भीमा-कोरेगांव महारांच्या अफाट शौर्याचा इतिहास...!!!


1】 चला आता... एक दीर्घ लेख देत आहे, मला माहीत आहे कोणीही वाचनार नाही, परंतु रेकॉर्ड रहावे म्हणून इथे पोस्ट करून ठेवत आहे... तुम्ही ही सेव्ह करून ठेवा, निवांतपणे वाचा... ❤️
----------------------------------------------------------------------------
पेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगांवची लढाई - 
१ जानेवारी १८१८
----------------------------------------------------------------------------
५ नोहेंबर१८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१डिसेंबर १८०२रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही देणे लागत होते. त्यासंबंधाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली पेशव्यांशी बोलणी करण्याकरीता गंगाधरशास्त्री हे वकील म्हणून पुण्याला आले. परंतु, त्यांचा पंढरपूर येथे संशयास्पदरीत्या खून झाला. हा खून बाजीराव पेशव्याच्या सांगण्यानुसार त्रिंबकजी डेंगळे यांनी केला, असे गायकवाडांच्या वतीने इंग्रजांनी आपले म्हणणे मांडले व त्रिंबकजी डेंगळेला पकडून ठाण्याच्या तुरुंगात त्यांनी ठेवले. परंतु तो तेथून पळाला. त्याला पकडून आपल्या ताब्यात देण्यास बाजीराव पेशवा टाळाटाळ करीत आहे, असे वाटल्याने ८मे१८१७रोजी इंग्रजांनी पुण्याला आपल्या सैन्याचा वेढा दिला. त्यावेळी नाईलाजास्तव बाजीरावास इंग्रजांशी दि.१३जून१८१७रोजी तह करून इंग्रजांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या. या तहास ' पुण्याचा तह 'असे म्हटले जाते. या तहाने पेशव्यांचा फार मोठा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला.तहानुसार इंग्रजांनी पेशव्यांसाठी प्रशिक्षित केलेली आपली पलटण परत घेतली. अशा प्रकारे,या तहाने इंग्रजांची सत्ता वाढत गेली व पेशव्यांची सत्ता कमी होऊ लागली.ही बाब बाजीरावाच्या मनाला लागून राहिली व त्यासाठी तो मार्ग शोधू लागला. या कामी त्याने हैदराबादहून त्याला भेटण्यास आलेला निजामाचा वकील सर  जॉन माल्कम याचा सल्ला घेतला असता, पेशव्यांनी इंग्रजांशी इमानेइतबारे वागून नेहमी त्यांना मदत व सहकार्य करावे, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे उत्तर भारतातील पेंढाऱ्यांचे बंड मोडून काढण्याच्या कामी इंग्रजांना मदत करण्यासाठी बाजीराव सैन्य ठेवू लागला. परंतु, पेशव्यांच्या पुणे दरबारात असलेला इंग्रजांचा रेसिडेंट एल्फिन्स्टन याचा मात्र बाजीरावावर विश्वास नसल्याने,बाजीराव हा नवीन सैन्य जमवून आपल्यावर हल्ला करीन, असा एल्फिन्स्टन याचा समज झाला.
      याच सुमारास, उत्तर भारतातील पेंढाऱ्यांचे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांचे एक मोठे सैन्य ठिकठिकाणी जमा होत होते. त्यापैकी ब्रिगेडियर जनरल स्मिथ याच्या ताब्यातील फोर्थ डिव्हिजन मधील लष्कर खानदेशातून कूच करीत हळू हळू अहमदनगरकडे येत होते व मुंबईची एक युरोपियन पलटन , व मद्रास नेटिव्ह पलटन , मद्रास नेटिव्ह घोडदळाची दुसरी पलटन,आणि मद्रास नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या पंधराव्या रेजिमेंटमधील दुसरी पलटन , अशा प्रकारचे सैन्य मुंबईहून पुण्याकडे चाल करून येत होते.मुंबईकडून येणारे सैन्य , आणि अहमदनगरकडे येणारे जनरल स्मिथ याचे सैन्य हे एकत्र व्हायचे होते. या इंग्रजी सैन्याला 'आर्मी ऑफ दि डेक्कन '  असे नाव दिले होते. अशा प्रकारे दोन्हीही बाजूंकडून आपापल्या सैन्याची जमवाजमव सुरु होती. यावेळी पेशव्यांनी इंग्रजांशी लढाई करावी,की करू नये, या महत्वाच्या प्रश्नावर बाजीरावाने कारभारी व सरदारांशी सल्लामसलत केली असता,फारच कमी सरदारांनी लढाई करण्यास अनुकूलता दर्शविली. कारण, इंग्रज फौजा आपल्यापेक्षा सरस असल्याने , त्यांच्याशी आता लढाई करून यशप्राप्ती साध्य होणार नाही, असे त्या अनुभवी सरदारांचे मत होते. परंतु, बाजीरावास त्यांचा सल्ला न पटल्याने त्याने लढायचे ठरवून लढाईची जय्यत तयारी केली. पुण्यात त्याच्या आदेशावरून अनेक सरदार जमा झाले. त्यात निपाणकर, अक्कलकोटचे भोसले, निंबाळकर, घोरपडे, जाधव, विंचूरकर, पटवर्धन, बापू गोखले, भोईटे, पुरंदरे यांचे व नवीन फौज मिळून लाख-सव्वालाख घोडदळ उभे ठाकले. याव्यतिरिक्त  अरब, रोहिले, पठाण, सिद्दी,गोसावी, रजपूत, रांगडे,मुसलमान असे मिळून ५०,००० पायदळ तयार झाले.या सर्व दीड लाख लष्कराचे नेतृत्व बापू गोखल्याकडे देण्यात आले.
    बाजीरावाच्या लष्कराची छावणी पुण्यातच गारपिराच्या आसपास पडू लागली. परंतु, गारपिरावर कर्नल बर याच्या कमांडखाली इंग्रजांच्या पलटनी अनेक दिवसांपासून आपला तळ ठोकून होत्या. या इंग्रजी लष्करात नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या सहाव्या , आणि सातव्या रेजिमेंटमधील मिळून १२००शिपाई होते व त्यांच्याकडे दोन तोफाही होत्या. हे सर्व लष्कर सध्या जिथे पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याच्या सभोवतालचा परिसर, म्हणजेच गारपिरावर होते. इंग्रजांच्या या छावणीच्या सभोवताली पेशव्यांच्या लष्करी छावण्या येऊन पडल्या.व गोसावी लोकांच्या छावण्या वानवडीच्या मैदानावर उतरल्या. त्याचप्रमाणे संगमावरील रेसिडेंट मि. एल्फिन्स्टन याचा बंगला व भांबुर्डे गावच्या ( सध्याचे शिवाजी नगर )दरम्यान विंचूरकरांचे घोडदळ, पायदळ आणि तोफखाना यांचा तळ येऊन पडला. अशा प्रकारे इंग्रजांची फौज ही पेशव्यांच्या लष्कराकडून हळूहळू चोहोबाजूंनी वेढली गेली.अशा रीतीने पेशव्यांच्या सैन्याची जय्यत तयारी झाल्यानंतर , इंग्रजांच्या छावणीवर ताबडतोब हल्ला चढवावा,असे सरदारांचे मत होते, परंतु  बाजीरावाने हा बेत रहित केला.
