डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली...!!!




डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?यशवंत मनोहर...!!!


डॉ. यशवंत मनोहर विद्रोही कवी डॉ. यशवंत मनोहर यांची ‘डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?’ ही पुस्तिका २००५ साली प्रकाशित झाली आहे. नागपूरच्या युगसाक्षी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेतील हा संपादित मजकूर…
मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर ‘मनुस्मृती’ एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी याच परिषदेत नव्या समताभारताच्या निर्मितीसाठी उपकारक ठरेल अशा नव्या स्मृतीची मागणी केली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कीर, नववी आवृत्ती १९९२, पृ. १०५-१०६). 

या ठिकाणीच मांडल्या गेलेल्या ठरावातला दुसरा ठराव ‘मनुस्मृती’च्या संदर्भातला आहे. तो ठराव असा : “शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी ‘मनुस्मृती’तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.” (बहिष्कृत भारत आणि मूकनायक : महाराष्ट्र शासन १९९०, पृ. १६३-१६७)

‘मनुस्मृती’ जाळण्याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी १९२८च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकातही दिलेले आहे. ‘स्वराज्य’ या पत्राचे संपादक रा. भुस्कुटे यांनी ‘मनुस्मृती’ जाळण्याच्या संदर्भात काही आक्षेप घेणारे पत्र बाबासाहेब आंबेडकरांना पाठविले होते. त्यातील आक्षेपांना बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – 

“आम्ही जे ‘मनुस्मृती’चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही.व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. १५८ : २)

‘रिडल्स इन हिंदुइझम’ (खंड ४) या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच ‘MANU’S MADNESS’ म्हणजे ‘मनूचा वेडेपणा’ या नावाने लिहिले आहे. इथेही त्यांनी ‘मनुस्मृती’ची चिकित्सा केलेली आहे. बाराव्या खंडातही (पृ. ७१९-७२४) डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ची समीक्षा केलेली आहे. काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की, ‘मनुस्मृती’ ही गतकाळात होऊन गेली. आता हिंदूंच्या वर्तनाशी तिचा काहीही संबंध नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, असे समजणारांची ही मोठी गफलत आहे. त्यांनी लिहिले आहे – “Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a ‘living past’ and therefore as really present as any present can be.” (पृ. ७१९)

या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार ‘मनुस्मृती’ हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की, ‘मनुस्मृती’ची निर्मिती इ.स.च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्परतुच्छता या गोष्टी केवळ आज कायम आहेत असे नाही, तर त्या आज अधिक कडवे रूप धारण करीत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ जाळली त्याची ही अशी कारणे आहेत. ‘मनुस्मृती’ या नावाचे एक पुस्तक जाळणे, ‘मनुस्मृती’ या नावाची एक प्रत जाळणे, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश नाही. ‘मनुस्मृती’ जाळणे याचा अर्थ मनुस्मृतीने लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळणे असा आहे. ‘मनुस्मृती’ने लोकांच्या मनावर उच्चनीचतेचे संस्कार केलेले आहेत आणि या संस्कारापासून ती लोकांना मुक्तच होऊ देत नाही. या देशातील लोकांची मने ‘मनुस्मृती’ने विषमतेशी पक्की बांधून ठेवली आहेत. त्यामुळे लोकांना समता ही गोष्ट अस्तित्वात असू शकते असे वाटतच नाही. म्हणूनच ‘मनुस्मृती’ जाळणे म्हणजे लोकांची ही समजूत जाळणे होय. याप्रकारे लोकांची मने बदलणे, लोकांचे मानसशास्त्र बदलणे अर्थात मनांतर करणे हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश आहे. समता जाळणारा हा ग्रंथ जाळणे, लोकांची माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळणे, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश आहे.

माणसांमध्ये उच्चनीचतेचे हलाहल पसरवणारा मनूचा कायदा आता चालू ठेवणे योग्य नाही. मानवी मूल्यांच्या दृष्टीने, मानवअधिकाराच्या प्रतिष्ठेसाठी हा जन्मजात विषमता सांगणारा, सनातन म्हणजे विश्वारंभापासूनचा आणि तो कधी बदलू नये या हेतूने सांगितलेला हा कायदा यापुढे चालणे योग्य नाही. समतेला, स्वातंत्र्याला, बंधुतेला आणि सामाजिक न्यायालाही जन्मालाच येऊ न देणारा हा कायदा जाळून टाकायलाच हवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तीव्रपणे वाटले आणि त्यांनी मनूच्या विषमतेला आग लावली. पवित्र मानला गेलेला हा विषमतेचा कायदा जाळला जाऊ शकतो, हे लोकांच्या मनावर बिंबवावे आणि त्यांच्या मनात स्वतंत्र विचार करण्याची, समतेची प्रस्थापना करण्याची ताकद जागवावी, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे...

- डॉ यशवंत मनोहर सर...✍️💗
-------------------------------------------------------------------------------------------------


2] बाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?- प्रा. हरी नरके...!!!




