डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला...? व बौध्द पौर्णिमेबद्दल माहिती...!!!
1] डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला...?
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक, बौद्धधर्म प्रवर्तक व महान बोधीसत्व होते. तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरूत्थानक होते. एकेकाळी भारतातून लूप्त झालेला बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवीत केला. भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉ. आंबेडकरांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्म सोडायचाच होता, पण इतके सगळे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो. बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तो मानवतावादी आहे, त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला का?. तिची बीजं त्यांच्या मनात कशी रुजत गेली? बाबासाहेब हिंदू धर्माचे विरोधक नव्हते, तर सर्वश्रेष्ठ सुधारक होते. धर्माची सामाजिक उपयुक्ततेच्या संदर्भात चिकित्सा झाली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास केलेला होता. विशेषत: हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम व बौद्ध धर्माचा त्यांचा विशेष अभ्यास होता...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेंव्हा लक्षात आले की प्रस्थापित हिंदू धर्मात दलितांना बरोबरीचे स्थान मिळणे शक्य नाही, तेंव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा केली. पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही. आपल्या घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येवला येथील १९३५ मधील आपल्या भाषणाच्या अगोदरच १९२९ साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की 'तुम्हाला सन्मान देईल असा कोणताही धर्म स्वीकारायला हरकत नाही'...
१९३६ साली अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 'हे भाषण मी हिंदू म्हणून करणार असलेले शेवटचे भाषण असेल' असे बाबासाहेबांनी अगोदर जाहीर केले होते. त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा व पुतण्या या दोघांनाही हरमिंदर साहिब येथे पाठवले होते. हे दोघेही तेथे दीड महिन्यांहून जास्त काळ राहिले होते. जून १९३६ मध्ये बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते शीख मिशनच्या संपर्कात सतत राहू लागले. मुंबई येथे धर्मांतरीत शीख विद्यार्थ्यांसाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार झाला. बाबासाहेबांनी आपल्या १३ अनुयायांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले. याच काळात पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची तयारी दाखवली. यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार करणे हा होता...
धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांनी जैन धर्माचाही विचार केला होता. पण शीख धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते, तेवढे जैन धर्माबाबत नव्हते. धर्मांतराच्या बाबतीत त्यांनी प्रसिद्ध जैन आचार्य शांतीसागर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण शांतीसागर यांनी अशा प्रकारच्या धर्मांतरास नकार दिला. पण याच काळात दुसरे कांही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा प्रचार करत होते, आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता. विशेषत: मध्य प्रदेश, राजस्थान या भागात अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन मुनींच्या प्रयत्नामुळे कांही दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. पण बाबासाहेब जैन धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते असे दिसते...
बाबासाहेबांवर मुंजे, कुर्तकोटी शंकराचार्य वगैरेंच्या कडून आणि एकूणच हिंदू समाजाकडून धर्मांतराच्या बाबतीत खूप मोठे दडपण होते. बाबासाहेबांनी हिंदू धर्म अवश्य सोडावा, पण त्यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती हे धर्म स्वीकारू नयेत अशी त्यांची इच्छा होती. बाबासाहेबांचीही या दोन धर्मांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे भारतात जन्मलेले जैन, बौद्ध, शीख धर्म हेच त्यांचे पर्याय होते. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता. तिथे सुरवातीला त्यांचे स्वागत झाले होते, पण पुढे अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला. बहुधा असा अनुभव पुन्हा येवू नये म्हणूनच बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा...
अशा परिस्थितीत धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव पर्याय उरला होता. या धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्मात यायला त्यांना विरोध करायला, नकार द्यायला कोणीच शिल्लक नव्हते, कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे अस्तित्व जवळ जवळ नव्हतेच. डॉ. आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचेवर झालेल्या मानसिक व बौद्धिक विकासाची वाटचाल पाहिली तर भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली होती...
दादासाहेब केळुसकरांनी १८९८ साली प्रसिद्ध केलेले मराठीतील बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात अर्पण केले. १९१२ साली बी.ए. होईपर्यंत डॉ. बाबासाहेबांनी मुंबईतील सर्व ग्रंथालये पालथी घालून मॅक्समुलर, हॉगसन यांची गौतम बुद्धावरील पुस्तके, सर एडविन अर्नाल्ड यांचे ‘लाइट ऑफ एशिया’ हे बुद्धाचे काव्यमय चरित्र यांचे सूक्ष्म वाचन केले. पी. लक्ष्मी नरसू यांचे इसेन्स ऑफ बुद्धिझम हे पुस्तक १९०७ साली प्रसिद्ध झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक १९४८ साली पुन्हा प्रसिद्ध करताना म्हटले की, ‘‘हा ग्रंथ आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांत सर्वोत्कृष्ट आहे.’’ कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या एम.ए.च्या शोधनिबंधाचा विषय एन्शट इंडियन कॉमर्स होता. त्या निबंधात प्राचीन भारताच्या समृद्धीचे स्पष्टीकरण करताना त्यांनी बौद्ध धर्म ग्रंथांचे आधार सादर केले होते. बट्राँड रसेल यांच्या सामाजिक पुनर्घटनेची मूलतत्त्वे या पुस्तकांचे परीक्षण करताना डॉ. आंबेडकरांनी म्हटले हाते की, ‘‘प्रत्येक माणसाला स्पर्धा आवश्यक आहे. अडथळे, अडचणी पार करून विजय मिळविल्यामुळे त्याच्या अंतर्गत प्रवृत्ती-शक्ती कार्यप्रवण होतात. त्यातून त्याला आपण विकास करीत असल्याची जाणीव होत राहते.’’ हे विवेचन बौद्ध तत्त्वज्ञानाशी पूर्णत: सुसंगत आहे असे आढळून येते...
१९३३ साली गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुस्लीम आणि अन्य अल्पसंख्य वर्गाशी जवळचे संबंध प्रस्थापित केले असले तरी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा माझा विचार तर नाहीच, परंतु बुद्ध धर्माच्या स्वीकारासंबंधी मी विचार करीत आहे’ असे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते...
१९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात तोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले. म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार १९३६ पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून येते. २ मे १९५० रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे सूचित केले होते. एप्रिल-मे १९५०च्या महाबोधिमध्ये ‘बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ या लेखात डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘जग जर कोणता धर्म स्वीकारू शकेल तर तो बुद्ध धर्म होय’’. रॉयल एशियाटिक सोसायटीतील एका भाषणात त्यांनी ‘मला माझ्या बालपणापासून बुद्ध धर्माची आवड आहे’ असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्या वेळेस त्यांच्याबरोबर अन्य पुस्तकांबरोबर भगवान बुद्धावरील बरीचशी पुस्तके होती व ‘मी ही पुस्तके वारंवार वाचीत असे’ असे त्यानी नंतर नमूद करून ठेवले आहे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्माबद्दल आस्था आणि आशा होती. ते जरी निरीश्वरवादी असले तरी धर्माबद्दल सकारात्मक होते. व्यक्तीच्या आयुष्यात, विशेषत: गरीब व दु:खी व्यक्तींना संकटप्रसंगी धर्म जगण्यासाठी आशा देत असतो. म्हणून ते धर्म नाकारत नसून धर्माची कसोटी उपयुक्तता व न्याय यावर तपासतात. गांधीजींच्या भूमिकेला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात,
‘‘मनुष्यमात्राला धर्म आवश्यक आहे, हे गांधीजींचे म्हणणे मला मान्य आहे. परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या खऱ्या धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वत:च्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला स्फूर्तिप्रद होणारा व आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर वाटते, त्या नियमांचा अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच तिने त्याला चिकटून राहिले पाहिजे हा मात्र त्यांचा दंडक मुळीच कबूल नाही.. धर्मातर करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे. बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की नाही याची मला पर्वा नाही. तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना त्यात हित वाटत असेल तर ते माझे अनुकरण करतीलच.’’ त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा देऊन स्पष्ट केले की ‘‘थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मातर केले पाहिजे. तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल. त्यासाठी वेळ हा लागणारच आणि तेवढा वेळ मी थांबणार आहे.’’ डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही.’’
