महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास....!





1] महार सैनिकांचा गौरवशाली इतिहास...!!!


इ. स. १८२६ मध्ये काठियावाड, १८४६ मध्ये मुलतान आणि इ. स. १८८० मध्ये कंदाहार येथे ज्या लढाया इंग्रजानी केल्या त्यांत महार लढवय्यांनी आपल्या शौर्याचा झेंडा उभारला. 


इ. स. १८८० मध्ये दुसरे अफगाण युद्ध झाले, त्यांत अफगाणिस्थानांत असलेला इंग्रजांच्या डुब्रो' येथील तळावर शत्रूनी हल्ला केला, तेव्हां त्या तळाचे संरक्षण करताना १९ वी बाँबे इन्फट्री (पायदळ) ने शौर्याची कमाल केली. १९ व्या मुंबई पायदळांत बहुसंख्य लढवय्ये महार होते. 

या लढाईत १६ एप्रिल १८८० रोजी विशेष रंग आला. तो असा की एका मा-याच्या ठिकाणावर शत्रूनी हल्ला केला, तेव्हां तेथील इंग्रजसैनिकांनी माघार घेतली. पण त्यातील तिघांनी मात्र पाय रोवून, त्या ठिकाणी शत्रुला तोंड दिले. शत्रुंची संख्या ३०० होती. त्या संख्येपुढे या तिघांचा निभाव लागणार नाही म्हणून सहकाऱ्यांनी त्यांना माघार घेण्यास सांगितले. पण ते तिघे शूर वीर जागेवरून हालले नाहीत. त्या तिघांनी तीन तास लढत दिली व तीनशे शत्रूपैकी बऱ्याच जणांना यमसदनास पाठविले.

जेव्हां त्यांच्या जवळची काडतुसे संपली तेव्हां ते शत्रूच्या घोळक्यात शिरून बंदुकीचा उपयोग लाठी सारखा करून शत्रूला झोडपू लागले. लढता लढता ते धारातीर्थ पडले...

ते तीन महावीर म्हणजे मेजर सिडने जेम्स वॉडबी, प्रायव्हेट इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सौननाक ताननाक... (महार, शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तेव्हांपासून त्यांच्या नावापुढे नाक हे उपपद लावण्यात येत असे. तीच प्रथा पुढील काळांत इंग्रजी अमदानीतही चालू राहिली.) या शूर वीरांचे स्मृतिचिन्ह म्हणून मुंबईतिल युरोपियन जिमखाना जवळच्या रस्त्याला 'बॉडबी रोड' हे नाव देण्यांत आले, आणि आलेक्झाड्रा गर्लस हायस्कूलच्या भिंतीत एक शिलालेख ठेवण्यांत आला. तो शिलालेख असा:-

"This Road is named after Major Sidney James Waudby, who with Elahi Bux and Private Sonnak Tannak (nak was a characteristic suffix to Mahar names that dates from their service in Shivaji's armies) all of the 19th Bombay Infantry, fell on the 16th April 1880, in fence of Dubro, post in Afganistan which, when warned that an attack in force was imminent, they refused to abandon and most gallantly held for three hours against three hundred of the enemy, many of whom were slain. Eventually when all their ammunition was expended they dashed into the amidst of their foes and died fighting. The odds are even greater than at Koregaon and the heroes were of the same castes, a Europen, a Muslim and the Mahar, who had made up the Bombay Regiments from the start".

- ॲड.राज जाधव, पुणे...!
(संदर्भ - Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches, Val 17, Part III, Page - 36, The Mahar MG Regiment, Page - 8-9, अस्पृश्यांचा लष्करी पेशा )
--------------------------------------------------------------------------------------------



2] सैन्यात इन्फ्रंट्री नावाचा जो प्रकार असतो त्यात सैनिक फुटसोल्जर्स असतात. जमीनी युद्ध लढतात. थेट समोरच्या सैन्याशी आमनेसामने भिडतात. महार रेजिमेंट ही अशीच एक लाईन इंन्फ्रट्री. १८१८ सालचं भीमा कोरेगाव येथील शौर्य गाजवल्यानंतर ब्रिटिशांनी या महार रेजिमेंटच्या शूर सैनिकांच्या सन्मानात कोरेगाव येथे स्तंभ उभारला. मानवंदना दिली. तेव्हापासून आजपर्यंत या रेजिमेंटने भारतीय सैन्याला अमूल्य योगदान दिलेले आहे. 


