बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी अ‍ॅड.बी.सी.कांबळे...व त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान...!!!


1] बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बी.सी.कांबळे...

उद्या (दि. १५) रिपब्लिकन नेते अ‍ॅड . बी. सी. उर्फ बापूसाहेब कांबळे यांची जन्मशताब्दी आहे. संपादक, वक्ता, संसदपटू, घटनातज्ज्ञ, बाबासाहेबांचे चरित्रकार व त्यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार असणाऱ्या कांबळे यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख...

१९४६ साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ साली पुणे येथे 'पुणे करार रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच इतिहासात 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात तीन सत्याग्रह केले. त्यातील पहिला होता १९२७ सालचा महाडचा सत्याग्रह. पाण्यासाठी केलेला हा सत्याग्रह मूलभूत मानवी हक्कांसाठी होता. दुसरा सत्याग्रह म्हणजे १९३० ते ३५ सालापर्यंत केलेला काळाराम मंदिराचा सत्याग्रह. हा समाज धार्मिक हक्कांसाठी होता. तिसरा व शेवटचा सत्याग्रह 'पुणे करार रद्द करा'चा होता. बाबासाहेबांनी राजकीय हक्कांसाठी आपल्या आयुष्यात केलेला हा एकमेव सत्याग्रह होता. या सत्याग्रहाचे एवढे अनन्य साधारण महत्त्व आहे. दुर्दैवाने पहिल्या दोन सत्याग्रहांइतके यावर लिखाण व संशोधन झाले नाही. हा सत्याग्रह त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या मानाने काहीसा उपेक्षित व दुर्लक्षित राहिला...
या सत्याग्रहाचे मुख्य केंद्र पुण्याच्या नाना पेठेतील अहिल्याश्रम बोर्डिंग व राजाभाऊ भोळे यांचा 'जोसेफ हाउस' बंगला होता. सत्याग्रहींच्या तुकड्या रोज भीमपुऱ्यातील (पुणे कॅम्प) कडबाफडई येथून निघून कौन्सिल हॉलकडे जात. पोलिस त्यांना बोलाई चौकात (हल्लीचा जिल्हा परिषद चौक) अडवत व सत्याग्रही स्वत:ला अटक करवून घेत. सत्याग्रह सुरू झाला त्या दिवशी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे जनरल सेकेटरी पा. ना. राजभोज, दादासाहेब गायकवाड, शांताबाई दाणी, लळींकर, आर. डी. भंडारे, राजाभाऊ भोळे आदी नेते व हजारो आंबेडकर अनुयायी जमले होते. या सत्याग्रहाची मुख्य घोषणा होती, 'पुणे करार रद्द करा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिरायु होवोत!'

हा सत्याग्रह ऐन जोमात सुरू असताना, त्या वेळच्या मुंबई राज्याचे मुख्यप्रधान (मुख्यमंत्री) बाळासाहेब खेर यांनी मुंबई असेंब्लीत 'हा सत्याग्रह का व कशासाठी आहे हेच मला कळत नाही,' असे मानभावी विधान केले. खरेतर बाबासाहेबांचा हा सत्याग्रह कशासाठी आहे, हे ते चांगलेच ओळखून होते. त्या विधानाला उत्तर म्हणून त्यावेळी पुण्याच्या लॉ कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या बी. सी. कांबळे यांनी 'दलित सत्याग्रहींची कैफियत' नावाचा लेख 'आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स'चे एक सभासद या नात्याने लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक विचारांचा रीतसर अभ्यास करून, त्यांचा समाजात प्रसार व प्रचार करण्यासाठी अहिल्याश्रम, पुणे येथील विद्यार्थ्यांनी ३० जुलै १९४४ रोजी 'आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ भोळे व जनरल सेक्रेटरी भास्करराव भोसले होते. बी. सी. कांबळे, गुंडोपंत माने, शंकरराव खरात, एन. एम. कांबळे असे 'अहिल्याश्रम'चे त्यावेळचे सर्व विद्यार्थी त्यात सहभागी होते. या संस्थेचे औपचारिक उद्घाटन ३ ऑक्टोबर १९४७ रोजी स्वतः बाबासाहेबांनी केले होते.