आपले धर्मातराविषयीचे ठाम मत विविध अंगांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. ते म्हणतात, ‘‘माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मातर करा. संघटन करावयाचे असेल तर धर्मातर करा. समता, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मातर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.’’ नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हटले की, ‘आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी ‘नाग’ नदी आहे. म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.’’ ‘मनुस्मृती’मध्ये चातुर्वण्र्य सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये समता नाही. हिंदू धर्माच्या विचित्र वर्णव्यवस्थेने सुधारणा होणे शक्य नाही. उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिख्खू होते. सागरात गेल्यावर जशा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, असे समतेने सांगणारा एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय,’’
डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले की.. ‘‘या देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.’ ‘देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. दु:खाने पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे.’’
बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी ते हिंदू धर्माची चिकित्सा करतात, कारण त्यांना धर्माच्या व्यक्तिगत आवश्यकतेपेक्षा किंवा व्यक्तिगत गरजेपेक्षा धर्माची सामाजिक उपयुक्तता महत्त्वाची वाटत होती. हिंदू धर्मानं व्यक्तीला आत्ममग्न करून टाकलं होतं. तो स्वत: पलीकडे बघायलाच तयार नव्हता. तेव्हा स्वत:च्या पलीकडे जाऊन बघणारा धर्म त्यांना हवा होता. या देशात हिंदू धर्मानं सामाजिक समता व न्यायाचं उत्तरदायित्वच नाकारलेलं होतं. त्यामुळेच अस्पृश्यता व वंचितता ही काहीच्या वाट्याला आलेली होती. ती नष्ट करणं व समता, स्वातंत्र्य, बंधता व न्याय प्रस्थापित करणं अपेक्षित होतं.
बाबासाहेबांनी पाश्चिमात्त्य देशात शिक्षण घेतल्यामुळे धर्माबद्दलच्या पारंपरिक धर्मसंकल्पना त्यांना मान्य नव्हत्या. ते म्हणतात, कोणताही धर्म पुढील कसोटीवर तपासून घेतला पाहिजे. जसं - नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच नवीन धर्मात काय स्वीकारावं हेही स्वातंत्र्य असलं पाहिजे. म्हणून तर त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्म नाकारून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांनी ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ त्यासाठीच लिहिला. बाबासाहेब व्यक्तीची सर्व बंधनातून मुक्तता, धर्माची सामाजिक उपयुक्तता व वैयक्तिक नीतिमत्ता या दृष्टीनं धर्माकडे पाहत होते...
बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जशास तसा स्वीकारलेला नाही, त्याचीही चिकित्सा केलेली होती. ते धर्माचे टीकात्मक विवेचन करतात. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम हे धर्म ईश्वरवादी आहेत. या धर्माचे संस्थापक स्वत:ला ईश्वराचे प्रेषित मानतात. ते व्यक्तीला आत्ममग्न करतात. सामाजिक नीतिमत्ता सांगून व्यक्तिगत स्वातंत्र्य बंदिस्त करतात. जैन धर्मात टोकाची अहिंसा सांगितलेली आहे. व्यवहाराच्या पातळीवर ही अहिंसा शक्य नाही. आंबेडकरांच्या मते, अहिंसा हे तत्त्व असावं, नियम असता कामा नये. म्हणून ते सम्यक, निरीश्वरवादी, विज्ञानवादी, कर्मवादी, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मानणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. त्यांच्या मते, बुद्ध हा मोक्षदाता नसून मार्गदाता आहे...
बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्मही चिकित्सा करून काही पातळीवर नवीन अर्थाच्या संदर्भात स्वीकारलेला आहे. ‘धर्मक्रांती’ करण्याची एकमेव ताकद बौद्ध धर्मात त्यांना आढळली. व्यक्तिगत, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व गुलामगिरीचे आधार बुद्ध नाकारतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही आधुनिक लोकशाहीला पूरक असलेली मूल्यं बौद्ध धर्मात आढळली म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांचं धर्म स्वीकारण्यामागचं प्रयोजन हे व्यक्तीला धार्मिक कर्मकांडापासून दूर ठेवून विज्ञान व नीतीतत्त्व याची सांगड घालणं, तसंच धर्माची सामाजिक उपयुक्तता किंवा संदर्भ त्यांना महत्त्वाचा वाटत होता...
बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याऐवजी बुद्धाला स्वीकारलं. त्यांनी पूर्णपणे जडवादी मार्क्स जरी नाकारला पण मार्क्स बुद्धाला समीप आहे, पण पर्याय नाही हेही सांगितलं. दोघंही दु:ख व शोषण मुक्तीचीच भाषा बोलतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्यं जगाला फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समजलेली असली, तरी त्यांना ती बुद्धानं सांगितलेल्या धम्म तत्त्वज्ञानात सापडलेली आहेत. ‘बुद्ध आणि मार्क्स’ या ग्रंथात आंबेडकर नमूद करतात की, फ्रेंच क्रांती समता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली, रशियन क्रांतीनं बंधुता व स्वातंत्र्याचा बळी देऊन समता स्थापण्याचा प्रयत्न केला, पण बौद्ध धम्मात मात्र स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तीन्ही मुल्यं एकत्र येतात. साम्यवादात या तिन्हींपैकी एक असेल, पण बौद्ध धम्मात तीनही एकत्र असतील...
बाबासाहेब बौद्ध धम्मातील महत्त्वाच्या संकल्पना नाकारत नाहीत, पण त्याचा पारंपरिक आशय बदलून वैज्ञानिक आशय स्वीकारतात. त्यांची धर्मांतरामागची अपेक्षा अशी होती की, सापेक्ष ईहवादी, धर्मनिरपेक्ष व कर्मकांडविरोधी असलेल्या बौद्ध धर्माच्या अनुसरणामधून दलितांना चिकटलेलं पिढीजात गौणत्व नष्ट होईल आणि आधुनिक दृष्टीनं जगाकडे पाहणं त्यांना शक्य होईल. परंतु आंबेडकरांचं हे स्वप्न त्यांच्या तथाकथित अनुयायांनी आणि दलित समाजाच्या मागास मानसिकतेनं पार धुळीस मिळवलेलं दिसतं. नव्या धर्मानं दलितांचं मानुषीकरण होण्याऐवजी त्या धर्माचं दलितीकरण व पारंपरिक आविष्करण घडून येत आहे...
बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना धर्मविरहित धम्म दिला. ते म्हणत, समाज धर्मासाठी नसून धर्म समाजासाठी आहे. म्हणून धर्माची सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून चिकित्सा झाली पाहिजे. बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की, जो धर्म असूनही ईश्वरवादी असणार नाही, आध्यात्मिक असूनही विज्ञाननिष्ठ असेल. त्याचा पाया ज्ञानाचा असेल, धर्म त्यांना तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायचा होता. आणि बौद्ध धर्म या सर्व बाबतीत इतर धर्मापेक्षा अधिक स्वीकार्य वाटला...
