डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा RSS बद्दलचा विरोध...व त्याची ऐतिहासिक कारणे, वास्तव आणी दृष्टिकोन...!!!


1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!"- @ प्रा.हरी नरके सर...


संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी श्री. राजीव तुली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संघाच्या जवळकीचे दि प्रिंटमध्ये २३ एप्रिल २०२० रोजी केलेले सर्व दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आर.एस.एस. हा तर विषवृक्ष आहे! ते पुढे असेही म्हणतात की, हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे! काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला जवळ करणेच शक्य नाही.

ठेंगडींची नियुक्ती ह्या निव्वळ हवेतल्या बाता-
१. तुलींनी दावा केला आहे की संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून डॉ. आंबेडकरांनी नियुक्ती केली होती. तुली यांचा असाही दावा आहे की ठेंगडी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी १९५४ मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत त्यांना आपला निवडणूक प्रतिनिधी नेमले होते. असेच दावे याआधी अरूण आनंद यांनी केले होते. ते मी पुराव्यानिशी फेटाळले होते. पण संघाचा खोटारडेपणा असा की खोटे दावे पुन्हापुन्हा करीत राहायचे. पण ठेंगडींच्या ह्या नियुक्तीचा लेखी पुरावा तुलींनी सादर केलेला नाही. निवडणूक प्रतिनिधी तोंडी नेमला जात नाही. निवडणूक अधिकार्‍यांना तसे लेखी कळवावे लागते. तुली यांनी ठेंगडींच्या नियुक्तीच्या कपोलकल्पित कहाण्या सांगणे, तोंडी दावे करणे आणि हवेत महाल बांधणे सोडून ठेंगडींच्या नियुक्तीचे लेखीपत्र सादर करावे. विषय संपला.
शेकाफेचे महासचिव राजभोज तर म.प्र.सचिव आवळे- ठेंगडी नव्हेत-

२. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून शेकाफेचे अ.भा. जनरल सेक्रेटरी पां. ना. राजभोज व मध्यप्रदेश शेकाफेचे सेक्रेटरी बाबू हरिदास आवळे यांची नियुक्ती डॉ. आंबेडकरांनी केलेली होती. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड,१८ वा, भाग ३ रा ]

३. शेकाफेच्या घटनेनुसार नॉन श्येड्युल्ड कास्ट व्यक्तीची सदस्य वा पदाधिकारी म्हणून जशी नियुक्ती शक्य नव्हती तशीच जी व्यक्ती इतर संघटनेची वा पक्षाची सदस्य असेल तर तिचीही नियुक्ती करता येत नव्हती. ठेंगडी हे नॉन शेड्युल्ड कास्ट असल्याने व ते आर.एस.एस. RSS तसेच भारतीय जनसंघाचे मध्यप्रदेशचे पदाधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती शेकाफेचे सचिव म्हणून होऊ शकत नव्हती. शेकाफेच्या घटनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, Any person belonging to the scheduld castes and Who is not a member of any other political or any social or religious organisatoin can be become a member of SCF. { डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग दुसरा, पृ. 459}
 
निवडणूक भंडार्‍याला ठेंगडी वर्ध्याचे- आणि नवखे-
४. शिवाय निवडणूक भंडार्‍याला होती आणि ठेंगडी त्या मतदार संघातले मतदार नव्हते. ते वर्ध्याचे आर्वीचे होते. अशा अपरिचित व्यक्तीच्या इलेक्शन एजंट म्हणून केलेल्या नियुक्तीचा निवडणुकीत काय फायदा? ठेंगडी तेव्हा अगदी नवखे होते.