बॉर्डर स्काऊट नावाचा एक प्रकार असतो. ज्यात असे सैनिक रिक्रूट होतात ज्यांचा थेट बॉर्डर आणि आसपासची लोकवस्ती यांच्याशी थेट संबंध असतो. युद्ध काळात लोकांचे मोबीलायजेशन करण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याजवळ असते. महार रेजिमेंटने फाळणीनंतरच्या काळात सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. याचे कारण एकच... महार रेजिमेंटमधल्या सैनिकांना सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांशी संपर्क करण्यात कसलीच तुच्छता नव्हती. सीमावर्ती भागात चांभार जातीसमुहाचे लोक सर्वात जास्त राहतात. फार पुढे बोलणे योग्य नाही. 


महार रेजिमेंटचे जनरल केव्ही कृष्णराव आणि जनरल कृष्णस्वामी सुंदरजी या दोन अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केलेले आहे. आजपर्यंत या रेजिमेंटकडे १ परमवीर चक्र, ४ महावीर चक्र, २९ वीर चक्र, १ किर्ती चक्र, १२ शौर्य चक्र, २२ विशिष्ट सेवा पदक आणि ६३ सेना पदक मिळवलेले आहेत. 


काठेवाड- १८२६), मुलतान -१८४६- व दुसऱ्या इंग्रज −अफगाण युद्धात - १८८०, भारत पाकिस्तान युद्ध जांगारे येथील भीषण युद्ध - १९४८, नौशहर, उरी, चकोथी, टिटवाल, द्रास, कारगिल या ठिकाणी जमीनीवर लढल्या गेलेल्या सर्व युद्धात महार रेजिमेंट फ्रंट फायटर होती. बेल्जियन कांगो या देशात कटांगा येथे झालेल्या युद्धात शौर्य गाजवून शांतता प्रस्थापित केली, १९६१ सालचा गोवा मुक्तीसंग्राम, १९६२ साली चीनी सैन्य ज्या पाच चौक्यांवरून मागे फिरले होते त्या चौक्या होत्या चुशूल, दौलतबेगोल्डी, लडाख, अक्साई चीन व कार्मेग... या ठिकाणी महार रेजिमेंटच्या सैनिकांनीच निकराचा प्रतिकार करून चौक्या राखल्या होत्या. 


१९६५ सालच्या युद्धात कच्छमधल्या सरदारचौकी, व्हिगोकोट येथील युद्धे कश्मिर येथील संबा, जोरियान, खेमकरण, अस्सल उत्तर येथील युद्धे, 
पुन्हा १९७१ सालच्या युद्धात बांग्लादेश, पंजाब व काश्मीर येथील युद्धे, हरहरकलान, पर्वतअली, कैयान, शेजरा, ठाणपीर, शमशेरनगर, मौलवी बाझार, सिल्हेट, बेलोनिया व चट्टग्राम या ठिकाणी झालेल्या भीषण युद्धात शत्रुंना परतवून लावले महार रेजिमेंटने.


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण लष्कारात शिख सैनिकांनी विद्रोह केला होता तेव्हा पुणे मुंबई अंबाला अशा महत्त्वाच्या लष्करी छावणीमध्ये महार सैनिकांनी बंडखोर शिख सैनिकांना पकडून जेरबंद केले होते.