जातीचं वास्तव दुहेरी असतं. ते जेवढं भौतिक असतं तेवढंच मानसिकही असतं. सामाजिक-आर्थिक लढ्याच्या माध्यमातून कदाचित भौतिक वास्तव बदलता येईल. पण जातीचं मानसिक वास्तव जर बदलायचं झालं तर बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक मार्ग बाबासाहेबांना दिसत होता. बौद्ध धर्माच्या ध्वजाखाली सर्व शूद्रातिशूद्र जाती एकवटल्या तर त्यांच्या पृथक जातीय अस्मिता गळून पडतील आणि त्या सर्वांचा एक जातीविहीन वर्ग तयार होईल. म्हणजे त्यांना बौद्ध धम्म, धम्म-वर्ग मानसिकतेतून हवा होता. धम्म समाजपरिवर्तनासाठी त्यांना हवा होता. इहलौकिक जीवनाला व मानवी मूल्यांना महत्त्व देणारा एक अनिश्वरवादी व गतीशील धर्म म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची निवड केली होती. जातीमुक्त समाजच खऱ्या अर्थानं लोकशाही समाज असतो. कारण जातीय समाजात बहुसंख्याक जातीचं कायम बहुमत असल्यामुळे खरी लोकशाही तिथं नांदूच शकत नाही. बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांच्या जन्मभराच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणूनच त्याकडे पाहिलं पाहिजे...
बौद्ध धम्म हा जनवादी आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे, त्यानेच प्रथम दलित-शोषित जनसामान्यासाठी आपली कवाडं खुली केली. बौद्ध धम्म हा केवळ ‘जगात दु:ख आहे’ एवढं सांगून थांबत नाही, तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे ‘दु:खालाही कारण असतं’ आणि त्या कारणांचं निराकरण करून दु:खाचं निरसन करणं शक्य असतं, हा आशावाद तो माणसाला देतो. मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला तो वेसण घालत नाही. निवड स्वातंत्र्य व निवडीचे निकष तो पुरवतो. जे तर्काला व बुद्धीला पटेल तेच घ्यायचं आणि जे पटणार नाही ते सोडून द्यायचं, असं तो बजावतो...
बाबासाहेबांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारण्याचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी नवदीक्षितांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिला आहे...
आम्ही बौद्ध धर्मच का स्विकारला या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या भूमिकेचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात की, माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे. त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे. मनुष्यमात्र हा आशेवर जगत असतो. आशा ही श्रद्धेतून मिळते. श्रद्धा ही त्याच्या ठायी असलेल्या धर्मातून मिळते. येथे धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे. ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल. तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील. आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील. मला बुद्धाच्या धम्मामध्ये या साऱ्या गोष्टी आढळतात. मी बुद्धाचा स्विकार करून या देशावर एक प्रकारे उपकारच करत आहे. बुद्ध याच मातीतला. प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता. आम्ही त्याचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत. त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेले असेल...
डॉ.बाबाासाहेब आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण मला बौध्द धम्म का आवडतो...???
1】.मला दिलेल्या थोड्या वेळात मला दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.पहिला प्रश्न, "मला बुद्ध धम्म का आवडतो ?" आणि दुसरा प्रश्न, "वर्तमान स्थितीत तो जगाला कसा उपयोगी आहे ?"
२】 "मला बुद्ध धम्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धम्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो. तो करुणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करु शकत नाहीत.
3】जगात आणि विशेषतः दक्षिणपूर्व आशियाला आकर्षित करु शकणारी तिसरी गोष्ट बुद्ध धम्मात आहे. जगावर कार्ल मार्क्स आणि साम्यवाद, ज्याचा तो निर्माता आहे, यांचा जोरदार हल्ला झाला आहे. हे अत्यंत गंभीर असे आव्हान आहे. मार्क्सवाद आणि साम्यवाद हे ऐहिक विषयांशी संबंधित आहेत. त्यांनी सर्व राष्ट्रांच्या धार्मिक संस्थांचा पाया खिळखिळा केला आहे. ऐहिक व्यवस्थेशी जुळलेले नसताना सुद्धा धार्मिक व्यवस्थेसाठीही आज स्वाभाविक बाब आहे की, धार्मिक व्यवस्थेवरच लौकीक व्यवस्था अवलंबून असते, लौकीक व्यवस्था ही धर्माच्या आशेशिवाय अधिक काळ टिकू शकत नाही, ती किती दूर असली तरी.
4】दक्षिणपूर्व आशियातील बौद्ध राष्ट्रे साम्यवादाकडे वळल्यामुळे मी फारच आश्चर्यचकीत झालो आहे. याचाच अर्थ ते बुद्ध धम्म काय आहे हे जाणत नाहीत असा होतो. बुद्ध धम्म हा मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना पूर्णपणे उत्तर आहे असा मी दावा करतो.
5】रशियन प्रकारचा साम्यवाद हा रक्तरंजित क्रांतीमुळेच घडून येऊ शकतो. बुद्धाने सांगितलेला साम्यवाद हा रक्तविहीन मानसिक क्रांतीने घडून येतो. ज्यांना साम्यवाद अंगीकारायचा आहे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भिक्खू संघ ही साम्यवादी संघटना आहे. तेथे खाजगी संपत्तीला स्थान नाही. यामुळे हिंसा घडून आली नाही. मनातील बदलामुळे हे शक्य झाले आणि ही व्यवस्था २५०० वर्षे टिकून राहिली. त्या व्यवस्थेचा -हास झाला तरी ते विचार अजूनही जीवंत आहेत. रशियन साम्यवादाने या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. त्यांना अजूनही दोन प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.पहिला प्रश्न आहे : साम्यवादी व्यवस्था ही नेहमीकरिता का आवश्यक आहे ?रशियन लोक कधीही करू शकले नसते असे कार्य त्यांनी केले आहे हे मान्य केले पाहिजे, परंतु जेव्हा हे कार्य घडून आले आहे तेव्हा लोकांनी बुद्धाने शिकविलेल्या प्रेमासह स्वातंत्र्य का उपभोगू नये ? दक्षिणपूर्व आशियातील राष्ट्रांनी रशियाच्या जाळ्यात उडी मारण्यापूर्वी काळजी घ्यावी. ते कधीही त्या जाळ्यातून बाहेर पडणार नाहीत. त्यांना बुद्धाने काय शिकविले याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बुद्धांच्या शिकवणीला त्यांनी राजकीय स्वरुप देणे आवश्यक आहे. दारिद्र्य आजही आहे आणि ते नेहमीसाठी राहील. रशियामध्येही दारिद्र्य आहे. तथापि, दारिद्र्य मानवी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे कारण होऊ शकत नाही...
6】दुर्दैवाने बुद्धाची शिकवण ही योग्य प्रकारे समजून घेण्यात आली नाही, त्यांची शिकवण ही सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे मिश्रण होते, हे लोक पूर्णपणे विसरलेले आहेत. बुद्ध धम्म हा एक सामाजिक संदेश आहे याची जाणीव झाली की, त्याचे पुनरुज्जीवन हे चिरकाली ठरून 'बुद्ध धम्म हा प्रत्येक व्यक्तीसाठी आकर्षणाची बाब कां ?' हे जग जाणायला लागेल...
【Ref:२६अलीपूर रोड, (सही) नवी दिल्ली (भी. रा. आंबेडकर)
दिनांक १२ मे, १९५६..(संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन व भाषणे, खंड-१७, भाग-तीन, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, २००३., पाने ५१५-५१६.)】
--------------------------------------------------------------------------
संकलन : महेश कांबळे...✍️💗
संदर्भ : 1)आम्ही बौद्ध धर्मच का स्विकारला...?
2) भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड (चां.भा.खैरमाडे)
3) बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य..
4) बुद्ध आणि मार्क्स...
5) बुद्ध आणि त्याचा धम्म...
6) डॉ.बाबाासाहेब आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण मला बौध्द धम्म का आवडतो...
