डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुध्दीप्रामाण्यवादी पत्रकारिता व त्यांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी...!!!



1】बाबासाहेबांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी.. !!



अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली आणि चालविली. त्यांची वैचारिकता, पोटतिडीक, निर्भीडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. सर्वसामान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दांत लिखाण करीत, ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला....‘इं ग्रजीपेक्षा मराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण थोडे आहे हे खरे; तथापि ज्या बहिष्कृत वर्गात ते जन्मले त्या वर्गाच्या कैफियती मांडताना सर्वसामान्य साक्षर व्यक्तीलादेखील समजेल, अशी सुबोध भाषा त्यांनी वापरली आहे. जाडे पंडिती व लठ्ठ अवघड शब्द त्यात फारच थोडे आढळतात. पंडित असूनही विद्वत्तेचा अहंकार त्यांच्या भाषेत नाही. हिंदुधर्माला यापुढे तरी जगायचे असल्यास डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील हे मत बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकणारे आहे. ‘मराठी भाषेसंबंधी बोलताना जे फक्त साहित्याच्याच क्षेत्रात असतात, त्यांच्याच शैलीचा उल्लेख होतो. पण सरल प्रासादिक आणि सूत काढल्यासारख्या सुबोध मराठी भाषेत लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठी शैलीचे कौतुक झालेले आढळत नाही’’, अशी व्यथा पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात व्यक्त केली होती. त्यांचेही निरीक्षण महत्त्वाचे आहे.बाबासाहेबांची चळवळींमागची भूमिका, पोटतिडीक, त्यांचे धगधगीत विचार या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. त्याची काही उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. बाबासाहेबांना हिंदुधर्म आपला आहे, की नाही या प्रश्‍नाचा कायम निकाल हवा होता. ‘जोपर्यंत आम्ही स्वतःला हिंदू म्हणवितो आणि तुम्ही आम्हाला हिंदू समजता तोपर्यंत देवळात जाण्याचा आमचा हक्क आहे. आम्हास एकजात निराळी देवळे नकोत’. नाशिक काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी दगडमाराची, लाठ्यांची धुमश्‍चक्री उडाली, तेव्हा हा सत्याग्रह सोडून येवले मुक्कामी त्यांना धर्मांतराची घोषणा करावी लागली. त्यावर बाबासाहेब चवताळून लिहितात, ‘काही सवर्ण हिंदुंनी हिंदू समाजाच्या पोटातील वडवानळात बुद्ध खाक केला. महावीर खाक झाला. बसव खाक झाला. रामानंद खाक झाला. महानुभावांचा चक्रधर खाक झाला. नानक व कबीरांची तीच वाट लागली. राममोहन, दयानंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जोतिबा फुले, रानडे, भांडारकर, श्रद्धानंद यांचीही तीच वाट लागली.’ ते लिहितात, ‘माझी जनता अमोल मानव जातीस प्राप्त असलेले, समान हक्क मागत आहे. माणुसकीच्या व्यापक वृत्तींचा निष्पाप नागरिक होण्याचे माझे ध्येय आहे.’ बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांची संपूर्ण जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यावर वाहिली. एक पट्टीचे साक्षेपी संपादक म्हणून लौकिक मिळविला. मराठी अक्षरवाङ्‌मयाला आपल्या वृत्तपत्रीय वैचारिक लिखाणाची देणगी दिली. परंतु, एक सिद्धहस्त समर्थ पत्रकार म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. तरीपण त्यांनी आपल्या धारदार, सडेतोड व विद्वत्तापूर्ण, प्रतिभायुक्त लेखनाने समाजप्रबोधनाबरोबरच दलितांची अस्मिता व स्वाभिमानाची मशाल सतत तेजाळतच ठेवली. राजर्षी शाहू महाराजांच्या औदार्याने त्यांनी ‘मूकनायक’ सुरू केले.दलित समाजास वृत्तपत्राची किती निकड आहे ते समजावून सांगत बाबासाहेब लिहितात, ‘आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. मुंबई इलाख्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. त्यातून अहितकारक प्रलापही निघतात. त्यात बहिष्कृतांच्या प्रश्‍नांच्या ऊहापोहासाठी पुरेशी जागा मिळणे शक्‍य नाही. त्यासाठी एक स्वतंत्र पत्र पाहिजे. ही उणीव भरून काढण्यासाठी या (मूकनायक) पत्राचा जन्म आहे. टिळकांनी २ वर्षे कैद भोगून परत आल्यानंतर ‘पुनश्‍च हरिओम्‌’ नावाचा अग्रलेख लिहून केसरीची ४ जुलै १८९९ ला पुन्हा सुरवात केली होती. बाबासाहेबांनीही मूकनायकाच्या अस्तानंतर सहा महिन्यांनी ‘पुनश्‍च हरिओम्‌’ हा अग्रलेख लिहून ३ एप्रिल १९२७ ला ‘बहिष्कृत भारत’ नामक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करून पत्रकारितेला पुन्हा सुरवात केली.