आंबेडकर स्कूलचे सभासद असणाऱ्या कांबळे यांनी लिहिलेला 'दलित सत्याग्रहींची कैफियत' हा लेख मराठीतील त्यावेळच्या अग्रगण्य अशा 'किर्लोस्कर' मासिकाकडे पाठवला. त्याचे संपादक शंकरराव किर्लोस्कर हे एक पुरोगामी, सुधारणावादी व सामाजिक दृष्टिकोन असलेले होते. त्यांनी १९३३ साली मासिकातर्फे 'अस्पृश्यता निवारण विशेषांक' काढला होता. बाबासाहेबांच्या काही गाजलेल्या मुलाखती 'किर्लोस्कर' मासिकाने घेतल्या व छापल्या होत्या. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनामध्ये 'किर्लोस्कर' मासिकाचे फार मोठे योगदान आहे. शंकरराव किर्लोस्कर यांचे किर्लोस्करवाडी हे गाव कांबळे यांच्या पलुस या गावाजवळच होते. त्यामुळे आपल्या सातारा जिल्ह्यातील (त्यावेळी सांगली जिल्हा साताऱ्यातच होता) विद्यार्थ्याने एवढा चांगला लेख लिहिला आहे, हे पाहून ते खूष झाले. कांबळे यांना उत्तेजन देण्यासाठी तो लेख नोव्हेंबर १९४६च्या 'किर्लोस्कर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. लेखात 'पुणे सत्याग्रहा'ची भूमिका मांडतांना कांबळे म्हणतात, 'हुजऱ्या होण्याचे येथून पुढे नाकारून, हुजूर होण्यासाठी हा सत्याग्रह आहे. गांधीजींनी १९३२ साली केलेल्या उपासात अन्न खाल्ले नसले, तरी अस्पृश्यांचे राजकीय हक्क खचितच गिळंकृत केले आहेत, हे जगाच्या न्यायासनापुढे मांडण्यासाठी हा सत्याग्रह आहे.' कांबळे यांचा संपूर्ण लेखच वाचण्यासारखा आहे. नंतर एकदा कांबळे यांनी मला सांगितले, की त्यांनी तो लेख गावी सुट्टीवर आल्यानंतर घरासमोरच्या आंबाच्या झाडाखाली बसून लिहिला होता...

हा लेख 'किर्लोस्कर' मासिकात छापून आला. आंबेडकर स्कूलच्या सर्वच मित्रांनी वाचला व त्यांना तो आवडला; कारण चांगले ते चांगलेच असते! भास्करराव भोसलेंना देखील तो आवडला. त्यांनी 'किर्लोस्कर' मासिकाच्या दोन प्रती विकत घेतल्या. त्यातील एक प्रत बाबासाहेबांना दिली व सांगितले, 'आमच्या एका मित्राने यात आपल्या सत्याग्रहाची नैतिक बाजू मांडणारा चांगला लेख लिहिला आहे. तो वाचा.' भास्कररावांच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेबांनी कांबळे यांचा लेख वाचला. भास्करराव त्यावेळी मुंबईला टेक्सटाइल डिपार्टमेंटमध्ये कामाला होते. पुढे १९४८ साली ते आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी म्हणून गेले व शेवटी स्टेशन डायरेक्टर झाले...

बाबासाहेबांना लेख आवडला. त्यांनी भास्कररावांना बोलावून घेतले व चौकशी केली. बाबासाहेब म्हणाले, 'कोण रे हा? कुठे असतो? पाहा त्याने कसा छान सुटसुटीत व सोप्या भाषेत लेख लिहिला आहे. नाहीतर तुझी ती टिळक-चिपळूणकरी लांबलचक पल्लेदार वाक्यांची शैली आपल्या जनतेला काही कामाची नाही. तिच्या ती डोक्यावरून जाईल. (बाबासाहेब असे म्हणण्याचे कारण, १९४४ साली भास्करराव म्हणजे बी. बी. भोसले व गुंडोपंत म्हणजे जी. बी. माने यांनी आंबेडकर स्कूल तर्फे 'आमदार राजाभाऊ भोळे यांची परदेशातील कामगिरी' नावाचे भोळेंच्या इंग्लंड, अमेरिकेतील भाषणांचा अनुवाद करणारे पुस्तक लिहिले होते. ते कोल्हापूरच्या दादासाहेब शिर्के यांच्या 'गरूड प्रकाशना'ने प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे संपादकीय भास्कररावांनी लिहिले होते. त्यातील पहिलेच वाक्य एका परिच्छेदाचे होते व बाबासाहेबांनी ते वाचले होते.) अशा सोप्या, सरळ व बाळबोध भाषेत लिहिणाऱ्या माणसाची आपल्या 'जनता पत्रा'ला गरज आहे. याला बोलावून घे आणि मला भेटायला घेऊन ये.'..
बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे भास्कररावांनी कांबळे यांना पत्र पाठवून मुंबईला बोलावून घेतले. त्यावेळी कांबळे हे कोल्हापूर येथे शिक्षकाचे काम करत होते. मुंबईला आल्यावर त्यांना सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये ठेवून घेतले. हवापाण्यात बदल झाल्यामुळे ते आजारी पडले; तेव्हा त्यांना लोणावळ्याच्या कैवल्य धाममध्ये उपचारासाठी पाठवले. तिकडून बरे होऊन आल्यानंतर बाबासाहेबांसमोर त्यांना 'अप टू डेट' हजर करण्यासाठी, हॉस्टेलच्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून नवीन सूट व बूट घेऊन दिला. त्यानंतर बाबासाहेबांची ओळख करून देण्यासाठी भास्करराव त्यांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये घेऊन गेले. सिद्धार्थ कॉलेज तेव्हा मरिन लाइन्सच्या हटमेंटसमध्ये भरत असे...