------------------------------------------------------------------------------------------------------------
2] बुद्धाचा जन्म आपल्या भुमीवर झाला. इथल्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम तो होता. बुद्धाचे विचार वैश्विक निश्चितच आहे पण प्रत्येक धर्म, विचारधारा स्थलांतरीत होत असताना त्याचं local customisation होत जातं तोपर्यंत स्वीकारार्ह होत नाही हा इतिहास ठरला. त्यामुळे जपानचे बौद्ध, थायलंडचे बौद्ध काय करतात याचा आपला संबंध येत नाहीत. म्हणून तिकडच्या उदाहरणाने आपण उणिवा शोधणं तर्कहीन आहे. इथली सामाजिक विषमता, ब्रामणवाद या आव्हाणा विरोधात बुद्ध तेव्हा उभा राहिला तेव्हा तो याच परिपेक्षात बघणं अधिक योग्य ठरेल. म्हणून बाबासाहेबांनी भारताचा इतिहास हा ब्राह्मण विरूद्ध बौद्ध हा नीती संघर्षाचाच इतिहास आहे म्हणून सांगितलं. जर तुम्ही जपान व थायलंड मंगोलिया समोर ठेवत असाल तर या ऐतिहासिक संघर्षाच्या तथ्यावर ते उतरत नाही. म्हणून त्यांनी स्वीकारलेला बुद्ध वरवरच्या spiritually development साठी घेतला असेल तर त्यात आक्षेप नाही, सोयीने त्यातले घडुन आणलेले बदल यावर आक्षेप नाही कारण आपली व त्यांची सामाजिक परिस्थिती भिन्न आहे. बाबासाहेबांनी बुद्ध विचाराला outline केलं आहे. त्यांच्या भाषणात निबंधात मुलाखतीत ग्रंथ लिखाणात हे दिसुन येतं. स्वांतत्र्य समता बंधुता ही राजकीय क्रांतीची सिद्धांत तत्व त्यांनी बुद्धिझम म्हणून स्वीकारली हे स्पष्ट सांगितलं. सामाजिक विषमतेची मांडणी करताना, सामाजिक संघर्षाची रुपरेखा ठरवताना कार्ल मार्क्स की बुद्ध? पर्यायांवर चर्चा करुन अंतिमतः बुद्ध स्वीकारला, बुद्ध आणि त्यांचा धम्म यात "धम्म अधम्म सधम्म" नीतीमुल्य शिकवणीवर भर दिला... behavioural sciences चा हा scientific approach होता या तिन्ही गोष्टी लक्षात घेतल्या, ही marked outline लक्षात घेतली तर बाबासाहेब सामाजिक व्यक्तिमत्व व व्यक्तीगत व्यक्तीमत्व याला फिलॉसॉफीच्या केंद्र स्थानी आणु पाहतात हे लक्षात येईल. याच नितीमुल्याच्या आधारावर एक व्यक्ती, as an individual म्हणून समाजाला अस्तित्व मान्य करायला बुद्ध व बाबासाहेब भाग पाडत आहेत, यात यशस्वी झालो की लोक इतराचं "व्यक्ती स्वातंत्र्य व समता" श्रद्धा म्हणून स्वीकारतील कुठलाही रक्तरंजित क्रांतीच्या उपयोजना केल्या शिवाय !
अत्त दीपं भवं, स्वयंप्रकाशित व्हा, स्वताचा उद्धार स्वतः करा!
बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
Rahul Pagare...✍️💗
---------------------------------------------------------------------------------------------------------
3] बौद्ध धम्म कशासाठी...?
मनुष्यप्राण्याला सुखकर जीवन जगण्यासाठी शिस्तशीर वर्तणूक ( धम्माचरण ) करणे आवश्यक आहे हे ज्यांनी सर्वप्रथम मानवाला सांगितले त्या जगातील महानतम पुरुषाची म्हणजेच गौतम बुद्धाची जयंती साजरी होत आहे....बुद्धाच्या धम्माचे आधुनिक काळातील सर्वोत्तम शिष्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुत्थान केल्यानंतर भारतात बुद्ध जयंती प्रचंड उत्साहात साजरी केली जाते. धर्मांतरित बौद्धांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्यामुळे महाराष्ट्रात बुद्ध जयंती हा एक प्रमुख उत्सव झाला आहे. मात्र हल्ली या उत्सवाचे स्वरूप नुसतेच धार्मिक झाले आहे. इतर धर्माचे अनुयायी ज्याप्रमाणे त्यांच्या धर्माच्या संस्थापकाला एक दैवी पुरुष / ईश्वराचा दूत / अतिमानवी सामर्थ्य लाभलेला अवतार या स्वरुपात पूजतात त्याच स्वरुपात बौद्ध धम्माचे अनुयायी बुद्धाला पूजताना दिसून येतात. यामुळे बुद्धाचे क्रांतिकारी तत्वज्ञान, बुद्धाने स्वातंत्र्य, समता व लोकशाहीची आपल्या तत्वज्ञानात केलेली मांडणी व दैनंदिन व्यवहारात केलेली अंमलबजावणी,बुद्धाच्या या क्रांतिकारक तत्वज्ञानाची बाबासाहेबांनी संकल्पित केलेल्या आधुनिक लोकशाही क्रांती व राज्य समाजवादी क्रांती यासाठी उपयुक्तता इत्यादी महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली जात नाही. महाराष्ट्रातील बौद्धांनी जगाची पुनर्रचना करून मानवी कल्याण साधण्याची एकमेवाद्वितीय क्षमता असलेल्या बौद्ध धम्माला हिंदू धर्माविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून एका संस्थात्मक धर्मात परिवर्तित करण्याचे उपद्व्याप चालविले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन हिंदू धर्माला पर्याय देणारा कर्मकांडी धर्म असा नव्हता तर भारतात राज्यघटनेद्वारे झालेले सामाजिक,राजकीय व आर्थिक बदल आत्मसात करणारा माणूस घडविण्यासाठी सहायक धर्म असा होता, हे त्यांनी '' बुद्ध आणि त्याचा धम्म '' या ग्रंथात तसेच बौद्ध धम्मावर दिलेल्या अनेक व्याख्यानात स्पष्ट केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे लोकशाही क्रांती करून भारत नावाचा देश निर्माण करण्याचे म्हणतं क्रांतिकार्य केले आहे. कोणत्याही समाजात जेव्हा क्रांती होते तेव्हा त्या समाजाचे घटक असलेल्या व्यक्तींच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक संबंधामध्ये बदल होतात.हे बदल नवीन नीतीमूल्यांची मागणी करतात. या बदलांना अनुरूप अशी नितीमुल्ये समाजात रुजविण्याचा प्रयत्न क्रांत्युत्तर काळात झाला नाही तर मात्र क्रांती फसते आणि अवनतीला सुरुवात होते याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुरेपूर जाणीव होती. भारताच्या इतिहासात बुद्धानंतर झालेली ही महत्तम क्रांती यशस्वी व्हावी,तीच विकास व्हावा,आणि ती चिरस्थायी व्हावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी राज्यघटनेतील मूल्यांच्या अनुरूप असे मानसिक बदल व्यक्तीच्या मनात झाले पाहिजेत असे त्यांचे मत होते. जोपर्यंत भारतीय व्यक्तीची मानसिकता हिंदूंच्या धार्मिक ग्रंथात नमूद मूल्यांच्या आधारावर घडत राहणार तोपर्यंत भारतात संविधानिक मुल्ये रुजणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.यामुळेच बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यापुढे दिनांक २३ नोवेंबर १९५६ रोजी केलेल्या भाषणात ते प्रश्न विचारतात की '' तुम्ही हिंदू धर्मग्रंथांना मानणार की,स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय या चार उदात्त तत्त्वांवर आधारलेल्या राज्यघटनेला मानणार ? '' ( लेखन व भाषणे खंड १८ भाग ३ पृष्ठ ५५८ ) बाबासाहेबांच्या मतानुसार लोकशाही,गणराज्य आणि संसदीय शासनप्रणाली या एकमेकांपासून भिन्न बाबी आहेत. जेते गणराज्य असेल तेथे लोकशाही असेलच असे गृहीत धरणे चुकीचे आहे असे ते म्हणतात. लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे.लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मूळे शोधावी लागतात. भारतीय समाजात सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा,सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य हे आदर्श आढळून येत नाहीत. ( BAWPS खंड १८ भाग ३ पृष्ठ ५७८ ) हे आदर्श बौद्ध धम्मात आहेत म्हणून भारतीय लोकशाही क्रांती यशस्वी करण्याचे सामर्थ्य बौद्ध धम्मात आहे या दृष्टीकोनातून बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माकडे पाहतात.