‘पुनश्‍च हरिओम’ या अग्रलेखात बाबासाहेब लिहितात; सहा वर्षांपूर्वी ‘मूकनायक’ पत्रास सुरवात केली तेव्हा राजकीय सुधारणांचा कायदा यावयाचा होता. आता इंग्रजांच्या हातची सत्ता वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे... अस्पृश्‍यांची स्थिती आज जास्त शोचनीय आहे. ही शोचनीय स्थिती जगजाहीर करून, अन्याय व जुलुमापासून त्यांचा बचाव करण्यासाठी वृत्तपत्राची जरुरी आज अधिक तीव्र आहे.’’ नियतकालिक पाक्षिक, मासिक चालविणे लोखंडाचे चणे खाण्यासारखे कठीण काम आहे. येणाऱ्या संकटांचे व अडचणींचे वर्णन करीत बाबासाहेब लिहितात, ‘बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची संपादकी स्थिती नव्हती. संपादकीय खात्यात बिनमोली संपादकी काम करणारा स्वार्थत्यागी अस्पृश्‍यातील माणूसही लाभला नाही. अशा अवस्थेत बहिष्कृत भारताचे २४-२४ रकाने लिहून काढण्याची जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली. प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ स्वार्थत्याग करणे शक्‍य होते तेवढा केला आहे. देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होणाऱ्या शिव्याशापांचा भडिमार तो सोशित आहे. ‘बहिष्कृत भारता’द्वारे लोकजागृतीचे काम करताना त्याने आपल्या प्रकृती व सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्याच्या वाती केल्या. माता रमाईबद्दल ते लिहितात, ‘‘प्रस्तुत’ लेखक परदेशी असताना रात्रंदिवस जिने (रमाईने) प्रपंचाची काळजी वाहिली व अजूनही वाहतच आहे व तो स्वदेशी परत आल्यावर त्याच्या विपन्नावस्थेत शेणीचे भारे स्वतःच्या डोक्‍यावर आणण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही. अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासांतून अर्धा तासही त्याला घालविता येत नाही.....’’  हे वाचताना डोळे पाणावल्याशिवाय कसे राहतील? समाजोत्थानाचे साधन असलेल्या ‘बहिष्कृत भारता’साठी त्यांनी सर्वसामान्यांना कळकळीने आवाहन केले होते. ‘बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिकऋण नव्हे काय?’ हा अग्रलेख बाबासाहेबांनी लिहिला. त्यात  लोकांना विनंती करताना लिहिले, ‘तुमचे भांडण भांडणाऱ्या पत्रास तुम्हीच मदत केली पाहिजे. जास्त नाही तरी आपल्या गावातर्फे दहा रुपयांची मदत केल्याशिवाय राहू नका.’ परदेशात जाताना बाबासाहेबांनी जहाजावरून लिहिले होते, ‘गरज पडली तर माझे ‘राजगृह’ घर विका. परंतु, ‘बहिष्कृत भारत’ वर्तमानपत्र बंद पडू देऊ नका. केवढा अतुलनीय व महान त्याग! लो. टिळकांचे सुपुत्र श्रीधर बळवंत टिळक हे बाबासाहेबांच्या समाजसमता संघाचे विधायक कार्यकर्ते होते. बाबासाहेबांनी ‘समता’ नावाचे मुखपत्र २९-६-१९२८ ला सुरू केले होते. त्या ‘समता’च्या पहिल्या अंकात, २५-५-१९२८ ला आत्महत्या करणाऱ्या श्रीधर बळवंत टिळकांनी बाबासाहेबांना लिहिलेले पत्र छापले होते. त्यात श्रीधर यांनी ‘माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे,’ असे लिहिले होते.वृत्तपत्रसृष्टीचे मूल्यांकन करीत बाबासाहेब म्हणतात, ‘जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र चालू शकत नाहीत, ही बाब सत्य आहे. तरीसुद्धा वर्तमानपत्रांनी जाहिरातींच्या जाळ्यात फसावे काय आणि कुठवर फसावे? आर्थिक सशक्तीकरणासाठी जाहिरात आवश्‍यक आहे, तरीही जाहिरात प्रकाशित करताना संहितेचे पालन केले पाहिजे.’ वर्तमानपत्राचे महत्त्व विशद करीत बाबासाहेब लिहितात, ‘आधुनिक प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये वर्तमानपत्र उत्तम शासनाचा मूलभूत आधार आहे. ते जनतेला शिक्षित करण्याचे साधन आहे. (मात्र) काही वर्तमानपत्र अज्ञानी लोकांना मूर्ख बनवण्याचे कारखाने बनले आहेत.’ संकुचितपणा, आत्मप्रौढी, तळागाळातील लोकांविषयीची तुच्छता आदी दोषांनी इथली वृत्तपत्रसृष्टी डागाळली होती. बाबासाहेबांनी अशा प्रवृत्तींवर घणाघाती टीका केली आहे. वर्तमानपत्राने समजदारीने, जबाबदारीने सत्याधारित लेखन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निःपक्ष वार्ता देणे वृत्तपत्रांचे सर्वप्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी वेळोवेळी करून दिलेली दिसते. पत्रपंडित बाबासाहेब आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे...


-लेख.डॉ.भाऊ लोखंडे..✍️१४ एप्रिल २०१८...

【 Ref:http://www.esakal.com/sampadakiya/dr-bhau-lokhande-write-dr-babasaheb-ambedkar-article-editorial-109687 】

---------------------------------------------------------------------------------------------------------

2】डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता व पत्रकारिताविषयक दृष्टीकोन...!!