बाबासाहेबांकडे गेल्यावर भास्करराव म्हणाले, 'बाबासाहेब, हाच तो आमचा 'किर्लोस्कर' मासिकात लेख लिहिणारा मित्र बी. सी. कांबळे.' त्यावर बाबासाहेब म्हणाले, 'तुझा तो लेख मी वाचला. तो मला आवडला. तू आपल्या जनता साप्ताहिकाचा संपादक होशील का?' त्यावर कांबळे यांनी पुढचा मागचा विचार न करता तत्काळ होकार दिला. या ऐतिहासिक भेटीच्या वेळी सिद्धार्थ कॉलेजचे ग्रंथपाल शां. शं. रेगे, पी. टी. बोराळे व टी. टी. तायडे हेदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर बाबासाहेबांनी यथावकाश १९४८साली तेव्हाचे संपादक आर. डी. भंडारे यांच्या जागी कांबळे यांना 'जनता'चे संपादक नेमले. १९४८ ते १९५४ पर्यंत कांबळे हे 'जनता साप्ताहिका'चे संपादक होते. बाबासाहेबांच्या सानिध्यात आल्यामुळे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे जसे सोने होते, तसे कांबळे यांचे अवघे जीवन उजळून निघाले...

अशा प्रकारे कांबळे यांना प्रकाशात आणण्यासाठी माझे वडील भास्करराव भोसले हे कारणीभूत झाले. कांबळे यांचा 'दलित सत्याग्रहींची कैफियत' नावाचा लेख भास्कररावांनी बाबासाहेबांना दाखवला; त्या लेखातच वकील बी. सी. कांबळे, लेखक बी. सी. कांबळे, पुढारी बी. सी. कांबळे, बाबासाहेबांचे चरित्रकार व भाष्यकार बी. सी. कांबळे इत्यादी त्यांनी पुढे पार पाडलेल्या विविध भूमिकांची चुणूक दिसते. यामध्ये एक योगायोगही आहे. ज्या पुणे सत्याग्रहाच्या समर्थनार्थ कांबळे यांनी हा लेख लिहिला व प्रसिद्धीस आले, तो पुणे सत्याग्रह १५ जुलै १९४६ रोजी सुरू झाला आणि कांबळे यांची जन्मतारीख देखील १५ जुलै १९१९ आहे...

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५० वर्षे कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीला एक चांगला संपादक, वक्ता, संसदपटू, घटनातज्ज्ञ, लेखक व अनुवादक, बाबासाहेबांचा चरित्रकार व त्यांच्या तत्वज्ञानाचा भाष्यकार मिळाला. कांबळे १९५२ ते १९५७ या काळात मुंबई असेंब्लीत शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आमदार होते. या काळात त्यांनी विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकाकी लढा दिला व तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना सळो की पळो करून सोडले. ते १९५७ ते १९६२ व १९७७ ते १९७९ असे दोनदा लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते. आणीबाणी व ४४व्या घटना दुरुस्तीला त्यांनी प्रखर विरोध केला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी व आणीबाणीच्या विरोधात जो लढा दिला, तो जनता कधीही विसरणार नाही. ते रिपब्लिकन पक्षाचे बुद्धिमान व विद्वान नेते होते...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आज नाजूक अवस्थेतून जात आहे. स्वतः बाबासाहेबांच्या नातवाने देखील तो सोडला. उरलेले बहुतेक सर्व गट या ना त्या पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा बिकट अवस्थेत ज्या कोणी नेत्यांना व कार्यकर्त्यांना मनापासून असे वाटते, की बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष टिकावा व वाढावा, अशा सर्वांना अॅड. बी. सी. कांबळे यांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील, अशी खात्रीच नव्हे तर आत्मविश्वास आहे...