५. तुली एकुण दोन वेगवेगळ्या निवडणुकांबद्दल एकत्र बोलत आहेत. पहिली १९५२ सालची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि दुसरी भंडार्‍याची १९५४ सालची ची पोटनिवडणूक. भंडारा येथील लोकसभा पोटनिवडणूक २ ते ५ मे १९५४ रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेले प्रचार दौरे, भाषणे आणि निवडणुकीची वार्तापत्रे एप्रिल आणि मे १९५४ च्या जनता या डॉ. आंबेडकरांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात सविस्तरपणे अनेकदा प्रकाशित झालेली आहेत. जनताचे अंक पुराव्यासाठी आजही उपलब्ध आहेत. या सर्व सभांना उपस्थित असलेले नेते, सभेत भाषणे केलेले नेते यांच्या नावांची मोठी यादी जनतामध्ये आलेली आहे. भंडार्‍याच्या एकाही प्रचार सभेला ठेंगडी हजर नव्हते. ते जर डॉ. आंबेडकरांचे विश्वासू असे निवडणुक प्रतिनिधी होते तर मग ते सर्वच प्रचारसभांना गैरहजर का होते? याचे उत्तर संघ देत नाही. ठेंगडींचा प्रचार सभांमध्ये वक्ता वा मंचावर उपस्थित सदस्य असा साधा उल्लेखसुद्धा जनता या डॉ. आंबेडकारांच्या वर्तमानपत्रामध्ये नाही.
यावरूनच सिद्ध होते ठेंगडी बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रतिनिधी नव्हते.

काय जनसंघ- कम्युनिस्टांची युती होती?
६. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षासह इतर अनेक पक्ष,संघटनांनी स्वत:हून डॉ. आंबेडकरांना पाठींबा दिलेला होता. कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्री ए. बी. वर्धन हे भंडार्‍याच्या प्रचारसभांना हजर असत. या निवडणुकीत कम्युनिस्ट आणि जनसंघ यांची युती होती व ते एकत्र काम करीत होते असे तुलींना म्हणायचे आहे काय?

एक वर्ष नाही अवघे तीन महिने-
७. राजकारणात एका वर्षात काहीही होऊ शकते असे विधान करून डॉ. आंबेडकरांचे आर.एस.एस. ही प्रतिगामी व विघटनवादी असल्याबाबतचे विधान व लोकसभा निवडणूक यात वर्षाचे अंतर होते असे तुली सांगतात. वस्तुस्थिती अशी आहे इथे तुली १९५२ च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलत आहेत. " हिंदु महासभा व आर.एस.एस.बरोबर शेकाफेची निवडणुक युती होऊ शकत नाही हा शेकाफेचा बाबासाहेबांनी स्वत: लिहिलेला निवडणूक जाहीरनामा ४ जाने १९५२ रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचाच आहे. तुली म्हणतात तसा तो एक वर्षे आधीचा नसून ऑक्टोबर १९५१ चा आहे. जाहीरनामा लेखन, प्रकाशन, प्रदीर्घ, देशव्यापी प्रचारमोहीम आणि अनेक आठवड्यांमध्ये पार पडलेली निवडणूक या तीन महिन्याच्या काळातील सलग गोष्टी आहेत. १९५१ च्या शेवटी जाहीरनामा व निवडणूक प्रचार झाला व ४ जानेवारी १९५२ ला मतदान झाले असा हा एकत्र कार्यक्रम होता. त्यात १९५१ आणि १९५२ असे वर्षाचे वर्षाचे अंतर नव्हते. [ डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग पहिला, दि. 3 ऑक्टोबर 1951, पृ. 402]

हिंदूराष्ट्र हे महाभयानक संकट-
८. देशाची फाळणी व इस्लाम याबाबतची डॉ. आंबेडकरांची व संघाची मतं यात खूप साम्य असल्याचा दावा तुली करतात. यासाठी डॉ. आंबेडकरांच्या ज्या "पाकीस्तान किंवा भारताची फाळणी "या पुस्तकाचा हवाला ते देतात, त्याच पुस्तकात आर.एस.एस.बद्दल आंबेडकरांनी संतप्त उद्गार काढलेले आहेत. त्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की आर.एस.एस.आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेत काडीचेही साम्य नव्हते. गोळवलकरगुरूजींचे "बंच ऑफ थॉट" हे आर.एस.एस.चे बायबल आहे. गुरूजी चातुर्वर्ण्य मानतात. सनातन संस्कृती रक्षण, हिंदुराष्ट्राची स्थापना ह्याला प्राधान्य देतात.