भारत नावाच्या राष्ट्राचे निर्माते, युगनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विस्मयकारक सामाजिक बदल अत्यंत कमी कालावधीत घडवून आणणारे जगाच्या इतिहासातील एकमेव महापुरुष आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार सामाजिकदृष्ट्या अत्यंत खालच्या स्तरातील समजल्या गेलेल्या जातीत जन्मले.अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबात त्यांचे पालन-पोषण झाले.त्यांना घराण्याच्या नावाचा,वंशाचा कोणताही वारसा नव्हता. त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नव्हती.त्यांना स्वपक्षीय आणि स्वजातीय तसेच शत्रुपक्षातील टीकाकार,विरोधक यांचा प्रचंड विरोध आणि आडकाठी होती. अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीत अशक्यप्राय वाटणारे सामजिक आणि राजकीय बदल या महापुरुषाने कसे काय घडवून आणले असावेत? याविषयी जगातील राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना,समाज शास्त्रज्ञाना आणि राजकीय अभ्यासकांना प्रचंड कुतूहल आहे.यामुळे बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाच्या विविध पैलूवर विद्वानांनी व अभ्यासकांनी संशोधन करून प्रचंड लेखन केले आहे. ब्राह्मणी धर्माने व्यक्तीचे कर्तृत्व मोजण्याची मोजपट्टी व्यक्तीचा जन्म कोणत्या जातीत झाला ? ही ठेवली आहे. यामुळे विस्मयकारक बुद्धिमत्ता आणि अनेक क्षेत्रात आभाळाएवढे कर्तृत्व असूनही ब्राह्मणी इतिहासकारांनी/अभ्यासकांनी संबंधित क्षेत्रातील बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेतली नाही.या ब्राह्मणी परंपरेशी इमान राखत, भारतीय पत्रकारितेचा इतिहास लिहिणाऱ्या ब्राह्मणी लेखकांनी, भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात एक वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या, डॉ.आंबेडकरांची दखल घेण्याचे टाळणेच श्रेयस्कर मानले.मात्र आप्पासाहेब रणपिसे,रत्नाकर गणवीर,डॉ.हरिश्चंद्र निर्मळे, प्रा. सुखराम हिवराळे,डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यासारख्या अभ्यासकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे गांभीर्यपूर्वक संशोधन करून बाबासाहेबांच्या प्रगल्भ पत्रकारितेची दखल सर्वाना घेणे भाग पाडले. बाबासाहेबांच्या पत्रकारितेची चर्चा करताना बहुतांश अभ्यासकांनी बाबासाहेबांचे वृत्तपत्रीय लिखाण,लिखाणातून प्रगट होणारी विद्वत्ता,भाषेची ओज,आक्रमकता आणि लिखाणातील पत्रकारितेची वैशिष्ट्ये या बाबींना प्रामुख्याने केंद्रस्थानी ठेवलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेत एका प्रगल्भ पत्रकाराच्या लेखनात असलेली ही सर्व वैशिष्ट्ये आहेतच.मात्र बाबासाहेबांनी उभारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील प्रथम क्रमांकाचे साधन म्हणून बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी बजावलेली ऐतिहासिक कामगिरी, बाबासाहेबांनी स्थान दिलेली वृत्तपत्रीय मते व लेखनसामुग्री, बातम्यांची निवड, वैचारिक आणि सैद्धांतिक भूमिका आणि वृत्तपत्र प्रकाशनाची आर्थिक व व्यावहारिक बाजू या अनुषंगाने फारशी चर्चा किंवा अभ्यास झाल्याचे दिसत नाही." पत्रकार बाबासाहेब" समजून घेताना या मुद्यांचा परामर्श घेतल्याशिवाय बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे यथायोग्य महत्व समजून घेता येणार नाही. बाबासाहेबांची पत्रकारिता ही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन केलेली प्रयोजनलक्ष्यी पत्रकारिता आहे.बाबासाहेबांनी त्यांचा व्यवसाय म्हणून,आवड म्हणून किंवा पत्रकारितेच्या आडोशाने आपल्या वकिलीच्या व्यवसायाला बरकत यावी म्हणून पत्रकारिता केलेली नाही. वृत्तपत्र चालविण्याचे कार्य म्हणजे खिशाला भोक पाडून वरून मोहरा ओतत राहण्याचे काम आहे. बाबासाहेबांच्या काळातील अस्पृश्य समाजाची एकूण शैक्षणिक,आर्थिक आणि वैचारिक स्थिती पाहता या काळात वृत्तपत्रासाठी लेखनसामुग्री गोळा करणे, बातम्यांचे संकलन करणे,वृत्तपत्राचे मुद्रण करणे,वितरण करणे,वर्गणीदार जमविणे या बाबी अत्यंत कठीण आणि जिकिरीच्या होत्या.