त्यामुळेच भारतीय संविधानाद्वारे कागदावर केलेल्या लोकशाही क्रांतीला व्यवहारात उतरविणारा ,या क्रांतीचा वाहक ठरणारा माणूस घडविण्यासाठी लागणारी सामाजिक मूल्यव्यवस्था रुजविण्यासाठी त्यांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म "या ग्रंथातून नवीन नीतीसंकल्पना मांडली.ही नितीसंकल्पना म्हणजेच धम्मक्रांती होय.मात्र महाराष्ट्रातील बौद्ध या धम्म्क्रांतीला संस्थात्मक धर्माचे स्वरुप देऊ पाहत आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनासाठी मांडलेल्या नवयानाचे कार्माकांडिकरण करू पाहत आहेत. या कृतीतून महाराष्ट्रातील बौद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म्क्रांतीला अधिक गतिमान करण्याऐवजी धम्म्क्रांतीतील अडथळा ठरत आहेत. बुद्ध की कार्ल मार्क्स ?या आपल्या सुप्रसिद्ध निबंधात त्यांनी बौद्ध धर्म हा प्रज्ञावंत,करुणामयी,द्वेषरहित,क्षमाशील आणि सजग असा विचार करणारा माणूस घडविण्याची क्षमता असलेला एकमेव धर्म आहे हे बुद्धाच्या प्रवचनांचा हवाला देऊन पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी बुद्धाच्या धम्माचे प्रयोजन,तत्वज्ञान आणि व्यवहार यांची पारंपारिक बौद्ध धम्माच्या अनुयायांना न पटणारी चिकित्सक मांडणी केली आहे.तरीही बाबासाहेबांच्या या दिशादर्शक लिखाणाकडे दुर्लक्ष करून बौद्ध धम्माला हिंदू किंवा अन्य धर्माच्या विरोधाचे एक साधन या स्वरुपात उभे करणे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीची धार बोथट करणे होय.बाबासाहेबांच्या धम्माचे हे स्वरूप समजून न घेता बौद्धांनी स्वतःला दलित म्हणू नये,अमुक-तमुक सण साजरे करू नये, अमुक पद्धतीनेच विवाहविधी करावा,दर पौर्णिमेला उपवास करावा,दर रविवारी शुभ्र पोशाख घालून विहारात जावे,पाली गाथांचे पठण करावे, भिक्खुच्या माध्यमातून विवाह,गर्भसंस्कार,नामकरण,मृत्युसंस्कर,गृहपूजा,परित्राण पाठ इत्यादी कर्मकांड करावेत हे जो करीत असेल तोच खरा बौद्ध नाहीतर तो आंबेडकरी विचारांचा नाही असा जो प्रचार या तथाकथित कट्टर बौद्धांकडून चालविला जातो आहे तो बुद्धाच्या धम्माचे क्रांतिकारक स्वरूप नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
स्वतःला बौद्ध धर्माचे म्हणविणारे बरेच लोक हिंदू देव देवतांची पूजा करतात,हिंदूंचे सण-उत्सव साजरे करतात,हिंदू प्रथा आणि परंपराचे पालन करतात ही बाब खरी आहे. अशा लोकांमुळे बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र संस्कृती निर्माण होत नाही याविषयीची खंत बौद्धामधील सुशिक्षित तरुण,विविध संघटनांचे कार्यकर्ते, चळवळीतील वयोवृद्ध कार्यकर्ते इत्यादी सर्वांकडूनच वेळोवेळी व्यक्त केली जाते.मात्र यासाठी जो नकारात्मक प्रचार (हे करू नका,ते करू नका,असे आचरण करू नका इ.) केला जातो त्यातून बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र संस्कृती निर्माण होईल हा भ्रम आहे. बुद्धाने आपल्या धम्माची उभारणी करताना समाजाला नव्हे तर व्यक्तीला केंद्रस्थानी मानले आहे. व्यक्तीच्या चेतनेचा स्तर ( Level Of Consciousness )अधिकाधिक उच्चतम पातळीवर वाढवीत नेण्यास बुद्धाने आत्यंतिक महत्व दिले आहे.व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले तर सामुहिक जनचेतनेच्या स्तरामध्ये वाढ होईल आणि अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येईल.जर व्यक्तीच्या चेतनेचा स्तर ( Level Of Consciousness ) उंचावला नाही तर कितीही कठोर फतवे जरी केले तरी अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येण्याची शक्यता नाही.आता मूळ प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे व्यक्तीच्या चेतनेचा स्तर वाढविण्याची कार्यपद्धती कोणती असावी ? ही कार्यपद्धती रूढ करणे म्हणजे बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा संस्कृती निर्माण करणे होय. यासाठी प्रथम समाज ( society ) आणि जनता ( People ) या संकल्पना व त्यांचे व्यक्ती ( Individual ) या घटकाशी असलेले नाते समजून घेतले पाहिजे.
अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून जनता बनते मात्र समाज बनत नाही.समाज ही एक परस्परावलंबी व्यक्तींची संरचना किंवा व्युह आहे. या संरचनेतील प्रत्येक व्यक्तीला निश्चित अशी एक भूमिका ठरवून दिलेली असते. या भूमिकांचा मिळून समाज बनतो. भूमिका कशा ठरतात ? तर भूमिका या अपेक्षांपासून ठरतात.तुम्ही अमुक असाल तर तुमच्याकडून अशी-अशी अपेक्षा आहे.तुम्ही भिक्खू असाल तर तुमच्याकडून या...या..अपेक्षा आहेत. उपासक,बौद्धाचार्य असाल तर तुमच्याकडून अशा - अशा वर्तणुकीची अपेक्षा आहे. या अपेक्षा कोण करतात ? तर व्यक्तीच अपेक्षा करतात. या अपेक्षांचा आधार काय तर पूर्वापार चालत आलेले संकेत ( convention ) .संकेत कोणी निर्माण केले ? तर कोणातरी ज्ञात किंवा अज्ञात व्यक्तीनेच संकेत निर्माण केले.या संकेतांना आधार काय ? प्रचलित दृष्टीकोनातून संकेतांना आधार असलाच पाहिजे असे आवश्यक नाही.मात्र बौद्ध दृष्टीकोनातून आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास प्रज्ञावंत,करुणामयी,द्वेषरहित,शीलवंत आणि सजग असा माणूस घडविणे व त्याद्वारे अखिल विश्वाचे कल्याण साधणे, हाच संकेताचा आधार आहे. संकेत हे नित्य आचरणातून वारंवार अवलंबिल्याने संस्कार बनतात. नित्यनेमाने मनावर पडलेले संस्कार हे व्यक्तीच्या स्वभावाचाच एक भाग बनतात.अशा प्रकारे व्यक्तीची जाणीव नियंत्रित करण्याचे सामर्थ्य संस्कारांना प्राप्त होते.या नियंत्रित जाणीवेमुळे समाजाला एकप्रकारे स्वतःचे वजन प्राप्त होते.परंतु समाज हा जड ( बौद्ध परिभाषेत नामरूप ) व व्यक्ती या चैतन्यमय असल्याने व्यक्ती समाज घडवू शकतात.बिघडवू शकतात.समाजाची पुनरर्चना करू शकतात.हे लक्षात घेतले तर समाजासाठी व्यक्ती नाही तर व्यक्तींसाठी समाज आहे.समाजाकडे व्यक्तीच्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती नसते.ही बाब लक्षात घेता बौद्धामधील काही गटांनी अथवा झुंडीनी फतवे काढून परिवर्तन घडून येणार नाही हे समजून घेतले पाहिजे.