- Article by- राजेंद्र भास्करराव भोसले...✍️💗

महाराष्ट्र टाईम्स ,15 jully 2019

Ref:https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/babasahebs-loyal-follower-b-c-kamble/articleshow/70205406.cms

--------------------------------------------------------------------------

2] १३ एप्रिल १९९१ च्या ब्लिट्झ साप्ताहिकात जेष्ठ रिपब्लिकन व बौद्ध नेते अ‍ॅड. बी.सी. तथा बापूसाहेब चंद्रसेन कांबळे यांचा प्रसिद्ध झालेला लेख संकलक: एच. बी. जाधव
मो. 9867187665

-------------------------------------------------------------------------

अ‍ॅड. बी.सी. कांबळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच स्वप्राप्तही पक्षांतर करावंसे वाटले नाही...तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चळवळीत मी उशीराच आलो. सांगायला जुणिअर म्हणू तरी हरकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन म्हणून नाशिकचे दादासाहेब गायकवाड, मद्रासचे एन. शिवराज, बंगालचे बॅ. जोगेन्द्रनाथ मंडल, उत्तर प्रदेशचे प्यारे लाल कुतील, पंजाबचे किसानसिंह, हैदराबादचे सुद्धामा, नागपूरचे आंबेड बाबू, गुजरातचे परमार, कर्नाटकचे वरकरे शिवाय महाराष्ट्रातील राजभोज, शिवतरकर, भोंडे, भंडारे इत्यादी होते. मी त्या सर्वात अत्यंत लहान होतो.

१९४५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा उत्तरार्थ चालू होता. त्याच सुमारास माझी विद्यार्थी दशा संपत आली होती. मुंबईतील आपले पूर्वीचे वास्तव्य डॉक्टरांनी दिल्लीस हलवले होते आणि शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे कार्य, जाहीर सभा, दौरे व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईस येऊन जाऊन असत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माझी पहिली भेट झाल्यानंतर त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा, अर्थगर्भज्ञानाचा, त्यांच्या नितिमान चारित्र्याचा व साधने नसतानाही अनंत अडचणींना सोसून त्यांनी चालविलेला अभूतपूर्व चळवळीचा जो परिणाम माझ्यावर झाला, तो हयात असतानाच जसा झाला तसाच त्यांच्या...महापरिनिर्वाणानंतर आजपावेतो सतत वाढत्या प्रमाणात झाला. त्यामुळेच माझ्या मनाला कधीही पक्षांतर भावनेचा स्वप्नातही साधा स्पर्श होऊ शकलेला नाही. भारतातील निरनिराळ्या पक्षांची पुढाऱ्यांची, कार्यकर्त्यांची पक्षांतराच्या भूकंपामध्ये मोडतोड, परत जोड, परत मोड झाली आहे. मी मात्र यातून तावून सुलाखून निघालो आहे. याचे मुख्य कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा माझ्या अंतःपटलावर असलेला प्रभाव यात शंका नाही.

भारतातील व भारताबाहेरील अनेक नामवंत पुढारी पाहण्याची, त्यांची भाषणे, लेखन पाहण्याची अभ्यासण्याची संधी मला योगायोगाने मिळाली. भारतातील नेते महात्मा गांधी, बॅरिस्टर जीना, बॅरिस्टर सावरकर, जवाहरलाल नेहरु, सुभाषचंद्र बोस, मानवेंद्रनाथ रॉय, जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया त्याचप्रमाणे भारताबाहेरील नेत्यांत रशियाचे कुश्चेव्ह, बुल्गानिन, कोसिजिन, अमेरिकेचे आयसेन हॉवर, इंग्लंडचे अनुरीन बेव्हिन इत्यादी नामवंताचा उल्लेख करावयास हरकत नाही. परंतु यापैकी कोणीही माझ्या मनावरील बाबासाहेब आंबेडकरांनी उमटविलेला प्रभाव किंचतही कमी करु शकलेले नाहीत. कधी कधी मी माझ्या मनाला प्रश्न विचारतो की, माझ्या पूर्वीच्या ज्या महार, अस्पृश्य समजलेल्या जातीमध्ये माझा जन्म झाला, त्या जातीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला नसता, अगर बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आले त्या जातीत माझा जन्म झाला नसता तर काय घडले असते? माझ्या मनावर त्यांचा असाच प्रभाव राहिला असता काय? आणि या प्रश्नांचे उत्तर मी निःसंकोचपणे देऊ शकतो की, होय आणि होयच!

बाबासाहेबांना मी प्रथम पाहिले, त्यावेळी मी मराठी चौथीत शिकत होतो. पूर्वीच्या सातारा जिल्ह्यात व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातील पेठ या गांवी त्यांची जाहीर सभा होती. रात्रभर बैलगाड्या हाकून आजूबाजूच्या खेड्यातील माणसे पेठच्या जाहीर सभेला आली होती. त्यामध्ये मी एक छोटा विद्यार्थी माझ्या नातलगांबरोबर गेलो होतो. त्यावेळी मी बाबासाहेबांना दुरूनच पाहिले. ऐन तारुण्यातील त्यांचे ते दर्शन अजूनही आठवते. शुभ्र मलमलचे धोतर, पिवळा सिल्कचा सोगळा झब्बावजा शर्ट, हातात काठी असा त्यांचा साधा परंतु आकर्षक पोषाख होता. त्यांचे भाषणही मी दुरून गर्दीतून ऐकले.