     बाजीराव पेशव्याचे सैन्य केव्हाही आपल्यावर हल्ला करेल, असे वाटल्याने इंग्रज रेसिडेंट मि. एल्फिन्स्टनने मुंबई व अहमदनगरच्या युरोपियन पलटणींनी ताबडतोब मदतीस यावे, असा हुकूम पाठविला. ततपूर्वी, मुंबईचे सैन्य हे लगेचच, म्हणजे ३०ऑक्टोबर १८१७ रोजी खडकीस येऊन पोहोचले. कर्नल बर याच्या कमांडखालील गारपिरावर असलेले इंग्रजांचे सैन्य हे असुरक्षितेमुळे ताबडतोब खडकी येथे हलविण्यात आले. हे सैन्य सध्याच्या होळकर पुलाच्या जवळपास व खडकी गावापर्यंत जाऊन पोहचले. पेशव्यांनी मेजर फोर्ड याच्याकडून जी प्रशिक्षित पलटन तयार करवून घेतली होती, तिचे वास्तव्य जवळच दापोडी येथे असल्याने वेळप्रसंगी ती इंग्रजांच्या खडकीतील सैन्याच्या मदतीस येऊ शकणार होती. 
    पेशवे व इंग्रज यांनी एकमेकांस आदेश पाठविले की, जमवाजमव केलेले सैन्य त्यांनी दूर पाठवून द्यावे, अन्यथा परिणामास तयार राहावे.इंग्रजांकडून मेझर फोर्ड व पेशव्यांकडून विठोजी नाईक यांनी हे निरोप परस्परांना दिले. तथापि, दोन्हीकडूनही हे म्हणणे मान्य न केले गेल्याने पेशव्यांचे सैन्य खडकीस इंग्रजांवर हल्ल करण्यासाठी ५नोव्हेंबर १८१७रोजी दुपारी ३वाजता पुण्यातून बाहेर पडले. रेसिडेंड मि. एल्फिन्स्टन हा संगमावरील आपल्या रेसिडेन्सिमधून आपल्या ५०० सैन्यासह खडकीला सुरक्षित पोहचला व त्याने ताबडतोब लढाईस सुरुवात करण्याचे आदेश दिले व दापोडी येथे मेजर फोर्डलाही आपल्या सैन्यासह खडकीच्या सैन्याला येऊन मिळण्याचा तातडीचा निरोप पाठविला.मराठ्यांचे पायदळ , घोडेस्वार तोफा वगैरे सर्व लष्कर चतु:श्रुंगीजवळ गणेशखिंडीच्या डोंगरापासून, संगमावरील रेसिडेन्सिच्या जागेपर्यंत मधल्या मैदानात चोहोकडे पसरले होते.त्यात बापू गोखले, मोरे , दीक्षित, मराठे, चिंतामणराव पटवर्धन , तासगांवकर, मिरजकर, आप्पाजी पाटणकर,घोरपडे, पुरंदरे, राजेबहाद्दर व अक्कलकोटवाले इ. राजे व सरदार होते.पेशव्यांची फौज फारच मोठी होती. त्यामानाने इंग्रजांचे लष्कर लहान असून, ते कर्नल बर याच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या सैन्याला खडकीच्या मैदानावर तोंड देण्यासाठी सज्ज झाले होते. इंग्रज सैन्याच्या मध्यभागी युरोपियन पलटन,रेसिडेंटने आपल्याबरोबर आणलेले शिपाई आणि सहाव्या रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनपैकी एक तुकडी , तसेच मुळा नदीच्या बाजूला सातव्या रेजिमेंटची पहिली बटालियन , तर खडकी गावाजवळ पहिल्या रेजिमेंटपैकी दुसरी बटालियन होती. आणि दोन्ही टोकाला एक एक तोफही होती.दापोडीहून खडकीकडे आगेकूच करीत असलेल्या मैजर फोर्डच्या सैन्याला खडकीपर्यंत जाऊ न देण्यासाठी पेशव्यांचे मुख्य प्रधान, मोरे, दीक्षित व रास्ते त्या दिशेला वळले.त्यांनी मेजर फोर्डवर हल्ला करण्याचे ठरवले. मोरे, दीक्षितांचे घोडेस्वार मेजर फोर्ड याच्या उजव्या बाजूच्या शिपायांजवळ येत चालले आहेत, असे पाहून व पेशव्यांचे स्वार आपल्या माऱ्याच्या टप्प्यात आले असल्याचे पाहून मेजर फोर्ड याने आपल्या बटालियनला तोफांमधून व बंदुकीतूनगोळीबार सुरू करण्याविषयी हुकूम दिला.त्यामुळे मोरे व दीक्षितांचे सैन्य खडकीच्या बाजूला वळले. तेथेही त्यांच्यावर तोफगोळ्यांचा भडीमार झाला. त्यात मोरे व दीक्षित तोफगोळा लागल्याने ठार झाले.त्यामुळे त्यांच्या सैन्यात धांदल उडाली व सैन्य मागे फिरले . मेजर फोर्ड च्या  मार्गातील अडथळा दूर झाल्यामुळे तो कर्नल बर यांच्या सैन्याला येऊन मिळाला. पेशव्याकडील अरब व गोसावी यांनी सातव्या रेजिमेंटची  पहिली बटालियन व सहाव्या रेजिमेंटची दुसरी बटालियन यांच्यावर हल्ला चढविला या हल्ल्याचे नेतृत्व पेशव्यांच्या सैन्यातील पोर्तुगिज सेनापती डी. पिंटो याच्याकडे होते. परंतु, तो या हल्ल्यामध्ये ठार झाल्याने इंग्रज सैन्य प्रतिहल्ल्यासाठीपुढे सरसावले .पम कर्नल बर याने त्यांना थांबविले व गोळीबार करण्याचा आदेश दिला. बापू गोखले हा यशस्वीरीत्या पुढे घुसला . परंतु त्याचा घोडा जखमी झाल्यामुळे  त्याला माघार घ्यावी लागली. त्यावेळी त्याच्या मागे असलेले दुसरे सरदार पुढे सरसावले,व त्यांनी आपल्या सैन्याची जोरदार मुसंडी मारली. पुढे त्यांना दलदल व चिखलाने भरलेला खोल ओढा लागला व ते या दलदलीच्या चिखलात एका पाठोपाठ एक असे येऊन पडले.अशा प्रकारे या लढाईत हल्ले-प्रतिहल्ले होत राहिले.यात दोन्हीकडचे अनेक सैनिक ठार झाले, तर कित्येक जखमी झाले. ही लढाई चालू असतांना हळू हळू अंधार पडू लागल्याने संध्याकाळी सातच्या सुमारास ही लढाई संपली व पेशव्यांचे सैन्य पुणे शहराकडे परत गेले.पेशव्यांचे सैन्य माघारी फिरल्यानंतर मेजर फोर्ड हा देखील आपल्या सैन्यासह दापोडील परतला. आणि कर्नल बर हा आपल्या ब्रिगेडसह कूच करून रात्री आठ वाजता खडकी येथील आपल्या छावणीत परतला. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला असला, तरी इंग्रजांचे संपूर्णपणे वर्चस्व राहिले नाही पुढील आठ दिवस दोन्हीकडूनही कसलीच कारावाई झाली नाही. परंतु या कालावधीत इंग्रजांनी मात्र आपल्या पलटणींची जय्यत तयारी करून घेतली.
    खडकीची लढाई सुरू होण्यापूर्वीच ब्रिगेडियर जनरल स्मिथ याला फोर्थ डिव्हिजनचे लष्कर लवकरात लवकर व जलदगतीने कूच करून खडकीच्या सैन्याच्या मदतीसाठी घेऊन यावे, असा आदेश रेसिडेंट मि. एलफिन्स्टन याने पाठवला होता. परंतु हे लष्कर वेळेवर पोहचू शकले नाही, आणि खडकीच्या लढाईस सुरूवात झाली.