व्यक्तीच्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता व्यक्तीतच असू शकते.मात्र यासाठी जीवनविषयक विशेष दृष्टीकोण विकसित होणे गरजेचे असते.बौद्ध धर्माचा प्रारंभ,विकास आणि ऱ्हास याचा इतिहास पाहिला तर बुद्धकाळातील राजे,व्यापारी, आणि श्रेष्ठी अशा जीवनविषयक विशेष दृष्टीकोण बाळगणाऱ्या वर्गाने सर्वप्रथम बुद्धाचा धम्म आणि विनय समजून घेतला आणि तो आचरणात आणला. स्वतःमधील सुप्त शक्तीचा संपूर्ण विकास करा ! ' अत्त दीप भवः ' हे बुद्धाचे आवाहन स्वीकारून ते अर्हत पदाला पोहोचले. सामान्य जनतेने या वर्गाचे अनुकरण करून आपले नैतिक आचरण सुधारले.सम्राट अशोकाने प्रथम स्वतः बुद्धाचा धम्म आणि विनय समजून घेतला आणि तो आचरणात आणला.अशोकाच्या मंत्रीगण,सरदार-अमात्य आणि प्रजेने त्याचे अनुकरण केले.पुढे काळाच्या ओघात बौद्ध धम्माचा आश्रयदाता अभिजन वर्ग तसेच भिक्खुवर्ग धम्म आणि विनय सोडून जसजसा भ्रष्ट,स्वार्थी,मठवासी झाला तसतसा बौद्ध धम्माचा समाजावरील प्रभाव ओसरत गेला व धम्माचा ऱ्हास झाला. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःमधील सुप्त शक्तीचा संपूर्ण विकास करा ! ' अत्त दीप भवः ' हे बुद्धाचे आवाहन स्वीकारून ते स्वतः परिपूर्ण बौद्ध झाले.त्यानंतरच इतरांना ते बुद्धाचा धम्म स्वीकारा हे आवाहन करू शकले.म्हणूनच बौद्ध धम्माचा अधिकाधिक प्रचार-प्रसार व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या बौद्धजणांनी सर्वप्रथम बुद्धाचा धम्म आणि विनय हा आपल्या स्वतःच्या संस्काराचा भाग बनविला तरच इतरेजन त्यांचे अनुकरण करतील.
स्वतःमधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करण्याची प्रक्रिया पूर्णपणे व्यक्तीनिष्ठ स्वरुपाची आहे.स्वतःच्या अंतरंगाचा ठाव घेणे, स्वतःचा स्वतःच शोध घेऊन स्वतःमधील माणूसपणाची व्याप्ती मोजणे यातूनच स्वतःमधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करणे व्यक्तीला शक्य होऊ शकते. निरंतर अभ्यासाने व्यक्तीला स्वतःमधील गुणदोषांचा शोध घेऊन आपल्या चेतनेचा स्तर ( Level Of Consciousness) अधिकाधिक उच्चतम पातळीवर वाढवीत नेता येऊ शकतो. हा निरंतर अभ्यास कोणी ध्यान किंवा विपश्यनेच्या मार्गाने करू शकतात तर कोणी विवेकशील चिंतनाच्या माध्यमातून करू शकतात. व्यक्तीच्या चेतनेचा स्तर जसजसा उंचावेल तसतसा व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करू लागेल, या मार्गाच्या पालनाच्या आड येणाऱ्या दहा आस्रवांना पार करू शकेल आणि दहा पारमिताना आपल्या संस्कारांचा भाग बनवेल.असा नैपुण्यप्राप्त व्यक्तीच बौद्ध बनू शकतो. मात्र यासाठी प्रचंड निग्रह,मानसिक क्षमता आणि धाडस लागते.हे धाडस कमावण्याची शक्ती ज्यांच्याकडे असेल तोच बौद्ध बनू शकतो.केवळ माझ्या बापजाद्यानी धर्मांतर केले होते म्हणून किंवा मी भिक्खुच्या हातून अथवा अन्य कोणाच्या हातून दीक्षा घेतली आहे म्हणून मी बौद्ध आहे असे म्हटल्याने किंवा दर रविवारी विहारात जातो, परित्राण करतो,गाथापठण करतो,बौद्धांच्या तीर्थस्थळांना भेटी देतो,जन्म,विवाह,नामकरण बौद्ध पद्धतीने करतो म्हणून कोणी बौद्ध बनू शकत नाही.असे बौद्ध केवळ सरकारी जणगणनेपुरते संख्यात्मक बौद्ध असू शकतात.बाबासाहेबांना अपेक्षित गुणात्मकदृष्ट्या उन्नत बौद्ध नाही.भारतीय लोकशाही क्रांतीचे वाहक बौद्ध नाही...
- सुनील खोब्रागडे सर...✍️💗
---------------------------------------------------------------------------------------------------------
4 ] जगातील सर्वात महान व्यक्तिमत्वजगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीजगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी
‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वत: सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.
आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बुद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी ते २१० कोटी आहेत.अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.
मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधीलऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.’’
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव .गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. लोक कथेनुसार शुद्धोदन हे #सूर्यवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.
भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्यास्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषत: धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.
महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्ये महत्त्वाची आहेत. पहिले - दुःख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दुःख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.
१. शील
धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेऊन वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेंवा सुख तिच्या मागे तसेच लागते जसे की कधी तिची साथ न सोडणारी तिची सावली.
२. समाधी
शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वंश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचार पासून वाचू शकतो व सदचार्नाकडे वळू शकतो ह्यासाठी समाधी महत्वपूर्ण आहे. आपल्या मनाला वंश करण्यासाठी त्यांनी सार्वजनीक उपाय सांगितला. येणार्या – जाणार्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. म्हण जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात.
३. प्रज्ञा
सहज स्वाभाविक श्वासाच्या सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेंव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोन्तिना कोणती संवेदना मिळू लागते. त्या नंतर ती सार्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोण इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.
१. जेव्हापर्यंत वज्जी ( Vajji ) अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, र्हास होणार नाही.
२. जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्हास होणार नाही..
३. जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्या प्रमाणे वागतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्हास होणार नाही.
४. जेव्हापर्यंत वडिलधार्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्हास होणार नाही.
५. जेव्हापर्यंत महिलांना आणि तरुणींना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्हास होणार नाही.
६. जेव्हापर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्हास होणार नाही.
७. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्हास होणार नाही.
दहा पारमिता ह्या शील मार्ग अाहेत..
१) शील
शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
२) दान
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
३) उपेक्षा
निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
४) नैष्क्रिम्य
ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य
हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
६) शांती
शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
७) सत्य
सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
८) अधिष्ठान
ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
९) करुणा
मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
१०) मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.[१९]
पंचशील
१) मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.२) मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.३) मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.५) मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणार्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर आपण जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.
१) बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव
बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.
२) वैचारिक स्वातंत्र्य
वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.
३) सद्गुणांचा विकास
बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.
४) समता तत्त्वाचा प्रभाव
तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जाह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदूसमाजरचनेवर प्रभाव पडला.
५) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास
विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनबिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.
६) नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव
करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.
७) बौद्ध धर्माचे कलेतील योगदान
वास्तुविद्या, लेण्यांचॆ आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.
बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्र्याभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.
८) स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान
बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.
९) शिक्षणास प्रोत्साहन
बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.