पुण्याचा कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही काही विद्यार्थी त्यांना भेटावयास गेलो होतो. त्यांच्याशी कसे बोलावे याची भिती मनावर नव्हती. कदाचित माझ्या विद्यार्थी मनावर तसा काही आगापीछा विद्यार्थ्यांना काही विचारावयाचे असेल तर विचारा अशी मोकळीक बाबासाहेबांनी दिल्यामुळे मी चटकन नकळत विचारले," बाबासाहेब तुम्ही अभ्यास कसा करता?" प्रश्न ऐकताच आजूबाजूचे सर्वच चपापले, पण बाबासाहेब म्हणाले," काय म्हणतोस, मी अभ्यास कसा करतो? अरे, शेंडीला गाठ बांधायची आणि मग अभ्यासाला बसायच."

बाबासाहेबांनी दिलेल्या उत्तराने माझे समाधान झाले नव्हते. त्यांनी खरे उत्तर मुद्दाम राखून ठेवले असावे असे वाटले. बाबासाहेबांचा स्वभाव व चेहरा प्रथमदर्शनी कुणालाही तापट वाटत असे. एखाद्याची चाचणी घेतल्याप्रमाणे ते प्रथम बोलत. वरवर तापट दिसणाऱ्या त्यांच्या स्वभावात आईपेक्षाही माया असणारे गोड झरे त्यांच्या बोलण्यात असत, त्याची प्रचितीच येथे आली. त्यांनी प्रश्नाचे खरे उत्तर द्यायला सुरुवात केली तीही वेगळ्या पध्दतीने बाबासाहेब एकदा बोलू लागले की ज्ञान गंगाच वाहत असे.

त्यांनी आम्हा प्रत्येकाला विचारले, "तू लग्न केले आहेस काय?" अर्थात त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. त्यामुळे मला क्षणभर वाटले. आपण एवढ्यापुरते तरी वाचलो. त्यांनी मला विचारले, "तुला माहित आहे का विद्या कोणाला येते?" आम्हाला याची गंधवार्ता नव्हती की विद्या कोणाला येते. ते पुढे म्हणाले, "अरे, तुमच्या कोणाच्या हातून काय होणार? तुम्हाला काय, चांगली नोकरी मिळाली, देखणी बायको मिळाली की झाले. या शिवाय दुसरे तुम्ही काय करणार?" आम्ही सगळेच गप्प होतो. बाबासाहेबांनी पुनः विचारले, "विद्या कोणास येते?" मग त्यांनीच एक प्रात्यक्षिक करून उत्तर देण्यास सुरूवात केली. एखादा मुद्दा पटवून देण्याची त्यांची ती एक प्रकारची पध्दत होती. त्यांनी आपल्या हाताचे बोट आपल्या पोटाच्या बेंबी जवळ नेले आणि म्हणाले, " ज्यांच्या अंतःकरणात या बेंबीच्या देठापासून जळत राहते की आपल्या समाज बांधवासाठी व देश बांधवासाठी सतत झिजत सेवा करीत राहिले पाहिजे. त्यालाच ज्ञान प्राप्त होईल." प्रश्न करता मी असल्याने ते मला उद्देशून म्हणाले, " तुझ्या अंतःकरणात असे काही जळत असते काय? मग तुला विद्या कशी येईल, आणि तू विचारतोस बाबासाहेब तुम्ही अभ्यास कसा करता?" तेव्हापासून आजतागायत बाबासाहेबांच्या या प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकलो काय याचा सदैव विचार करीत असतो.

पुढे, त्यांची माझी समोरासमोर पहिली भेट झाली ती १९४८ मध्ये. मला बोलावून घेण्यात आले होते. 'किर्लोसकर' मासिकामध्ये माझा एक लेख प्रसिध्द झाला होता. 'दलित सत्याग्रहींची कैफियत' असे त्या लेखाचे नांव होते. तो लेख बाबासाहेबांच्या वाचण्यात आला असावा. बाबासाहेबांनी सुरूवातीस 'मूकनायक' नंतर 'बहिस्कृत भारत' ही द्विसाप्ताहिके काही काळ चालविली. पुढे 'जनता' हे नांव ठेवण्यात आले. पुढे काही काळ चालवून त्याचे प्रकाशन स्थगित करण्यात आले होते. त्या 'जनता' चे संपादकत्त्व माझ्याकडे देण्यासाठी मला बोलाविण्यात आले होते. बाबासाहेबांना मी येऊन भेटलो. त्यावेळी, त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली, व संपादकपदाबद्दल प्रथम काही न बोलता, ते म्हणाले, "तू आधी तुझी प्रकृती सुधारून घे." त्यांनी मला ऑपेरा हाऊस येथे, त्यावेळी असलेल्या होमियोपॅथीचे डॉक्टर चुघाकडे पाठविले. नंतर काही दिवसांनी त्यांनी मला एक प्रश्न विचारला, "तू 'जनता' साप्ताहिक चालवशील काय?" मला काहीच अनुभव नव्हता. किर्लोस्कर मासिकातील लेख, मी विद्यार्थी दशेत सुध्दा राजकीयदृष्ट्या व घटनात्मकदृष्ट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यावेळेच्या धोरणात जणू तंतोतंत बसेल अशाप्रकारे कसा काय लिहिला होता, याचे कोडे अजून मलासुध्दा उलगडलेले नाही. परंतु तेवढ्या सामुग्रीवर मी बाबासाहेबांना सरळ उत्तर देऊन टाकले की 'जनता' साप्ताहिक चालवीन. बाबासाहेबांचा गुणग्राहीपणा त्यामध्ये दिसून आला, यात शंका नाही.