      जनरल स्मिथ आपले फोर्थ डिव्हिजनचे लष्कर घेऊन अहमदनगरहून जलदगतीने कूच करीत होता . पेशव्यांचे काही सैन्य त्याच्या येण्याला प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या वाटेत आडवे आले होते.त्यांच्यामध्ये कोंढापुरी येथे काही चकमकी देखील झाल्या. परंतु या अडथळ्यांचा फारसा परिणाम जनरल स्मिथवर झाला नाही आणि जनरल स्मिथ आपल्या सैन्यासह दि. १३नोव्हेंबर १८१७रोजी पुण्यास येरवड्याजवळ पोहचला. येरवड्याच्या नदीच्या काठावर उजवीकडे सादलबाबाची टेकडी म्हणून जी जागा आहे, तिथे तो तळ देऊन राहिला. तेथून जवळच खडकीला कर्नल बर याची छावणी होती. या दोन्ही सैन्यास एक होऊ द्यायचे नाही, असा पेशव्यांचा डाव होता. व त्यासाठी पेशवा तसा प्रयत्न करीत होता. परंतु त्याच्या या प्रयत्नास यश आले नाही. आणि इंग्रजांचे दोन्ही सैन्ये एकत्र येऊन त्यांनी सादलबाबाच्या टेकडीच्या मागे आपला तळ ठोकला. मुळा-मुठा नदीच्या मधून  पलीकडे जाण्यासाठी जी नदीच्या उताराची वाट होती, त्या उतारवाटेने जाऊन पुण्यातील गारपिरावरील पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा इंग्रजांचा बेत होता. म्हणून त्यासाठी त्यांनी ' पिकेट हिल ' टेकडीवरून दोन तोफा डागल्या.
      नदीच्या उतारवाटेने पलिकडे जाणाऱ्या इंग्रज सैन्याला प्रतिबंध करण्याकरता पेशव्यांच्या काही सैन्याने अडथळे नदीच्या पात्रात निर्माण केले होते.या सैन्यात अरबांचे घोडेस्वार होते. त्यामुळे पेशव्यांचे आणखी काही सैन्य त्यांच्या मदतीला धावून आले व इंग्रज आणि पेशवे सैन्यात नदीपात्रातच काही चकमकी झडल्या. तथापि, पेशव्यांच्या या हल्ल्याला न जुमानता इंग्रज सैन्य नदी ओलांडून पैलतीरावर पोहचले.इंग्रज सैन्याच्या या भागाचा प्रमुख लेफ्टनंट कर्नल मिलने हा होता.या सैन्यात मुंबईची युरोपियन पलटन, रेसिडेंटच्या तैनातीतील सैन्य आणि पहिल्या, सहाव्या व सातव्या नेटिव्ह पलटनीतील एक एक बटालियन होती. हे सैन्य १६नोव्हेंबर १८१७रोजी मध्यरात्री पैलतीरावर पोहचले.त्यानंतर १७नोव्हेंबर १८१७रोजी पहाटे जनरल स्मिथ याच्या छावणीतील सैन्य संगमाजवळच्या नदीतील उतारवाटेने पलिकडे पुण्याला पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी निघाले.अशा रितीने इंग्रजांची एकत्र आलेली दोन्ही सैन्ये वेगवेगळ्या बाजूने पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी निघाली.परंतु,हे सैन्य जेव्हा गारपिराकडे आले, पेशव्यांचे सैन्य आपला तळ उठवून रात्रीतून कूच करून तेथून निघून गेले होते. त्यामुळे १७नोव्हेंबर १८१७रोजी त्याच दिवशी तिसरे प्रहरी म्हणजेच दुपारी  तीन वाजता शनिवारवाड्यावरील पेशव्यांचा भगवा जरीपटका खाली उतरवून, इंग्रजांचा युनियन जँक शनिवारवाड्यावर फडकावला.
       पेशव्यांनी जेव्हा येरवडा येथे इंग्रजांवर हल्ले केले, तेव्हा त्यांच्यातील अरब, गोसावी हे लढत होते . ते टेकडी चढून वरही आले. परंतु त्यांना दारूगोळा अथवा रसद यांचा पुरवठा न झाल्याने, आणि वरून इंग्रजांच्या तोफांचा मारा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे मग पेशव्यांनीही माघार घेतली. हे पाहून पेशव्यांच्या सैन्याचे नेतृत्व करीत असलेले सेनापती बापू गोखले यानेही माघार घेतली. या लढाईत अनेक अरब,गोसावी मारले गेले व उरलेल्यांनी आपला जीव बचावण्यासाठी पळ काढला. अशा वेळी इंग्रज सैन्याने त्यांचा पाठलाग केला. परंतु , बाजीराव पेशवा हा दिवे घाटातून आपल्या सैन्यासह सासवडला पळून गेला. अशा रितीने येरवड्याच्याही लढाईत पेशव्यांचा पराभव झाला.
     येरवड्याच्या लढाईत माघार घेतल्यानंतर दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा सेनापती बापू  गोखले हे मोठ्या सैन्यासह पुरंदरच्या बाजूला पळून गेले. त्यांचा ताबडतोब पाठलाग करने जनरल स्मिथ ला शक्य नव्हते.दि. १७नोव्हेंबर ते २१नोव्हेंबर  हे पाच दिवस त्याने आपल्या सैन्याची तयारी करण्यात घालवले.या कालावधीत बाजीरावानेही आपल्या सैन्यासह बराच लांबचा पल्ला गाठला.त्याला साताऱ्याजवळ माहुली मुक्कामी निपाणीचे आप्पासाहेब निपाणकर हे आपल्या दोन हजार घोडेस्वार व एक हजार अरब सैन्यासह येऊन मिळाले.बाजीराव माहुलीहून पुसेसावळी येथे २७नोव्हेंबर रोजी आला.तेथे दोन दिवस मुक्काम करून, २९नोव्हेंबर १८१७रोजी तो निपाणकर व सांगलीचे पटवर्धन यांचेकडील पाच हजार घोडदळ घेऊन मिरजेकडे निघाला.बापू गोखले, विंचूरकर आणि घोरपडे यांचेकडे पेशव्यांचे मुख्य लष्कर सोपवण्यात आले होते.
      इंग्रज सैन्य पाठलाग करीत असल्यामुळे बाजीरावाने आपली दिशा बदलली व तो उत्तरेकडे पंढरपूरच्या दिशेने सटकला आणि त्याने पंढरपूरला मुक्काम केला. परंतु, इंग्रज सैन्य पंढरपूरच्या जवळपास आल्यामुळे बाजीराव अहमदनगरकडे पळाला.तेथून त्याने आपला मोर्चा सोन्यासह नाशिकच्या दिशेने वळवला.बाजीरावाच्या या गनिमी काव्यामुळे हैराण झालेल्या जनरल स्मिथला त्याचे निश्चित ठिकाण कळणे अशक्य झाल्याने , त्याला बाजीरावाचा पाठलाग करने कठीण जाऊ लागले. त्यामुळे, जनरल स्मिथ याने आपला मोर्चा घोडनदीकडे ( शिरुर ) वळवून, शिरुर येथे आपल्या तोफा व इतर अवजड सामान ठेऊन त्याने नाशिकच्या दिशेने पेशव्यांचा पाठलाग करण्यासाठी संगमनेर गाठले.परंतु , तो पर्यंत बाजीराव पेशवा आपल्या सैन्यासह ओझरचा घाट उतरून ३० डिसेंबर १८१७रोजी त्रिंबकजी डेंगळे याच्या पायदळासह जुन्नर मार्गे चाकण येथे येऊन पोहचला.