याही परिस्थितीत बाबासाहेबांनी कर्ज काढून, आर्थिक नुकसान सोसून,सहकाऱ्यांचा रागलोभ सहन करून,वर्गणीदारांच्या तक्रारींना तोंड देऊन वृत्तपत्रे सुरु केली व चालविली. हे पाहता पत्रकारितेच्या क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान केवळ लेखनापुरते मर्यादित नसून वृत्तपत्राच्या निर्मितीसाठी आर्थिक तजवीज तसेच व्यवस्थापन व वितरण या बाबीमध्येही त्यांनाच लक्ष द्यावे लागत होते हे दिसून येते. बाबासाहेबांनी ज्या उद्दिष्टांसाठी पत्रकारिता केली व वृत्तपत्रे चालविली त्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी त्यांची पत्रकारिता आणि वृत्तपत्रे कितपत आणि कशी सहाय्यकारी ठरली ? या अंगाने बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा विचार करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांची वृत्तपत्रे व ती सुरु करण्यामागील प्रयोजन बाबासाहेबांनी आपल्या हयातीत १) मूकनायक ( ३१ जानेवारी १९२० ते २३ ऑक्टोबर १९२० ), २) बहिष्कृत भारत ( ३ एप्रिल १९२७ ते १५ नोव्हेंबर १९२९ ), ३) समता ( २९ जून १९२८ ते १५ मार्च १९२९ ), ४) जनता ( २४ नोवेंबर १९३० ते २८ जानेवारी १९५६ ), ५ ) प्रबुद्ध भारत ( ४ फेब्रुवारी १९५६ ते १ डिसेंबर १९५६ ) अशा एकूण पाच वृत्तपत्राची स्थापना केली.या वृत्तपत्रांचा वापर बाबासाहेबांनी वर्गणी जमा करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी, सनसनाटी बातम्या देण्यासाठी, अत्याचारांच्या घटनांचे भडक वृत्त देऊन सहानुभूती मिळविण्यासाठी किंवा नुसताच क्षोभ निर्माण करण्यासाठी केलेला नाही. बाबासाहेबांनी ही वृत्तपत्रे चळवळीचे मुखपत्र आणि चळवळीच्या सैद्धांतिक बाजूची मांडणी करणारे विचारपत्र म्हणून वापरली. निग्रोंच्या पत्रकारितेपासून प्रेरणा अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील निग्रोंची नागरी स्वातंत्र्याची चळवळ अत्यंत जवळून पाहिली होती. निग्रोंच्या लढ्याचे केंद्र हार्लेम उपनगर होते. अमेरिकेत शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच हार्लेम उपनगरात वास्तव्यास होते. निग्रोंच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक उत्थानासाठी डब्ल्यू.इ.बी.ड्यू-बोईस यांनी 1909 साली `नॅशनल असोशिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल' नावाच्या संघटनेची स्थापना केली.या संघटनेतर्फे `द क्रायसिस ' नावाचे मुखपत्र सुरू केले या मुखपत्रातून निग्रोंवरील अत्याचाराच्या घटना, सरकारशी वैधानिक पद्धतीने सुरू केलेल्या संघर्षाच्या बातम्या आणि निग्रोंचे लढाऊ संघटन उभे करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन सुरू केले. निग्रोंना गोऱ्यांच्या गुलामीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी खेड्यातून शहरांमध्ये स्थलांतर केले पाहिजे यासाठी `द क्रायसिस ' मधून प्रभावी प्रचार सुरू करण्यात आला. सन १९११ ते १९२० या कालावधीत `द क्रायसिस ' या नियतकालिकाने अमेरिकेतील निग्रोंचे विश्व ढवळून काढले होते. डब्ल्यू.इ.बी.ड्यू-बोईस यांचे दुसरे एक सहकारी रॉबर्ट ऍबॉट यांनी`द शिकागो डिफेंडर' नावाचे नियतकालिक सुरू करून निग्रोंनी ऊसाच्या आणि कापसाच्या मळ्यात काम करण्याचा पारंपारिक व्यवसाय सोडून देऊन मोठ्या शहरात स्थलांतर केले पाहिजे यासाठी जागृती सुरू केली.मार्कस गार्वी यांनी त्यांच्या " निग्रो वर्ल्ड '' या नियतकालिकांतून निग्रोंवरील अत्याचार,निग्रोंची स्थिती व त्यासाठी जबाबदार असलेली गोऱ्यांची मानसिकता यावर सडेतोड लेखन सुरु केले.निग्रोंच्या या नागरी स्वातंत्र्याच्या लढ्याला `हार्लेम रिनेसन्स' या नावाने ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच चळवळीकडे दृष्टीक्षेप टाकल्यास त्यांच्यावर `हार्लेम रिनेसन्स'चा मोठा प्रभाव असल्याचे जाणवते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पाहिले वृत्तपत्र मूकनायक आणि त्यानंतरचे वृत्तपत्र ‘ बहिष्कृत भारत ’ यातून, तत्कालीन अस्पृश्यांना स्वच्छ राहणीमान ठेवण्याचे केलेले आवाहन, गावकीची पारंपारिक कामे सोडण्याबाबत केलेले आवाहन, महार वतने रद्द करून रोखीने वेतन घेणारा नियमित गावकामगार म्हणून महारांची नेमणूक करण्यात यावी यासाठी धरलेला आग्रह या सर्व बाबी पाहिल्या तर त्यांनी निग्रो नेत्यांच्या उपरोक्त पत्रकारितेतून प्रेरणा घेतली असावी असे वाटून जाते. अमेरिका व इंग्लंडमध्ये पाच वर्षे वास्तव्य करून भारतात परतल्यानंतर दुसऱयाच वर्षी म्हणजे १९१९ सालच्या जानेवारी महिन्यात भारतीयांना विशेष राजकीय हक्क प्रदान करण्यासाठी लॉर्ड साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात आलेली होती.या समितीने एकूण ३६ लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. या ३६ जणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होते. साऊथबरो समितीला त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काच्या मागणीचे पहिले निवेदन दिले.होते.या निवेदनामध्ये त्यांनी निग्रोंच्या चळवळीचा सविस्तर उहापोह केला आहे. अमेरिकेत विद्यमान असलेल्या विभिन्न सामाजिक भेदभावांसह अमेरिकेत प्रातिनिधिक सरकार स्थापन होऊ शकते तर भारतात का नाही? