिशनचे अध्यक्ष होते तर जयंत नारायण लाल हे संविधान सभेचे सदस्य व पन्ना लाल हे निवृत्त सनदी अधिकारी या कमिशनचे सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९४८ धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेला पाठिंबा देणारे निवेदन सादर केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही औपचारिक सुरवात म्हणता येईल. १० डिसेंबर १९४८ रोजी या कमिशनने सादर केलेल्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला नकार देत भौगोलिक सलगता, आर्थिक सक्षमता व प्रशासकिय सोयीच्या आधारे प्रांत रचना करण्याची शिफारस केली. त्यानंतर धार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस सरकारने जेपीव्ही कमिशन स्थापन केले. या कमिशन मधे खुद्द देशाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष पट्टाभी सितारमय्या या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या कमिशनने धार कमिशनच्या अहवालाचा अभ्यास करुन सध्याची वेळ भाषावार प्रांतरचनेस योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला.

पण दक्षिण भारतात स्वंतंत्र तेलगू राज्याच्या स्थापनेसाठी आंदोलन पेटत होते. १९५२ साली पोट्टी श्रीरामालू या आंदोलकाच्या ऊपोषणात झालेल्या मृत्युनंतर हे आंदोलन अधिक ऊग्र झाले. परिणामी १९५३ साली नेहरु सरकारने आंध्रपदेश राज्याच्या मागणीला मान्यता दिली. यानंतर देशाच्या विविध भारातातुन भाषावर प्रांताच्या मागणीने जोर धरला. २८ सप्टेंबर १९५३ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषदेने स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेला पाठिंबा मिळविण्यासाठी विदर्भातील नेत्यांशी सशर्त “नागपुर करार” केला. २२ डिसेंबर १९५३ रोजी नेहरु सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. निवृत्त सरन्यायाधिश फाजल अली या आयोगाचे अध्यक्ष होते तर ह्रद्यनाथ कुंजरु आणि के.एम.पण्णीकर हे या आयोगाचे इतर दोन सदस्य होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतर भाषिक समित्यांनी या फाजल आयोगसमोर साक्षी दिल्या. या फाजल आयोगाने १० ऑक्टोबर १९५५ रोजी आपला अहवाल सादर केला. १४ डिसेंबर १९५५ रोजी लोकसभेत सादर केला. या अहवालाने सुद्धा देशाची अखंडता कायम राखण्यासाठी केवळ भाषिक किंवा सांस्कृतिक या कोणत्याही एका तत्वावर प्रांत रचनेस नकार दिला. पण दुसरीकडे हिमाचल, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांच्या निर्मितीची शिफारस केली. हैदराबाद व विदर्भ स्वतंत्र ठेउन गुजराती व मराठी भाषिकांचे द्वीभाषिक राज्य स्थापन करण्याची शिफारस केली. तसेच मुंबई प्रांतात असलेला दक्षिणेतील बेळगाव, निपाणी, चिकोडी, खानापुर, कारवार, धारवाड हा मराठी भाषिक प्रांत मैसुर(कर्नाटक) प्रांताला जोडण्याची शिफारस केली आला. या अहवालाच्या शिफारसी स्वीकारून मराठी भाषिकांच्या संतापाकडे दुर्लक्ष करत नेहरू सरकारकडून मुंबई ही राजधानी ठेऊन गुजराती व मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य शेवटी स्थापन करण्यात आले. याच अन्यायातुन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा पुढील ईतिहास सर्वांना माहीत आहे. त्यावर प्रसिद्धी माध्यमात बरीच चर्चा होते पण या आंदोलनात आंबेडकरी चळवळीने दिलेल्या योगदानावर मात्र फारशी चर्चा होत नाही. वस्तुत: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीने व तत्कालिन रिपब्लिकन पक्षाने फार निर्णायक भुमिका बजावली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष असताना भाषिक प्रांत आयोगाला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची मागणी करणारे निवेदन दिले होते. ते निवेदन Maharashtra as linguistic state म्हणून प्रकाशित केले तसेच Thoughts on linguistic states या ग्रंथातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याबाबत अतिशय तर्कशुद्ध आणि मुद्देसूद मांडणी बाबासाहेबांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची मागणी केल्यानंतर मुंबई गुजरातला जोडावी म्हणून वर्तमान इंग्रजी पत्रातून काही गुजराती मंडळींकडून केल्या जाणाऱ्या लेखांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर वकिली प्रत्युत्तराने खोडून काढत असत. महाराष्ट्राचे स्वतंत्र्य राज्य निर्माण न होण्यामागे मुंबई हे महत्वाचे कारण होते. गुजराती, पारशी व्यापारी व भांडवलदारांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता. मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्राशासीत करावे असा काँग्रेस व गुजराती भांडवलंदारांचा मनसुबा होता. पण मुंबईवर गुजराती भाषिकांचे वर्चस्व असावे म्हणून गुजरात व महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य स्थापन करण्याचा मार्ग स्विकारण्यात आले. या द्विभाषिक राज्यात मराठी भाषिक लोकप्रतिनिधींची संख्या कमी करण्यासाठी म्हणून बेळगाव, कारवार, निपाणी, चिकोडी, खानापूर सह मोठा मराठी भाषिक प्रांत वेगळा करुन कर्नाटकला जोडण्यात आला. विदर्भाचा काही प्रांत मध्यप्रदेशाला जोडण्यात आला. या गोष्टीचा खुलासा बाबासाहेबांनी Thoughts on linguistic state या ग्रंथात केला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरवात करण्याआधी सयुंक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे, एस.एस. जोशी, आचार्य अत्रे वगैरे मंडळी बाबासाहेबांना दिल्लीला निवासस्थानी जाऊन भेटले होते. मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची रणभुमी होती. या रणभुमीत बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती. दिल्लीला हादरा बसेल असे आंदोलन मुंबईत करायचे असेल तर कामगारांसह बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा या आंदोलनात उतरणे आवश्यक आहे हे स.म. समितीला ठाऊक होते. कारण शिस्तबद्ध आंबेडकरी कार्यकर्ता हा संगठीत होता शिवाय रस्त्यावरील लढाईसाठी अतिशय महत्वाचा होता. या भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठींबा दिला होता. “माझा शेकाफे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचे खडका सारखा खंबीर पणे उभा राहील” असे आश्वासन बाबासाहेबानी सं.म. समितीला दिले होते. त्यानंतर बाबासाहेब मुंबईत परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत. एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेतेमंडळी हजर असत. बाबासाहेबांनी समितीला दिलेला शब्द खरा करून दाखवला. आंबेडकरी नेते, कार्यकते आणि सामान्य जनता मोठ्या प्रमाणात जीवावर उदार होऊन या आंदोलनात उतरली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राला दिलेला पाठिंबा केवळ ते महाराष्ट्रात, मराठी कुटुंबात जन्माला आले यासाठी नव्हता तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी न्यायाची होती याचसाठी होता.