सुरूवातीच्या काळात महार सैन्याचा दबदबा इतका मोठा जबरदस्त होता की मराठा बटालीयनच्या अधिकारपदी सुद्धा महार रेजिमेंटचेच अधिकारी होते. हा इतिहास आहे. 
हे लिहीण्याचा प्रपंच याचसाठी की, सालाबादप्रमाणे, महार रेजिमेंटला देशद्रोही ठरवण्याचे काम पुन्हा चाळीस पैसे गँगकडून सुरू आहे. अनेक रिकाम्या डोक्यांना इतिहास ठाऊक नाही. त्यांच्यासाठी हे थोडेसे संक्षिप्त दिले आहे. सीमावर्ती भाग आपल्याला थोडाथोडका नाही तर तब्बल १२ ते १३ हजार किमीचा आहे. अगदी राजस्थानपासून ते थेट ईशान्य भारताच्या टोकापर्यंत बॉर्डर स्काऊट बनून लोकांचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आजही सैन्याला महार रेजिमेंटच सर्वात बेस्ट पर्याय वाटत आला आहे. 
असो... 
सप्रेम जय भीम... 
बोलो हिंदूस्तान की जय... हे घोषवाक्य आहे महार रेजिमेंटचे.

- Vaibhav Chhaya...✍️💓
-----------------------------------------------------------------------------------------

3] महार लोकांबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांचे गौरवोद्गार...💗

मि खरोखरच महार लोकांचा अतीश्य ऋणी आहे. महार लोकांच्या बळावरचं मि हे करु शकलो , हा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे . महार रणशुर आहेत ते लढू शकतात , त्याग करु शकतात . इतर कोणतिही जात करु शकत नाही. तेंव्हा माझ्या दृष्टीने त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.मी येथे जातीवाचक उच्चार करतो याबद्दल कोणी आरोप करील.पण मी या शुरविर जातीत जन्माला आलो याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो.....

-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर....✍📚
【Ref: २८ आँक्टोबर १९५४ मुंबई,जाहीर सभा..जनता ६ नोव्हेंबर १९५४ 】
----------------------------------------------------------------------------------


इंग्रजांच्या [ईस्ट इंडिया कंपनीच्या] फौजेत `महार फलटणी' होत्या, यावरून `दलित देशाविरुध्द लढले, त्यांनी देश गुलाम करण्यास मदत केली' असे आरोप करणाऱ्यांना माझे उत्तर आहे की, "जर अस्पृश्यांच्याकडून देशद्रोह घडला असेल तर त्याचे पाप ज्यांनी अस्पृश्यता निर्माण करून दलितांना गुलाम केले त्यांच्यावर आहे. सवर्ण समाजाने अस्पृश्यतेच्या रूपाने 'मानवद्रोह' केला. या `मानवद्रोहीं'वर अस्पृश्यांच्या हातून घडलेल्या 'देशद्रोहा'ची जबाबदारी आहे ! [ अस्पृश्यांचा द्रोह मानवद्रोहींविरुध्द होता ]

- विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
【Ref: बहिष्कृत भारत- अग्रलेख, २१/१२/१९२८ ]
------‐-------------‐-------------‐----------------------------------------------


“ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे, पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का ? स्पृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्यामांजरापेक्षा वाईट वागविले म्हणून, पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाइलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे.” 

- विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
[Ref: दि.०१/०१/१९२७...!]
-----------------------------------------------------------------------------------



4] बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युटीव कॉन्सिलच्या डिफेन्स अॅडवायझरी कमिटीवर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले. १ ऑक्टोबर १९४१ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियनची स्थापना बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियन ची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टीनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्यावेळेस महार रेजिमेंट च्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगावचा जयस्तंभ असणारे चिन्ह व त्यावर "World Mahar" कोरण्यात आले. हे चिन्ह दुस-या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते. जे प्रत्येक महार बटालियनच्या सैनिकांच्या डोक्यावर पराक्रमी विजय चिन्ह म्हणून शोभून दिसत होते. तिसरी महार रेजिमेंट बटालियन बेळगाव, कर्नाटक येथेच १९४२ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल कम्बिएर आणि मेजर सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली.द्वितीय महायुद्धाच्या वेळी पहिली व तिसरी महार रेजिमेंट North - West Frontier Province च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली. तर दुसरी आणि २५ वी बटालियन देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. द्वितीय महायुद्धाच्या काळात महार बटालियन बर्मा campaign मध्ये सैन्यात प्राणपणाने लढली.या पलटणींनी भारताच्या सीमासंरक्षण केले. तसेच जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन (म्यानमार) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली जी मोहीम अतिशय धोकादायक आणि शौर्य पणाला लावून लढायची होती त्या मोहिमेत महार बटालियनचा वापर केला गेला. यावरून सैन्यातील महार बटालियन चे महत्व लक्षात घेण्यासारखे आहे. या मोहिमेत ५ महार बटालियनचे सैनिक शहीद झाले. त्याच बटालियन च्या एका ऑफिसरला त्याच्या शौर्यासाठी गौरविण्यात सुद्धा आले होते. १ ऑक्टोबर १९४६ ला महार रेजिमेंट मशीनगन रेजिमेंट म्हणून नावारूपास आली. 'महार रेजिमेंट' चे 'महार मशीनगन रेजिमेंट' असे नवीन नाव देण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट'चे केंद्र कामठी,नागपूर येथेच स्थापन करण्यात आले. मात्र यावेळी 'महार रेजिमेंट'च्या टोपीवरील बिल्ल्यावरील चिन्हात बदल करण्यात आले.बदललेल्या चिन्हात भीमा कोरेगावच्या स्तंभावर Cross Wicker मशीनगनचे चिन्ह कोरण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट'च्या ३ बटालियननी पंजाब च्या सीमावर्ती प्रदेशात पंजाब सीमा सैनिक दलात काम केले. १९४७ला भारताच्या फाळणीच्या वेळी संरक्षण शरणार्थी म्हणूनही 'महार मशीनगन रेजिमेंट' बटालियनने काम केले.पंजाब प्रांतात सीमा सुरक्षा दल म्हणून काम करतांना 'महार मशीनगन रेजिमेंट' ने आपले शौर्य पणाला लावून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक गावांना सुरक्षा प्रदान केली होती. महार रेजिमेंट / बटालियन पासून तर 'महार मशीनगन रेजिमेंट' पर्यंतचा हा प्रवास अनेक शौर्य इतिहासांना प्रस्थापित करून गेला. परंतु त्याची नोंद भारतीय जातीय मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या इतिहासाने कधी घेतली नाही हेच दिसून येते. महार बटालियन मधील १, २, ३, ७, ८ आणि १३ या बटालियन या पूर्णपणे महार बटालियन होत्या. ज्यात प्रामुख्याने महार सैनिकांचा समावेश होता. ४, ५ आणि ६ या तीन बटालियन तुकड्यांनी सीमा सुरक्षा दल म्हणून काम केले. ज्या तीन तुकड्या पंजाब प्रांतात सीमावर्ती प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. महार बटालियन च्या १६ व्या तुकडीला ८ व्या पराशुट बटालियन मध्ये बदलण्यात आले होते. १९८१ ला हीच बटालियन यांत्रिक पायदळाच्या १२ व्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. महार बटालियन चे शौर्य सैन्याच्या प्रत्येक विभागात आपे पराक्रम गाजवून गेले. ज्यामुळे महार बटालियनला ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या सैनिक दलामध्येसुद्धा मानाने-सन्मानाने गौरविण्यात आले.आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मान पातळीवर नेउन पोहचविले.जाज्वल्य देशभक्ती आणि देशाचे संरक्षण यात महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार बटालियनने केवळ स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे. १९८७ ला दक्षिण भारतात LTTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती.१३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद् धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. अतिशय अल्प पुराव्यांच्या आधारावर मिळालेला हा महार बटालियन आणि महार सैनिकांच्या योगदानाचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की प्रत्येक भारतीयात महार सैनिकात असलेले धाडस आणि साहस निर्माण झाले. तर या देशावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. इतकेच काय तर देशांतर्गत चालना-या आतंकवादी कारवाया संपुष्टात आणता येईल. गरज आहे ती महार बटालियनच्या सैन्याकडून प्रेरणा घेण्याची. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळवली. महार रेजिमेंटने 9 युध्दक्षेत्र सन्मान आणि 12 रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीरचक्र, 4 कीर्तीचक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युध्द सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीरचक्र, 39 शौर्यचक्र पदक, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे. अशा शूर पराक्रमी दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या महार रेजिमेंटला टीम जागल्या सॅल्युट करते...