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय चळवळीचा पाया घातला. या राजकीय हक्कांच्या मागणीला पाठबळ मिळविण्यासाठी त्यांनी मूकनायक वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली.मूकनायक सुरु करण्यामागची एक प्रेरणा त्यांना कदाचित अमेरिकेतील निग्रोंच्या लढ्यात त्यांच्या मुखपत्रांनी बजावलेली भूमिका पाहून मिळालेली असू शकते.मूकनायक वृत्तपत्र सुरु करताना बाबासाहेबांनी आपल्या पहिल्याच अग्रलेखात जी भूमिका मांडली त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, " बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तीचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच नाही." याच अग्रलेखात त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, " दीनमित्र,जागरूक,डेक्कन रयत,विजयी मराठा,ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते.परंतु ब्राह्मणेत्तर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो ; त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही,हे ही पण उघड आहे.त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यासाठी एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबुल करील." या भूमिकेतून हे स्पष्ट होते की बाबासाहेबांचा वृत्तपत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बातमी देणारे वृत्तपत्र नव्हे तर चळवळ बांधणारे मुखपत्र निर्माण करण्याचा होता. समाजभिमुख पत्रकारितेचा आदर्श बाबासाहेबांची पत्रकारिता आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेली वृत्तपत्रे पत्रकारितेच्या रूढ संकल्पनांना ठोकरून लावणारी आहेत.त्यांनी भारतातील ब्राह्मणी धर्म व या धर्माने जोपासलेली अमानवीय वर्णव्यवस्था यांच्याविरोधात जो घनघोर क्रांतीलढा उभारला त्या क्रांतीलढ्याचा जिवंत आलेख या वृत्तपत्रातून पहावयास मिळतो.मुकनायकातील , "स्वराज्याची सर सुराज्याला नाही, हे स्वराज्य नव्हे,हे तर आमच्यावर राज्य, स्वराज्यातील आमचे आरोहण '' या अग्रलेखातून त्यांनी अस्पृश्यांच्या राजसत्तेतील सहभागाचा प्रखर युक्तिवादाच्या आधारे पुरस्कार केला आहे.मूकनायक वृत्तपत्रातून अस्पृश्यांच्या संदर्भात महत्वाचे असलेल्या ब्रिटन आणि भारतामधील महत्वाच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या मतांचे संकलन प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसते.सभोवताल घडणाऱ्या महत्वाच्या राजकीय घडामोडींचे अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून केलेले विश्लेषण हे सुद्धा एक वेगळे वैशिष्ट्य यात दिसते. ५ जुलै १९२० रोजी बाबासाहेब आपले पुढील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले.यामुळे मूकनायक पुढे फार काळ सुरु राहिले नाही.२३ ऑक्टोबर १९२० नंतर ते बंद पडले. आपले उच्च शिक्षण पूर्ण करून १४ एप्रिल १९२३ रोजी बाबासाहेब भारतात परत आले. परत आल्यानंतर मूकनायक पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु विलायतेला जाण्यापूर्वी ज्या ज्ञानदेव धृवनाथ घोलप यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांनी वाद निर्माण केला. यामुळे हे वृत्तपत्र त्यांना पुन्हा सुरु करता आले नाही. १९- २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळ्याचे पाणी बाटविल्याच्या आरोपांवरून जो धर्मसंगर झाला त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची स्थापना ३ एप्रिल १९२७ रोजी केली. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र म्हणजे मानव मुक्तीसाठी बाबासाहेबांनी उभारलेल्या लढ्यातील जहाल अस्त्र होय. बहिष्कृत भारतातील बाबासाहेबांचे अग्रलेख म्हणजे विद्वातापूर्ण, ज्वलज्जहाल वृत्तपत्रीय लेखनाचा सळसळता आविष्कार आहे. ‘ महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी’ , ‘ महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी’, ‘महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची कर्तव्ये’ या तीन भागात लिहिलेल्या अग्रलेख मालिकेतून त्यांनी महाडच्या धर्मसंगराच्या तीनही बाजूंचा परामर्श घेतला.या अग्रलेख मालिकेतून भारतातील जातीय विषमतेची त्यांनी केलेली कारण मीमांसा व ही विषमता नष्ट करण्याची उपाययोजना यावर केलेली चर्चा ही आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ," आप घरी बाटा, बाप घरीही बाटा ! , अस्पृशता व सत्याग्रहाची सिद्धी,अस्पृशोन्नतीचा आर्थिक पाया, समतेसाठीच ही विषमता इत्यादी अग्रलेखातून त्यांनी दलितांच्या स्वाभिमानाच्या चळवळीच्या अनुषंगाने काही पायाभूत संकल्पनांची मांडणी केली आहे. बहिष्कृत भारतातील लेखनातून चळवळीला मार्गदर्शक लेखन करताना चळवळीशी बांधिलकी मानणाऱ्या पत्रकारांनी कशा प्रकारची मांडणी केली पाहिजे याची दिशादर्शक सूत्रे सापडतात.