बाबासाहेबांच्या हयातीत आणि नंतर सुद्धा संपूर्ण आंबेडकरवादी नेतृत्वफळी, कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरली होते. दादासाहेब गायकवाड, भैय्यासाहेब आंबेडकर, बॅ. बी.सी. कांबळे यांच्यासह अनेक आंबेडकरवादी नेते या लढ्यात उतरले होते. दादासाहेबांनी आपल्या रांगड्या वक्तृत्वाने आणि संगठनशक्तीच्या बळावर आंबेडकरवादी समूह कामागरांच्या सोबतीला मुंबईच्या रस्त्यावर उतरवला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि काँग्रेस सरकारला दादासाहेबांच्या भाषणांची धडकी भरली होती. दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आग पसरवण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता. ते आपल्या रांगड्या पण सर्वसामान्यांच्या मनाला साद घालणाऱ्या भाषेत मोरारजी देसाई, काँग्रेस आणि संयुक्त मराष्ट्राच्या विरोधकांना सोलून काढीत असत. त्यांच्या प्रखर वक्तृत्वामुळे आंबेडकरवादी आणि त्यांना मानणारा भूमिहीन मजूर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरला. मुंबईत झालेला संयुक्त महाराष्ट्र समितीचा न भूतो न भविष्यती असा मोर्चा यशस्वी करण्यात दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाचा फार मोठा वाटा होता याकडे कायम दुर्लक्ष केले जाते.