संघ म्हणजे मान न मान मैं तेरा मेहमान-
आंबेडकर म्हणतात, " हिंदु राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये." { पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८, डॉ. बा.आं.ले.भा. खंड 8 वा, 1990, पृ. 358} या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आणि हिंदू राष्ट्रवाला संघ यांच्यात कसलेच साम्य नव्हते. हे म्हणजे " मान न मान मैं तेरा मेहमान" असला लोचट गळेपडूपणा संघाने चालवलेला आहे.

मराठाविरोधी गोळवलकरगुरूजी- संघ हा विषवृक्ष-
९.] ७ सप्टेंबर १९४९ ला आर.एस.एस.सुप्रिमो गोळवलकरगुरूजी कायदामंत्री डॉ. आंबेडकरांना दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडॆ मदत मागितली. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, " आर.एस.एस. हा विषवृक्ष आहे. आर.एस.एस.ला पेशवाईची स्वप्नं पडत आहेत. माझे तुमच्याशी जमूच शकत नाही. मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही." या भेटीची विस्तृत बातमी तिसर्‍या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या जनताने १० सप्टेंबर १९४९ ला दिलेली आहे. शिवाय या दोघांच्या भेटीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोहनलाल शास्त्री प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे. { पाहा: बाबासाहेब डॉ. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली,पृ. ५४/५५}

संविधान आणि हिंदु कोड बिलाला संघाचा विरोध-
१०. याच काळात डॉ. आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर.एस.एस. विरोध करीत होती. हिंदु कोड बिलालाही संघाचा विरोध होता. घटना सभेचे कामकाज उधळण्यासाठी आर.एस.एस.चे सदस्य संसदेच्या सभागृहाच्या गॅलरीत घुसले होते अशी नोंद पार्लमेंटच्या दप्तरात आहे. [ पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७ वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९, CAD7/1233 ]

हवेतल्या गप्पा मारू नका लेखी पुरावे द्या-
११. लिखित दस्तावेज आणि तोंडी माहिती यात लिखितला प्रथम दर्जाचा पुरावा मानले जाते तर तोंडीला दुय्यम महत्व असते. संघाकडे त्याकाळातला एकही लेखी पुरावा नाही तर आम्ही आंबेडकरवादी ठोस, सबळ, लेखी आणि त्याकाळातल्या पुराव्यांच्या आधारे बोलत आहोत. शिवाय ठेंगडी आणि ऑर्गनायझर हे आर.एस.एस.चे असल्याने त्यांना फारशी विश्वासार्हता नाही. ते या घटनेचे लाभार्थी असल्याने त्यांचा नंतरच्या काळातला आणि तोही तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.

ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा-
१२. ठेंगडीचे पुस्तक डॉ. आंबेडकर हयात असताना लिहिलेले नसून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कितीतरी वर्षांनी लिहिलेले आहे. समकालीन एकही लेखी दस्तावेज ठेंगडी, आनंद वा तुलींनी सादर केलेला नाही. त्यामुळे ही तोंडी माहिती कल्पित आणि नंतर रचलेली आहे. बनावट आणि सांगोवांगी असल्याने ती टिकू शकत नाही.

बाबासाहेबांची संघशिबिराला भेट? नाही, हीही थापच-
१३. डॉ. आंबेडकरांच्या संघ शिबिराच्या भेटीची १९३९ ची कहाणीही अशीच कपोलकल्पित आहे. बनावट आहे. तिचे त्याकाळातले लिखित पुरावे, फोटो, संघ व बाबासाहेब यांच्यातील भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे पुरावे संघ देऊ शकलेला नाही. ते दिल्याशिवाय त्यांच्या म्हणण्यावर चर्चासुद्ध शक्य नाही. विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