सामाजिक बांधिलकी जोपासत चळवळीचा सहाय्यक पत्रकार म्हणून ज्यांना काम करायचे आहे त्यांनी मार्गदर्शक लेखन म्हणून बहिष्कृत भारतातील '' आजकालचे प्रश्न '' आणि '' प्रासंगिक विचार '' या सदरातील लेखनाचा जरूर अभ्यास केला पाहिजे.बाबासाहेबांनी '' आजकालचे प्रश्न '' आणि '' प्रासंगिक विचार '' या सदरातून केलेले स्फुट लेखन म्हणजे अकाट्य तर्क आणि बिनतोड युक्तिवादाचा कळस गाठणाऱ्या लेखनशैलीचा परमोच्च आविष्कार आहे. सळसळता त्वेष,बोचरी परंतु सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडणारी टीका, कोणताही शिवराळपणा न करता समोरच्यांना गप्पगार करणारे शब्द, उपहास,उपरोध,कोट्या,म्हणी यांचा चपखलपणे केलेला प्रचुर वापर आणि कोणतीही भीडमुर्वत न ठेवता ब्राह्मणवादाची केलेली चिरफाड ही बाबासाहेबांच्या पत्रकारीय लेखनाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत.बहिष्कृत भारतात केलेल्या लेखनातून बाबासाहेबांनी भारताच्या सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,आर्थिक,शैक्षणिक,राजकीय स्थितीविषयी मूलगामी स्वरूपाचे विश्लेषण केले आहे. चळवळीच्या मार्गदर्शक वृत्तपत्राची भूमिका कशी असावी याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र व त्यातील बाबासाहेबांचे मार्गदर्शन याला तोड नाही. दृढनिश्चयी पत्रकार बहिष्कृत भारत चालविताना बाबासाहेबांनी वैचारिक प्रगल्भ पत्रकारितेचा कळस गाठला.मात्र दुसरीकडे बहिष्कृत भारताची व्यावहारिक बाजू सांभाळताना त्यांना प्रचंड त्रास झाला. बहिष्कृत भारताला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर बऱ्यापैकी कर्ज झाले. वृत्तपत्र डबघाईस आले. यासाठी त्यांनी समाजकार्याप्रती अनास्था बाळगणारे शिकलेले लोक ( त्या काळात शिक्षक ) यांना जबादार धरले आहे. स्वार्थत्याग करण्यास तयार नसलेल्या किंवा लौकिक म्हणजेच सामाजिक ऋणाची जाणीव नसलेल्या बहिष्कृत वर्गातील लोकांच्या वागणुकीबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ३ फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात त्यांनी " बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय ?" या शीर्षकाचा अग्रलेख लिहून चळवळीसाठी वृत्तपत्र चालविताना काय यातना सहन कराव्या लागतात याचे हृदय पिळवटून टाकणारे वर्णन केले आहे.वृत्तपत्राचे आर्थिक गणित जुळविण्यासाठी शक्य तितकी काटकसर करून, कमीतकमी नोकर व सहाय्यक ठेऊन, टपाल खर्चात बचत करून रात्रंदिवस एकहाती लेखन करून बहिष्कृत भारत बाबासाहेबांनी सतत वर्षभर चालविले याचा लेखाजोखा त्यांनी या अग्रलेखात दिला आहे.सहज मिळू शकणारी उच्च पगाराची नोकरी लाथाडून,व्यवसायासाठी उपयोगी पडू शकणाऱ्या स्पृश्य मित्रांशी दुरावा पत्करून, स्वतःच्या प्रकृतीकडे,सुखाकडे,चैनीकडे,कुटुंबाकडे दुर्लक्ष करून सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करून हे वृत्तपत्र कसे सुरु ठेवले आहे याची जाणीव ज्यांच्या भल्यासाठी आणि हितासाठी ते चालविण्यात येत आहे त्या लोकांनी ठेवली पाहिजे अशी अपेक्षा बाबासाहेब या अग्रलेखात व्यक्त करतात. मात्र आपण हे सर्व करतो म्हणजे आपण समाजावर फार मोठे उपकार करीत आहोत असा अहंकाराचा लवलेश सुद्धा या महामानवात आढळून येत नाही. आपल्या अवनत स्थितीची जाणीव होण्यासाठी,आपल्या सामाजिक आणि राजकीय हक्काच्या मागणीसंदर्भात सरकारकडे आपले म्हणणे पोहोचविण्यासाठी.स्पृश्य लोकांनी चालविलेला बुद्धिभेद व त्यांचे आक्षेप यांचे खंडन करण्यासाठी बहिष्कृत भारतासारखे निर्भीड वर्तमानपत्र असल्याशिवाय चालणार नाही, असे ते लिहितात.हे वृत्तपत्र बंद झाले तरी हरकत नाही अशी कल्पनासुद्धा करवत नाही असे ते नमूद करतात. यावरून समाजभिमुख पत्रकारितेप्रती त्यांची असलेली तळमळ आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी चालेल परंतु पत्रकारिता सोडणार नाही असा हाडाच्या पत्रकाराचा दृढनिश्चय त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता हे दिसून येते. या अग्रलेखातील विवेचनावरून बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा उद्देश काय होता हे स्पष्ट होते. आज आंबेडकरी समाजाच्या भल्यासाठी पत्रकरिता करण्याचा दावा करणारे अनेक पत्रकार आहेत. या पत्रकारांनी " बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय ?" हा अग्रलेख पुन्हा -पुन्हा वाचून आपल्या पत्रकारितेची जातकुळी कोणती आहे याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. समता आणि जनता वृत्तपत्राचा प्रपंच बहिष्कृत भारत सुरु असतानाच बाबासाहेबांनी समाज समता संघाचे मुखपत्र म्हणून " समता " नावाचे पाक्षिक सुरु करण्यास संमती दिली.