१८नोव्हेंबर ते ३०डिसेंबर १८१७ या दीड महिन्याच्या कालावधीत त्याने जनरल स्मिथला बऱ्याच हुलकावण्या देऊन, अक्षरश : जेरीस आणले होते. बाजीराव हा सैन्याची जमवाजमव करून, प्रचंड सैन्यासह पुणे शहर काबीज करण्यासाठी परत येत आहे, हे पाहून धास्तावलेले इंग्रज सैन्य बाजीरावाच्या पुण्याकडील रोखाला प्रतिबंध करू शकले नाही. पेशवे सैन्य पुण्याच्याअगदी जवळ, चाकण येथे आले, तेव्हा पुणे शहराच्या बंदोबस्ताचे काम कर्नल बर याच्याकडे होते, व त्यावेळी त्याच्याजवळ फारच थोडे सैन्य असल्याने कर्नल बर फारच घाबरलेला होता. पेशव्यांचा पाठलाग करणारा जनरल स्मिथ यावेळी नेमका कोठे आहे, हे ही त्याला निश्चित माहिती नव्हते.पेशवे अचानक चाकणहून पुण्याकडे आले, तर नेमके काय करावे लागेल, या चिंतेने ग्रासल्याने, वेळप्रसंगी आपल्याला सहकार्य व मदत मिळावी म्हणून त्याने त्वरीत एक घोडेस्वार इंग्रज सैनिक शिरूरच्या छावणीत लेफ्टनंट कर्नल फिल्समन याचेकडे पाठवून  खास संदेश पाठवून,त्याचेद्वारा  शिरुर येथून नेटिव्ह इन्फंट्रीची एक पलटण पुण्यास अतिजलद मदतीसाठी मागवली.
    लेफ्टनंट कर्नल फिल्समन  याने हा तातडीचा संदेश प्राप्त होताच, पुण्याला सैनिकी मदत पाठविण्याचा निर्णय त्वरीत घेतला व त्यासाठी ' सेकंड बटालियन ऑफ  दि फर्स्ट रेजिमेंट ऑफ बाँम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री ' ची खास निवड केली. कारण, या बटालियनमधील बहुतांश सैनिक हे लढवय्ये महार सैनिक होते.
       कॅप्टन फ्रान्सिस स्टाँटन हा या महार सैन्यासह ३१डिसेंबर १८१७रोजी रात्री आठ वाजता शिरुर येथून खास कर्नल बर च्या मदतीसाठी निघाला. त्याच्या नेतृत्वाखाली ' पहिल्या  बाँम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनचे ' ५०० पायदळ सैनिक,  ' पूना इर्रेग्युलर हॉर्स ' चे २५०घोडदळ सैनिक, २ सहा पौंडी तोफा घेतलेले ' मद्रास तोफखान्या ' चे २४युरोपियन्स गनर्स इतके सैन्य होते. या युरोपियन्स सैनिकांचे नेतृत्व लेफ्टनंट चिशोलम याचेकडे होते. २७मैलांचा , थंडीतील रात्रीचा पायी प्रवास करून कॅप्टन स्टाँटन आपल्या सैन्यासह १जानेवारी १८१८ रोजी,नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता भीमा कोरेगांव येथील भीमा नदीच्या  पूर्व तीरावर येऊन पोहचला. सतत दहा तासांच्या अविश्रां प्रवासामुळे त्याचे सैन्य अतिशय थकले होते.
      कोरेगांवलगतच्या टेकडीवरून सभोवताली पाहिल्यानंतर त्याला पेशव्यांचे प्रचंड सैन्य दिसले. टेकडीच्या पलीकडे, भीमा नदीच्या पश्चिम तीरावर किनाऱ्याच्या काठाने , सभोवताली पेशव्यांचे अफाट सैन्य लढाईच्या जय्यत तयारीनीशी उभे ठाकले होते.पेशव्यांच्या सैन्यात २३ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ, असे २८,००० सैन्य होते. त्यात गोसावी, अरब व मराठे होते आणि त्या सैन्याचे नेतृत्व पेशव्यांचा कसलेला व अनुभवी सेनापती बापू गोखले हा करीत होता.या प्रचंड सैन्यापासून आपला बचाव होणे शक्य नाही, असे स्टाँटनला वाटले.परंतु , पेशव्यांच्या अफाट सैन्याला पाडाव करण्याचा ठाम निश्चय करुन, त्यांना हुलकावण्या देत  कोरेगांवात त्याने प्रवेश केला. या गावाला त्यावेळी मातीचे गांवकुस होते. गावातील घरे, आणि गावाला असलेले गांवकुस यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे अशक्य होईल, याची कल्पना आल्यामुळे कॅप्टन स्टाँटन याने संपूर्ण कोरेगांव ताब्यात घेतले. गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गढीच्या बुरूजावर तोफा चढवून, तसेच गावातील गल्ली-बोळांच्या रस्त्यांतून आपल्या मूठभर सैन्याची व्यूह रचना करून त्याने पेशवा सैन्यावर तोफ डागून आपण या लढाईस तयार असल्याचे सूचित केले. काही वेळातच त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी पेशवा सैन्याने भीमा नदी उतरून कोरेगांव भोवती  चोहोबाजूने गराडा घातला. बरेचसे सैन्य गर्दी करून गावात शिरण्यास यशस्वी झाले व लढाईस सुरुवात झाली. सुरुवातीस इंग्रजांनी आपल्या तोफा गढीच्या बुरुजावर चढविल्याने, त्यांचा वापर गावात शिरलेल्या पेशवे सैन्यावर त्यांना करता येईना. म्हणून त्या तोफा मोठ्या मुश्किलीने पुन्हा खाली आणून, नदीच्या बाजूस असलेल्या दरवाजाने त्यातून इंग्रजांनी पेशवे सैन्यावर त्यांचा मारा सुरू केला. त्या माऱ्याने पेशव्यांकडील बरेच सैन्य ठार झाले. 
     इंग्रजसैन्य रात्रभर उपाशीपोटी चालत २७मैलांचा पायी प्रवास केल्याने अतिशय थकले होते. तहानेने व्याकूळ असले, तरीही जवळ नदी असूनही ते आपली तहान भागवू शकत नव्हते. अशाही परिस्थितीत ते पेशव्यांच्या प्रचंड सैन्याशी मुकाबला करीत होते. त्यातच कोरेगांवच्या त्या लहानशा तटबंदीच्या आत कोंडले गेल्याने, गावात दोन्हीही सैन्याची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. आणि याचाच फायदा घेत, अशा अडचणीच्या जागेत सापडलेल्या इंग्रज सैन्यावर हल्ला करण्याकरीता एक हजार अरब सैनिकांची तुकडी, अशा तीन तीन फळ्यांनी चोहोबाजूंनी एकत्र हल्ला करून गावच उध्वस्त करण्यासाठी पुढे चाल केली. हातघाईच्या या लढाईमध्ये इंग्रजांकडून प्रभावी मारा करणाऱ्या तोफांवर गावकुसाच्या तटबंदीचा आधार घेत, अरबांनी जोरदार हल्ला केला. आणि शेवटी त्यांनी मोठ्या हिकमतीने एका तोफेवर ताबा मिळवून तोफेवरील अधिकारी लेफ्टनंट चिशोलम यास गनिमी काव्याने ठार मारले, व त्याचे शिर धडावेगळे केले व ते भाल्याच्या टोकावर खोचून , इंग्रज सैन्याचै मनोबल या  भीतीने कमी होईल,  व त्यांच्या दहशत निर्माण होईल, या करीता ते शिर  इकडे तिकडे मिरवत राहिले व आरोळ्या ठोकू लागले.