बाबासाहेब आणि संघ, तत्वज्ञानात १८० डिग्रीचा फरक-
१४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला परमप्रिय असलेली मनुस्मृती जाळतात, संघ ज्या डोलार्‍यावर उभा आहे तो हिंदू धर्म ते सोडतात, हिंदुत्व सपशेल नाकारतात, बौद्ध धर्म स्विकारताना आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ते लाखोंच्या जनसमुदायाला २२ प्रतिज्ञा देतात, त्यात हिंदूंच्या देवता राम, कृष्ण यांना मी मानणार नाही अशा प्रतिज्ञा आहेत.
आर.एस.एस.ने रामराज्याची कल्पना सोडून दिलेली आहे काय? "रिडल्स ऑफ हिंदुइझम," "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" "रेव्होल्युशन अ‍ॅण्ड काऊंटर रेव्होल्युशन" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे ग्रंथ आर.एस.एस.ला मान्य आणि प्रिय आहेत काय?
"अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुलभूत तत्वज्ञान आहे. तर आर.एस.एस.ला समरसता हवीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती नष्ट करा म्हणतात, तर जाती टिकवा आणि त्यांचातले भेद कमी करून समरसता निर्माण करा असे संघीय म्हणतात.

या संपुर्ण विरूद्ध दिशा आहेत.
फॅसिस्ट संघाचा बाबासाहेबांच्या अपहरणाचा डाव-
थोडक्यात आर.एस.एस. आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीत काडीचेही साम्य नाही. डॉ. आंबेडकराना हायजॅक करण्यासाठी संघ हे प्रयत्न करीत आहे. डॉ. आंबेडकरांना आज सारे जग महान विद्वान, घटनाकार, जगभरच्या उपेक्षित वंचितांचा मसिहा म्हणून वंदन करते तर संघ हा फॅसिस्ट म्हणून कुविख्यात आहे. म्हणून संघाला आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तसेच आंबेडकरांना मानणार्‍या व्होटबॅंकेला भुलवण्यासाठी ही पळवापळवी करायची आहे. आम्ही जागृत आंबेडकरवादी संघाला त्यात कदापिही यशस्वी होऊ देणार नाही!

- प्रा. Hari Narke सर...✍️
२३/४/२०२०
[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे,या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत]

-------------------------------------------------------------------------


2] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपुलकी होती का...?
प्रविण सिंधू,बीबीसी मराठी
7 जानेवारी 2025

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली. त्यावेळी आंबेडकरांनी केलेल्या भाषणात म्हटलं की, संघाशी मतभेद असले, तरी त्यांच्याकडं आपलेपणानं पाहतो", असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी कराडमधील बंधुता परिषदेत केला...
याबाबत संघाची माध्यम शाखा असलेल्या विश्व संवाद केंद्राने एक वृत्तही प्रसारित केलं...यानंतर या दाव्याविषयी वादविवादाला सुरुवात झाली आहे.
सद्यस्थितीत डॉ. आंबेडकरांशिवाय राजकारण करणं शक्य नसल्याने संघ ओढून ताणून आंबेडकरांशी नातं जोडू पाहत आहे, असा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही संघाचे हे दावे फेटाळले आहेत..या पार्श्वभूमीवर संघाने जसा दावा केला आहे, त्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांना खरंच संघाविषयी आपुलकी होती का? संघ कोणते पुरावे देत आहे? त्यावर डॉ. आंबेडकरांच्या साहित्याच्या अभ्यासकांचं म्हणणं काय...?
आंबेडकरांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी यावर काय भूमिका मांडली आहे आणि स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाविषयी व त्यांच्या मांडणीचा केंद्र असलेल्या हिंदू राष्ट्राविषयी काय म्हटलं आहे हे जाणून घेऊयात...

नेमका दावा काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी कराडमध्ये बंधुता परिषदेचे आयोजन केले. या परिषदेच्या पत्रकात दावा करण्यात आला की, 2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कराड (जिल्हा सातारा) येथे गेले होते. तेव्हा त्यांनी संघाच्या शाखेस भेट दिली व तेथे उपस्थित संघ स्वयंसेवकांसमोर भाषण सुद्धा केले.
या भाषणात आंबेडकर म्हणाले होते की, काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातो. या भेटी बाबतची बातमी पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या केसरी वृत्तपत्रात 9 जानेवारी 1940 रोजी प्रसिद्ध झाली होती, असा दावा या पत्रकात करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह आणि कराडमधील बंधुता परिषदेचे संयोजक विजय जोशी म्हणाले, "2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती. तेव्हा केसरी साप्ताहिक निघत असावे. त्यामुळे भेटीबाबत 9 जानेवारी 1940 रोजी बातमी छापून आली होती. अशी बातमी आहे हे आमच्यापासून अनेक दिवस लपून राहिलं होतं, ते आम्हाला माहिती नव्हतं."