दुसरीकडे बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवाई बाबत वारंवार प्रश्न विचारून मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना हैराण केले होते. समितीच्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी अत्याचाराचा जाब बॅरिस्टर बी.सी. कांबळे विधानसभेत सरकारला विचारात असत. उत्तरादाखल मोरारजींनी दिलेल्या पोलिसी कारवाई व जखमींच्या माहितीच्या जबाबाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मुख्य बातम्या बनत आणि त्यातून हे आंदोलन अधिक पेट घेत असे. मोरारजींनी बॅ. बी.सी. कांबळे यांना उत्तर देण्यासाठी सभागृहात इतक्यावेळ उठावे-बसावे लागे कि विधानसभेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना बॅ. बी.सी कांबळे हे मोरारजी देसाईंना जणू उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहेत असे वाटे. पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी होऊन संयुक्त महाराष्ट्राचा कलश कलश मुंबईत आणण्यात आला. शिवाजी पार्कवर त्या कलशाचे स्वागत करण्यासाठी जंगी सभा भरवण्यात आली. विचारपीठावरून समितीचा जो तो नेता यशवंतराव चव्हाण यांचे कौतुक करत होता. जेव्हा शेवटी दादासाहेब गायकवाड यांची भाषण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे बजावले कि “संयुक्त महाराष्ट्राची खरी आई केवळ संयुक्त महाराष्ट्र् समिती आहे. यशवंतराव चव्हाण यांनी फक्त दाईचे काम केले आहे.”

आपल्या एकजुटीच्या बळावर त्याकाळी आरपीआयचे लोकसभेत ९ खासदार व महाराष्ट्र विधानसभेत १३ आमदार निवडून होते. १९६० साली पी.टी. बोराळे हे बौद्ध समाजातील पहिले महापौर मुंबईला लाभले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीच्या योगदानाकडे कितीही दुर्लक्ष केले तरी नव्या पिढीपर्यंत या गौरवशाली इतिहासाची माहीती पोहचत आहे आणि त्यातुनच आंबेडकरी चळवळ केवळ शोषित वंचित समुहांच्या हक्कांपु्रती मर्यादीत नव्हते तर या चळवळीने भूमीहिनांचे लढे सुद्धा लढले आहेत आणि संयुक्त महाराष्ट्रासारख्या न्याय्य आंदोलनात सुद्धा निर्णायकी भूमिका बजावली आहे हा इतिहास सर्वांसमोर येत आहे ही आनंदाची बाब आहे.

- Article by-Sakya Nitin...✍️

प्रबुध्द भारत. 1 मे 2021

---------------------------------------------------------------------------------------------



2】 संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर..... !!


आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज 'महाराष्ट्रदिन' साजरा होत  आहे." मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे " या मागणीतून ' संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला' हे निर्भेळ यश मिळाले.कॉ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे… आणि अश्या बऱ्याच  जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले.पण आज संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगितला जात असताना केवळ डांगे, अत्रे आणि जोशी यांच्याच नावाचा गवगवा केला जातो. त्यांचे योगदान कुणीही नाकारत नाही, पण त्यांच्यासोबतच काम करणाऱ्या ''शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'च्या दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे…. इत्यादी मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो. आणि त्यापेक्षाही वाईट याचे वाटते कि जो हा 'संयुक्त महाराष्ट्राचा लढा' ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात लढला गेला त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कुणीही करत नाही याचा !!संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरु असताना प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे यांना या लढ्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हा लढा यशस्वी झाला त्या डॉ. आंबेडकरांचे स्मरण केल्याशिवाय मी तरी ' महाराष्ट्र दिन ' साजरा करत नाही.बाबासाहेबांच्या दादर, मुंबई येथील 'राजगृह' या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची दिशा कशी असावी याचे मार्गदर्शन स्वतः बाबासाहेबांनी प्र. के. अत्रे, डांगे, प्रबोधनकार या मंडळींना केलेले आहे. या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी 'मराठा' या वृत्तपत्रातून प्र. के. अत्रे जसे रान उठवत होते, त्याप्रमाणेच डॉ. आंबेडकर आपल्या 'जनता' मधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत होते.याच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढे दादासाहेब गायकवाड यांनी शोषित-वंचित-कष्टकरी मराठी जनांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता.संयुक्त महाराष्ट्र आंदोलन मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी महाराष्ट्राला न देण्यासाठी मुंबईतील भांडवलदार, ज्यात जास्त अमराठी होते त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात केली. आणि त्याचवेळेस " मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे " या मागणीनेही जोर पकडला. त्याचवेळेस बाबासाहेबांनी ७ जाने. १९५६ ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला.मुंबईवर हक्क कुणाचा ??मुंबई हि राज्याची अस्मिता आहे हे सर्वजण मान्य करत होते, पण ती का व कशी ? याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नव्हते. त्यावर बाबासाहेब म्हणतात--" मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी ! जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क  का पोहचू शकत नाही ? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ १५ % , पण ५० % हून अधिक असलेल्या   महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता ? मुळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली व कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटीश राजा-दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती. "