समता पाक्षिकाचा पहिला अंक २९ जून १९२८ रोजी प्रसिद्ध झाला आणि अंतिम अंक १५ मार्च १९२९ रोजी निघाला.डॉ.भीमराव आंबेडकर, एम.ए., पी.एच.डी., डी.एससी. ,बार-अॅट- लाॅ यांच्या नेतृत्वाखाली निघणारे समाज समता संघाचे मुखपत्र असे या वृत्तपत्राच्या दर्शनी पृष्ठावर ठळकपणे लिहिले जात असे.या वृत्तपत्राच्या सर्वच अंकातून " समता " या संकल्पनेची विस्तृत चर्चा करण्यात करण्यात आली आहे. समता वृत्तपत्र चालविण्यासाठी स्पृश्य जातीत जन्मलेले परंतु बाबासाहेबांच्या चळवळीशी समरस झालेले ग.नी.सहस्त्रबुद्धे,भा.वि.प्रधान, द.वि.प्रधान,भा.र.प्रधान,रा.दा.कवळी,पी.पी.ताम्हाणे, आर.एन भाईंदरकर, दे.वि.नाईक यांनी प्रचंड मेहनत घेतली.आर्थिक अडचणीमुळे बहिष्कृत भारत व समता ही वृत्तपत्रे फार काळ जिवंत राहू शकली नाहीत.मात्र यामुळे बाबासाहेबांमधील दृढनिश्चयी पत्रकार नाऊमेद झाला नाही. समोर गोलमेज परिषदांचे आव्हान उभे ठाकले होते. या स्थितीत वर्तमान पत्राशिवाय चळवळ जिवंत ठेवणे आणि मजबूत करणे शक्य होणार नाही हे ओळखून बाबासाहेबांनी ' जनता " या नावाने नवीन पाक्षिक वृत्तपत्र सुरु करण्याची घोषणा २ ऑक्टोबर १९३० च्या दसऱ्याच्या दिवशी केली. या वृत्तपत्राचे संपादकत्व त्यांनी समता वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पाहिलेले देवराव विष्णू नाईक यांच्याकडे सोपविले.'' गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल '' हे घोषवाक्य घेऊन जनता पत्राचा उदय झाला.पुढील २५ वर्षे जनता पत्राने आपले हे घोषवाक्य सार्थ ठरवीत भारतातील ब्राह्मणी धर्माच्या गुलामीत जखडल्या गेलेल्या गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देत या गुलामगिरीविरुद्ध बंड करण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये जागविली. जनता हे वृत्तपत्र सुरुवातीला पाक्षिक होते.मात्र एक वर्ष पूर्ण होताच त्याचे साप्ताहिकात रुपांतर करण्यात आले.साप्ताहिक स्वरुपात '' जनता '' २८ जानेवारी १९५६ पर्यंत अव्याहतपणे सुरु होते. जनता वृत्तपत्र म्हणजे डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीची बखर आहे. अस्पृश्यांचे राजकीय हक्क,पुणे करार, गांधी आणि कॉंग्रेसने भारतीय राजकारणाचा केलेला विचका, भांडवलशाही,साम्राज्यशाही यांच्याविरुद्ध भारतीय श्रमजीवी वर्गाने घ्यावयाची भूमिका, इंग्रजांचे अस्पृश्याच्या हितासंबंधीचे बोटचेपे धोरण,रशियन राजकीय धोरण व साम्यवाद, इंग्रजांच्या राजकीय धोरणांचे विश्लेषण,मुस्लिम राजकारण, अशा अनेक विषयावर बाबासाहेबानी केलेले सडेतोड लेखन त्यांच्यातील प्रज्ञावंत निबंधकाराची ग्वाही देतात. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय लेखनाचा एक विशेष पैलू म्हणजे प्रत्येक विषयाचे जागतिक संदर्भ पडताळून स्थितीची केलेली कारणमीमांसा आणि बिनतोड युक्तिवादाच्या आधारे विरोधी मताचे खंडन करून आपल्या मताला पुराव्याच्या आधारे प्रस्थापित करणे हा आहे .वृत्तपत्रीय लेखनाचा हा गुणविशेष भारतीय पत्रकारितेत अभावानेच आढळतो. याचे कारण बाबासाहेब हे प्रकांड बुद्धीचे संशोधक,प्रज्ञावंत वकील आणि दृढनिश्चयी समाजक्रांतिकारक होते हे असले पाहिजे.मराठी पत्रकारसृष्टीने ज्यांना झुंजार पत्रकार, व्यासंगी निबंधकार म्हणून गौरविले आहे त्यांच्या निबंधाची शैली केवळ शब्दांचे फुलोरे फुलविणारी आणि भावनेला आवाहन करीत तर्क आणि अभ्यास याला दुय्यम स्थान देणारी टिळकपंथीय अहंकारी पत्रकारिता आहे.या टिळकपंथीय पत्रकारांपैकी कोणीही पत्रकार बाबासाहेबांच्या व्यासंगी आणि बेधडक पत्रकारितेच्या आसपासही फिरकत नाहीत. जानेवारी १९५६ मध्ये जनता पत्र बंद करून " प्रबुद्ध भारत " या साप्ताहिक पत्राची निर्मिती बाबासाहेबांनी केली.प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून जनतेला ज्ञानसंपन्न म्हणजेच प्रबुद्ध बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.प्रबुद्ध भारत म्हणजे बाबासाहेबांच्या बौद्ध धर्म स्वीकाराच्या घडामोडीचा आलेख आहे.बौद्ध धम्माच्या स्वीकारासाठी समाजमन संस्कारित करण्याचे आणि वातावरण निर्मिती करण्याचे महान कार्य प्रबुद्ध भारताने केले. याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ, रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी, कॉंग्रेसच्या सत्तालोलुप राजकारणाचा पर्दाफाश करण्याचे कार्य प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून करण्यात आले. बाबासाहेबांचा पत्रकारिताविषयक दृष्टीकोन वृत्तपत्रे,प्रसारमाध्यमे आणि पत्रकारिता यांच्याबाबतीत आंबेडकरवादी जनतेमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज रुजले आहेत." चळवळीसाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते,ज्या चळवळीला स्वतःचे वृत्तपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षासारखी असते," ही वाक्ये आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेते आणि कार्यकर्ते वारंवार उच्चारताना आढळतात.