१०) भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार
बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
११) आर्थिक विकासाला प्रोत्साहन
बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. #जगाच्या एकूण #अर्थव्यस्थेत #सर्वाधिक म्हणजेच #३४% वाटा हा #सम्राट #अशोकाच्या #साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीन व जपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानी आहेत.
भारतीय संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरियाआदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे. ते पुण्यातील बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थेतर्फे चालविले जाते.
बौद्ध साहित्य
गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार जेथे झाला ते गंगा नदीचे खोरे ह्याच भागात गौतम बुद्धांनी आपले प्रारंभिक भ्रमण केले होते.
गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मयहोय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद(धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्पिढ्या पुढे चालत राहिला.[२१]उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.
एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमाध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.
गौतम बुद्ध व बौद्ध धर्माविषयी जागतिक विचारवंत व जगप्रसिद्ध व्यक्तींची मते खालिल प्रमाणे आहेत.
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरूष भगवान बुद्ध होय.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर.
— तुकडोजी महाराज
शाक्यमुनी गौतम बुद्धांखेरीज संपूर्ण मानवजातीत येशू ख्रिस्तांएवढा थोर पुरूष दुसरा झाला नाही.
— रेनन, प्रसिद्ध ख्रिस्तपंडित
जगातल्या सर्व धर्मसंस्थापकास भगवान बुद्ध हेच फक्त असे थोर होते की, जे आपली मुक्तीसाध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खर्या थोर माणसाचे मोठेपण सामावले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल? बुद्धांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा (ज्ञान) व मैत्रीच्या (प्रेम) शिखरावर (त्याला) प्रस्थापित करून श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले आहे.
— ड्वाईट गोडार्ड
कलियुगी हरी बुद्ध रुपधरी ।
तुकोबा शरीरी प्रवेशला ।।— संत बहिणाबाई
एकोनी बंका करित उत्तर ।
बौद्ध अवतार पांडुरंग ।।— संत बंका महार
बुद्ध अवतार माझीया आदृष्टा ।
मौन्य मुखे निष्ठा धरियली ।
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध |
शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे ||— संत तुकाराम
बुद्ध अवतारी आम्ही झालो संत ।
वर्णवया मात नामा म्हणे ।— संत नामदेव
“बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.”
— स्वामी विवेकानंद
“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.”
— स्वामी विवेकानंद
“बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.”
— स्वामी विवेकानंद
माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसर्या कोणत्याही धर्माची त्याचेशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे माझे पक्के मत सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“भविष्य काळातील धर्म हा वैश्विक धर्म असेल, तो व्यक्तिगत शरिरधारी ईश्वराच्या पलिकडचा, ठाम निश्चित अशा परंपरेने पाळत असलेल्या मतप्रणाली, तसेच पराप्राकृतिक ईश्वराचा शोध घेणार्या शास्त्रांना बाजूला ठेवणारा असेल. विज्ञानाच्या गरजांची जर कोणता धर्म परिपूर्ती करीत असेल तर तो फक्त बौद्ध धर्म आहे.
— अल्बर्ट आईन्स्टाईन
बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरूष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ, तसाच श्रेष्ठतम सदाचारीही असला पाहिजे. बौद्ध धर्मात ज्ञान हे मुक्ती (निर्वाण) साठी अनिवार्य मानले गेले आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक कारण आहे. (दुसरे कारण लोभ किंवा तृष्णा होय.) ह्या उलट ख्रिश्चन आदर्श पुरूषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. जगातल्या दु:खापैकी पुष्कळशी दु:खे दृष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत.
— डब्ल्यू. टी. स्टेस, ग्रंथ - बौद्ध धर्माचे नीतीशास्त्र (Buddhism Ethics)
बौद्ध धर्माइतका दुसर्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्याश्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही.
— ई. जे. मिल्स, ग्रंथ - बौद्ध धर्म (Buddhism)
बौद्ध धर्माचे आध्यातमिक तत्त्वज्ञान हीतकारक सामर्थशाली देणगी आहे, बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेरिअनख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाला अंतर्यामी असलेल्या मार्गदिपाचा अधिकार मान्य करतात. युनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त व तथागत बुद्ध हे जीवनाचे सर्वोच्छ भाष्यकार आहेत असे मानतात.
— रेव्हरँड लेस्ली बोल्टन, युनिटेरिअन ख्रिस्ती पाद्री
आधुनिक विज्ञान हे बौद्ध धर्मातील अनित्यता आणि अनात्मवादाच्या सिद्धांताचे प्रतिध्वनी होय.
— डॉ. रंजन रॉय
दीर्घकाळापर्यंत मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्वानुसार स्वशासनाचा स्विकार करावा. बौद्ध धर्म यात जगातील पहिली नैतिक विचारधारा आहे. जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन (स्वशासन) करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच प्रगतीशील जगाला ही सर्वोच्छ शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे.
— इ. जी. टेलर, ग्रंथ - बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा (Buddhism and Modern Thought)
जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, तेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची गाथा वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा ईश्वर प्रेमरूप आहे हे मत किती भसवे आहे याची जाणिव होते. बुद्धाचा धर्म हा कितीतरी निराळा धर्म आहे.
— विनवुड रीड, ग्रंथ - मानवाचे हौतात्म्य (Martyrdom of Man)
बौद्ध धर्माने मानवात प्रछन्न असलेल्या अंत:सामर्थ्यांच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणांस प्रार्थना, पुजा, प्रशंसा आढळते. बौद्ध धर्मात प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी चित्ताच्या (मानसिक) संस्काराचे महत्त्व सांगितल्याचे आढळते.
— आर. जे. जॅक्सन
बौद्ध धर्म एक अदभुत धर्म नि तत्त्वज्ञान आहे.
— मार्क झुकेरबर्ग
ऐतिहासिक थोर धर्मांपैकी मी बौद्ध धर्माला पसंत करतो.
— बर्ट्रांड रसेल
-आर्टिकल by- राज कांबळे
--------------------------------------------------------------------‐‐----------
5] "बुद्धिझम हा प्रत्येकाच्या जीवनाचा खरा मार्ग आहे. त्याप्रमाणे कम्युनिझम देखील जीवनाचा मार्ग ठरविता येईल. या दोन मार्गापैकी अधिक चांगला कोणता हे बौद्धजनांनी नीट समजावून घेणे आवश्यक आहे. विशेषतः कम्युनिझम जो जीवनमार्ग दाखवितो.त्यापेक्षा बुद्धिझमने दाखविलेला जीवनमार्ग योग्य आहे हे बौद्धजनांनी विशेषतः तरुणांनी समजावून घेऊन वागले नाही तर बुद्धिझम नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बुद्धिझमवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी आपल्या बौद्ध तरुण पिढीला जागृत केले पाहिजे. इतकेच नव्हे तर कम्युनिझमपेक्षा बुद्धिझम श्रेष्ठ आहे हे पटवून दिले पाहिजे आणि असे जर घडले तरच बुद्धिझम जिवंत राहू शकेल.....
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर....✍📚
【Ref- २० नोव्हेंबर १९५६ काठमांडू, नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेप्रसंगी दिलेले भाषण 】
--------------------------------------------------------------------------
-------------------------------------
6] ●कुमारप्रश्न●
आपण सर्वांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचला असेल, ऐकला असेल. मूळ तीपीटकात कुमारप्रश्न नावाचं एक छोटेसे सूत्र आहे. ते आज आपण पाहू.
कुमारप्रश्न (कुमारपञ्हा) ज्यास 'श्रामणेर प्रश्न' म्हणून काहीजण ओळखतात, ते पवित्र तीपीटकातील सुत्तपिटक, खुद्दकनिकाय,खुद्दकपाठपाळि, या ग्रंथात उपलब्ध आहे.