【Ref:डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड-१०, पृष्ठ क्र. ८५】
-----------------------------------------------------------------------------------------------



3】मुंबई_महाराष्ट्रातच_का_राहिली_पाहिजे...? 

 
यासंबंधी केलेले प्रभावी आणि परखड विवेचन,भाषावार प्रांतरचना करताना "मुंबई" महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद तत्कालीन विचारवंतांनी ( विशेषतः प्रोफेसर सी.एन.वकील,प्रा.दातवाला आणि प्रा.घीवाला यांनी केला होता,यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे? याचे सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन केले ते अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी (संदर्भ : महाराष्ट्र,एक भाषिक राज्य,बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर केलेले निवेदन) विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली सडेतोड आणि तर्कसंगत उत्तरे यांचा गोषवारा खालीलप्रमाणे...

आक्षेपः मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता 

बाबासाहेबांचे_उत्तर: महाराष्ट्र प्रांताच्या संदर्भात मुंबईचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे.महाराष्ट्र प्रांताची रचना झाल्यास तो आकाराने त्रिकोणी असेल,या त्रिकोणाची एक बाजू ही उत्तरेकडील दमण आणि दक्षिणेकडील कारवार यांमधील भारताची पश्चिम किनारपट्टी आहे. मुंबई शहर हे दमण आणि कारवारच्या मध्यावर पडते. गुजरात प्रांत दमणपासून पुढे उत्तरेकडे पसरतो. कन्नड प्रांत कारवारपासून पुढे दक्षिणेकडे पसरतो,जर दमण आणि कारवारमधील अखंड प्रदेश भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा भाग ठरतो तर फक्त मुंबईच महाराष्ट्राचा भाग का बरे होऊ शकत नाही ? ही निर्विवाद नैसर्गिक वस्तुस्थिती आहे. भूगोलाने मुंबईला महाराष्ट्राचा हिस्सा ठरविले आहे.जे या नैसर्गिक तथ्यालाच आव्हान देऊ इच्छितात त्यांना ते करु द्यावे मात्र निःपक्षपाती बुद्धी याच निष्कर्षात येते की मुंबई महाराष्ट्राचीच आहे.

आक्षेप: मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता.

बाबासाहेबांचे_उत्तर:- मराठ्यांनी मुंबईला आपल्या साम्राज्याचा एक भाग बनविण्याची पर्वा केली नाही, ही बाब भौगोलिकतेपासून काढलेल्या निष्कर्षाच्या वैधतेवर कोणताही परिणाम करीत नाही.मराठ्यांनी मुंबई जिंकुन घेण्याविषयी गांभीर्य दाखविले नाही यावरुन मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही असे सिद्ध होत नाही.याचा अर्थ एवढाच होतो की, मराठेशाही ही भुमीवरील सत्ता होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांचे बळ बंदर जिंकून घेण्यासाठी साठी वापरले नाही.

आक्षेप : मुंबई शहराच्या लोकसंख्येत मराठी भाषक "मेजॉरिटी" ने नाहीत.

बाबासाहेबांचे_उत्तर : भारताच्या सर्व भागांतील लोकांना जर मुंबईत येण्याची आणि स्थायिक होण्याची मुभा आहे तर त्याची शिक्षा महाराष्ट्रीयांनी का भोगावी? हा त्यांचा दोष नाही,म्हणूनच आजच्या लोकसंख्येची वस्तुस्थिती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आधारभूत ठरु शकत नाही.

आक्षेप : गुजराती हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत.