ग्रेनेडियरचा ऍडजंट लेफ्टनंट पँटिनसन हा शक्तीशाली, ६फूट ७इंच उंचीचा दुसऱ्या तोफेवरील धिप्पाड अधिकारी जखमी होऊन पडला होता. त्याचीही तोफ पेशव्यांकडील अरब सैनिकांनी आपल्या ताब्यात घेतली, तेव्हा तशा जखमी अवस्थेतही त्याने आपल्या सैन्याला पुन्हा आवाहन केले व पेशव्यांच्या त्या अरब सैन्यावर निकराचा हल्ला करून आपली तोफ परत मिळवली. हे करत असतांना पँटिनसनला वीरगती प्राप्त झाली. इंग्रज सैन्यातील इतर अधिकारी लेफ्टनंट कोनलेन, असिस्टंट सार्जंट वुईंगेट हे देखील जबर जखमी झाले. इंग्रज सैन्याचे नेतृत्व करणारा कॅप्टन स्टाँटन हा स्वत:ही जखमी झाला होता. त्यामुळे या सर्व जखमींना  गावातील मंदिरे व धर्मशाळेत ठेवण्यात आले. परंतु , पेशवा सैन्यास याचा सु गावा लागताच त्यांनी धर्मशाळेवर कब्जा करून आतील सर्व जखमींना ठार मारले. त्याच दरम्यान पहिल्या बटालियनचे लेफ्टनंट जोन्स आणि असिस्टंट सार्जंट विली यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी तेथे आले.हल्ले- प्रतिहल्ले करून त्यांनी आपल्या सैन्याच्या चपळाईने धर्मशाळा परत हस्तगत केली. दोन्हीही बाजूंच्या सैन्यात तुंबळ युद्ध सुरू होते. अनेक सैनिक जखमी होत होते, तर बरेच लढता लढता मरत होते.
        इंग्रजांचे सैन्य खूपच शौर्याने लढत होते. तहानेने, आणि भूकेने व्याकूळ झाल्यामुळे आता हळू हळू त्यांचा प्रतिकार कमी होत होता. पेशव्यांच्या सैन्याने देखील आपल्या शौर्याची शिकस्त केली होती. तेही चांगले कसलेले लढवय्ये होते व त्यांच्या दमदार माऱ्यापुढे इंग्रज सैन्याने अनेकदा कच खालली होती. पेशव्यांच्या अफाट सैन्यापुढे हे मूठभर इंग्रज सैन्य निष्प्रभ ठरत होते. पेशव्यांच्या सैन्यापुढे आता टिकाव धरणे शक्य नाही , असेच आता त्यांना वाटू लागले, आणि आपला पराभव निश्चित आहे, असे समजून ते शरणागती पत्करणार , याचा अंदाज जेव्हा खुद्द कँप्टन स्टाँटनला आला, तेव्हा या अत्यंत बिकट परिस्थितीतही आपल्या सैन्याचे मनोबल वाढावे, म्हणून त्यांना '' धीर न सोडता, न घाबरता, शेवटचा सैनिक जीवंत असेपर्यंत प्राणपणाने लढत रहा. मरण पत्करा, परंतु शरण जाऊ नका ", असे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून ' बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री ' च्या महार सैनिकांचे मनोबल वाढल्याने, त्यांच्यात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले व आपला नाईक जसनाक यसनाक याच्याकडे जखमी स्टाँटनने सोपवलेल्या नेतृत्वाखाली  ते पेशवे सैनिकांवर निकराने तुटून पडले. अतिशय विषम संख्येने, आपल्यापेक्षा ५६पट जास्त असलेल्या पेशवे सेन्यावर त्वेषाने ते महार सैनिक गोळीबार करू लागले. पेशवा सैन्याचे मुडद्यावर मुडदे पडू लागले. या अवघ्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या सैन्याला मात्र आक्रमक चढाया करुन जेरीस आणले. त्यांच्याकडील दारुगोळा जेव्हा संपला, तेव्हा त्यांनी आपल्या तलवारी व कटारी म्यानाबाहेर काढून पेशवा सैन्याची कापाकापी सुरू केली. 
        पेशवा सैन्याने कोंडी केल्यामुळे पुण्याहून कर्नल बर किंवा इतरत्र असलेल्या जनरल स्मिथचे सैन्य त्यांच्या मदतीस कोरेगांव येथे येऊ शकत नव्हते.आता रात्र होऊ लागल्याने कसेबसे नदीचे पाणी त्यांना प्यायला मिळाले,  आणि  नव्या दमाने, नव्या उत्साहाने याच संधीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजता महार सैन्याने पेशवा सैन्यावर जबरदस्त हल्ला चढवला. महार सैनिकांच्या या जबरदस्त तडाख्याने पेशवा सैन्य गर्भगळीत झाले व कच खाऊन ते रणांगणातून माघार घेऊन पळ काढू लागले. याच हातघाईत पेशव्यांचा सेनापती असलेल्या बापू गोखल्याचा एकुलता एक पुत्र महार सैनिकांच्या हातून ठार झाला, आणि पेशवा सैन्य युद्ध करण्याचे सोडून, सापडेल त्या दिशेला सैरावैरा धावू लागले. या धावत्या सैनिकांचा महार सैनिकांनी थेट वढू, फुलगांव, आपटी पर्यंत पाठलाग केला. खुद्द दुसरे बाजीराव पेशव्यांनी अगोदरच पळ काढला होता. त्रिंबकजी डेंगळे,विंचूरकर, शिंदे व होळकरांसह बापू गोखल्याने तुळापूर येथे भीमा नदी ओलांडली.
      पेशव्यांच्या या अफाट सैन्याला रणांगण सोडून पळ काढावयास लावणारी जी ' बाँबे नेटिव्ह इन्फंट्री ' ची प्रमुख तुकडी होती, ती सर्व लढवय्या, शूर अशा महार सैनिकांची होती. तीचे नेतृत्व रतनाक, जतनाक, व भिकनाक यांनी केले होते. त्यामुळे पेशव्यांना पळ काढण्यास भाग पाडणारे सर्वच योद्धे हे महार होते, हेच सिद्ध होते.
       या लढाईत इंग्रजांकडून लढणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या रेजिमेंटच्या एकूण ५०सैनिकांना वीर मरण आले, तर २०५ सैनिक जखमी झाले. त्यापैकी इंग्रजांना हे युद्ध जिंकून देण्यास ज्यांनी अति पराक्रम करून आपल्या जीवनाचे बलिदान दिले, अशा २३ महार सैनिकांची नावे, त्यांच्याबद्दल अतीव कृतज्ञता बाळगून, या युद्धात पहिल्या महार सैनिकाला जेथे लढतांना हौतात्म्य प्राप्त झाले, बरोबर त्याच ठिकाणी ३३×३३फूटांच्या चबुतऱ्यावर ६५फूट उंचीचा , घडीव दगडांचा सूच्याकार स्तंभ उभारून , त्यावर संगमरवरी फलकावर कायम स्वरुपी कोरून त्यांची स्मृती जतन करून ठेवली आहे. 
    कोरेगांवच्या या लढाईत धारातीर्थी पडलेले , व जखमी झालेले ते शूर वीर महार सैनिक, व त्यांचा सैन्यातील हुद्दा पुढील प्रमाणे-