"संशोधन करताना पुण्यातील एका गृहस्थांच्या लक्षात आलं की, याबाबत केसरीत बातमी आली आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही केसरीच्या कार्यालयात जाऊन तो मूळ अंक मिळवला. त्यात या भेटीविषयीची त्रोटक माहिती छापण्यात आलेली आम्हाला आढळली," असा दावा विजय जोशी यांनी केला.

डॉ. आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिल्याच्या दाव्यावर आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, "या भेटीला कुणीही साक्षी नाही. केसरीच्या बातमीला पुष्टी देणारं दुसरं कुठलंही संशोधन उपलब्ध नाही. याविषयी बोलायला बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारीही आज हयात नाहीत."आंबेडकरांचे जवळचे सहकारी आणि चरित्रकार काय सांगतात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी आणि त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथ खंड 8 मध्ये 1938 ते 1945 काळातील आंबेडकरांच्या आयुष्यातील घडामोडींची सविस्तर नोंद केली आहे. यात पान क्रमांक 27 वर डॉ. आंबेडकर 3 जानेवारी 1940 रोजी कराडला जाण्यासाठी निघाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या दिवशी कराड म्युनिसिपालिटीचे मानपत्र मिळणार असल्याचंही नमूद केलं आहे.
विशेष म्हणजे कराडला जाताना आंबेडकरांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला खूप इजा झाल्याचाही उल्लेख या चरित्र ग्रंथात आहे. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी कराडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्याची किंवा भाषण करून संघाबद्दल आपलेपणा वाटत असल्याचं वक्तव्य केल्याची कोणतीही नोंद येथे नाही. त्यामुळे संघाच्या दाव्याला येथे दुजोरा मिळत नाही...

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले...?
संघाच्या दाव्यावर बीबीसी मराठीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकर कधीही संघाच्या शाखेवर भेटायला गेले नाहीत. तसेच त्यांनी संघाला कधीही गोंजारलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाप्रमाणे त्यांचे संघाशी मतभेद होते आणि ते कायम आहेत."

बीबीसी मराठीशी बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवकाकडून जे संदर्भ दिले जातात ते संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणात कुठेही दिसत नाही. आंबेडकर हिंदुत्वाच्या विरोधात होते. त्यांनी हिंदू राष्ट्राचे काय दुष्परिणाम होतील हे सांगून ठेवलं आहे."
"ही सगळी बनवाबनवी, चलाखी आहे. हे प्रयत्न आजचे नाही. हे प्रयत्न जुन्या काळापासून सुरू आहेत. 1980 च्या दशकात असे अनेक लेखक होऊन गेले ज्यांनी सावरकर आणि आंबेडकरांमध्ये सावकरकरांमध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर आणि हेडगेवार यांचा एकत्रित उल्लेख करून हे दोन डॉक्टर कसे मोठे होते असं लिहिलं गेलं," असा आरोप रावसाहेब कसबे यांनी केला.

आंबेडकरांनी संघावर टीका केलेली नाही या संघाच्या दाव्यावर कसबे म्हणाले, "आंबेडकर जोपर्यंत जीवंत होते तोपर्यंत संघाचं कार्यच नव्हतं. आंबेडकरांनी संघावर टीका केली नाही, म्हणजे टीका करावी, ही योग्यताही संघाची नव्हती."