बाबासाहेबांचे_उत्तर : गुजराती मंडळी आपणहून मुंबईत आली नाहीत.ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना व्यापारी अडते दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले गेले. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या अधिकाऱ्यांची पहिली फॅक्टरी सुरतमध्ये होती, त्यांना त्यांचा धंदा चालविण्यासाठी, दलाल म्हणून सुरती बनियांची गरज होती. गुजरात्यांच्या मुंबई वास्तव्याचे हे स्पष्टीकरण आहे. दुसरे असे की,अन्य व्यापाऱ्यांशी तुल्यबळ स्पर्धा करीत स्वतंत्र व्यापार करण्यासाठी गुजराती मुंबईत आले नाहीत. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना दिलेल्या काही विशेष व्यापारी हक्कांचा फायदा घेऊन आलेली ही मंडळी होती.

आक्षेप:-मुंबई हे महाराष्ट्राबाहेरील फार मोठ्या प्रदेशाचे व्यापारी केंद्र आहे म्हणून मुंबईवर महाराष्ट्राला हक्क सांगता येणार नाही. मुंबई ही पूर्ण देशाची आहे.

बाबासाहेबांचे_उत्तर:- मुंबई संपूर्ण भारताची बाजारपेठ आहे हे स्वीकारता येईल,मात्र त्यामुळे महाराष्ट्र मुंबईवर हक्क सांगू शकत नाही, हे म्हणणे समजून घेणे अवघड आहे. कोणतेही बंदर ते ज्या देशाचे असते त्यापलीकडे अधिक मोठ्या परिसराची सेवा बजावते. त्या बळावर कुणी असे म्हणू शकत नाही की,ज्या प्रदेशात ते बंदर आहे तो प्रदेश त्या बंदरावर आपला भूभाग म्हणून हक्क सांगू शकत नाही. तर मग मुंबईवर हक्क सांगण्यापासून महाराष्ट्राला का रोखता? केवळ एवढ्यासाठीच की बंदर म्हणून मुंबई महाराष्ट्राखेरीज इतरही प्रांतांची सेवा बजावते ? आता महाराष्ट्रेतरांसाठी हे बंदर बंद करण्याचा अधिकार महाराष्ट्राला असता तर गोष्ट वेगळी, असा अधिकार राज्यघटनेनुसार असणार नाही, परिणामतः मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याने महाराष्ट्रेतरांनी या बंदराचा वापर करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

आक्षेप:-मुंबईतील गुजराती भाषिकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योगधंदा उभा केला . महाराष्ट्रीय केवळ कारकून आणि हमाल राहिले. महाराष्ट्रीय नावाखाली येणाऱ्या या कामगार वर्गाच्या राजकीय वर्चस्वाखाली व्यापार-उद्योगाच्या मालकांना राहू द्यावे हे चुकीचे ठरेल.

बाबासाहेबांचे_उत्तर :-मुंबईचा व्यापार-उद्योग कोणी उभा केला? याबाबत फार मोठ्या संशोधनाची गरज नाही..मुंबईचा व्यापार-उद्योग गुजरात्यांकडून उभारला गेला या म्हणण्याला खरेतर काहीच आधार नाही, तो युरोपियनांकडून उभारला गेला,गुजरात्यांकडून नाही . गुजराती हे केवळ व्यापारी होते.हे उद्योगपती असण्यापेक्षा वेगळे आहे. व्यापार-उदीम गुजरात्यांच्या मालकीचा आहे हा युक्तिवाद मांडून मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही. गहाण ठेवून घेतलेल्या जमिनीवर कायमस्वरुपी बांधकाम केले आहे अशी सबब पुढे करुन गहाण ठेवणाऱ्याने जमिनीच्या परताव्यासाठी केलेली मागणी, गहाण ठेवून घेणारा धुडकावून लावू शकत नाही.बिहारमध्ये ज्या जमिनीत कोळसा सापडला ती जमीन बिहारी लोकांच्या मालकीची आहे . कोळशाचे मालक मात्र गुजराती,काठेवाडी आणि युरोपियन आहेत. तेथील बिहारी लोक गुजराती आणि काठेवाडी कोळसा मालकांबाबत भेदाभेद करण्याची शक्यता नाही काय? या गुजराती आणि काठेवाडी कोळसा उद्योजकांच्या हितार्थ बिहारचे कोळसा क्षेत्र बिहार प्रांतापासून वेगळे करुन स्वतंत्र प्रांत स्थापणार काय? 