१) सोननाक कमलनाक - नाईक.
२) रामनाक येसनाक - नाईक.
३) गोंदनाक कोढेनाक - शिपाई.
४) रामनाक यसनाक - शिपाई.
५) भागनाक हरनाक - शिपाई.
६) अंबरनाक काननाक - शिपाई.
७) रूपनाक लखनाक - शिपाई.
८) गणनाक बाळनाक - शिपाई.
९) काळनाक कोंडनाक - शिपाई.
१०) वपनाक रामनाक - शिपाई. 
११) विटनाक धामनाक - शिपाई.
१२) राजनाक गणनाक - शिपाई.
१३) वपनाक हरनाक - शिपाई.
१४) रैनाक वाननाक - शिपाई.
१५) गणनाक धरमनाक -शिपाई
१६) देवनाक आमनाक - शिपाई.
१७) गोपाळनाक बाळनाक -शिपाई.
१८) हरनाक हिरनाक - शिपाई.
१९)जेठनाक दैनाक - शिपाई.
२०) गणनाक लखनाक - शिपाई.

 जखमी झालेले वीर सैनिक -

१) जाननाक हिरनाक - शिपाई.
२) भीकनाक रतननाक - शिपाई.
३) रतननाक धाकनाक -शिपाई.

      या महार सैनिकांच्या पराक्रमाची गौरवगाथा संपूर्ण जगाला कळावी, म्हणून त्यांच्या या महान पराक्रमाबद्दल  भीमा कोरेगांवच्या या विजयस्तंभावर इंग्रजीत पुढील प्रमाणे गौरववाक्य लिहिलेले आहे -
" One of the proudest triumphs of the British Army in the East " .
 अर्थात - "पूर्वेकडील देशांत ब्रिटीश सैन्याला जे अनेक विजय मिळालेले आहेत, त्यामध्ये अतिशय गर्व बाळगण्यासारखा हा विजय आहे.....!
------------------------------------------------------------------------------
- लेखक - मा.अशोक नगरे...✍️
पारनेर, जि. अहमदनगर...
#भीमकोरगाव
----------------------------------------------------------------------------

2] तर...

अलेक्झांडर रॉबर्टसन (Minister of Kilmallie, Scotland) हे त्यांच्या १९३८ ला प्रसिद्ध झालेल्या "दि महार फोक" या पुस्तकाच्या "दि मिलिटरी रेकॉर्डस ऑफ दि महार" या चॅप्टर मध्ये पृष्ठ क्र. ६२ वर भीमा कोरेगाव लढाई संदर्भात लिहितात...

".... But in particular the Mahar folk cherish the memory of the fight at Koregaon on the 1st January, 1818, when the flower of Maratha chivalry, in retreat it is true, but by no means broken, swooped in many thousands upon a force of 600 rank and file, which was on the march from Sirar to Kirkee.

There were just about two dozen European gunners and a few European officers in that small body of 600 outcastes which entrenched itself in the village of Koregaon when the Peshwa's army fell upon it. For twelve weary hours a hand to hand conflict was main- tained until many were slain and wounded on both sides. The victory lay with the small British force.

The heroism of that day is commemorated on the monament which stands on the bank of the sacred Bhima where the Poona-Ahmednagar Road crosses the river.

The Mahar names on the monument may be recognised by the termination - nak; and they are not a few..."

हजारो वर्षापासून अस्पृश्यांच्या शौर्याचा इतिहास दडवून ठेवला आहे, हा स्तंभ उभा नसता तर १८१८ चा इतिहास देखील त्यांच्या रक्तासोबतच भीमा नदीत वाहून गेला असता...

Adv_ Raaj Jadhav...✍️💗
भीमाकोरेगाव सत्य...!!
------------------------------------------------------------------------------


3 】 भीमा-कोरेगांव महारांच्या अफाट शौर्याचा इतिहास....!!