आंबेडकरांचं हिंदू राष्ट्राला समर्थन की विरोध?
बीबीसी मराठीशी बोलताना अखिल भारतीय समरसता विभागाच्या राष्ट्रीय कार्यमंडळाचे सदस्य असलेले प्रा. डॉ. रमेश पांडव यांनी डॉ. आंबेडकर आणि हिंदू राष्ट्र या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राला विरोध केलेला नाही."
मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ लेखनात देशातील हिंदू राजला प्रखर विरोध केलेला स्पष्टपणे दिसतो. आंबेडकरांचं लेखन आणि भाषणे खंड 8 मध्ये पान क्रमांक 358 वर आंबेडकर 'हिंदू राज'वर बोलताना म्हणतात, "जर देशात हिंदू राज आलं, तर ते या देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल यात शंका नाही."
"हिंदूंनी काहीही म्हटले तरी हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदू राज लोकशाहीशी सुसंगत नाही. हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत रोखलं पाहिजे," असंही बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलं आहे.

रमेश पांडव यांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा उपस्थित करत काही प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदुत्व, हिंदू संघटन, हिंदू राष्ट्र याला विरोध असता, तर त्यांनी हिंदू कोड बिल का लिहिलं असतं? त्यांनी मुसलमान कोड बिल का लिहिलं नाही? हिंदू कोड बिल लिहून त्यात बौद्धांचा समावेश का केला? बौद्ध कोड बिल लिहून त्यात हिंदूंचा समावेश का केला नाही?"

रमेश पांडव यांच्या प्रश्नांवर बोलताना मनिपाल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि आंबेडकर साहित्याचे अभ्यासक प्रबोधन पोळ म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला, तरी इथला समूह हिंदूबहुल आहे. त्यामुळे कोणतीही सामाजिक सुधारणा करायची असेल, तर हिंदू समाजात सुधारणा करणं गरजेचं आहे, या मताचे आंबेडकर होते. म्हणून त्यांनी त्या कायद्याला हिंदू कोड बिल म्हटलं होतं."

'आंबेडकरांनी काँग्रेस, गांधी आणि डाव्यांवर टीका केली, संघावर का नाही?'
"बाबासाहेब आंबेडकरांचे मार्क्सवादी किंवा डाव्यांच्या विरोधात काही लेख किंवा भाषणं सापडतात. गांधी आणि काँग्रेसविरोधातही आंबेडकरांचं पुस्तकच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात असं एखादं भाषण, एखादं पुस्तक कुणी दाखवू शकतं का?" असाही प्रश्न रमेश पांडव यांनी विचारला.

यावर बोलताना प्रबोधन पोळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना फार नंतर झाल्याचा आणि त्यावेळी त्यांची दखल घेण्याइतकं अस्तित्व नव्हतं असा मुद्दा उपस्थित केला.
प्रबोधन पोळ म्हणाले, "संघाची स्थापना 1925 मध्ये झाली. सुरुवातीला 1960 पर्यंत संघ महाराष्ट्रात फार व्यापक स्तरावर वाढला नव्हता. पुणे, नागपूर आणि विदर्भातील ब्राह्मण समाजातच संघाचं अस्तित्व मर्यादित होतं. त्यावेळी सार्वजनिक वर्तुळात संघाला फार स्थान नव्हतं. त्यामुळे आंबेडकरांनी संघावर फार लिहिलेलं नाही."

'शेड्युल कास्ट फेडरेशन आरएसएस आणि हिंदू महासभेशी कधीही युती करणार नाही'प्रबोधन पोळ पुढे म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळात त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. 1952 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशनचा जाहिरनामा काढला होता. तो जाहीरनामा सर्व प्रश्नांचं उत्तर देतो. त्यात आंबेडकरांनी म्हटलं होतं की, शेड्युल कास्ट फेडरेशन आरएसएस आणि हिंदू महासभेसारख्या प्रतिक्रियावादी संघटनांशी कधीही युती करणार नाही..."

"बाबासाहेब आंबेडकरांसारखा मोठा व्यक्ती वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना भेटत असतील. मात्र, त्याचा अर्थ बाबासाहेबांची त्या लोकांशी वैचारिक जवळीक आहे असा होत नाही," असंही प्रबोधन पोळ यांनी नमूद केलं.