'जनता' साप्ताहिकाचे कार्य, संपादक म्हणून करताना, बाबासाहेबांच्या राजगृहामध्ये न काही काळ मी राहत होतो. त्यावेळी बाबासाहेबांचे ग्रंथ, तसेच इतर ग्रंथ राजगृहामध्ये अभ्यासण्याची संधी मला मिळाली.

मी 'जनता' साप्ताहिकाचा संपादक असताना, त्यांनी कधीही कसले अधिकारवाणीचे आदेश मला दिले नाहीत की, हे लिहावे, ते लिहू नये अगर हे प्रसिध्द करावे, ते प्रसिध्द करू नये. मात्र दोन वेळा त्यांनी उपदेश केला. त्यांचा पहिला उपदेश हा होता की, विस्कटलेले पाणी जसे असते, व कोठे कोठे मातीत जिरून जाते, असे लेखन असता कामा नये. ते पाणी एकत्र करुन त्याच्या प्रवाहाचा खळखळाट झाला पाहिजे असे लेखन असावे. त्यांचा दुसरा उपदेश असा होता की, लेखन असे पाहिजे की त्याच्या वाचनाने वाचकांची झोप उडाली पाहिजे.

१९५२ ते १९५७ मध्ये मुंबईमध्ये मुंबई असेब्लीचा आमदार म्हणून मी निवडून आलो. त्यावेळेही बाबासाहेबांनी माझ्यावर मुंबई असेंब्लीत, मी कसे काम करावे व कसे काम करु नये असे कोणतेच निर्बंध घातले नव्हते. निवडून गेलेल्या सभासदाला, सभागृहात, पक्ष धोरणाप्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य असावे या स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. मोरारजीभाई देसाई यांच्या बरोबर मुंबई गोळीबारावर माझी जी खडाजंगी होत होती, त्याचे वृत्त इंग्लीश वृत्तपत्रे टाईम्स ऑफ इंडिया इत्यादी वृत्तपत्रातून ते दिल्लीत वाचीत असत. मीही त्यांना असेंब्लीच्या कामकाजाची माहिती देत असे. त्यावेळी मुंबई शहरात वातावरण तंग असे. तेव्हां ते 'जयराज हाऊस' वर कुलाब्याला मुक्कामास होते. दंगल चालली होती म्हणून बाबासाहेबांच्या जयराज हाऊस कडील स्थिती सुरक्षित आहे काय हे पाहाण्यासाठी आम्ही काही जण पोलिसांचे चौकी पहारे चुकवित त्यांच्याकडे पोहोचलो. ते पाहून त्यांचे मन भरून आले आणि म्हणू लागले, "अरे या दंगलीत तुम्ही लोक कशाला आला?" आम्ही म्हणालो, "बाबासाहेब तुमचीच काळजी आम्हाला वाटत असल्यामुळे आमचा जीव रहावला नाही."


बाबासाहेबांचे एक स्नेही सॉलिसीटर कोठारी हे होते. त्यांच्याकडे माझे जाणे येणे होते. ते बाबासाहेबांचे मोठे चाहते. मी मुंबई हायकोर्टाची सनद ७५० रुपये उसने घेऊन काढली, आणि मुंबई डिव्हिजन बेंच पुढे माझ्या पहिल्याच केसचे जे आर्गमेंट मी केले होते, ते स्वतः सॉलिसीटर कोठारी यांनी ऐकले होते. काही दिवसांनी सॉलिसीटर कोठारी मला म्हणाले, "कांबळे मी डॉ. आंबेडकरांना पत्र लिहिले आहे की, आय हॅव हर्ड मिस्टर बी. सी. कांबळे आर्गुईंग बिफोर ए डिव्हिजन बेंच ऑफ हायकोर्ट, अँड हिज परफॉर्मन्स इज व्हेरी गुड अँड प्रॉमिसिंग."