मात्र आंबेडकरी चळवळीतील मातब्बर राजकीय नेते, मजबूत राजकीय-अराजकीय संघटना तसेच धार्मिक संघटना यांनी स्वतःची दखलपात्र प्रसारमाध्यमे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. आंबेडकरी समाजात समाजाची गाऱ्हाणी मांडणारी,चळवळीला दिशा देणारी,विरोधी मतांना खणखणीत प्रत्युत्तर देणारी प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे असावीत ही सार्वत्रिक भावना आहे.मात्र या भावनेचा व्यापार करणारे अनेक व्यापारी पत्रकार आणि प्रवचनकार अलीकडे उदयास आले आहेत.अन्याय अत्याचारांच्या घटनांचे भडक वृत्त छापून रुदन करणे,रात्रंदिवस बाबासाहेबांचा व बुद्ध धर्माचा नामजप करणे म्हणजेच आंबेडकरी पत्रकारिता करणे असा या धूर्त व्यापाऱ्यांचा समाज आहे. लोकसुद्धा अशाच लबाड लोकांना महान आंबेडकरवादी पत्रकार म्हणून गौरवितात तेव्हा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे लोक बाबासाहेबांच्या ध्येय्यवादी आणि व्यासंगी पत्रकारितेविषयी किती अनभिज्ञ आहेत याची प्रचिती येते. आंबेडकरी पत्रकारिता म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी आरंभीलेला उद्योग नाही. हे समजून घेण्यासाठी बाबासाहेबांनी "रानडे गांधी आणि जिन्ना " या सुप्रसिद्ध भाषणात भारतातील पत्रकारितेविषयी केलेले भाष्य लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणतात, " एकेकाळी पत्रकारिता हा एक प्रतिष्ठित पेशा होता. परंतु आता तो व्यापार झाला आहे. एखाद्याने विकण्यासाठी साबण बनवावा यापेक्षा अधिक नैतिक कार्य या पत्रकारितेत उरलेले नाही.ती आता जनतेच्या जबाबदार मार्गदर्शकाची भूमिका निभावत नाही. बातमी देताना ती अतिरंजित नसावी,त्यामागे दुष्ट हेतू नसावा याचे भान ती बाळगत नाही. सरकारने आखलेले धोरण जनतेच्या आणि समुदायाच्या हिताचे नसेल तर मग ते कितीही उच्च पदावरील व्यक्तीने ठरविलेले असेल याची तमा न बाळगता त्यावर न घाबरता तुटून पडले पाहिजे, योग्य धोरण कोणते असावे यासाठी निर्भीडपणे मत व्यक्त केले पाहिजे हे आपले प्रथम आवश्यक कर्तव्य आहे असे भारतीय पत्रकारिता मानत नाही. एखाद्याला नायकत्व बहाल करणे आणि त्याचे पूजन करणे हेच आपले परम कर्तव्य असल्याचे भारतीय पत्रकारितेने ठरविले आहे.सनसनाटी निर्माण करण्याच्या कुहेतुने बेजबाबदार वृत्त देणे,सहेतुक स्वार्थ ठेऊन लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या तर्कहीन अफवा पसरविणे यात भारतीय पत्रकारिता रममाण झाली आहे. भारतीय पत्रकारिता म्हणजे वाजंत्र्यांनी आपल्या नायकाचा गाजावाजा करण्यासाठी ढोल बडविणे होय. भारतीय पत्रकारितेने नायकपूजेसाठी इतक्या मुर्खतम पातळीवर जाऊन देशाच्या हिताशी यापूर्वी कधीच सौदा केलेला नव्हता.आजचा भारत नायक पूजेच्या कैफाने आंधळा झाला आहे व त्यास भारतीय पत्रकारिता जबाबदार आहे." ( BAWS, Vol 1, पृष्ठ 227 ) बाबासाहेबांनी हे विचार १८ जानेवारी १९४३ रोजी मांडले आहेत.मात्र ते आजही तंतोतंत खरे आहेत.या भाष्यातून बाबासाहेबांचा स्वतःचा भारतीय पत्रकारितेविषयीचा दृष्टीकोन काय होता हे स्पष्ट होते. आंबेडकरी अनुयायांना खऱ्या अर्थाने पत्रकार बाबासाहेब समजून घ्यायचे असतील आणि स्वतःची दखलपात्र प्रसारमाध्यमे स्थापन करून सामुदायिक हित साध्य करायचे असेल तर बाबासाहेबांचे केवळ पत्रकारीय लेखनच नव्हे तर त्यांचा पत्रकारितेविषयीचा समग्र दृष्टीकोन समजावून घेण्याची आज नितांत गरज आहे...

- Article By- सुनील खोब्रागडे...✍️
 संपादक,दैनिक जनतेचा महानायक
---------------------------------------------------------------------------------------------------------------


3】 आपले वृत्तपत्र हां व्यवसाय नव्हे तर समाज प्रबोधनकार्यासाठी स्वीकारलेले ते एक प्रकारचे दिव्य आहे.....बहिष्कृत भारताची संपादकी हा तर पत्राच्या संपादकी प्रमाने पैसे कमविन्याचा धंदा नसून ही लोकजागृतीकरिता घेतलेली स्वयंदीक्षा आहे.अस्पृश्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून तर दिलीच पाहिजेपरंतु त्याच्यावर होणार्या अन्याय-अत्याचाराला प्रखरपने वाचा फोडन्याची गरज आहे .आणि त्यासाठी नुसते थंडपने न बसता आपल्या पत्रातून जनजागरण करने हेच सर्वाथाने हितावह आहे...

-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर.....✍📚
【Ref-बहिष्कृत भारत 3 फेब्रुवारी 1928】
-------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!