मनुस्मृती हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून ते एक कायद्याचे पुस्तक होय. बाबासाहेब म्हणतात, मनुस्मृती वॉज लिगल ॲण्ड पिनल कोड. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्याप्रमाणे ब्रिटीशांचे अन्याय कायदे आम्ही मानत नाही असे सांगण्यासाठी कायदेभंगाचे आंदोलन केले गेले तसेच आंदोलन म्हणजे मनुस्मृतीचे दहन करणे होय. विदेशी कापडांची होळी करणे जसे जन आंदोलन होते तसेच मनुस्मृती या माणूसघाण्या पुस्तकाची प्रत जाळण्याचे कृत्य प्रतिकात्मक होते. बाबासाहेब पुस्तकप्रेमी असताना त्यांनी पुस्तक कसे जाळले? मनुस्मृतीत काहीच चांगले नव्हते का? मनुचा काय दोष, त्याने तर तत्कालीन कायद्यांचे संकलन केले, मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता, अशा नानाविध युक्तीवादांद्वारे या गलिच्छ पुस्तकाचे व कर्त्याचे समर्थन केले जाते.
कोण असतात हे लोक?


१. मनुस्मृतीचे पिढीजादा लाभार्थी,
२. अशा लाभार्थ्यांकडे बुद्धी गहान टाकलेले स्त्री किंवा पुरूष = पाळीव पोपट,
३. आंत्यंतिक अज्ञानी, सनातनी, विकृत, वेडे, 



मनुस्मृतीचे समर्थन करणारा कुणीही प्राणी माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा असत नाही. अशा विकृतांना चार जोडे मारून एक मोजला पाहिजे. अशी घाण दूरच ठेवलेली बरी. पिढ्यानपिढ्या वरील ३ वर्गात मोडणार्‍या या इसमांची किंव किंवा किळसच करायला हवी. मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, सराईत गुन्हेगार किंवा राष्ट्रद्रोही इसमांच्या वर्तनाचे समर्थन करणे होय. 



मूठभर त्रैवर्णिक पुरूषांना उच्च आणि तमाम बहुजनांना नीच मानणारा हा कायदा, सरसकट समस्त स्त्री वर्गाला गुलाम मानणारा हा मनू, उच्चवर्णियांचे हितरक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ तिनदाच काय पुन्हापुन्हा जाळायला हवा. जोपर्यंत मनुची पिळावळ जिवंत आहे, तोवर नियमितपणे जाळायला हवा. नाकारायला हवा. समर्थकांच्या तोंडावर थुंकण्यासाठी गटारात फेकायला हवा.

बाबासाहेबांना कुठे संस्कृत येत होते? त्यांना काय माहित मनुस्मृतीत काय होते? असले साळसूद प्रश्न विचारणार्‍या हरामखोरांना जोड्यानेच मारायला हवे. भडव्यांनो, तुमच्या बापजाद्यांनी त्यांना संस्कृत शिकू दिले नाही. त्यांना शाळेत त्याऎवजी पर्शियन शिकावे लागले. तरिही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा मान्यवरांच्या खाजगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली...


ज्या माणुसकीच्या शत्रूने म्हणजे मनूने [ ती व्यक्ती असो, संस्था असो, मठ असो, ब्राह्मण किंवा क्षत्रिय असो ] गटारगंगा पसरवली, ज्या नीच प्रवृत्तीने ८५ % स्त्री शूद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली, उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही, संडासला बसतानाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून बसावे, ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक तर शूद्राचे नाव किळसवाणे ठेवावे, स्त्री- शूद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे, स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती.



काय आहे मनुस्मृतीत?
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[9/46]



सार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व सामाजातील स्त्रिया आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी वाचायला हवा.
संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे.सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे"
मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत."
या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत.
आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत.
मनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत.
बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]



" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [2/13]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [2/15]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [3/8]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ 3/11]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [3/56]
" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [4/43]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [5/47]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [5/48]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [5/49]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [5/150]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [5/155]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [5/162]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [5/166]
" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [5/168]
" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [6/2]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ 6/3]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [9/13]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]
" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [9/18]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[9/46]
आय हेट मनुस्मृती. आय सॅल्युट बाबासाहेब, कुरूंदकर, गोखले, साळुंखे ॲण्ड कौशल्यायन.

२५ डिसेंबर १९२७ ला पहिल्यांदा, भारतीय राज्यघटनेच्या १३ व्या कलमाद्वारे दुसर्‍यांदा आणि बौद्ध धर्म स्विकारून तिसर्‍यांदा भारतरत्न बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली.
मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, राष्ट्रद्रोही इसमांचे समर्थन करणे होय. अशांना जवळपासही फिरकू देऊ नका. हे प्लेगचे उंदीर जाळलेलेच बरे. कारण ते निकोप आरोग्याला घातक आहेत. भयंकर व्हायरस आहेत. त्यातनं साथीचे रोग पसरतात.

- प्रा हरी नरके सर....✍️💗
२५ डिसेंबर, २०१९
 

-----------------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!