- मिलिंद धुमाळे...✍️
https://www.facebook.com/jaaglyaCommunity 
------------------------------------------------------------------------------------------


5] लंडन येथील "नॅशनल आर्मी म्युझियम" मध्ये हा "बिल्ला" जतन करून ठेवलेला आहे...👍



 लंडन येथील "नॅशनल आर्मी म्युझियम" मध्ये हा "बिल्ला" जतन करून ठेवलेला असून, त्याबाबत अशी माहिती लिहून ठेवली आहे की, "भारतातील महाराष्ट्रातील महार समाजातील सैनिक हे ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मीचा मुख्य आधार होते. हा बिल्ला दुस-या महायुद्धाचा असला तरी, त्यावरिल वैशिष्ट्यीकृत स्तंभ हा १८१८ मध्ये झालेल्या कोरेगावच्या लढाईचे स्मरण व युद्धाचा सन्मान करतो, जेथे महार सैन्याने कंपनीला पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करण्यास मदत केली होती, आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ, ईस्ट इंडिया कंपनीने कोरेगावमध्ये 'विजय स्तंभ' उभा केला..."

- ॲड Raaj Jadhav...✍️ पुणे...!
(संदर्भ - by Field Marshal Sir John Chapple Indian Army Collection, location - National Army Museum, Study collection, London)
#भीमाकोरेगाव_सत्य
-------------------------------------------------------------------------------------------


6] फाळणी आणि महार बटालियन...!!



शौर्य... धैर्य... पराक्रम... कर्त्यव्य... माणुसकी... याचे अमूल्य असे उदाहरण...

ऑगस्ट १९४७ मध्ये महार बटालियनला दिल्लीला नेण्यात आले, दिल्लीतील जी मुसलमान कुटुंबे पाकिस्तानात जाणार होती; त्यांना आगगाड्यातून सिमेवर सुरक्षितपणे पोहोचविण्याचे काम बटालियनला करावे लागले. 

२२ आगगाड्यातून २५-३० हजार मुसलमानांना सुरक्षितपणे नेण्याचे अवघड कार्य या जवानांनी केले. या बाबतीत यांना प्राण धोक्यात घालून मुसलमान निर्वासितांचे रक्षण करावे लागले...

याबद्दलची दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत,
११ सप्टेंबर १९४७ ला दिल्लीहून अत्तारीला, आगगाडी मुसलमान निर्वासीतांना घेऊन चालली होती. महार मिडियमगनची एक तुकडी सुभेदार के. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, आगगाडीचे रक्षक म्हणून आगगाडीतील निरनिराळ्या डब्यात बसवली होती. रेल्वे लाईनवर कोणीतरी अपघाताचे कारस्थान अगोदर केल्यामुळे जलंदर शहराच्या नंतर गाडी रूळावरून घसरली तेव्हा आसपासच्या भागातून शेकडो हिंदू व शीख लोक हातांत काठ्या, तलवारी व भाले घेऊन मुसलमान प्रवाशांना मारण्यासाठी धावून आले. 