  भीमा-कोरेगांव महारांच्या अफाट शौर्याचा इतिहास,यत्किंचितही देशद्रोह नसून जाज्वल्य उच्चकोटीची देशभक्तीच १ जानेवारी हा भारतातील तमाम मागासलेल्या चिरडल्या दाबले गेलेल्या बहिष्कृतता लादल्या गेलेल्या आणि १९५६ नंतर चिवटपणे झुंज देत आपलं नव जग नवी ओळख निर्माण करणाऱ्या तमाम जातींसाठी अभिमानाचा शौर्य दिन. ज्यांच्या कमरेला ज्ञानाच्या किल्ल्या होत्या त्यांनी आपल्याच जातीचं गुणगान गाणारा आणि काहींची त्रोटक दखल घेणारा इतिहास लिहिला.जे शुद्र आहेत दखलपात्र नाहीत ज्यांना अनुल्लेखाने मारायचे त्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख न करणे हे भारतात नैसर्गिक. त्यातून मग सिंधूला हिंदू असा अपभ्रंशही चिकटवला जातो.हे ओघानं आलंच. अलिकडे आपल्याकडे अतोनात गंमतीजंमती होत असतात.कधी आपल्याकडे अस्पृश्यताच नसते,कधी इंग्रजांनीच आपल्यात फुट पाडण्यासाठी जाती निर्माण केल्या असल्याचे मांडले जाते कधी शिक्षण सर्वांना मिळत होते.अशा निखालस थापा मारून सत्याचा अपलाप करून वस्तुस्थिती आणि आपली पापं झाकण्याची केविलवाणी धडपड इथले बुद्धीभेदी करत असतात ते केवळ सनातनी ब्राह्मणच नाहीत तर ब्राह्मणेतरही यात आघाडीवर आहेत. त्यामुळे भीमा-कोरेगांवची लढाई त्यात मिळविलेला “जय” हा केवळ एका जातीचा इतिहास ठरतो अन तोही अदखलपात्र होऊन जातो.तो तत्कालीन मराठेशाहीतील मराठ्यांच्या अपमानाचा बदला ठरत नाही.कारण इथं जात आडवी येते.आणि म्हणून आपल्याकडे बाजीप्रभू देशपांड्यांची पावनखिंड अभ्यासाला लावली जाते.हिरकणी गडावरून उतरते तानाजी घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा सर केला अशी दंतकथा शौर्य म्हणून अभ्यासाला लावले जाते. मात्र महारांचा अतुलनीय इतिहास अभ्यासाला येत नाही.नागेवाडी वाई येथील महा+अरि = नागनाक महार पाटलाने मोगल सम्राटांकडून जिंकून दिलेला वैराटगडाचा इतिहास अभ्यासाला येत नाही.जेव्हा कुणीच पुढे येत नव्हतं तेव्हा जीवाचा धोका पत्करून छत्रपती संभाजी राजांचं पार्थिव गोळा करून त्यावर अश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केलेला पहेलवान गोविंद महार अभ्यासाला येत नाही.जात्याभिमानी जात गंड बाळगणाऱ्या सर्वांच्याच ते गैरसोयीचं असतं. हल्ली भीमा-कोरेगांवची लढाई म्हणजे देशद्रोह.भीमा-कोरेगांवची लढाई झालीच नाही. भीमा-कोरेगांवची लढाई जिंकलीच नाही.इथपासून भीमा-कोरेगांवच्या लढाईत केवळ महार सैन्य नसून मराठा चर्मकार कोळी धनगर वगैरे जातीही होत्या असेही मांडले जातेय.हे सगळेच आपल्या परीने करत आहेत आता केवळ सनातनी ब्राह्मण नाही तर ब्राह्मणेतर जातीही यात अग्रभागी आहेत. भीमा-कोरेगांव लढाईचा इतिहास इंग्रजांनी लिहिला म्हणून तरी ते आपल्याला माहित झालं नाहीतर अशा कितीतरी शौर्यगाथा आजही वाचा फुटण्याची वाट पहात असतील.किंकेड चार्लस अन पारसनीस यांनी संपादित केलेलं हे पुस्तक ब्रिटीश स्कूल ऑफ मिलिटरी मध्ये अभ्यासाला आहे. या लींकवर ते मोफत वाचता येईल.,https://archive.org/details/historyofmaratha03kincuoft Volume 3 Publisher London, MilfordPages 294 पान क्रमांक २१४-२१६वर भीमा-कोरेगांव लढाईचा संदर्भ वाचता येईल. ५०० महार सैनिक लढले हे खरे आह.२८ हजार पेशव्याचं सैन्य होतं हेही खरं मात्र हे सगळेच कापले गेले नाहीत.हजारो मारले गेले असतील त्यातून अनेकांनी पळून जावून आपला जीव वाचवला.यशस्वी माघार आणि लढाई जिंकली यात महार सैनिक आणि इंग्रज अधिकारीही मारले गेले. मुळात एक कसोटी लक्षात घेतली पाहिजे की हे देशद्रोह देशभक्ती राष्ट्भक्ती हे सगळं भंपक आणि टाकाऊ थोतांड आहे.असं आपल्या देशात त्या त्या काळी कधीच अस्तिवात नव्हतं.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना जसे परकीयांच्या विरुद्ध लढावे लागले तसे इथल्या मराठा ब्राह्मण सरदार लोकांशीही लढावे लागले आहे.उलट सर्वात जास्त त्रास हा स्वकीयांनी राजांना दिलेला आहे.त्यासाठी तह करावे लागले आहेत.हि वस्तुस्थिती आहे. हे सगळे त्रास देणारे पवित्र देशभक्त होते काय? त्यांची देशभक्ती देशनिष्ठ कोणत्या ग्रहावरील देशाला समर्पित होती? इंग्रजांच्या सैन्यातून लढले म्हणून पेशव्यांना हरवणे म्हणजे देशद्रोह वाटतो त्याच पेशव्यांनी याच इंग्रजांना प्रथम आवतान देवून इथं पाय रोवण्यास जमीन दिली हे किती भोळ्याभाबड्या देशप्रेमी लोकांना माहित आहे? भारत देश कधीच एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता.त्यासाठी एक उदाहरण पुरेसे ठरणारे आहे. इसवी सन १७५५ साली याच पेशव्यांनी मराठ्यांचे आरमार बुडवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली होती. म्हणजे कधी? तर १८१८ ची भीमा-कोरेगांवची लढाई होण्याअगोदर तब्बल ६३ वर्षे अगोदर. परकीय इंग्रजांना सोबत घेऊन स्वतःच्याच राज्यातील हिंदू धर्मीयांचे राज्य हिसकावून घेण्याचे प्रकार तेव्हा चालत होते. याचा अर्थ तेव्हा ‘भारत’ हा देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता, हे यावरून निर्विवादपणे सिद्ध होते.पेशव्यांनी सत्ता हातात येताच छत्रपतींचा शक बंद करून मोगलांचा फसली शक सुरु केला.पुढे इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांचे राज्य बुडविणे देशप्रेमाचा उत्कट नमुना आणि तेच इतरांनी केलं की देशद्रोह? असले कावे आपल्याकडे हरएक जण खेळत आला म्हणून आपण देश म्हणून एकत्र असलो तरी राष्ट्र म्हणून कधीच एकत्र आलो नाही येवूही शकत नाही.असो.इतिहासात रमण्यात कुणाला स्वारस्य असू नये.जो इतिहासात रमतो त्याचा भूतकाळ अंधकारमय होतो. खरेतर १९६० च्या नंतरचा सगळाच इतिहास अभ्यासक्रमातून कायमचा बाद केला पाहिजे.आपण वर्तमानातील प्रश्न काय परिस्थिती काय यावर लक्ष केंद्रित करून भविष्याचा वेध घेतला पाहीजे. पेशव्यांचे राज्य घालवले आणि शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.म्हणून त्यास त्वेषाने जितम् जितम् म्हणण्यात आज अर्थ नाही.आजची तरुण पिढी विवेकवादी आहे. आज भीमा-कोरेगांवला एकवही एक पेनचा उप्रकम सुरु आहे.हे मला जास्त आश्वासक आणि महत्वाचं वाटतं.गतइतिहासात प्रत्येक जात प्रत्येक जातीविरुद्ध लढली आहे.आपण आज वर्तमानात आहोत.सर्वाना सोबत घेऊन समतेचा शांतीचा मार्ग चोखाळूया हीच त्या शुरविरांना खरी आदरांजली ठरावी
  _/\_ जयभीम,जय भारत, भारतीय संविधान चिरायू होवो !!