सदर निकायावरील कुमारपञ्हवण्णना या अठ्ठकथेनुसार तथागत सम्यक संबुद्धांनी सोपाक नावाचे सात वर्षीय महाश्रावक होते, त्यांना उपसंपदा द्यायची, या हेतूने १० प्रश्न विचारले.
इथे महाश्रावक सोपाक यांचे वय ७ वर्ष म्हणून त्यांचा आणि सदर प्रश्नावलीचाच एकंदरीत उल्लेख 'कुमार प्रश्न' म्हणून नोंदविला गेला.
ते दहा प्रश्न व त्यांची उत्तरे हे जरी सूत्र रुपात असली, तरी त्यांच्या सविस्तर विश्लेषणात उत्तुंग असे बौद्ध जीवन तत्वज्ञान दडलेलं आहे.
१, २, ...,१० या संख्या म्हणजे गणितीय मूल्य, ज्या वस्तू मोजण्यासाठी, गणना करण्यासाठी असतात. या सूत्रात त्या संख्या 'वैश्विक सत्य' सांगण्यासाठी, ज्याचा हेतू अर्थातच 'अखिल जीवसृष्टीचे कल्याण' व्हावं हाच आहे, केलेला आहे.
उत्तरे precisley, एका वाक्यात आहेत. त्यांचा अर्थ अतिशय खोल, गहन असा आहे.
ते दहा प्रश्न व त्यांची उत्तरे खालील प्रमाणे,
१. ‘‘एकं नाम किं’’? ‘‘सब्बे सत्ता आहारट्ठितिका’’।
२. ‘‘द्वे नाम किं’’? ‘‘नामञ्च रूपञ्च’’।
३. ‘‘तीणि नाम किं’’? ‘‘तिस्सो वेदना’’।
४. ‘‘चत्तारि नाम किं’’? ‘‘चत्तारि अरियसच्चानि’’।
५. ‘‘पञ्च नाम किं’’? ‘‘पञ्चुपादानक्खन्धा’’।
६. ‘‘छ नाम किं’’? ‘‘छ अज्झत्तिकानि आयतनानि’’।
७. ‘‘सत्त नाम किं’’? ‘‘सत्त बोज्झङ्गा’’।
८. ‘‘अट्ठ नाम किं’’? ‘‘अरियो अट्ठङ्गिको मग्गो’’
९. ‘‘नव नाम किं’’? ‘‘नव सत्तावासा’’।
१०. ‘‘दस नाम किं’’? ‘‘दसहङ्गेहि समन्नागतो ‘अरहा’ति वुच्चती’’ति।
अर्थ–
◆ १. एक काय आहे ? सर्व प्रकारचे जीव (सत्ता) आहारावर स्थित आहेत.
सयूंक्त निकायातील अत्थिरागसुत्तात
आहाराचे चार प्रकार आहेत असे बुद्ध सांगतात,
“चत्तारोमे, भिक्खवे, आहारा भूतानं वा सत्तानं ठितिया सम्भवेसीनं वा अनुग्गहाय कतमे चत्तारो? कबळीकारो आहारो ओळारिको वा सुखुमो वा, फस्सो दुतियो, मनोसञ्चेतना ततिया, विञ्ञाणं चतुत्थंइमे खो, भिक्खवे, चत्तारो आहारा भूतानं वा सत्तानं ठितिया सम्भवेसीनं वा अनुग्गहाय”।
पहिला कबळीकर आहार– रोजच्या आहारातील जड, पातळ अन्न, जे प्राणी-वनस्पती-माणस जन्म ते मृत्यूपर्यंत खात असतात.
दुसरा स्पर्श आहार– सहा इंद्रियांना सहा इंद्रिय विषयांचा स्पर्श होतो, त्यातून उत्पन्न होणारा. सहा इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक आदी, व सहा इंद्रिय विषय म्हणजे दृश्य,ध्वनी,वास आदी..
तिसरा मनोसंचेतना आहार आणि चौथा विज्ञान आहार.
इथे मनो संचेतना आहार म्हणजे कामभव आणि रूप-अरुप भव आहार व पटीसंधीनामरूप म्हणजे विज्ञान आहार.
सोप्या भाषेत मनोसंचेतना आहार म्हणजे मनात योजलेला हेतू (intention) आणि विज्ञान म्हणजे जाणीव.
◆ २. दोन काय आहे? नाम-रूप.
तथागत सांगतात, “कतमञ्च भिक्खवे, नामरूपं? वेदना, सञ्ञा, चेतना, फस्सो, मनसिकारो – इदं वुच्चति नामं। चत्तारो च महाभूता, चतुन्नञ्च महाभूतानं उपादायरूपं। इदं वुच्चति रूपं।इति इदञ्च नामं, इदञ्च रूपं।इदं वुच्चति, भिक्खवे, नामरूपं।
हे नामरूप काय आहे?
नाम म्हणजे – वेदना, संज्ञा, चेतना, स्पर्श आणि मनसिकार व रूप म्हणजे– पृथ्वी,जल,तेज आणि वायू.
◆ ३. तीन काय आहे? तीन वेदना. सुखद वेदना,दुःखद वेदना आणि असुखद-अदुःखद वेदना.
◆ ४. चार काय आहे? चार आर्य सत्य.
दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध मार्ग.
◆ ५. पाच काय आहे? पाच उपदान स्कंध.
वेदना स्कंध, संज्ञा स्कंध, संस्कार स्कंध, विज्ञान स्कंध आणि रूप स्कंध.
◆ ६. सहा काय आहे? सहा आयतन (खिडक्या). सहा इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन.
◆ ७. सात काय आहे? सात बोध्यंग.
'बोधाय संवत्तन्तीति खो, भिक्खु, तस्मा ‘बोज्झङ्गा’ति वुच्चन्ति।' बोधी जागृत करण्याचे सात अंग. स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा,
◆ ८. आठ काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. सम्मादिट्ठि (सम्यक दृष्टी)
सम्मासङ्कप्पो(सम्यकसंकल्प)
सम्मावाचा (सम्यकवाणी) सम्माकम्मन्तो (सम्यककर्म) सम्माआजीवो(सम्यकअजीविका) सम्मावायामो (सम्यक व्यायाम) सम्मासति (सम्यक स्मृती) सम्मासमाधि (सम्यक समाधी)
◆ ९. नऊ काय आहे? नऊ प्रकारचे जीव ठिकाण.इथे सत्तावासा मधील 'वासा'– ठिकाण ही मनोवस्था (stations of consciousness) असते असे बौद्ध विद्वानांचे मत आहे.
◆ १०. दहा काय आहे? दहा अंगांनी युक्त असलेला ज्यास पुढील प्रशिक्षणाची आवश्यकता उरली नाही त्यास अर्हत असे म्हणतात.
ही दहा अंगे काय आहेत? तर अरिय अष्टांगिक मार्गातील आठ अंग आणि सम्यकज्ञान, सम्यकविमुक्ती असे दहा अंग. जो आर्य श्रावक सम्यक दृष्टी,सम्यक वाणी आदी उपरोक्त दहा अंगांच्या पलीकडे गेलाय, सदर मार्गातील प्रशिक्षणाच्या पलीकडे गेला आहे. निष्णात बनला आहे तो अर्हत.
अशाप्रकारे उपरोक्त दहा प्रश्नाच्या उत्तरांचा जर विस्तार करत करत गेलं तर विमुक्तीचे सर्वोच्च ज्ञान दडलेलं आहे हे स्पष्ट होते. वर केवळ आजच्या बौद्ध युवा वर्गाला हे दहा प्रश्न आणि त्याची उत्तरे माहित असावयास हवीत या हेतूने संक्षिप्त नोंद करून ठेवली आहे.
त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व सर्वांप्रति मंगलकामना
। भवतु सब्ब मङ्गलं ।।
- Adv. Pavankumar Shinde सर...✍️
8459853080
-------------------------------------------------------------------------
-------------------------------------
Comments
Post a Comment