सुरेश सावंत यांनी आंबेडकर आणि हिंदू राष्ट्र यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "चर्चेसाठी काही वेळ बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली असं मानलं, तरी आंबेडकरांची आणि संघाची विचारसरणी एकमेकांच्या विरुद्ध आहे. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉ. आंबेडकरांनी म्हटलं होतं की, कुठल्याही परिस्थितीत हिंदू राष्ट्र होऊ नये. हिंदू राष्ट्र स्वातंत्र्य आणि समतेच्या विरोधातील आहे. ते लोकशाहीशी कुठल्याही प्रकारे सुसंगत नाही."

"एका विशिष्ट समुहातून आलेल्या हिंदू राष्ट्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही कोणताही पाठिंबा नव्हता. 1920 ते 1956 या संपूर्ण काळात हे स्पष्टपणे दिसतं की, बाबासाहेबांनी हिंदू राष्ट्रवादाबरोबर किंवा त्या राजकीय शक्तींबरोबर कधीही युती केली नाही. कुणाशी राजकीय व्यवहार करायचे याबाबत आंबेडकरांना फार स्पष्टता होती," असंही पोळ यांनी नमूद केलं...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघावर नेमकं काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे खंड 15 च्या पान क्रमांक 560 वर सरदार हुकम सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अकाली दलासारख्या संघटनांचा उल्लेख करत त्यापैकी काही अतिशय धोकादायक संघटना असल्याचं मत व्यक्त करतात.

राजकारणाची गरज म्हणून संघ आंबेडकरांशी नातं जोडत आहे का?
संघ राजकारणाची गरज म्हणून आंबेडकरांबाबत असे वेगवेगळे दावे करत आहे, असा आरोप प्रबोधन पोळ आणि सुरेश सावंत यांनी केला आहे.
प्रबोधन पोळ म्हणाले, "1920-30 च्या काळात आंबेडकरांचं काम वाढत होतं. त्याला सरळ मार्गाने प्रत्युत्तर देता येणार नाही. म्हणून त्याला संघ वेगवेगळ्या मार्गाने हाताळतो. सद्यस्थितीत आंबेडकरांना टाळणं शक्यच नाही. त्यामुळे पुढील राजकारण करण्यासाठी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या इतिहासाला टाळता येणार नाही. त्यामुळे हे प्रयत्न होत आहेत."

"दुसरीकडे या मांडणीतून आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी संभ्रम निर्माण करण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यातून आंबेडकर हे कसे विरोधाभासी होते, ते विरोधाभासातच जीवन जगले आहेत हेही दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे," असाही आरोप पोळ यांनी केला...

सुरेश सावंत म्हणाले, "आंबेडकर आणि संघ यांचा कधीही मेळ नव्हता. संघ चलाखीने आंबेडकरांशी नातं जोडत आहे. संशोधनाचा नियम आहे की, एक पुरावा असून चालत नाही. त्यासाठी वेगवेगळे पुरावे असावे लागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा हिंदू राष्ट्राच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली आहे. असं असताना आंबेडकरांना संघाविषयी आपुलकी वाटत होती हे सिद्धच होऊ शकत नाही."

"एखादा संदर्भ घेऊन ओढून ताणून त्याचा अर्थ काढणं म्हणजे फसवणूक करणं आहे. ही आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांना आपल्या बाजूने करण्याची खेळी, डावपेच आहे. हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं अपहरण आहे. संघाने आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचं जसं अपहरण केलं, तसंच ते बाबासाहेब आंबेडकरांचं करत आहेत," असा आरोप सुरेश सावंत यांनी केला.

आंबेडकरांशिवाय राजकारण करणं शक्य नाही म्हणून संघ आंबेडकरांशी नातं जोडू पाहतो आहे, या आरोपावर पांडव यांनी संघ डॉ. आंबेडकरांचा आधार घेऊन संघटन करत नाही हे अगदी स्पष्ट आहे, असं प्रत्युत्तर दिलं...

- प्रविण सिंधू,बीबीसी मराठी
7 जानेवारी 2025

https://www.bbc.com/marathi/articles/cql5q342zypo

------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!