सुभेदार गायकवाड यांनी आपल्या सैनिकांना या हल्लेखोरांवर गोळ्या झाडण्याचा हुकूम दिला. सर्व डब्यांतून दोन्ही बाजूनी गोळ्यांचा वर्षाव होत असलेला पाहून हल्लेखोर पळून गेले व दूर उभे राहिले. हे हल्लेखोर परत गाडीवर चाल करतील हे ओळखून सुभेदाराने गार्डाला आगगाडी परत जालंदर शहराला नेण्यास हुकूम दिला. जालंदरच्या स्टेशनावर पुनः दुसऱ्या थव्याने आगगाडीवर हल्ला केला. तेव्हांही सुभेदाराने सैनिकांना गोळीबाराचा आदेश दिला, तेव्हा हल्लेखोरांचा जमाव दूर पळाला व तेथे उभे राहून आम्ही मुसलमानांना कापणार अशा घोषणा देऊ लागला. असा हा प्रकार तीन दिवस चालू होता. मुसलमान प्रवासी आगगाडीच्या डब्यात जीव मुठीत घेऊन तीन दिवस अन्न-पाणी व झोप यांच्याशिवाय गप्प बसून राहिले होते. मुले, भूक व तहान यांनी व्याकूळ होऊन रडत होती. सुभेदाराने, स्टेशनपासून दूरच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी सैनिकांच्या दोन तुकड्या पाठविल्या. त्यांनी जेव्हां पाणी आणले तेव्हां ते सर्व प्रवांशांना पिण्यास दिले. सुभेदार गायकवाड यांनी प्रसंगावधान व धैर्य दाखवून निर्वासित प्रवासी मुसलमानांचे प्राण वाचविले. चौथ्या दिवशी आगगाडी, रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यावर जालंदरच्या पुढे निघून इष्ट स्थळी मुसलमान प्रवाशांना पोहचविले. 

.........................................................................
दुसरी गाडी मुसलमान प्रवाशांना घेऊन त्याच मार्गाने चालली होती, त्यावेळी जोराचा मुसळधार पाऊस आला. पावसामुळे जालंदरजवळची रेल्वे लाईन उध्वस्त झाली. सुभेदार के. मोरे यांच्या नेतृत्वाखाली या गाडीचे रक्षण करणेचे काम होते. सुभेदार के. मोरेही गाडीत होतेच. जालंदरला गाडी असलेली पाहून शेकडो हिंदू व शीख हल्ला करण्यास धाऊन आले आणि सांगू लागले तुम्ही तुमचे सैनिक बाजूला घ्या आम्ही सर्व मुसलमानांची कत्तल करतो." 

सुभेदार मोरे उत्तरले की तुम्ही हल्ला केला तर मी माझ्या सैनिकांना तुमच्यावर गोळ्या झाडण्याचा हुकूम देईन व तुम्हां सर्वांना भुईसपाट करीन, 

सुभेदार मोरे हल्लेखोरांचे व यांचे कडाक्याचे बोलणे १५-२० मिनिटे चालले हल्लेखोर ऐकत नाहीत असे पाहून मोरे यांनी सैनिकांना फायरींगसाठी तयार व्हा असा जोरात ओरडून हुकूम दिला; तेव्हा हल्लेखोर पळून गेले. 

रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यानंतर गाडी, ५ दिवसांनी इष्ट स्थळी पोहोचली. या दोन महार लष्करी पथकांच्या नायकांनी आपल्या कर्तव्यावर नितांत निष्ठा ठेऊन हजारो-लाखों मुसलमानांना पाकिस्तानच्या हद्दीवर नेऊन सोडले.

तत्कालीन परिस्थिती अतिशय भयावह अशी होती, दोन्ही बाजूकडून अमर्याद अश्या कत्तली सुरू असताना... स्वत:चा जीव धोक्यात घालून महार बटालियनने आपल्या कर्तव्यात कोणताही कसुर केला नाही...
- ॲड.राज जाधव, पुणे...!
( संदर्भ - अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ क्र.७२-७३)
-------------------------------------------------------------------------------