त्यानंतर बाबासाहेब मुंबईस जेव्हा आले, तेव्हा सॉलिसीटर कोठारीच्या पत्रामुळे की माझ्या असेंब्लीतील कार्यामुळे माहित नाही, त्यांनी मला विचारले, "तू कॉलेजमध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉ शिकवशील काय?" माझा त्या जागेसाठी अर्ज नव्हता. कोणी मुलाखतही घेतली नव्हती. बाबासाहेबांनी मला विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले, "हो शिकवीन." अशी माझी नेमणूक सिध्दार्थ लॉ कॉलेजमध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉ चा प्रोफेसर म्हणून त्यांनी केली. त्यावेळी सिध्दार्थ लॉ कॉलेजचे प्रिन्सिपाल प्रो. राव होते.

आठवणी खूप आहेत. परंतु आणखी एक दोनच आठवणींचा उल्लेख करून हा लेख संपवितो. मुंबई शहरात बाबासाहेबांच्या चळवळीत 'मडकेबुवा' (म्हणजे एम. जी. जाधव) या नांवाचे एक मोठे प्रस्थ होते. ते तसे शिकलेले नव्हते. त्यांना सहीसुध्दा करावयास वेळ लागत होता. ते सभेत, जनसमुदायाला खाली बसविण्यासाठी 'माय शिप' माय ऑर्डर' असे हुकूम देत असत. एक दिवस बाबासाहेबांच्या पुढे याबद्दलचा विषय काढावा असे मला वाटले.

मी बाबासाहेबांना म्हणालो, "बाबासाहेब, मुंबईमध्ये अॅड. भंडारे वगैरे अनेक पदवीधर व डब्बल पदवीधर असता, आपण मडके बुवासारख्या, जवळ जवळ अशिक्षित व्यक्तिला, मुंबई शहर शेड्युल कास्टस फेडरेशनचे अध्यक्ष बनविले आहे. त्याऐवजी अशा पदवीधारापैकी कोणास तरी ते पद द्यावयाचे काय आपण पहा."

बाबासाहेब त्वरीत म्हणाले, "काय म्हणतो? तुला चळवळ म्हणजे काय हे समजते काय? चळवळ कशी चालवता येते?" मी गप्पच होतो. वाटले माझी चूक झाली काय? बाबासाहेबांचे बोलणे चालूच राहिले. ते म्हणाले, "अरे तुम्ही शिकलेले लोक, म्हणजे ताज्या घोड्यावरील गोमाशा. ताजे घोडे दिसले की गोमाशा गेल्या उडून त्या ताज्या घोड्यावर. चळवळ चालविण्यासाठी मजबूत माणसे असावी लागतात. अगदी पोलादी खांबासारखी. मडकेबुवामध्ये काहीही दोष असले तरी तो पोलादी खांबासारखा आहे. तुम्हा शिकलेल्या लोकांचा काय भरवसा आहे? अरे सोन्याचे पोते ओतले तरी न ढळणारी माणसे हवीत."

मी अगदी खजील होऊन गेलो होतो. चळवळीचे सूत्र कसे
असते, आणि बाबासाहेबांनी केलेली भविष्यवाणी किती खरी ठरली याची आठवण मला आजपर्यंत सतत होत असते.

त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर, औरंगाबाद येथे मुक्कामास होते, व थॉटस् ऑन लिंग्निस्टिक स्टेट्स (भाषिक राज्यावरील विचार) हा ग्रंथ लिहित होते.

मुंबईच्या द्विभाषिक राज्यातील माहिती घेऊन मी त्यांना औरंगाबाद येथे भेटावयास गेलो होतो. तेथे तेव्हा खूप थंडी होती. मी बाहेरच व्हरांड्यात झोपलो. थंडी खूप असल्यामुळे मी व्हरांड्यात झोपू नये असे बाबासाहेबांनी सांगितले. तेव्हा त्यांची कळकळ दिसून आली.

त्यावेळी मुंबईच्या द्विभाषिक राज्यात सर्व गुजराथी मंत्र्यांच्याकडे एकूण २०२ विषय होते, तर सर्व महाराष्ट्रीय मंत्र्यांच्याकडे एकूण ८८ विषय होते. त्याचप्रमाणे विकासाच्या खर्चावर दरडोई खर्च महाराष्ट्रावर, १९५०-१९५१ मध्ये १.७ रुपये, १९५१-१९५२ मध्ये २.३ रुपये व १९५२-१९५३ मध्ये १.८ रुपये होता. तर तेच आकडे गुजराथ करता दरडोई अनुक्रमे रुपये २.९, ३.१ व ३.२ असे होते.