आक्षेप :- महाराष्ट्राला मुंबई हवी, कारण मुंबईच्या भांडवली नफ्यावर महाराष्ट्राला गुजराण करावयाची आहे.

बाबासाहेबांचे_उत्तर :- महाराष्ट्रीयांना मुंबई हवी कारण ते मुंबईच्या नफ्यावर जगू इच्छितात हे म्हणणे चुकीचे तर आहेच, पण खरे म्हणजे हेतूबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आहे. अशा काही हेतुंनी महाराष्ट्रीय प्रेरित आहेत का हे मला ठाऊक नाही. हा काही व्यापारी समाज नाही,पैसा त्यांचा ईश्वर कधीच नव्हता, हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नव्हे. म्हणूनच तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर समाजांना महाराष्ट्राच्या व्यापार-उदिमाची मक्तेदारी घेण्यासाठी येऊ दिले,परंतु असा काही हेतू महाराष्ट्रीयांच्या मनात असेल असे जरी गृहीत धरले तर त्यांचे काय चुकले? मुंबईच्या नफ्यावर त्यांचा अधिक हक्क आहे हे स्पष्टच आहे, कारण मुंबईचा व्यापार-उदीम उभा करण्यासाठी अन्य प्रांतातील लोकांपेक्षा मजुरांचा पुरवठा करण्याबाबत त्यांचा सहभाग मोठा आहे व मोठा राहिल, दुसरे असे की, मुंबईचा नफा केवळ महाराष्ट्राकडून वापरला जात नाही तर संपूर्ण भारताकडून वापरला जातो. इन्कम टॅक्स, सुपरटॅक्स इत्यादी म्हणून जी संपत्ती मुंबई केंद्र सरकारला देते ती केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतासाठी वापरली जाते आणि सर्व प्रांतांना त्यातील वाटा मिळतो. मुंबईचा नफा संयुक्त प्रांत,बिहार,आसाम,ओरिसा, पश्चिम बंगाल,पूर्व पंजाब आणि मद्रासने गिळंकृत केला तर ते प्रोफेसर,वकीलांना चालतो. त्यांची हरकत कशाला तर महाराष्ट्राला त्यातील काही हिस्सा मिळणे याला. हा युक्तिवाद नव्हे तर,त्यांच्या महाराष्ट्रद्वेषाचे दर्शन आहे"

त्याच निवेदनात,अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, " मुंबईप्रमाणेच कलकत्ता ही संपूर्ण पूर्व भारताची बाजारपेठ आहे. मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यात बंगाली अल्पसंख्याक आहेत. मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यातील बंगालीही व्यापार उद्योगावे मालक नाहीत. कलकत्त्यातील बंगाल्यांची स्थिती तर मुंबईतील महाराष्ट्रीयांपेक्षा डळमळीत आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रीय किमान असा दावा करू शकतात की, त्यांनी मुंबईतील व्यापार-उद्योगांना भांडवल पुरवले नसले तरी कामगार पुरवले आहेत. बंगाली हेही म्हणू शकत नाहीत. मुंबई महाराष्ट्रापासून विलग करण्याचा आग्रही युक्तिवाद जर ( राज्य पुनर्रचना ) आयोगाने स्वीकारला तर त्याचबरोबर आयोगाला कलकत्ता पश्चिम बंगालपासून वेगळा करावा, अशी शिफारसही करावी लागेल. कारण ज्या कारणासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकते तेच कारण अस्तित्वात असताना कलकत्ता मात्र पश्चिम बंगालपासून वेगळा का केला जात नाही असा समर्पक प्रश्न विचारला जाऊ शकतो".महाराष्ट्र आणि मुंबई केवळ परस्परावलंबीच नाहीत तर अभिन्न आणि अतूट आहेत. त्यांचे विभाजन दोहोंसाठी घातक ठरु शकेल. मुंबईसाठीच्या वीजपाण्याचा स्त्रोत महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा बुद्धिजीवी वर्ग मुंबईत राहतो, महाराष्ट्रातून मुंबई वेगळी काढणे म्हणजे मुंबईचे आर्थिक जीवन डळमळीत करणे होय....

-अरविंद वाघमारे...✍️
---------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!