7]  महार जमात तशी शूर जमात आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील त्यांचा पराक्रम असाच देदीप्यमान आहे. 1947 साली पाकिस्तानने जेव्हा काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा डॉ. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून महार बटालियन पाठविण्यात आली. महार बटालियनने काश्मीर वाचविण्यासाठी जो पराक्रम केला आहे, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी करावी लागते. या महार बटालियनच्या शूर सैनिकांनी काश्मीर मुक्तीसाठी जो पराक्रम दाखविला, तो तर देशभक्तीचा प्रेरणादायक इतिहास आहे. 'त्यांनी (महार बटालियनने) काश्मीरच्या समरांगणात एवढी मर्दुमकी दाखविली की, लष्करी अधिकाऱ्यांनी व खुद्द सरसेनापतींनी 'महार सैनिक, हिन्दी सेनेतील उत्कृष्ट लढवय्ये आहेत' असेच गुणगौरवपर उद्गार जाहीरपणे अनेक वेळा काढले.....24 डिसेंबर 1947 रोजी झांगर येथे भीषण लढाई झाली. बंदुकीच्या गोळया संपल्यानंतरही शूर महार सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला मुष्टियुध्दाने रोखले. यामुळे त्यांना एक महावीरचक्र आणि पाच वीरचक्र प्राप्त झाली... जय भिम

[Ref:चांगदेव खैरमोडे खंड 9, पृष्ठ 276】
---------------------------------------------------------------------------------


8]  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवनीतला एक प्रसंग.... आठवण_बाबांची..!! सन १९४९ मध्ये डॉ.आंबेडकर या बटालीयनला भेट देण्यास काश्मीरला गेले.("काश्मीरच्या सीमेवर आमच्या दुसऱ्या महार बटालीयनने शौर्य व धैर्याचा जो लढा दिला.तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले.कुणी सांगावे आमची ही बटालीयन काश्मीर सीमेवर लढली नसती तर संपूर्ण काश्मीर,पाकीस्तानच्या घशात गेले नसते का?") आमच्या बटालीयनने दाखवलेली वीरश्री पाहून बाबासाहेब गहिवरले.... 

बाबासाहेब मिलिटरी प्रांगणात आले.साऱ्या सैनिकांच्या चेह्ऱ्यावर आनंदाची छटा नाचत होती.बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघण्याचा लाभ त्यांना घडला होता.डॉ.आंबेडकरांनी आपली प्रेमळ नजर चोहीकडे फिरवली.प्रत्येक सैनिक जवान आदराने नतमस्तक होउन उभा होता.आणि त्याचक्षणी बाबासाहेबांच्या टपोऱ्या डोळ्यात आसवे तरळली.एका क्षणात वातावरण गंभीर झाले. एक जवान बुटांचा खटखट आवाज करत बाबासाहेबांकडे येतो आणि म्हणतो... बाबा ! काय झाल ते तत्काळ सांगा आम्ही तुमच्याकरिता रक्ताचे पाट.... परंतु त्या सैनिकाचे बोलणे संपण्यापुर्वीच बाबा म्हणतात... तस काही नव्हे रे !त्याच असं आहे...काही वर्षापूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी इंग्रजांनी हलक्या दर्जाची कामे करण्याकरता आपली माणसे देण्याबद्दल मला लिहिले होते...मी त्यांना खडसावून सांगितले की.....माझी माणसं शूरवीर आहेत.शत्रू सैन्याशी दोन हात करण्यास अन्य जमांतीपेक्षा त्यांच्यात अधिक दम आहे.तुम्ही माझ्या लेकरांना दोन हात करण्याची संधी तर देऊन पहा.आणि इंग्रजांनी माझी शिफारस पाहून कामठीमध्ये पहिल्या महार बटालियनची स्थापणा केली.त्यानंतर सुमारे दोन वार्षानंतर दुसरी महार बटालियन स्थापन करण्यात आली.तुम्ही लोकांनी माझे शब्द खरे करून दाखविले,हे पाहून मला अत्यानंद होत आहे.माझ्या डोळ्यात तरळणारी हि आसवे समाधान व आनंदाची आहेत.बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून सर्वचजण गहीवरले. असे होते आपले बाबा समाजासाठी अहोरात्र फक्त आणि फक्त समर्पनच...!!!  

-पोस्ट by: त्रिरत्न कांबळे...✍️ 
जय भिम....
------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान....व हिंदू कोड बिल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर....!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