ही माहिती आपल्या ग्रंथासाठी उपयोगी वाटते का पहा. ही माहिती दिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले. त्यांना मी पुढे सांगितले, "मुंबई असेंब्लीध्ये आमदार या नात्याने प्रश्न विचारुन ही माहिती मिळविली असल्याने ही माहिती कोणी निराधार म्हणू शकणार नाही." त्यावर बाबासाहेब म्हणाले," काय ही महाराष्ट्राची दुर्दशा! पण काय करणार? सगळे कारकूनच महाराष्ट्रात आहेत आणि कारकुनी प्रवृत्तीपेक्षा त्यांच्या अंगी दुसरे काय येणार? "

आपल्या चळवळीकडे वळून ते शेवटी म्हणाले, "अरे, आपल्या लोकांना तरी ही चळवळ निभावता येणार आहे काय? भगवान बुध्दाच्या अंगची एक सहस्त्रांश जागृती जरी तुमच्या अंगी आली तरी काही ना काही पुढे चांगले घडू शकेल. "

बाबासाहेबांच्या पुढे काय बोलावे, हाच महान प्रश्न माझ्यापुढे होता. मी म्हणालो, "बाबासाहेब, भगवान बुध्दाच्या अंगची जागृती आणि आपल्या अंगचीही जागृती एक सहस्त्रांशाने का होईना आम्ही कमविल्याशिवाय, तुमचे अनुयायी होण्यास; आणि भारतभर पसरलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कसे लायक ठरू?"

बाबासाहेबांच्या बरोबरची चर्चा संपल्यावर तेव्हापासून सतत आजपावेतो विचार करतो की, खरेच भगवान बुध्दाच्या व बाबासाहेबांच्या जागृतीचा एक सहस्त्रांश तरी प्राप्त करून घेऊन या चळवळीचे कार्य करण्यासाठी व ते पुढे नेण्यासाठी आपण पात्र आहो काय?

सध्या बाबासाहेबांच्या चळवळीतील समकालीन कोणी निधन पावले आहेत, कोणी दूर गेले आहेत. असे असले तरी, भगवान बुध्दाने व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महापुरुष ज्योतिराव फुले व संत कबीराच्या स्मरणाने केलेली भारताची मशागत निरर्थक ठरणे कधी शक्य नाही. याची मला संपूर्ण खात्री वाटते.

बाबासाहेब विचारत होते, " तुम्हाला तरी ही चळवळ निभावणार आहे काय?" बाबासाहेबांच्या दिव्य दृष्टितूनच ही शंका व्यक्त केली होती. भारतातील व भारताबाहेर पसरलेल्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, महापुरुष ज्योतिराव फुल्यांच्या, संत कबीरांच्या अनुयायांनो काय आहे आपले उत्तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ?

- लेखकः-अ‍ॅड .बी.सी.कांबळे...✍️💗

------------------------------------------------------------------------------

2] अ‍ॅड. बी. सी.कांबळे सरांची त्यांनी स्वता लिहलेली महत्त्वाची ग्रंथसंपदा...!!!

1. समग्र आंबेडकर चरित्र (खंड १-२४) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सर्वसमावेशक चरित्र.

2. अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले? – डॉ. आंबेडकरांच्या ‘The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद.

3. ऐक्यच का? – सामाजिक ऐक्याच्या संकल्पनेवर आधारित विचारमंथन.

4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार – संसदेतील शेवटच्या भाषणांचा संकलन.

5. संसदपटू-डॉ. बाबासाहेब आंबेडकर – संसदेतील बाबासाहेबांच्या योगदानावर आधारित पुस्तक.

6. राजा मिलिंदचे प्रश्न – प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ ‘मिलिंद पन्हा’चा अनुवाद.

7. Legislature Vs. High Court – भारतीय विधिमंडळ आणि उच्च न्यायालय यांच्यातील संघर्षावर आधारित पुस्तक.

8. Thoughts on 44th Constitution Amendment Bill – भारतीय घटनेतील 44 व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावावर विचार.

9. Dr. Ambedkar on Indian Constitution – भारतीय घटनेवर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले विचार.

10. Questions of King Milind – ‘मिलिंद पन्हा’ चा इंग्रजी अनुवाद.

11. Tripitak Volume Nos. 1 to 4 – बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटकावर आधारित लिखाण.

12. Dr. Ambedkar as Parliamentarian – डॉ. आंबेडकर यांचे संसदीय कार्य आणि योगदान.

13. Last Thoughts of Dr. Ambedkar on Parliamentary Affairs – संसदीय व्यवहारांबाबत बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम विचार.

14. Uprooting the famine – दुष्काळ निर्मूलनासंदर्भात लिखाण.

15. डॉ बाबासाहेब आबेडकर यांनी केलेली भारतीय घटनेची मीमांसा(संपादक.बी.सी.कांबळे )

Adv- B.c कांबळे यांच्या लेखनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सखोल आकलन होण्यास मदत होते. त्यांच्या साहित्याचा अभ्यास आंबेडकरी चळवळ आणि भारतीय संविधानाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरतो...✍️💗
------------------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!