  - मिलिंद धुमाळे ....✍️ 

------------------------------------------------------------------------------

4】बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युटीव कॉन्सिलच्या डिफेन्स अॅडवायझरी कमिटीवर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले. १ ऑक्टोबर १९४१ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियनची स्थापना बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियन ची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टीनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्यावेळेस महार रेजिमेंट च्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगावचा जयस्तंभ असणारे चिन्ह व त्यावर "World Mahar" कोरण्यात आले. हे चिन्ह दुस-या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते. जे प्रत्येक महार बटालियनच्या सैनिकांच्या डोक्यावर पराक्रमी विजय चिन्ह म्हणून शोभून दिसत होते. तिसरी महार रेजिमेंट बटालियन बेळगाव, कर्नाटक येथेच १९४२ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल कम्बिएर आणि मेजर सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली.द्वितीय महायुद्धाच्या वेळी पहिली व तिसरी महार रेजिमेंट North - West Frontier Province च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली. तर दुसरी आणि २५ वी बटालियन देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. द्वितीय महायुद्धाच्या काळात महार बटालियन बर्मा campaign मध्ये सैन्यात प्राणपणाने लढली.या पलटणींनी भारताच्या सीमासंरक्षण केले. तसेच जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन (म्यानमार) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली जी मोहीम अतिशय धोकादायक आणि शौर्य पणाला लावून लढायची होती त्या मोहिमेत महार बटालियनचा वापर केला गेला. यावरून सैन्यातील महार बटालियन चे महत्व लक्षात घेण्यासारखे आहे. या मोहिमेत ५ महार बटालियनचे सैनिक शहीद झाले. त्याच बटालियन च्या एका ऑफिसरला त्याच्या शौर्यासाठी गौरविण्यात सुद्धा आले होते. १ ऑक्टोबर १९४६ ला महार रेजिमेंट मशीनगन रेजिमेंट म्हणून नावारूपास आली. 'महार रेजिमेंट' चे 'महार मशीनगन रेजिमेंट' असे नवीन नाव देण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट'चे केंद्र कामठी,नागपूर येथेच स्थापन करण्यात आले. मात्र यावेळी 'महार रेजिमेंट'च्या टोपीवरील बिल्ल्यावरील चिन्हात बदल करण्यात आले.बदललेल्या चिन्हात भीमा कोरेगावच्या स्तंभावर Cross Wicker मशीनगनचे चिन्ह कोरण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट'च्या ३ बटालियननी पंजाब च्या सीमावर्ती प्रदेशात पंजाब सीमा सैनिक दलात काम केले. १९४७ला भारताच्या फाळणीच्या वेळी संरक्षण शरणार्थी म्हणूनही 'महार मशीनगन रेजिमेंट' बटालियनने काम केले.पंजाब प्रांतात सीमा सुरक्षा दल म्हणून काम करतांना 'महार मशीनगन रेजिमेंट' ने आपले शौर्य पणाला लावून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक गावांना सुरक्षा प्रदान केली होती. महार रेजिमेंट / बटालियन पासून तर 'महार मशीनगन रेजिमेंट' पर्यंतचा हा प्रवास अनेक शौर्य इतिहासांना प्रस्थापित करून गेला. परंतु त्याची नोंद भारतीय जातीय मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या इतिहासाने कधी घेतली नाही हेच दिसून येते. महार बटालियन मधील १, २, ३, ७, ८ आणि १३ या बटालियन या पूर्णपणे महार बटालियन होत्या. ज्यात प्रामुख्याने महार सैनिकांचा समावेश होता. ४, ५ आणि ६ या तीन बटालियन तुकड्यांनी सीमा सुरक्षा दल म्हणून काम केले. ज्या तीन तुकड्या पंजाब प्रांतात सीमावर्ती प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. महार बटालियन च्या १६ व्या तुकडीला ८ व्या पराशुट बटालियन मध्ये बदलण्यात आले होते. १९८१ ला हीच बटालियन यांत्रिक पायदळाच्या १२ व्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. महार बटालियन चे शौर्य सैन्याच्या प्रत्येक विभागात आपे पराक्रम गाजवून गेले. ज्यामुळे महार बटालियनला ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या सैनिक दलामध्येसुद्धा मानाने-सन्मानाने गौरविण्यात आले.आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मान पातळीवर नेउन पोहचविले.जाज्वल्य देशभक्ती आणि देशाचे संरक्षण यात महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार बटालियनने केवळ स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे. १९८७ ला दक्षिण भारतात LTTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती.१३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद् धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. अतिशय अल्प पुराव्यांच्या आधारावर मिळालेला हा महार बटालियन आणि महार सैनिकांच्या योगदानाचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की प्रत्येक भारतीयात महार सैनिकात असलेले धाडस आणि साहस निर्माण झाले. तर या देशावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. इतकेच काय तर देशांतर्गत चालना-या आतंकवादी कारवाया संपुष्टात आणता येईल. गरज आहे ती महार बटालियनच्या सैन्याकडून प्रेरणा घेण्याची. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळवली. महार रेजिमेंटने 9 युध्दक्षेत्र सन्मान आणि 12 रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीरचक्र, 4 कीर्तीचक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युध्द सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीरचक्र, 39 शौर्यचक्र पदक, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे. अशा शूर पराक्रमी दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या महार रेजिमेंटला टीम जागल्या सॅल्युट करते.
https://www.facebook.com/jaaglyaCommunity _____________________________________________
अवांतर - भीमा कोरेगांव मध्ये महार सैनिक ब्रिटीशांच्या सैन्यातून लढले असा आरोप केला जातो तो चुकीचा आणि धूळफेक करत मूर्खपणाचा आहे.मुळात त्यावेळी इंग्रजांच्या सैन्यात हिंदू सैन्य सुद्धा होते.मराठा सैन्य सुद्धा होते अन अठरापगड जातींचे सैन्य सुद्धा होते. भारत देश कधीच एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता.त्यासाठी एक उदाहरण पुरेसे ठरणारे आहे. इसवी सन १७५५ साली याच पेशव्यांनी मराठ्यांचे आरमार बुडवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली होती.म्हणजे कधी? तर १८१८ ची भीमा-कोरेगांवची लढाई होण्याअगोदर तब्बल ६३ वर्षे अगोदर. परकीय इंग्रजांना सोबत घेऊन स्वतःच्याच राज्यातील हिंदू धर्मीयांचे राज्य हिसकावून घेण्याचे प्रकार तेव्हा चालत होते. याचा अर्थ तेव्हा ‘भारत’ हा देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता, हे यावरून निर्विवादपणे सिद्ध होते.पेशव्यांनी सत्ता हातात येताच छत्रपतींचा शक बंद करून मोगलांचा फसली शक सुरु केला.पुढे इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांचे राज्य बुडविणे देशप्रेमाचा उत्कट नमुना आणि तेच इतरांनी केलं की देशद्रोह? असले कावे आपल्याकडे हरएक जण खेळत आला म्हणून आपण देश म्हणून एकत्र असलो तरी राष्ट्र म्हणून कधीच एकत्र आलो नाही येवूही शकत नाही.
Team Jaaglya https://www.facebook.com/jaaglyaCommunity/
---------------------------------------------------------------------------

5】 तुम्ही शुरवीरांची संतान आहात...ही गोष्ट काल्पनिक नव्हे...! भिमा कोरेगाव ला जावून बघा, तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत...! तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात...


-विश्वरत्न.डॉ . बाबासाहेब आंबेडकर...✍️📚  

【Ref:२५-१२-१९२७ महाडचे भाषण】
----------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!